व्हॉइस ऑफ फिशर्मन” अर्थात मच्छीमारांचा बुलंद आवाज!.

महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष आदरणीय दामोदर तांडेल यांचे शुक्रवार दि 4 डिसेंबर 2020 रोजी दु 12 वाजता दुःखद निधन झाले.ते 72 वर्षाचे होते.ते मुबंई जवळच्या पालघर जिल्ह्यातले रहिवाशी होते.मात्र त्यांची कर्मभूमी कफ परेड मुबंई होती. दिवसाचे केवळ 12 तास नाही तर 24 तास मच्छीमारांच्या कोणत्याही प्रश्नावर लोकांना नेहमी उपलब्ध असणारे हे लढाऊ व्यक्तिमत्व होते. 

   
मच्छीमारांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला. खासकरून अनैसर्गिक आणि अवैध मच्छीमारी रोखण्यात त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.सागरी किनारपट्टी वरील 375 गावठाणात मच्छीमारांची राहती घरे आणि वाहिवाटीतील जागा मालकीच्या सातबाऱ्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. राज्यातील मत्स्य विकास महामंडळ,राष्ट्रीय मत्स्यजीवी सहकारी कार्यकारी संचालक पदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.

आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी यांच्यामध्ये आरक्षणाची लढाई लढणाऱ्या नेतृत्वाची आजही मोठी मागणी आहे.यात दामोदर तांडेल यांनी फार मोठी भूमिका बजावली आहे.कोळी बांधवांचा किंवा ओबीसींचा ओढा आरक्षण विरोधी हिंदुत्ववादी किंवा सरंजामी मराठा कॉग्रेस राष्ट्रवादी या पक्षांकडे असल्यामुळे ओबीसीसाठी हे अवघड जागीचे दुखणे झालेय.तरीही ओबीसी समाजासोबत एकनिष्ठ असलेल्या मोजक्या नेत्यांपैकी दामोदर तांडेल हे एक बंडखोर नेते होते की ज्यांनी ओबीसी आरक्षणाची,मराठा आरक्षण ओबीसीत घुसविण्या विरोधात स्वयंस्पष्ट भूमिका घेताना उच्चवर्णीय पक्षप्रमुखांची कोणतीही तमा बाळगली नाही.त्याचा राजकीय वनवास आणि त्रास तांडेल यांनी हसत हसत भोगला.


ओबीसी आणि त्यातही कोळी बांधव हे आरक्षणाच्या बाबतीत अजूनही पुरेसे साक्षर झालेले नाहीत.आरक्षण म्हणजे एससी एसटी या अतिशूद्र मागास जातींचा विषय म्हणून दूर राहणारे कोळी बांधव, हे विसरून गेले की अनेकांना एसटी या आदिवासी जमातीतून (आरक्षित प्रवर्गातून) ओएनजीसी, नेव्ही आरसियेफ माझगाव डॉक  अन्य महत्वाच्या जागी अगदी मंत्रालय सिडको कोकण भवन विभागात ज्या नोकऱ्या लागल्या त्या समस्त कोळी जातीच्या मागासवर्गीय आरक्षणामुळेच! 

देशातील कोलीय गण जो भगवान बुद्ध यांच्या आई एकविरा महामाया अर्थात आजही हुंडा नाकारणाऱ्या मातृसत्ताक विचारांचा 2000 वर्षांपूर्वीचा सांस्कृतिक वारसा सांगतो.ज्याला जागतिक इतिहासकार ,सरकारी गॅझेट आणि परदेशी प्रवासी आंतरराष्ट्रीय व्यापारी इतिहासाने साक्षांकित केले आहे.बौद्ध लेण्यांमध्ये दगडावर कोरले आहे.म्हणूनच लग्नविधी मध्ये धवळगीते गाणारी आगरी कोळी स्त्रीपुरोहित ही एकविरा संस्कृतीचे खरे खुरे सांस्कृतिक पुढारलेपणाचे उदाहरण, पुराणातल्या वाल्मिकी पेक्षा,सागरपुत्रांना जास्त जवळचे आणि जीवनाच्या नैतिकडे घेऊन जाणारे आहे. भारताच्या आदिम जमाती पैकी सारे कोळी बांधव नदी जलाशये आणि समुद्र यात परंपरागत जलवाहतूक सागरी व्यापार, जलवाहतूक ,रेती मासेमारी मिठागरे चालविणाऱ्या कष्टकरी कोलीय लोकांचा कोलीय संघ होय.


