घोडे की दूम पे जो मारा हथौडा ….!
–रेखाचित्र – संजय पवार
‘कळ’फलक‘
गुलज़ार यांनी ‘मासूम’ या चित्रपटासाठी लिहिलेलं बालगीत आपल्या सर्वांनाच माहीत आहे. या गाण्यातला घोडा शेपटीवर हातोडा पडताच शेपटी उडवत पळत सुटतो. मुलं हसतात.
परवा कर्नाटकात अमित शहा नामक किंगमेकरच्या अश्वमेध घोड्याच्या शेपटावर असा काही हातोडा पडला की, आणखी एका राज्याचा घास घ्यायचं बुकासुरी स्वप्न भंगलंच. शिवाय तीन दिवासाचे आप्पा खालमानेनं राजभवनाकडे लाडू परत करायला गेले. अश्वमेधाची श्याम भट्टाची तट्टाणी झाली. सार्वत्रिक हसं झासं आणि विजयी जोडगोळीतील प्रधानसेवकांना परदेश वारीचा आवडता खेळ खेळावा लागला. बाकी राज्यस्तरीय प्रवक्ते कम ह.भ.प. लोकशाहीचा खून वगैरे आख्यान रंगवून रंगवून सांगू लागले, पण त्यात ‘राम’ नव्हता. त्यांना आपल्याच कदमतले कमलदले चिरडलेली पाहावी लागली.
दत्तक घेतलेली माध्यमं मांडीवर बसून कितीही, काहीही किंचाळत असली आणि भाबडा (की संमोहित, फसवलेला?) भक्तगण जास्तीची मेजॉरिटी म्हणत रडत बसला तरी सर्वसामान्य जनतेला दिसला, ते सत्तेच्या भूकेपायी आम्ही राजभवनही माजघरासारखं वापरू हा दर्प. विरोधी पक्षातले आमदार जणू काही लेबलं लावून स्वत:ला विकायलाच बसलेत, त्यांचा बाजार भरवा, किमती ठरवा, घासाघीस न करता चार पैसे ज्यादा फेका, पण विकत घ्या… आकडा वाढवा. ही अतिआत्मविश्वासाची चढाई. आपण म्हणजे तो व्यापारी आहोत, ज्यानं आपल्याला विकत घ्यावं यासाठी विकाऊंच्या रांगा लागतात…
पण राजभवनाच्या माजघरात शिजलेलं, सर्वोच्च न्यायालयात नाकारलं. एवढ्या घाईत मुख्यमंत्र्याला शपथ दिलीत, त्याचे चार ओळीचे पत्र वाचून, तर मग बहुमत सिद्ध करा लगेच! त्यासाठी १५ दिवस कशाला? या उद्याच मैदानात (पक्षी : विधानसभेत). तिथंच अश्वमेधाच्या शेपटावर पहिला हातोडा पडला आणि घोडा तोंड दाबून खिंकाळला!
तोवर अर्ध्या रात्रीत घोड्यावर बसवलेले आप्पा, आता या घोड्यावरून उतरायला लागणार, या जाणीवनेनं हतबल झाले. घोड्यावर बसवणारे दिल्लीत जाऊन बसले. आणि दिल्लीतूनच असा हातोडा बसला की, दिल्लीतल्या दिल्लीत दोन दिवसांपूर्वीचे लाडू ‘कडूजार’ झाले. ते उत्साही रविशंकर प्रसाद आणि नवी रणरागिणी निर्मला सितारामन माजघरातल्या मागच्या दरवाजानं लगालगा आपआपल्या मंत्रालयात परतून कामाला लागले. प्रधानसेवक थेट नेपाळला गेले. इकडे आप्पा पडले एकाकी! खाण सम्राट सोबत असूनही खाणीतून हिरे-माणकांऐवजी ढेकळंच हाती लागावी? ‘पैसा सबकुछ हे लेकिन सबकुछ पैसा नहीं’, हे कळून चुकलं. तरीही विधानसभा अध्यक्षांची वादग्रस्त निवड, सर्वोच्च न्यायालयानंही मान्य केली, तसा दिखाऊ उत्साहाला थोडा आधार मिळाला. तोवर शेपूट हलवत मागे मागे फिरणारी पाळीव माध्यमं दोन आमदार गायब, चार आमदार गायब… यांच्याकडे बहुमत आहे तर हे आमदारांना सुरक्षित स्थळी का ठेवताहेत वगैरे मालकाची री ओढत होती. त्यांना किमान मोजलेल्या किमतीएवढा निष्ठेचा सूर लावणं भागच होतं. पण जीव तोडून भुंकूनही परिस्थिती हवी तशी बिघडत नाहीए, हे एव्हाना त्यांच्याही लक्षात आलं.
