स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करतांना इतिहास आठवतो का ?.
सागर रामभाऊ तायडे, भांडुप,मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादींची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात झालेल्या अन्याय,अत्याचार व प्रश्नांच्याबाबत सनदशीर मार्गाने निवेदने देऊनही उचित न्याय मिळात नाही.
भारत स्वातंत्र्य कधी झाला?.कसा झाला?.त्याचा इतिहास आजच्या तरुणांना कसा समजणार?. सत्य सांगणारे,लिहणारे कसे संपवले हा दोन तीन वर्षातील इतिहास आज आपण विसरत असू तर १९४७ साला अगोदरचा संघर्षमय इतिहास कसा आठवणार ?.
आज स्वातंत्र्य संग्रामात भाग न घेणारे सत्ताधारी झाले आहेत. भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र झाला. आज भारतीय नागरिक प्रजेची सत्ता आहे हे गर्वाने सांगु शकत नाही. राजे महाराजे, भांडवलदार,सावकार यांचे संस्थान संपून लोकांनी लोकांमधून लोकप्रतिनिधी निवडून लोकांच्या भल्यासाठी काम करणारी यंत्रणा म्हणजे प्रजासत्ता अशी घटनाकारांनी सांगितले होते. लोकांना खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करणार नाही अशी यंत्रणा म्हणजे लोकशाही.लोकशाहीचे चार खांब न्यायपालिका (judiciary) प्रशासकीय यंत्रणा, कार्यकारी मंडळ,अधिकारी वर्ग (Executive), विधिमंडळ.संसद,विधानसभा (Legislature), प्रसार मध्यम (Media) हया आज तरी स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता विसरून पूर्णपणे दबावाखाली काम करतांना दिसतात. न्यायाधीश, आय ए एस,आय पी एस, पी एस आय,सचिवालय अधिकारी,लोकप्रतिनिधी आणि पत्रकार संपादक बहुसंख्येने भांडवलशाही, ब्राम्हणशाहीचे उघड समर्थक आहेत. तर काही जीव मुठीत धरून संघर्ष करत नोकरीत आहेत. या चारी ठिकाणी उच्चशिक्षित, उच्चवर्णीय निर्णय देणारे म्हणून विराजमान आहेत.देशाचे सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपती भारताचा प्रथम नागरिक त्याला आज काय किंमत आहे. त्याला आज ही पदाच्या गुणवत्तेच्या नुसार नव्हे तर जातीच्या वर्णव्यवस्था नुसार वागणूक दिली जाते. त्या विरोधात कोणताच पक्ष का बोलत नाही?.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७३ वर्षाने संविधानाच्या चौकटीत राहून मनुवादी मनुस्मृतीचे नियोजन बद्ध अंमलबजावणी करीत आहेत. आरक्षणामुळे देशात भ्रष्टाचार वाढला. म्हणणारे उच्चशिक्षित उच्चवर्णीय बुद्धीजीवी देशाच्या मातीशी किती प्रामाणिक आहेत. हे स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण केल्यानंतर आठवावे. प्रत्येक देशातील बुद्धिमान बुद्धीजीवी वर्ग शासनकर्ता वर्ग नसला तरी समाजावर त्याचे फार मोठे वजन असते. बुद्धिमान लोकांचा वर्ग म्हणजे दूरदृष्टी लाभलेला वर्ग असतो. तो लोकांना उपदेश करू शकतो. कोणत्याही देशातील सामान्य वर्ग विचारपूर्वक व सुज्ञपणे जीवन जगत नसतो.तो मुख्यता अनुकरणशील असतो.व बुद्धिमान वर्गांचे अनुकरण करीत असतो. एखाद्या देशाचे संपूर्ण भविष्य त्यातील बुद्धीजीवी लोकांवर अवलंबून असते.बुद्धीजीवी वर्ग जर प्रामाणिक स्वतंत्र आणि निस्वार्थी असेल ते आणीबाणीच्या प्रसंगी पुढाकार घेऊन समाजाला चालना देण्याचा विश्वास त्यांच्यावर ठेवता येतो. बुद्धी हा काही सदगुण नाही. तर साधन आहे आणि बुद्धिमान माणसांचे जे ध्येय असेल त्यासाठी वापरण्याचे साधन होय. बुद्धिमान माणूस चांगल माणूस असू शकतो.परंतु तो सहजगत्या लुच्चा बनू शकतो. त्याचप्रमाणे बुद्धीजीवी लोकांची टोळी मदतीला सिद्ध असणारी चुकीच्या मार्गापासून मानवतेला वाचविणारी असू शकते किंवा ती एक भामट्यांची टोळी किंवा आपला चरीतार्थ चालविण्यासाठी दुष्ट धंदे करणाऱ्या वकिलांची चांडाळ चौकडी ही असू शकते.