संपूर्ण भारतातील कोलीय गण आणि शाक्य गणाचे नाते भगवान बुद्धाच्या वैश्विक मैत्री मुळे आजही जगप्रसिद्ध आहे.म्हणूनच मुबंई ठाणे पालघर रायगड येथील दर 25 किलोमीटर वरची सागरी मार्गावरील प्राचीन लेणी बांधणारे आम्हीच सागरपुत्र आहोत.आमच्यावर गुलामी लादणारे मूठभर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे 15 टक्के लोक साऱ्या भारतात विखुरलेले असतानाही संघटित होऊन आमचे शोषण करतात. तर सर्वधर्मीय लोकांना कोळी टोपीच्या मैत्री भावनेने मातृसत्ताक विचारांनी जोडणारे आम्ही आगरी कोळी भंडारी आदिवासी महादेव कोळी का एक होऊ शकत नाही? या राष्ट्रीय भूमिकेविषयी मी दामोदर तांडेल याच्या जवळ खूप सखोल चर्चा केली होती.कोळी बांधव आरक्षणा विषयी फार जास्त आवड नसणारा समाज असताना,या भोळ्या कोळी समाजाला आरक्षणाच्या सत्याकडे घेऊन जाणारा नेता म्हणून दामोदर तांडेल याच्या एव्हढा वास्तववादी नेता आज कुणी दिसत नाही.


त्यांचा अकाली मृत्यू हा ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या सर्वानाच चटका लावून गेलाय.खासकरून ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र या आमच्या संघटनेला! ओबीसी आणि मच्छिमार बांधवांचे कधीही भरून येणार नाही असे नुकसान झाले आहे.समस्त मागास वर्गीय बांधव जोडणारे कोळी बांधव अत्यन्त दुर्मिळ आहेत. जे आहेत त्यांना आम्ही जपायला हवे.दामोदर तांडेल यांनी मला शिवस्मरकाच्या लढाईसाठी खास उरणवरून बोलावले होते.जसे कोळीवाडा गावठाण हक्काच्या लढाईसाठी माहीमच्या जयेश आकरे यांनी असेच निमंत्रण देऊन एका मोठ्या चळवळीला जन्म दिला.


 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र नावाचा वापर करून राजकीय सत्ता मिळविण्याचा अनेक ब्राह्मण मराठा राजकीय नेत्यांनी प्रयत्न केला.ब्राह्मण स्वार्थासाठी म्हणायचे छत्रपती शिवराय हे गोब्राह्मण प्रतिपालक आहेत. तर सरंजामी मराठे म्हणायचे ते क्षत्रिय कुलावंतस आहेत. प्रत्यक्षात शिवाजी महाराज हे क्षत्रिय मराठा पाटील आणि ब्राह्मण कुळकर्णी या परंपरागत आदिलशाही निजामशाहीत प्रशासक वतनदार असलेल्या जमीनदार सरंजामी लोकांच्या विरोधात होते.खऱ्या अर्थाने ते आगरी कोळी भंडारी कराडी बारा बलुतेदार आणि एससी एसटी या स्त्री शुद्रातिशूद्र या मागास रयतेचे राजे होते.


 ज्यांनी बौद्ध सम्राट अशोका नंतर भारताचे दुसरे सागरी आरमार उभे केले.दोन्ही वेळा आगरी कोळी भंडारी सागरपुत्र हेच त्या आरमाराच्या मुख्य आधारस्थम्भाच्या भूमिकेत होते. इतिहासाचा विपर्यास करून समुद्राचा दुरुनही समंध नसणाऱ्या मराठा नेत्यांकडे शिवस्मरकाच्या नियोजनाची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी दिली.मा पंतप्रधान नरेंद्र मोदी या सागरी निसर्गाविरोधी पर्यावरण विरोधी प्रकल्पाचे उदघाटन करण्याचा तुघलकी प्रयत्न केला. तो ही मच्छिमार बांधवांचे पुनर्वसन न करता! याला दामोदर तांडेल आणि माझ्या शिवक्रांती मावळा या रायगडच्या तरुणांनी प्रखर विरोध आणि निदर्शनेही केली.यातील दामोदर तांडेल यांचे नेतृत्व राष्ट्रीय चर्चेचा विषय झाले.


यावेळी आमच्या मातृसत्ताक महिलांना अटक करून सरकारने फारच निषेधार्ह भूमिका घेऊन तोंड काळे केले.मुबंईच्या सागराचे पेटलेले पाणी सागरपुत्रांची आरमारी ताकद देशाला दाखवून गेले.समुद्रात जगजेत्त्या इंग्रजांच्या आरमाराचा पराभव करणाऱ्या सागरपुत्राशी अन्यायी भूमिका घेणारे केंद्र आणि राज्यातील हिंदुत्ववादी भाजप शिवसेना सरकार हे छत्रपती शिवरायांच्या सागरी धोरणाशी द्रोह करणारे आहे हे सिद्ध झाले.विनायक मेटे या शिवसंग्राम संघटनेच्या मराठा नेत्यास टीव्ही चॅनलवर आणि सागरी लढाईत नमविणारे सागरी आरमारी नेते दामोदर तांडेल हे महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या मोदी सरकारलाही कायम आठवणीत राहतील.


