आरक्षण Reservation म्हणजे नक्की काय?.राजर्षी शाहूमहाराजानी ते का दिले?.

आरक्षण Reservation म्हणजे नक्की काय?.राजर्षी शाहूमहाराजानी ते का दिले?.

************************************* -सागर राजाभाऊ तायडे -भाडुप,मुंबई

**************************************

  आरक्षणामुळे देश ढवळून निघाला आहे.समतावादी व्यवस्था लोकशाहीच्या मार्गाने सत्तर वर्ष राज्य करीत असतांना विषमतावादी व्यवस्था मनुस्मृतीच्या मार्गदर्शक तत्वाने आरक्षण आरक्षण करीत राजकीय सत्ता स्थानी स्थिर झाली.त्यामुळेच आरक्षण हा विषय प्रत्येक समाजात खुपच जोर धरत आहे. लोक काय वाट्टेल ते याविषयी बोलत आहेत. काही लोक म्हणतात आरक्षण बंद करा, काही म्हणतात आरक्षण आर्थिक आधारावर द्या, काही म्हणतात धर्मावर द्या, काही म्हणतात आम्हाला नाही दिलं तर कोणालाच देऊ नका ! अशी  आरक्षणाच्या मागणीची ओरड सुरु आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी २६ जुलै १९०२ ला आरक्षण कुणाला दिले आणि का दिले हे आज ही मराठा समाज समजू शकला नाही. किंवा समजुन घेण्याची त्यांची इच्छा, क्षमता नाही.मुळात आरक्षण म्हणजे काय ?. याचा लोक सरळसरळ अर्थ लावतात “राखीव जागा” म्हणजे अर्थातच आरक्षण ! यातच लोक गोंधळ करतात. ते स्वतः संभ्रमीत असतात आणि इतरांनाही संभ्रमीत करतात. “आरक्षण” याचा सोपा आणि खरा अर्थ “किमान प्रतिनिधित्वाची संधी होय” (minimum opportunity for representation)_ प्रतिनिधित्व कोणाचे?. तर त्या लोकांचे ज्या लोकांना हजारो वर्षे त्यांच्या मुलभुत हक्कांपासुन, विकासापासुन, वंचित ठेवले त्यांच्या उत्कर्षाची संधी जी नाकारली गेली तो उत्कर्ष साधण्यासाठी दिलेली संधी होय. 
आज २६ जुलै राजर्षी शाहू महाराज यांनी १९०२ ला आपल्या संस्थानात प्रथम आरक्षणाची सुरुवात केली होती.मराठा समाज ज्या पद्धतीने पारायणे,भंडारे,पायी पदयात्रा,पालखी सोहळे आणि ममता दिन साजरे करतात त्याच पद्धतीने शाहूमहाराज यांनी आरक्षण कोणासाठी सुरू केले होते हा सत्य इतिहास का सांगितल्या जात नाही?.राजर्षी शाहू महाराज मराठा समाजाचे होते मग त्यांनी आरक्षण का सुरू केले हे आजचा मराठा तरुण का विचारत नाही?.
      आपल्या देशात जन्मा पासुन आरक्षणाची सुरुवात कोणी केली ?.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ?. अजीबात नाही !. शाहु महाराजांनी ? बिलकुल नाही. महात्मा फुलेंनी ? कदापि नाही. तर याची सुरुवात केली हिंदु धर्माचे शिल्पकार मनु यांनी…!. किती टक्के ? तर १००%. धर्मपंडीतांसाठी, (धर्ममार्तंडांसाठी) संपुर्ण आरक्षण होते.१००% राज्यसत्ता यांची, १००% धर्मसत्ता यांचीच, १००% शेतजमिनी यांच्याच ताब्यात, १००% व्यापार यांच्या तावडीत, १००% संपत्ती यांच्या मालकीची. असे सर्व अधिकार आणि संपत्ती याची मिरासदारी यांच्याकडे हजारो वर्षे होती. आणि बाकीचे लोक इतके मागासलेले, इतके अज्ञानी राहीले कि त्यांच्या शेकडो पिढ्या तशाच राहील्या. त्यांना स्वाभिमान काय असतो, शिक्षण काय असते?.मानवी मुल्ये काय?. जगण्याचा हेतु काय ?. हेच कळलं नाही. आणि याचा परीपाक असा झाली की एकुण संपुर्ण जातीच्या जाती वंचित राहील्या. गुलाम बनल्या..!
