मुलींना आत्मनिर्भर बनवा, घेऊ द्या आकाशात उंच भरारी.

मुलींना आत्मनिर्भर बनवा, घेऊ द्या आकाशात उंच भरारी.

जस्टीस फॉर वैष्णवी…. अशा आशयाची बातमी वाचताच अंगात कापरं भरलं.. विचार आला की, आता कोणत्या वैष्णवीचा गळा घोटला गेला… कोणत्या वैष्णवीच्या स्वप्नाचा भंग केला.. कोणत्या वैष्णवीला हे सुंदर जग सोडून जावं लागलं.. काल्पनिक लिहीत नाही पण खरंच जस्टिस फॉर वैष्णवी.. या आशयाची बातमी वाचताच.. जस्टीस फॉर असिफा.. जस्टीस फॉर प्रियंका.. जस्टीस फॉर निर्भया.. या सर्वच घटनांची पुन्हा एकदा आठवण झाली. आणि परत एकदा मन, हृदय अगदी व्यथित झालं.. फुले-शाहू-आंबेडकरांच्या सावित्री, जिजाऊ, रमाई , अहिल्याराणी यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा खरच खूपच वाईट वाटतं.. एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या हत्या कधी संपणार आहेत.. कायदा आहे सर्व आहे परंतु ही निर्दयी मानसिकता कधी संपणार आहे.. अजून किती वैष्णवीचे प्राण जाणार आहेत.. गरीब कुटुंबातील वैष्णवी गोरे हिची काय चुक होती? जग सोडून जाण्याचं तिचं वय होतं का? मृत्यूनंतरही मुलीकडे स्त्रियांकडे संशयाने पाहणाऱ्या या नजरा आहेत. तिची काहीतरी चूक असेल .. आज काल मुली कशा राहतात.. मोबाईल वापरतात नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय .. अशा काही गोष्टी मुलीच्या आई वडिलांना मुलीच्या मृत्यूनंतरही ऐकायला मिळतात.. मग विचार करा जिवंतपणी एखादी मुलगी हिम्मत करेल का की माझ्या बरोबर असं काही घडत आहे. शाळेत कॉलेजला जाताना कुणी मला त्रास देत आहे. असं काही सांगण्या अगोदर मुली विचार करतात की, माझी शाळा बंद होईल का?. कॉलेज बंद होईल का?. असे एक ना अनेक प्रश्न मुलींना पडत असतील.

परंतु मला असं वाटतं की आई-वडिलांनी मुलीवर विश्वास दाखवला तर मुली आई-वडिलांना सांगण्याची हिंमत करतील. एखाद्या वेळी एखाद्या मुलीने हिंमत केली तर तिच्याकडे संशयाने पाहणाऱ्या अनेक व्यक्ती समाजात असतात. आपल्या मुलीविषयी एखादी काही गोष्टी ऐकली तर पालक मुलीचे शिक्षण बंद करतात. त्यामागे त्यांची सुरक्षिततेची भावना असू शकते. कारण आपल्या मुलीबरोबर काही वाईट होण्या अगोदर तिचं लग्न करून देणे त्यांना योग्य वाटतं. पण मला वाटतं जो मुलगा आपल्या मुलीची छेड काढतो. शाळेत कॉलेजमध्ये जाताना येतांना त्रास देतो. त्या मुलाला पकडून पोलिसात देणे योग्य नाही काय ?. ही हिंमत बहुसंख्य पालक दाखवत नाही.आपल्या मुलीवर विश्वास ठेवत नाही.परंतु बऱ्याच पालकांना असंही वाटतं की, आपल्या मुलीला सर्वजण दोष देतील. परंतु ही मानसिकता आता बदलली पाहिजे. जो कोणी आपल्या मुलीला त्रास देत असेल, त्याची तक्रार केलीच पाहिजे . लोकभयास्तव काही पालक शांत बसतात आणि त्यांची परिणीती ही मोठ्या गुन्ह्यात होते. म्हणून कोणी कधी कसलाच अन्याय सहन करू नये.

सरस्वती,शारदा,लक्ष्मी,रुख्मिणी,द्रोपदी सीता सांगितल्या तर त्यांना अग्नीपरीक्षा द्यावीच लागेल. संघर्ष करण्याची प्रेरणा कधीच मिळणार नाही.छत्रपती शिवाजी महाराज,फुले,शाहू आंबेडकरांचा जिजाऊ,सावित्री,रमाई, अहिल्याराणीचा हा महाराष्ट्र आहे. या झुंजार लोकांचे विचार आपल्या पाठीशी आहेत. परंतु हा वारसा आपण आपल्या मुलींना दिला पाहिजे.