आज देशातील बुद्धिजीवी वर्ग कोणाच्या बाजूने उभे आहेत.त्यामुळेच सर्व सामान्य लोकांचे काय हाल आहेत.ते मांडण्याचे धाडस कोणात राहिल्याचे दिसत नाही. म्हणूनच ….??? स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करून झाल्यावर आपसात चार दहा लोकांनी एकत्र बसून जिथे असला तिथे चर्चा करा. पूर्वी ग्रामीण भागात चावडीवर गावगप्पा होत असत.चावडीवर बसून निर्णय होत असत. त्यांची अंमलबजावणी सर्व गावातील लोक करत असत.आता कोणत्या चर्चा होतात.
भारतात आरक्षण कोणाला किती टक्के होते आणि आज आहे. प्रत्येक जातीच्या लोकांनी आपला जातीचा लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, ताशिलदार, जिल्हाधकारी, पोलीस अधीक्षक, आयुक्त, बँक मॅनेजर,मुख्याध्यापक, प्राचार्य, संपादक, साहित्यिक,मंदिरांचे विश्वस्त,पुजारी आणि राजकीय नेते,कार्यकर्ता यांच्या टक्केवारीचा ७३ वर्षातील ताळेबंद मांडा, त्याबाबत माहिती नसेल तर ती गुगल वर सर्च करा. ते उपलब्ध नसेल तर आजूबाजूच्या जेष्ठ नागरिकांना विचारा त्यांना रामायण,महाभारत तोंड पाठ असते. त्यांना विचारा शांतपणे ७३ वर्षातील अनुभव आणि शक्य झाले तर लिहून काढा.स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करतांना इतिहास आठवला का?. देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार, अन्न, वस्त्र,निवारा हे मूलभूत अधिकार कोणी दिले.
शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण कोणी दिलेत्यांची अंमलबजावणी आज ७३ वर्षात कशी सुरू आहे. नोकरीतील पदोन्नतीतील आरक्षण.मागासवर्गीय समाजावर होणारे अन्याय अत्याचार,खाजगीकरण,कंत्राटीकरण,राजर्षी शाहू शिष्यवृत्ती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्जीव पुतळ्याचा अपमान,विटंबना कोण करते?. का करते?. ४४ वर्षा नंतर ही एवढी भीती त्यांना का वाटते. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सर्व संविधानकर्त्यांनी भारतातील समस्त नागरिकांना स्वतंत्र भारतात संविधानाद्वारे न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता प्रदान केली आहे आणि या मानवी मुल्यांची जपणूक करण्याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारवर दिलेली आहे. मात्र त्याप्रमाणे सरकारे जबाबदारी पार पाडताना दिसत नाहीत. देशात व विविध राज्यात समतेच्या विरुध्द विचारसरणीचे सरकार आल्यापासून देशभर मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, जमाती व बौद्धांवर अन्याय,अत्याचार वाढले आहेत व त्यांना संविधानाने दिलेल्या सेवा-सुविधा षडयंत्र करुन शिस्तबध्द पद्धतीने काढून घेण्याचे काम बहुमताच्या जोरावर चालू आहे.
विषमतेने,भेदभावाने,जातीभेदाने त्यांचा अतिशय छळ केला जात आहे. त्यामुळे या समाजात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादींची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात झालेल्या अन्याय,अत्याचार व प्रश्नांच्याबाबत सनदशीर मार्गाने निवेदने देऊनही उचित न्याय मिळात नाही. म्हणूनच स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करतांना इतिहास आठवावा. आरक्षणाचे लाभार्थी सुरक्षित नोकरी करून सुरक्षित ठिकाणी राहतात.त्यांनी स्वार्थासाठी कायम वैचारिक गुलामी स्वीकारली त्यांनी शिल्पकाराने दिलेल्या संविधान अधिकारांचे रक्षण करण्यासाठी लढणाऱ्या संघटना, युनियन चे सभासद होण्या ऐवजी संविधानिक अधिकार नाकारून जातिव्यवस्थेचे वर्णव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या राष्ट्रीय ट्रेंड युनियन चे सभासद असल्यामुळे त्यांनी देशात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या खासगीकरण, कंत्राटीकरण या विरोधात योग्य वेळी योग्य भूमिका न घेतल्यामुळेच आज मोदी सरकारचा घोडा चौफेर घौडदौड करीत आहे.
आरक्षणाचे लाभार्थी मागासवर्गीयांच्या आरक्षित जागेेेवर निवडुन गेलेले आमदार,खासदार हे मागासवर्गीयांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचारांबाबत किंवा त्यांच्या न्याय्य हक्क, अधिकारांबाबत तोंड उघडण्याचेही धाडस करतांना दिसत नाहीत. पक्षाच्या धोरणापुढे ते वैचारिक गुलाम लाचार झाल्याचे सर्वत्र स्पष्ट दिसत आहे. आम्ही खरच स्वातंत्र्यात आहोत काय?. असा प्रश्न आता सर्व समाजातून विचारला जात असल्याने, स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करतांना इतिहास आठवला पाहिजे.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप मुंबई,