       राजपुत्र सिद्धार्थ यांनी विषमतावादी व्यवस्था नाकारली, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचा प्रत्येक ठिकाणी त्यांनी ब्राम्हणाशी वैचारिक चर्चा केली सुसंवाढ साधला.सिद्धार्थाची मते जेव्हा त्यांना पटली तेव्हा त्यांनी त्यांना परिवर्जक बनले.नंतर संघात सामील करून घेतले.महात्मा फुले यांनी शिक्षणातील विषमतावादी व्यवस्था नाकारली.राजर्षी शाहु महाराजांनी प्रशासकीय विषमतावादी व्यवस्था नाकारली, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय विषमतावादी व्यवस्था नाकारली.आरक्षण म्हणजे काय हेच ज्यांना माहिती नाही ते केवळ जातीचा तिरस्कार करण्यासाठी आरक्षण मांगतात ते ही दुसऱ्यांचे ऐकून.देशात क्षत्रिय समाज मराठा समाज सर्व राज्यात सर्वच पक्षात आणि गावात मराठा समाज आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या जागरूक आहे.असे समजल्या जाते.कारण ते ब्राम्हणांचे सर्वात मोठे लढाऊ सैनिक आहेत.त्यांच्या धडावर त्यांचे डोके जरी असले तरी त्या डोक्यातील मेंदूवर शंभर टक्के नियंत्रण भटा ब्राम्हणांचे आहे.यासाठी कोणी पुरावा मागत असेल तर आजच्या राज्यातील व केंद्रातील सरकार मधील आमदार,खासदार संख्या पहा.विशेष महाराष्ट्रात मराठा आमदारांची मोठा भाऊ व इतर मागासवर्गीय आमदार लहान भाऊ म्हणून बेरीज केल्यास राज्य कोणाचे असते?. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य असते किंवा राजर्षी शाहूमहाराज यांच्या विचारांचे असते.पण ते आज कोणताही वैचारिक वारसा सांगणारे नाही तर तीन विचारांच्या पक्षांचे महाआघाडीचे आहे. कारण मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज वाचला नाही. म्हणूनच ते गर्वसे कहो हम हिंदू है असे म्हणतात. राजर्षी शाहु महाराज हे सामाजिक क्रांतीचे व आरक्षणाचे जनक आहेत.हे आज विशेष मराठा समाज विसरला आहे. उदयनराजे भोसले खूप गर्व असणारे नेते आणि रक्तांचे वारसदार आहेत.त्यांना राज्यसभेचे सभासद म्हणून शपथ घेतांना जयभवानी जय शिवाजी म्हंटले म्हणून तंबी देण्यात आली.यांचे मनुवादी हिंदुत्व मान्य करून त्यांची घोषणा दिली असती तर चालले असते.पण भवानी माता आणि शिवाजी महाराजांनी यांचे गोब्राम्हण पतीपालक राज्य नाकारले.आणि रयतेचे स्वराज्य उभे केले.हे कधीच विसरू शकत नाही.मराठे एका आमदारकी खासदारकी साठी सर्व विसरायला तयार आहेत. त्यामुळेच राजर्षी शाहू महाराज यांचे महत्व पाहिजे त्या प्रमाणात मराठा समाजात नाही. 
       आज २६ जुलै राजर्षी शाहू महाराज यांनी १९०२ ला आपल्या संस्थानात प्रथम आरक्षणाची सुरुवात केली होती. मराठा समाज ज्या पद्धतीने पारायणे,भंडारे,पायी पदयात्रा,पालखी सोहळे आणि ममता दिन साजरे करतात त्याच पद्धतीने शाहूमहाराज यांनी आरक्षण कोणासाठी सुरू केले होते हा सत्य इतिहास का सांगितल्या जात नाही?.राजर्षी शाहू महाराज मराठा समाजाचे होते मग त्यांनी आरक्षण का सुरू केले हे आजचा मराठा तरुण का विचारत नाही. त्यांच्या आईवडिलांनाच हा इतिहास माहिती नाही मग सामाजिक क्रांतीचे व आरक्षणाचे जनक राजर्षी शाहूमहाराज मराठा समाजाचे आदर्श कसे होतील?. 