आम्ही शिक्षिका नेहमी मुलींना सांगत असतो की,काही झाले तरी घरी पालकांना आई-वडिलांना विश्वासात घेऊन प्रत्येक गोष्ट सांगितली पाहिजे. आई-वडिलांनी ही आपल्या मुलीवर विश्वास दाखवला पाहिजे. परंतु गावातील एखादा टग्या मुलगा मुलींना त्रास देतो. आणि पालक मग आपल्या मुलीची शाळा बंद करून एखादं स्थळ पाहून लग्न लावून देतात. त्यांना वाटतं की, आता आपण मुक्त झालो. परंतु कमी वयात लग्न झालेल्या त्या मुलीच्या मनावर याचा काय परिणाम होत असेल, शारीरिक मानसिक वाढ न होता अगोदरच विवाह लावले जातात . कायदा आहे म्हणून तेरी भी चूप मेरी भी चुप असा काही प्रकार चाललेला असतो.

समाजामध्ये असे काही गुन्हे घडत आहेत की, पालकांची मानसिकता बदलत आहे. मी माझ्या मुलीला शिकविण्यापेक्षा तिचं लग्न करून दिलं असतं तर कदाचित एखाद्या ठिकाणी चांगल आयुष्य जगत अस्ती माझी मुलगी. सुशिक्षित लोक असा विचार करू शकतात तर गरीब अशिक्षित लोक तर हा विचार करणारच! शेवटी आपली मुलगी नसण्यापेक्षा कुठेतरी जिवंत आहे ही भावना जास्त महत्त्वाची वाटणे सहाजिक आहे. परंतु लग्न झाल्यावरही एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या हत्या थांबत नाहीत. पालकांना सशक्त होऊन लढा द्यावा लागणार आहे. लग्न करून देऊन प्रश्न सुटणार नाही. यासाठी मुलींना सक्षम बनवण्याची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने समाजाने आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. तरच मुलीवर होणारे अन्याय अत्याचार थांबतील. अन्याय कोणावरही झाला तरी अन्यायग्रस्त व्यक्तीच्या पाठीमागं सर्व समाजाने उभे राहण्याची गरज आहे. त्याची जात धर्म न पाहता त्या व्यक्तीचं मानसिक मनोधैर्य आपल्याला वाढवाव लागणार आहे. तरच खऱ्या अर्थाने गुन्ह्यांना आळा बसेल. वैष्णवीच्या मारेकऱ्यlला शिक्षा झालीच पाहिजे. अशी आपली सर्वांची ठाम भूमिका असली पाहिजे. आणि परत अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता समाजाला घ्यावी लागणार आहे.
मुली खूप हुशार असतात. अभ्यास करतात चांगले मार्क्स मिळवतात.शिकण्याची इच्छा असते. परंतु अमक्याच्या मुली सोबत असं झालं .. नको आपलं बर आहे.. लग्न लावून देऊ. शिकून तरी कुठे नोकरी लागणार आहे.. आपण मन वळविण्याचा प्रयत्न केला तर म्हणतात नको आम्ही गरीब गरीबाचा कोणी वाली नसतं. असं काही बोलून आपल्याला चूप करतात .शेवटी परक्याचे धन.. मुलीं बद्दल ची ही विचारधारा मुलींना पुढे जाऊ देत नाही. म्हणून पालकांनी समाजाने मुली बद्दलचे आपले विचार बदलले पाहिजेत. आपल्या मुलीचं लग्न लावून दिले तर कदाचित प्रश्न सुटतीलही परंतु तो मुलगा परत एखाद्या दुसऱ्या मुलीच्या मागे लागून तिला त्रास देईल हा विचार केला पाहिजे. यासाठी अशा काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच वठणीवर आणण्याची गरज आहे.

प्रत्येक आईने मुलीला सांगितलं पाहिजे की, तुझ्या पायातली चप्पल डोळ्यातली नजर सरळ आहे तोवर तुला कोणी काही करणार नाही. आणि जर का एखाद्या विकृत नराधमाने हिंमत केली तर तिथेच धडा शिकवून ये! मुलींना चंद्रासारखे शीतल बनवण्यापेक्षा सूर्यासारख प्रखर, तेजस्वी बनवा!. सांगा तिला की भर चौकात सावित्रीबाईंनी गुंडांच्या तोंडात मारली होती!. सांगा तिला अहिल्याराणी युद्धावर गेली होती!!. सांगा तिला की प्रसंगी जिजाऊ नि तलवारही चालवली होती!!. नक्कीच हे प्रसंग तिच्या जीवनामध्ये बदल करतील. तिच्या ध्येयाप्रत नेण्यासाठी मार्गदर्शक ठरतील! फक्त एवढेच सांगू नका की सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षण दिलं तिला हेही सांगा की, शेण,माती दगड मारणाऱ्या समोर ताट उभी राहून नजरेला नजर भिडवत होती.पळून कधीच गेली नाही. वेळो प्रसंगी सावित्रीबाई प्रत्येक प्रसंगातून संघर्ष करून बाहेर पडल्या. सावित्रीबाई फुले यांचे विचार जर मुलीला सांगितले तर नक्कीच आपल्या मुली झुंजार बनतील!.

