वंचित बहुजन आघाडीचा झेंडा काय सांगतोय ?
-आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीला नोंदणीकृत पक्ष म्हणून मार्च 2019 मध्ये मान्यता मिळाल्यावर वंचित बहुजन आघाडीने अधिकृतपणे पक्षाचा झेंडाही नुकताच स्वीकारला आहे, जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या विचारसरणीचं, ध्येय-धोरणांचं आणि कृतिकार्यक्रमांचं प्रतिबिंब या अधिकृत झेंड्यामध्ये स्पष्टपणे उमटलं आहे. हा झेंडा म्हणजेच एक सामाजिक-राजकीय संदेश आहे.
वंचित बहुजन आघाडीचा झेंड्याची वैशिष्टये –
या झेंड्यात येणारे प्रत्येक रंग केवळ रंग नाहीत, तर ते सामाजिक न्यायाचे आणि प्रतिनधित्वाचे प्रतीक म्हणून आलेले आहेत. हा झेंडा आपल्या बहुसांस्कृतिक देशाच्या वैविधतेला आणि एकात्मतेला आत्मसात करतो. हा झेंडा लोकशाहीचे सामाजिकीकरण, सत्तेचे सामाजिकीकरण करणाऱ्या वंचित बहुजनांचा आहे. केवळ राजकीय लोकशाहीच नव्हे, तर सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाहीचा आग्रहाने पुरस्कार करणारा आहे.
या झेंड्यातील निळा रंग सामाजिक समतेचा उद्गार म्हणून आणि कणा म्हणून येतो. जात्यंतक समाजक्रांतिकारी आंबेडकरी चळवळीचा रंग म्हणून येतो. मानवाच्या बंधविमोचनाचा, मोकळ्या श्वासाचा, खुल्या आभाळाचा आणि मानवमुक्तीचा रंग म्हणून येतो. त्याबरोबरच निळ्या रंगावर विराजमान झालेले अशोकचक्र हे स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यत्रयींचा ऐतिहासिक वारसा सांगणारं आहे. अनित्यता सांगणारं अशोकचक्र हे मानवाला कधीही स्थितिशील बनू न देता सतत गतिशील ठेवणारं आहे.
या झेंड्यातील पिवळा रंग हा फुल्यांच्या सत्यशोधक समाजाचा म्हणून येतो. मंडल ओबीसींच्या प्रदीर्घ लढ्याचं प्रतीक म्हणून येतो. बहुजन समाजाच्या भंडाऱ्याचा रंग म्हणून येतो. सूर्याच्या पिवळ्या किरणांचा ऊर्जेचा स्रोत म्हणून येतो. या झेंड्यातील हिरवा रंग माणसाच्या निसर्गाशी असणाऱ्या संघर्षाचा आणि एकत्वाचा रंग म्हणून येतो.
हिरवा रंग हा आपलं पृथ्वीशी असणारं नातं सांगतो. महंमद पैगंबर यांनी गुलामीविरुद्ध पुकारलेल्या लढ्याचा रंग म्हणून येतो.
या झेंड्यातील भगवा रंग हा समतावादी बुद्ध संस्कृतीचा, वारकरी संस्कृतीचा आहे. हा भगवा संत नामदेव, संत जनाबाई, सावता माळी, नरहरी सोनार, गोरा कुंभार, विद्रोही तुकाराम अशा संतश्रेष्ठांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा रंग आहे. वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्यात भगवा रंग हा वंचित-बहुजनांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेचा रंग म्हणून येतो.
( वंचित बहुजन आघाडीचा हा झेंडा लक्ष्मण माने, सचिन माळी आणि प्रतिभावंत डिझायनर किरण शिंदे यांनी बनविला आहे.)
(वरील लेख आद प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या FB वॉल वरून सभार)