आजचा मराठा तरुण पूर्णपणे मानसिक गुलाम आहे.असे लिहले तर कुणाला राग आल्याशिवाय राहणार नाही. त्यांना कारण त्यांना जो शिवाजी महाराज शिकविला दाखविला तो फक्त मुस्लिम समाजाच्या विरोधात लढणारा.देवा धर्माच्या कोणत्याही चौकटीत अडकणार छत्रपती शिवाजी महाराज सांगीतलाच नाही.ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असे बंधन घातले होते त्यांच्या विरूद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन समुद्रात आरमार उभारले. गड जिंकल्यावर तिथे सत्यनारायण कधी घातला नाही.अमावस्या अशूभ मानली जाते. काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही. पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या रात्री व्हायच्या. कारण अंधाराचा फायदा घेऊन ते बहूतेक मोहिमा अमावस्येला घेत. गनिमी कावा पद्धतीने लढाया करायचे व जिंकायचे.महाराजांनी दैववाद, अंधश्रद्धा कधीच मानली नाही, कारण त्यांचा मेंदूवर व मनगटावर पुर्ण विश्वास होता. रायगडावर काम घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती जेवल्याशिवाय गडावरून खाली जाऊ द्यायचा नाही हा नियम.छत्रपती शिवाजी महाराज ते राजर्षी शाहु महाराज यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या गडावर होता.
     अस्पृश्यांनी वरच्या दर्जाच्या लोकांप्रमाणे काही व्यवसाय करणे हे त्या काळच्या समाजाला पचणारं नव्हतं. तरीही शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांना व्यवसाय करण्याचा मार्ग खुला केला.आणि हॉटेल सुरू झाले पुढे काही दिवसांतच गंगाराम कांबळे यांनी शाहू महाराजांच्या प्रोत्साहनानं कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोडवर ‘सत्यसुधारक’ हॉटेल सुरू केलं.त्यांच्या हॉटेलची स्वच्छता आणि उत्तम चहा कुणालाही लाजवेल असा होता. पण ते अस्पृश्याचं हॉटेल आहे, असे समजताच सवर्ण मंडळी या हॉटेलात जायची बंद झाली. एका अस्पृश्यानं सर्वांना चहा द्यावा, या विचारानेच सवर्ण मंडळी संतप्त झाली होती. ही बातमी महाराजांना समजायला वेळ लागली नाही.समाज हा कायदे करून बदलत नाही, त्यासाठी काही नामी युक्त्या कराव्या लागतात. समाजाला गोड बोलून परिवर्तनाच्या दिशेनं वळवावं लागतं, याची महाराजांना जाण होती .त्यामुळे कोल्हापुरात फेरफटका मारताना त्यांची घोडागाडी (खडखडा) गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलवर थांबू लागली. महाराज त्यांच्या गडगडाटी आवाजात चहाची ऑर्डर देत आणि गंगाराम मोठ्या आदबीनं महाराजांना चहा देत असत. महाराज तो चहा स्वतः घेतच पण त्यांच्या घोडागाडीत खच्चून भरलेल्या ब्राह्मण, मराठा अशा उच्चवर्णीय मंडळींना ते आग्रहानं चहा पाजत.छत्रपती खुद्द गंगाराम यांच्या हॉटेलातला चहा घेत असल्यानं त्यांच्या चहाला नाही म्हणण्याची कोणाची छाती होत नसे.हाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीत हा प्रसंग इतिहासप्रसिद्ध झाला.महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी दोन मार्ग अवलंबले. एक मार्ग कायद्याचा आणि दुसरा म्हणजे आपल्या जाहीर आणि सार्वजनिक कृत्यातून समाजातील अस्पृश्यतेच्या रूढीला सुरुंग लावणे. असा हा इतिहास वाचला नाही.कुणी सांगितल्यावर ऐकला नाही, सोशल मीडियावर पोस्ट आल्यावर वाचली नाही. तर कुठलीही जादू होणार नाही. परंतु आपल्या विचारात सकारात्मक बदल शंभर टक्के करू शकतात.