त्यांना सरस्वती,शारदा,लक्ष्मी,रुख्मिणी,द्रोपदी सीता सांगितल्या तर त्यांना अग्नीपरीक्षा द्यावीच लागेल. संघर्ष करण्याची प्रेरणा कधीच मिळणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज,फुले,शाहू आंबेडकरांचा जिजाऊ,सावित्री,रमाई, अहिल्याराणीचा हा महाराष्ट्र आहे. या झुंजार लोकांचे विचार आपल्या पाठीशी आहेत. परंतु हा वारसा आपण आपल्या मुलींना दिला पाहिजे.. तरच खर्‍या अर्थाने क्रांती घडेल.त्यांना सरस्वती,शारदा,लक्ष्मी,रुख्मिणी,द्रोपदी,सीता कोणत्या शाळा कॉलेजमध्ये शिकल्या हे ही सांगा. नुसते त्यांचे सोमवार,मंगळवार गुरुवार व्रत करण्याची शिकवण देऊ नका.हे ही सांगा कितीही त्रास दिला व झाला,तरी सावित्रीबाई मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात होत्या. तेव्हा सावित्रीबाई च्या अंगावर लोकांनी दगड-धोंडे फेकून मारले हा प्रसंग आपण कधीच विसरायला नको. मला विश्वास आहे की, कोणी महिला, मुलगी हा प्रसंग आयुष्यात लक्षात ठेवेल नक्कीच ती प्रत्येक कार्य यशस्वी करून दाखविल. शेवटी या प्रसंगामुळे क्रांती घडली आहे. आणि तूम्ही मुलींना फक्त लढ म्हणा!. मग बघा मुलीमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्या आत्मनिर्भर बनतील. मुलींना शिकू द्या. उंचभरारी घेऊ दया.

आम्ही तुझ्या सोबत आहोत हा आत्मविश्वास निर्माण करा. मगच खऱ्या अर्थाने क्रांती घडेल. नक्कीच मुली आपला विश्वास सार्थ करून दाखवतील. त्यांच्या पंखात बळ भरण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे मंग बघा त्या कशी गरुड भरारी घेतात ते. भयावह परिस्थिती असतांना दहावी आणि बारावीत मुलीनी गुणवंता दाखवून दिली आहे.

माझीच एक विद्यार्थिनी आहे, तिने इयत्ता आठवी पासून आपले लग्न रोखून धरलेले आहे. पालकांची मानसिकता तिने स्वतः बदललेली आहे. ती मुलगी बारावीच्या वर्गात शिकत आहे. आणि मी म्हणेल तिचे लग्न तिने स्वतः रोखलेला आहे. आज आई-वडिलांनाही तिचा अभिमान वाटतो. की शेवटी आमच्या मुलीने करून दाखवले. मुलींमध्ये असा विश्वास निर्माण करण्याची गरज आहे की, तुझ्या मदतीला कोणी येईल अशी आशा तू करू नकोस. तुला स्वतः तुझी लढाई लढायची आहे. हा विश्वास आपण एक शिक्षक,शिक्षिका समाजातील प्रतिनिधी,आईवडील या भूमिकेतून आपल्याला निभवायचा आहे. शेवटी समाजात वाईट घटना घडणार नाहीत याची जबाबदारी एक भारतीय नागरिक म्हणून आपण सर्वांनी घेणे गरजेचे आहे. तरच एक निकोप समाज निर्माण होईल.

श्रीमती. मनिषा अनंत अंतरकर(जाधव)7822828708.
अंबड,शिक्षिका जिल्हा परिषद जालना

Next Post

भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान.!

सोम ऑगस्ट 3 , 2020
भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान.! ३ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय लोकसभेत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून भारताचे राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद  यांनी शपथ दिली . अस्पृश्य समाजातील पाहिले कॅबिनेट मंत्री .केंद्रीय कायदेमंत्री म्हणून पुढे 29 ऑगस्ट १९४७ ला […]

YOU MAY LIKE ..