समुद्रात भराव करून कोणताही सागरी किल्ला न बांधणारे छत्रपती शिवराय हे सागरी पर्यावरणाचे निसर्गनियमाचे जाणकार होते.त्यांनी समुद्रातील निसर्ग निर्मित खडक टेकड्याचा उपयोग यासाठी केला ज्या हजारो वर्षे सागरी व्यापार करणाऱ्या मच्छीमार बांधवांना अचूक माहिती होत्या. देशाच्या जनतेच्या पैशाची लूट करणारे केंद्र आणि राज्य सरकारांनी मूळ 2600 कोटींचा शिवस्मारक प्रकल्प गुपचूप 3800 कोटींकडे नेऊन छत्रपतींच्या पवित्र नावानेही आम्ही भ्रष्टाचार करू शकतो हे दाखवून दिले.कॉग्रेसच्या सचिन  सावंत यांनी हे प्रकरण उघड केले.दामोदर तांडेल यांनी विरोध केला नसता तर ब्राह्मण मराठे अळीमिली गुपचिलीचे राजकारण खेळले असते.सेंट्रल विझीलन्स कमिशन च्या टेंडर गाईड लाईनच्या अटी शर्थीची यात राज्यकर्त्यांनी वाट लावली.


कोळीवाडा गावठाणाची बांधकामे सीआरझेड पर्यावरण कांदळवन कायदा दाखवून अनधिकृत ठरविणाऱ्या मुबंई महानगर पालिका राज्य केंद्र सरकार यांनी शिव स्मारकाच्या नावे, सारे कायदे समुद्रात बुडविले आणि छत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे विचारही! 


आता होणारे स्मारक भ्रष्ट नेत्यांची आठवण सांगणार! ज्याचे आरमार त्याचाच समुद्र हा निसर्ग न्याय सांगणारा नवा भु समुद्र संपादन कायदा 2013 साली अस्तित्वात आला. परन्तु शिवस्मारकाच्या सागरी प्रकल्पात मच्छिमार बांधव प्रकल्पग्रस्तच नाहीत हे सांगून सरकारने सागरपुत्रांना फसविले आहे. हे मी दामोदर तांडेल यांच्या लक्षात आणून दिले.ब्राह्मण मराठा आमदारांचे पाशवी बहुमत हे ओबीसी बांधवांना आणि दामोदर तांडेल यांच्या सारख्या दमदार नेत्यांना आयुष्यभर दमवून टाकते.मंत्रालयाच्या हाकेच्या अंतररावरील आमच्या मच्छिमार बांधवांची ही व्यथा आम्ही आज समजून घेतली पाहिजे.याचबरोबर शिवस्मारक प्रकल्पात दलाली घेऊन सहमती पत्रे देणाऱ्या इतर मच्छिमार नेतृत्वाचीही ओळख परेड घेतली पाहिजे.

 
कोणत्याही सागरी प्रकल्पात 15 लाख रुपयांची व्यक्तिगत नुकसान भरपाई 2013 च्या भूसंपादन कायद्याने मिळत असताना प्रत्येक कोळीवाड्याचे हजारो कोटी रुपये गेले कुठे? पुनर्वसन म्हणून मिळणारी बंदरे आधुनिक 3 कोटी रुपयांच्या बोटी,जाळी कोल्ड स्टोरेज खाल्ली कुणी? वरळी कोस्टल रोड,न्हावा शिवडी प्रकल्प,नवी मुबंई विमानतळ प्रकल्प यात भ्रष्टाचार करणाऱ्या सर्वपक्षीय आजी माजी आमदार खासदारांना जाब विचारण्यासाठी नवे दामोदर तांडेल निर्माण करणे ही खरी मानवंदना ठरेल.


कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर हा मंत्र दादर चैत्यभूमीवरील डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आगरी नेते नारायण नागु पाटील यांच्या नेतृत्वात आम्हीही डॉ आंबेडकरांना ऐतिहासीक साथ दिली.ज्याचे आरमार त्याचा समुद्र या छत्रपती शिवरायांच्या परराष्ट्र नीतीचे सूत्र घेऊन आज सोमवार 7 डिसेंबर 2020 पासून मच्छिमार सागरपुत्रांची सागरी हक्कांची लढाई ठाणे वाशी खाडीत मच्छिमार नेते मा दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली 26 कोळीवाडा आणि गावठाने सर्व शक्तीनिशी सुरू करीत आहेत.साऱ्या भारतातील मच्छिमार बांधव यात सहभागी होतील ही अपेक्षा आहे.दामोदर तांडेल याना यापेक्षा मोठी दुसरी समर्पक श्रद्धांजली कोणती असावी?.

राजाराम पाटील. 8286031463,उरण रायगड.ओबीसी संघर्ष समन्वय समिती.आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी!   (मुंबईतील विविध वृत्तपत्रांनी त्यांच्या निधनाची अशी दखल घेतली)

Next Post

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बदलापूर येथील भव्य स्मारक पूर्ण कधी होणार ? बदलापूरातील सर्वपक्षीय बहुजन समाज स्मारकाच्या मागणीसाठी एकत्र आला!!!

सोम डिसेंबर 14 , 2020
१२ वर्षापासून रखडलेल्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामातील दिरंगाई व काम पूर्तीअभावी लोकार्पणापासून वंचित राहील्याकारणाने बदलापूरातील बहुजन समाज आज दि.१३/१२/२०२० रोजी सुसंवादाच्या रुपाने स्मारक स्थळी एकवटला. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारतीयांचे उध्दारकर्ते आहेत.बाबासाहेबांच्या नावाने अनेक वास्तू संपूर्ण जगभरात पहायला […]

YOU MAY LIKE ..