    फुले-शाहू-आंबेडकर हे आधुनिक महाराष्ट्राचे.पुरोगामी महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणावर जातवास्तवाचा मोठा प्रभाव असल्यामुळे महापुरुषांचा नामोल्लेख करताना ही अनेकांची अडचण होताना दिसते. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत काही वर्षापूर्वी ‘फुले-आंबेडकरांचा’ महाराष्ट्र असा उल्लेख करायचे. हीच मंडळी कोल्हापुरात आल्यावर त्यात शाहूंचे नाव समाविष्ट करत. म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर शाहूंना फुले-आंबेडकरांच्या बरोबरीने स्थान दिले जात नव्हते. राज्यकर्त्यांचेही यापेक्षा वेगळे काही नव्हते. परंतु कांशीराम-मायावती यांनी उत्तरप्रदेशातील सत्तेत असताना फुले-आंबेडकरांच्या बरोबरीने राजर्षी शाहूंना स्थान दिल्यामुळे,  विशेष मराठा समाजातील सत्ता धाऱ्याच्या पोटात व गोटात उलटा पालट झाली.यानंतर महाराष्ट्राच्या पातळीवरही शाहूंचे नाव घ्यायला सुरुवात झाली आणि आज ते रूढ झाले. हे सगळे पुन्हा जाती-पातीच्या समाजकारणाशीच संबंधित आहे. महात्मा फुले यांना माळी समाजाने मना पासुन कधीच दैवत मानले नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व दलितांनी आपले दैवत बनविले पण किती मानले हा प्रश्न आज आहेच?. राजर्षी शाहू महाराज यांना स्वीकारणे मराठा समाजासाठी तेवढे सोपे नव्हते. आजही नाही. आजही मराठ्यांना अडचणीचेच वाटतात. देशात आरक्षण ही संकल्पनाच राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली,कारण मराठा समाज हा देणारा होता. आपल्या संस्थानात मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बलांसाठी 50 टक्के आरक्षण लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय 1902 मध्ये त्यांनी घेतला होता. वेगवेगळ्या नावांनी काम करणाऱ्या मराठा संघटना आज शिवाजी महाराज, जिजाऊ यांची नावे घेतात, परंतु शाहू महाराज अनेकांना अडचणीचे वाटतात. कारण शाहू महाराजांना स्वीकारले,  तर आरक्षणाचे समर्थन करावे लागते. आणि आरक्षणाचे समर्थन करून मराठयांच्या संघटना बांधता येत नाही. म्हणूनच मराठा सेवा संघ आणि त्याचे 32 कक्ष मराठा समाजाला राजर्षी शाहु महाराज जास्त सांगताना दिसत नाही.राजर्षी शाहूमहाराज स्विकारल्या शिवाय छत्रपती शिवाजी महाराज कसे स्विकारल्या जातील ?. समता,स्वतंत्र,बंधुत्व यांचा पुरस्कार करणारे. मागासवर्गीय  बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला व क्रिडा, आरोग्य आदी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ज्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, ते आधुनिक भारताचे भाग्यविधाते, सामाजिक क्रांतीचे व आरक्षणाचे जनक.  यशवंत जयसिंगराव घाटगे म्हणजेच छत्रपती शाहू महाराज, पारतंत्र्य, दुष्ट रूढी परंपरा, निरक्षरता, अज्ञान इत्यादी समस्यांनी ग्रासलेल्या काळात २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. शाहू महाराज नावाप्रमाणेच यशवंत राहिले. भारतमातेच्या पोटी अनेक थोरांनी, संता, महंता, राजे, महाराजे, समाज सुधारकांनी जन्म घेऊन भारतातील गोरगरीब दीन दुबळ्यांची मनोभावे सेवा केलेली आहे.पण राजर्षी शाहु महाराजा त्यांच्या पेक्षा काकन भर सरस आहेत.
