तपास अधिकारी काय बदलता? आधी एसीपीची उचलबांगडी करा!

अरविंद बन्सोड मारहाण- मृत्यू
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
तपास अधिकारी काय बदलता? आधी
एसीपीची उचलबांगडी करा!

■ नितीन राऊत, वर्षा गायकवाड, संजय बनसोडे यांची प्रतिष्ठा पणाला ■

========================
◆ दिवाकर शेजवळ ◆
========================

===========================
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बरेच लांबणीवर गेले आहे. 22 जून ऐवजी ते आता 3ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. त्यात कोरोनाच्या मुकाबल्याचा विषय अर्थातच अग्रक्रमावर राहिला असता यात शंका नाही. पण त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यात अरविंद बन्सोड या बौद्ध तरुणाचा मारहाणीनंतर झालेला संशयास्पद मृत्यू आणि पुण्यात विराज जगताप या कोवळ्या बौद्ध तरुणाचा प्रेम प्रकरणातून झालेला खून ही दोन्ही प्रकरणे या अधिवेशनात गाजणे अटळ होते. मात्र आता ऑगस्टपर्यंत ही प्रकरणे गार पडतील, अशा भ्रमात सरकारने राहणे योग्य ठरणार नाही. सध्या कारवाईबाबत गृह खात्याकडून चाललेला देखावा आणि दिशाभूल थांबली नाही तर कदाचित अधिवेशनाआधीच आंबेडकरी समाजाच्या प्रखर आंदोलनाला ते निमंत्रण ठरेल, हे विसरता कामा नये.

राज्याचे गृह खाते हे राष्ट्रवादीकडे असून अरविंद बन्सोड यांच्या मृत्यूचे प्रकरण तर साक्षात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जिल्ह्यात घडले आहे. शिवाय, या प्रकरणातील आरोपी आणि त्याच्या कुटुंबाला राष्ट्रवादीचीच राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यातच या प्रकरणात पोलीस अधीक्षक आणि जलालखेडा पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी बजावलेली भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे नागपूरमधील ऊर्जा मंत्री नितीन राऊत, शालेय शिक्षण मंत्री प्रा वर्षा गायकवाड आणि राष्ट्रवादीचे बौद्ध राज्य मंत्री संजय बनसोडे यांची प्रतिष्ठा, प्रतिमा, राजकीय वजन हे सारे काही या प्रकरणात पणाला लागणार आहे.

नागपूर आणि पुण्यातील दोन होतकरू बौद्ध तरुणांचे बळी जाण्याच्या घटनांमुळे दलित अत्याचाराचा मुद्दा राज्यात तापला आहे. बौद्ध समाजात तीव्र असंतोष आणि संताप खदखदत आहे. कोरोनाचे भय आणि लॉक डाऊनचे निर्बंध नसते तर एव्हाना त्याचा स्फोट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले असते. तसे काही अद्याप घडले नाही, ते बरेच झाले. मात्र त्याचे श्रेय महाविकास आघाडीचे सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत आंबेडकरी जनतेतील आशावादी दृष्टिकोनाला द्यावे लागेल.

……पण अरविंद बन्सोड याला मुळात मारहाण का झाली,हे मला कळू शकेल काय असा सवाल डॉ शशिकांत लोखंडे यांच्यासारख्या उच्च विद्याविभूषितांसाहित बऱ्याच जणांना पडला आहे. तशी विचारणा अनेकांनी सोशल मीडियावर जाहीररीत्या केली आहे. या प्रकरणात न्यायालयीन लढाईसाठी सरसावलेले ऍड जय गायकवाड यांनीही ‘गॅस एजन्सीच्या फलकाचा मोबाईलने साधा फोटो घेतला, हे मारहाणीचे कारण कसे ठरू शकते?’असा सवाल फेसबुक लाईव्हवर विचारला आहे.थोडक्यात बन्सोड यांना झालेल्या मारहाणीच्या विश्वसनीय कारणाबद्दल सगळेच अंधारात आहेत. मग त्यामागचे खरे कारण आहे तरी काय?

अरविंद बन्सोड यांना आणि त्यांचा मित्र गजानन राऊत यांना मिथिलेश उर्फ मयूर उमरकर आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्या गॅस एजन्सीच्या कार्यालयात मारहाण केली हे खरे आहे. अन ही मारहाण गॅस एजन्सीच्या फलकाचा फोटो काढल्यावरून झाली, हेसुद्धा खरे आहे.पण तो फलक गॅस एजन्सीच्या सिलेंडरसाठीच्या गोदामावर आहे. अन ते गोदाम भाड्याच्या ठिकाणी जनतेच्या सुरक्षिततेसाठीचे सारे नियम धुडकावून भर वस्तीत थाटण्यात आलेले आहे. बन्सोड- राऊत यांनी त्याचे फोटो काढण्यामागे तेच कारण असावे, असा ग्रह झाल्याने मिथिलेश उमरकर याचे धाबे दणाणले नसते तरच नवल. पण गॅस एजन्सीचे धोकादायक गोदाम नियम फाट्यावर मारुन राजरोसपणे उभे आहे, ही गोष्ट या प्रकरणात दडवण्याचा प्रयत्न उमरकर कुटुंबीय आणि जलालखेडा पोलिसांनी केला आहे.

