मुंबईच्या इतिहासाचे आणि सुधारणावादी चळवळींचे अभ्यासक सुहास सोनावणे

मुंबईच्या इतिहासाचे आणि सुधारणावादी चळवळींचे अभ्यासक असलेल्या सुहास सोनावणे (79) यांचे गेल्या शुक्रवारी निधन झाले.


दि.सुहास सोनावणे यांनी दीर्घकाळ विविध वृत्तपत्रांतून सातत्याने लेखन केले. त्यांची ‘सत्याग्रही आंबेडकर’, ‘शब्दफुलांची संजीवनी’, ‘ग्रंथकार भीमराव’, ‘शिवराजकोश: एक महाकाव्य’, ‘महाराजांची समाधी’, ‘भवानी तलवारीचा भाग’, बहुआयामी आंबेडकर’, ‘डॉ. आंबेडकर आणि समकालीन’, ‘मुंबई कालची’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे ‘पुसलेली मुंबई’ हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. दादरच्या कबुतरखानानजीकचे ते रहिवासी होते. त्यामुळे त्याच भागात वास्तव्य असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविद्य अर्धांगिनी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचा दीर्घकाळ सहवास त्यांना लाभला. त्या काळात माईंनी सांगितलेल्या बाबासाहेबांच्या अज्ञात आठवणींचा जणू खजिनाच सोनावणे यांच्यापाशी होता. त्यासंदर्भातही त्यांनी विपुल लेखन केले आहे.

स्वातंत्र्याचा लढा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या न्याय्य हक्कांसाठी केलेल्या संघर्ष पर्वाचे ते अभ्यासक, संशोधक होते. याबाबतीत त्यांना अधिकारवाणी प्राप्त झाली होती. गांधीजी आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील संबंधांवर सोनावणे यांनी निराळय़ा दृष्टिकोनातून प्रकाशझोत टाकणारे लेखन केले आहे. नव्या पिढीच्या अभ्यासकांना ते मार्गदर्शक ठरेल असेच आहे.

दलितांच्या न्याय्य हक्कांच्या मुद्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निग्रही भूमिकेची साक्ष त्यांची अनेक विधाने देतात. ‘‘मला समोरच्या दिव्याच्या खांबाला लटकवून फाशी दिले तरी बेहत्तर, पण माझ्या दलित बांधवांशी विश्वासघात मी कदापि करणार नाही’’, हे विधान त्यापैकीच एक. बाबासाहेबांनी उल्लेख केलेला दिव्याचा तो खांब नेमका कुठला होता? या प्रश्नाने सुहास सोनावणे या एकमेव अभ्यासकाला छळले होते. अखेर त्या प्रश्नाचे उत्तरही त्यांनी मिळवून नंतर एका लेखातून सांगितले होते. फोर्ट भागात पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ कॉलेजच्या ‘बुद्धभवन’ या इमारतीच्या उभारणीचा तो काळ होता. त्यावेळी बाबासाहेब अभ्यासासाठी समोरच्याच एका इमारतीत बसायचे. तिथे खिडकीसमोरच दिव्याचा एक खांब होता. आपल्या निश्चयी उद्गारात बाबासाहेबांनी त्याच खांबाचा उल्लेख केला होता असे सोनावणे यांनी जगासमोर आणले होते.

त्या काळात फोर्टमधील एका हॉटेलातील ज्या कोकणी वेटरला 10 रुपये ‘टिप’ म्हणून द्यायचे, त्याची कथाही सोनावणे यांनी वृत्तपत्रांतून लिहिली होती. बाबासाहेबांना तो ‘वेटर’ सहकारी नेत्यांसमक्ष एकेरी हाक मारायचा. त्यातून त्याचा जिव्हाळा, स्नेह प्रतिबिंबित व्हायचा असे त्यांनी नमूद केले होते.

सुहास सोनावणे यांनी दीर्घकाळ शिक्षण मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष असताना मधुकरराव चौधरी यांचे स्वीय सहायक म्हणून काम केले होते. तसेच रिपब्लिकन नेते रा. सू. गवई हे बिहारला राज्यपाल असताना सोनावणे हेच त्यांचे स्वीय सहायक होते.
-दिवाकर शेजवळ.

प्रस्तुत लेखक आंबेडकरी चळवळीतील आघाडीचे पत्रकार आणि संपादक आहेत.

Next Post

गौतमा तूच माझ्या गुरूचा गुरु...

सोम जुलै 15 , 2019
आज गुरू पौर्णिमा……! जगाला दुःख मुक्तीचा मार्ग दाखवत …जगातील अज्ञान दूर करणारे अन ज्ञानाचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्धच खरे गुरू आहेत….गुरू शिष्य परंपरा त्यांनीच सुरू केलीय…..याचे सविस्तर कथन…प्रस्तुत लेखात केलेय ते नवोदित स्फुट लेखिका वृषली पवार यांनी…! इ. स. पूर्व […]

YOU MAY LIKE ..