    बहुजन हिताय बहुजन सुखाय हे सूत्र ध्यानात घेऊन शाहू महाराज राज्यकारभार पाहू लागले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याची फळे सर्व समाजाला चाखता यावीत म्हणून त्यांनी आपले सिंहासनच पणाला लावले. अज्ञान अंधश्रद्धा, निरक्षरता सामाजिक दुजाभाव, दारिद्रृय यात गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी महाराजांनी आपला खजिना सताड उघडा ठेवला.छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक बंधूभाव, समता, मागासवर्गीय समाज बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा, आरोग्य इ. क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी त्यांनी खूप परीश्रम घेतले. समाजातील गोरगरीब, दीनदुबळे, मागासवर्गीय, उपेक्षित व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देणारे ते एकमेव राजे होते. सुरूवातीस कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा कायदा लागू केला. समता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाने अस्पृश्यता निवारणाकरिता जातीभेद निर्मूलन, बलुतेदारी पद्धतीवर बंदी आणली. स्त्री शिक्षण, देवदासी प्रथेचे उच्चाटन, महिला संरक्षण कायदा, विधवा पूनविर्वाह कायदा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन यासारख्या परीवर्तनवादी मुद्दे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे धाडस त्यांनी केले व त्यांची अंमलबजावणी होते की नाही ते स्वत: खात्री करून घेत असत. स्त्री हक्क स्वातंत्र्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन पत्नीला त्रास देणाऱ्या पतीसाठी शिक्षेच्या कायद्याची तरतूद केली. अनिष्ठ रुढी परंपरा उच्चाटनासाठी प्रयत्न केले. 1917 मध्ये विधवा पूनर्विवाह कायदा व विवाहनोंदणी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.शंभर वर्षापूवी शाहूराजांनी ज्या दूरदृष्टिने निर्णय घेतले, त्याच्या जवळपासही आजचे राज्यकर्ते जाऊ शकत नाहीत. मानवी जीवनाच्या विकासाचे असे एकही क्षेत्र नाही, ज्यासाठी महाराजांनी काम केले नाही. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. राधानगरी धरण बांधून सिंचनाची सोय केली. कुस्तीला प्रोत्साहन दिले. कोल्हापुरात प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू करून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक कार्य केले.
फासेपारध्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी राबवलेली बांधकाम योजना राज्यकर्त्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरणारी आहे. हे सगळे करीत असताना समाजातील विशिष्ट वर्गाशी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. संघर्ष करतानाही त्यांनी विकासाची वाट आणि तळागाळातील घटकांप्रती असलेली बांधिलकी याचा कधी विसर पडू दिला नाही. प्रस्थापितांनी त्यांच्या बदनामीच्या कहाण्या रचल्या. परंतु नव्या पिढीतल्या इतिहास संशोधकांनी त्या कहाण्या म्हणजे हितसंबंध दुखावलेल्या मंडळींनी रचलेली कुभांडे असल्याचे सिद्ध केले आहे. असा प्रेरणादायी इतिहास सामाजिक क्रांतीचे व आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचा असतांना मराठा तरुणांना त्यांचा आदर व आदर्श का वाटत नाही?. या गोष्टीचा मी गांभीर्याने विचार करतो.तुम्ही वाचक करता का?.बहुजन व मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना परिपूर्ण शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा बौद्धिक, सामाजिक व आर्थिक विकास शक्य नाही हे महाराजांनी हेरले व ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावाला शाळांची निर्मिती केली व शिक्षण सक्तीचे केले, एवढे करून न थांबता त्यावरील शुल्क माफ केले. जे पालक आपल्या पाल्यांना रोज शाळेत पाठविणार नाही अशा पालकांना प्रतिमहिना एक रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतुदही केली. तसेच त्यांनी वसतीगृहे उभे केलीत, गरिब विद्यार्थ्यांसाठी तर त्यांनी आपला राजवाडाच खुला केला. यामुळे बहुजन व मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणाचे दरवाजे खुले झालेत.8 सप्टेंबर 1917 रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहिरनामा काढला. 