आता या प्रकरणात जलालखेडा पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी बदलला आहे.ही गोष्ट म्हणजे बन्सोड याला न्याय देण्यासाठी सरकारचे खूप मोठे पाऊल आहे,असा आभास त्याचा डांगोरा पिटत वृत्तवाहिन्या निर्माण करत आहेत. तो तपास काटोल येथील उप विभागीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. हा काही घेतलेला खास निर्णय वगैरे नाही. दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई झाल्यावर गुन्ह्याचा तपास संबंधित पोलीस ठाण्याकडून उप विभागीय अधिकाऱ्यांकडेच सोपवला जात असतो. मग यात नवे आणि वेगळे असे घडले तरी काय? उलट बन्सोड प्रकरणाचा तपास काटोलच्या उप विभागीय अधिकाऱ्यांकडे गेला म्हणजे थेट गृह मंत्र्यांच्या ‘घरात’ गेला, असे म्हणणे अधिक उचित ठरेल. वास्तविक या प्रकरणात तपास अधिकारी बदलण्याची नव्हे तर, नागपूर पोलीस अधिक्षकांचीच विनाविलंब तेथून उचलबांगडी करण्याची खरी गरज आहे.

नागपूर ग्रामीण पोलीस संशयाच्या भोवऱ्यात
************************
1) नागपूर जिल्ह्यातील पिंपळदरा या गावातील ( तालुका : नरखेड) अरविंद बन्सोड (३०वर्षे) या बौद्ध तरुणाला मेंढला पंचायत समितीचा सदस्य असलेल्या मिथिलेश उर्फ मयूर बंडू उमरकर याने आणि त्याच्या साथीदारांनी दिनांक २७ मे २०२० रोजी झालेल्या बेदम मारहाण केली. त्यानंतर बन्सोड याचा संशयास्पदरित्या दोन दिवसांनी २९ मे रोजी रुग्णालयात मृत्यू झालेला आहे. ही घटना थडी पवनी या गावात घडली आहे.

2) या प्रकरणात मयत बौद्ध तरुणाची मारहाणीनंतर मेडिकल का करण्यात आली नाही?

3) अरविंद बन्सोड याचा मृत्यू मारहाणीनंतर दोन दिवसांनी म्हणजे 29 मे रोजी रुग्णालयात झाला. या कालावधीत त्याचा मृत्यूपूर्व जबाब पोलिसांनी का घेतला नाही?

4) मयत बौद्ध तरुणाला झालेल्या मारहाणीच्या तक्रारीनंतर लगेच एफआयआर नोंदवून घेण्याऐवजी थेट मृत्यूनंतरच गुन्हा दाखल करण्याची भूमिका जलालखेडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱयांनी कोणाचे आदेश आणि दबावाखाली घेतली?

5) या घटनेची/ प्रकरणाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना जलालखेडा पोलिसांनी घटना घडल्यानंतर दिली की गुन्हा दाखल केल्यानंतर दिली? त्यानंतर त्यांनी या प्रकरणात नेमकी काय भूमिका बजावली?

6) बौद्ध तरुणांच्या या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात अनुसूचित जाती अत्त्याचार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाईला फाटा देऊन आयपीसीच्या कलम 306 आणि 34 अनवये कारवाई करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षकांच्या पातळीवर की स्थानिक पोलीस ठाण्याच्या पातळीवर घेण्यात आला?

7) लगेच जामीन मिळण्यास वाव असलेली कलमे लावण्याची कारवाई करण्याआधी आरोपी मिथिलेश उर्फ मयूर उमरकर याला पसार होण्यास रान कोणी मोकळे सोडले?

या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी अरविंद बन्सोड मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत वा किमान विशेष महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील एस आय टी म्हणजे खास तपास पथकाने करण्याची नितांत गरज आहे. आंबेडकरी चळवळीतील अनेक संघटनांनी तीच मागणी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडे केलेली आहे.पण त्यादृष्टीने आश्वासक हालचाली होताना अजून तरी दिसत नाहीत.
●●●●●●●●●●●●●●●●●●●

Next Post

मानवी हक्काचा सेनापती ते संविधान रक्षक.-महेश भारतीय

शनी जून 13 , 2020
मानवी हक्काचा सेनापती ते संविधान रक्षक. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ महेश भारतीय-भाष्य प्रकाशन मुंबई ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ नुकतेच न्यायमूर्ती सुरेश यांचे वृद्धापकाळाने निधन झाले मानवी हक्क आणि संविधान संरक्षण न्यायमूर्ती म्हणून त्यांची ख्याती होती आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी विचारधारेचा त्यांच्यावर प्रभाव होता ते त्या विचारधारेला धरून […]

YOU MAY LIKE ..