इथं कोणीच नाही बौद्ध मुस्लिम हिंदू
इथं कोणीच_
नाही बौद्ध मुस्लिम हिंदू…
दिड जीबी च्या जीवावर
शहाण्या झालेल्या दिडशहाण्यांना,
कधीच समजत नाही
आतली बाजू..
कारण मेंढरासारख्या
एकामाघ एक उड्या मारताना,
त्यांच्याकडे कुठं असतो,
खऱ्या खोट्याचा तराजू..?
नवीन ग्रह ताऱ्यांच्या शोधात
माणूस
5 जी च्या स्पीड ने
चंद्रावर पोहचला,
त्याची आम्हांला कानोकान
नाही कोणतीच खबर…
कारण आम्ही व्यस्त आहोत
शोधण्यात,
जन्मभूमी आहे की कबर..
मस्जिदचा भोंगा,
जयंतीचा डीजे
आणि मंदिराच्या घंट्यापेक्षा
साडी- बुरख्याच्या आतल्या
वेदनांचा आवाज मोठा आहे रे..
गल्ली – मोहल्ल्यात
भाई -दादा
म्हणून फिरणाऱ्या मर्दां..!
अजून किती दिवस
आपणच आपल्या चुकांवर टाकायचा पडदा…?
पोपटपंची करून,
विचारांची उंची वाढत नाही
विचारांची उंची,
मोजण्याइतकी उंची
आमच्या विचारांना कुठं आहे..?
म्हणून तर पुतळ्यांच्या उंचीवर
ठरवत असतो आम्ही
महापुरुषांची उंची..
जनावराच्या गु मुतासाठी
माणसांची हत्या होणाऱ्या देशात,
कोणतीही महामारी येउद्या,
फक्त शरीरं मरतील,
कारण
आत्मे तर आधीच मेलेत,
आणि महात्मेही
बंदुकीच्या गोळ्यांचे शिकार झालेत..
हे स्वातंत्र्य
एका क्लिक वर
कोणी सहजासहजी फॉरवर्ड केलेलं नाही..
हे लक्षात ठेवा रे,
व्हाटस अँप युनिव्हर्सिटीच्या पदवीधरांनो,
मोठ्या संघर्षाने सूर्य उगवलाय
अंधाराच्या छाताडावर
फक्त
संविधानाच्या डोळ्यात डोळे घालून बघा..,
हळू हळू कमी होईल,
तुमचाही मोतीबिंदू..
कारण
इथं कोणीच नाही बौद्ध मुस्लिम हिंदू…
….. कवी-सुमित गुणवंत,शिरूर,पुणे ,महाराष्ट्र
(नजरचुकीने दुसऱ्याचे नाव लिहिले गेले तरी मूळ कवीची दिलगिरी व्यक्त करीत आहोत.या मागे कोणाला मोठे करण्याचा व उगाच दुसर्याचे लिखाण ,साहित्य ,विचार चोरून प्रकाशित करण्याचा हेतू नव्हता. मूळ कवीने संपर्क केल्याने सदर प्रकार लक्षात आला.धन्यवाद.)