21 मे 1919 रोजी आर्थिक दृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. 1 जानेवारी 1919 रोजी आज्ञा देवून प्राथमिक शाळा व महाविद्यालयातील अस्पृश्य मुलांना स्पृश्य मुलांसारखीच समानतेची वागणूक द्यावी म्हणून शिक्षण खात्याला आदेश दिला. 30 सप्टेंबर 1919 रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्यात. 6 जुलै 1902 मागास जातींना नोकरीत 50 टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली. २६ जुलै १९०२ त्यांची अंमलबजावणी सुरु केली.e23 फेब्रुवारी 1918 ला कुलकर्णी वतने बंद, तलाठी सुरू. आंतरजातीय विवाह कायदा 15 एप्रिल 1920 नाशिक येथे उदोजी मराठा विद्यार्थी वसतीगृहाचा कोनशिला समारंभ केला.19 नोव्हेंबर 1921 मध्ये रायगड येथे शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाला. तसेच सिंधूदुर्ग जिल्ह्य़ातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार ही केला. 16 फेब्रुवारी 1922 दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे ते अध्यक्ष होते.आजच्या बहुसंख्य मराठा समाजाला हा इतिहास माहित नाही. त्यांच्या डोक्यात हिंदू हृदय सम्राट,मराठी माणसासाठी भाषेसाठी लढणारा मराठी हृदय सम्राट माहीत आहे. ते शाळा कॉलेज बंद करून मंदिरे बांधण्यासाठी जास्त प्रयत्न करतांना दिसतात.हे मराठा समाज व मराठी माणसांना दिसत नाही ही  शोकांतिका वाटत नाही काय?.
आमच्या सारख्या आंबेडकरी चळवळीतील लेखकांनी सांगितला तर तो त्यांना पचत नाही.मग त्यांनी का विचारू नये.क्रांतीचे व आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज मराठा समाजाचे आदर्श होतील काय ?.
आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाच्या मराठा मार्ग मध्ये लिहले होते की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मराठा समाजाचे राजर्षी शाहु महाराज यांनी शिक्षणा साठी खुप मोठी मदत केली. म्हणून बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले.हे आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी विसरु नये.त्याकरिता आंबेडकरी चळवळीतील जाणकार बुद्धिजीवी लोकांनी अज्ञानी अंधश्रद्धा मध्ये गुंतलेल्या मराठा समाजाच्या घरी जाऊन समाज प्रबोधन करावे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्हाला शाहु महाराज, सयाजी महाराज, संत कबीर, महात्मा ज्योतिराव फुले आणि तथागत बुद्ध कळाले. म्हणुन आमच्या सारखे लोक नेहमी मराठा समाजा बरोबर मंगल मैत्री करण्याचा प्रयत्न करतात.कारण सामाजिक क्रांतीचे व आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या त्या दूरदृष्टीने १९०२ साली दिलेल्या प्रथम आरक्षण आज मराठा समाज मांगत असलेले आरक्षण यात जमीन आस्मानचा फरक आहे.म्हणूनच आरक्षण Reservation म्हणजे नक्की काय हे समजुन घ्या.उदयनराजे भोसले यांना जयभवानी जय शिवाजी म्हणण्यास मनाई करण्याची हिंमत करणे हे शंभर टक्के ब्राम्हणाच्या आरक्षणाची ताकद नाही काय?.

सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई 9920403859.

Next Post

कोरोना लॉक डाऊनने जगण्याची नवीन शिकवण दिली.

मंगळ जुलै 28 , 2020
कोरोना लॉक डाऊनने जगण्याची नवीन शिकवण दिली. -सागर रामभाऊ तायडे  असंघटित नाका कामगारांच्या न्याय हक्क व प्रतिष्ठेसाठी १९८२ पासुन शहरातील नाक्यावर कामासाठी उभे राहणाऱ्या कामगारांना संघटित करून न्याय मिळवून देण्यासाठी लढत असतांना अनेक अनुभव आले. सकाळी सात वाजता पासून संध्याकाळी सहा […]

YOU MAY LIKE ..