तोवर आप्पांनी ‘जो हार के भी जितता है वो बाजीगार होता है’ हा संवाद पाठ केला. त्याआधी त्यांनी प्रधानसेवकांनाही मागे टाकेल असा नवा विक्रम केला. फक्त मुख्यमंत्री असलेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाचा (!) निर्णय घेत शेतकरी कर्ज सटासट माफ केली, आणखीही काहीबाही केलं. स्वत:च प्रस्ताव मांडला, स्वत:च अनुमोदन दिलं, स्वत:च स्वत:ला मुंजरी दिली!! ‘येडुयुरप्पा भातुकली’ म्हणून हा नवा खेळ बाजारात आणायला हरकत नाही.
फार पूर्वी हरणाऱ्या राज्याच्या राण्या नव्या आक्रमकानं जनानखान्याचा, आपला ताबा घेऊ नये म्हणून एकत्रित विहिरीत उड्या मारून जोहार करत आणि आपलं पावित्र्य जपत! आप्पा त्या उच्च संस्कृतीचे पाईक असल्यानं त्यांनी पराभवाचा शिलालेख आता अटळ आहे, हे समजताच जोहाराचं १३ पानी भाषण तयार केलं आणि पाळीव माध्यमांनी या तीन दिवसांना अटलजींच्या तेरा दिवसांशी जोडून आप्पांच्या भाषणाला अटलजींच्या भाषणाची स्मरणयात्रा जोडली. पण जनतेला माहीत होतं, आप्पा करून सवरून दमले नि देवपूजेला बसले! अटलजींचं तसं नव्हतं. भारतीय राजकारणातली पक्षीय अस्पृश्यता त्यांनी प्रथमच अनुभवली आणि कुणा रेड्डींच्या खाणीकडे न वळता थेट राष्ट्रपतीभवन गाठण्याचा निर्णय घेतला. प्रतीकात्मकतेनं त्यात एका योद्ध्याचं सन्मानपूर्वक पराभवाचा स्वीकार करणारं जखमी शरीर दिसतं. पण आप्पांचं असं नव्हतं. त्यांची अवस्था पानिपतच्या युद्धासारखी झाली. ते दिल्लीकडे बघत पुटपुटले, ‘काय मुहूर्त साधलाय!’
ज्या घोड्यावर बसवून राजभवनातून विधानभवनात वाजतगाजत आणलं होतं, ते सिंहासन आता घोड्यासकट परत करावं लागणार हे स्पष्ट होताच, आप्पांनी निर्वाणाचं आख्यान लावलं – मी कोणं! मी कसा त्यांचा सेवक, ते कसे सर्व शक्तिमान विकासाचे दूत! त्यांच्या पादुका ठेवूनच मी राज्य करणार होतो. लोकेच्छाही तीच होती. पण संख्याबळ पुरेसं नव्हतं. मी चाचपून, आंजारून, गोंजारून पाहिलं. वाटलं होतं, दिल्ली सांभाळेल. तसेही कर्ते करविते ते. मी निमित्त! पण कर्त्यांनीच पाठ फिरवली म्हटल्यावर मी काय करणार?
गर्वहरण झाल्यावर मग आधीच्या भाषेला, भाकरी दुधात कुस्करून मऊ करावी लागते, तशी मऊच करावी लागते. आप्पांनी तेच केलं. कारण दिसत नसलं तरी शेपूट आणि त्यावर बसलेला हातोडा, योग्य जागी ठणका देतच होता. त्यात ३ आणि १३, ते भाषण, हे भाषण असा गौरव अंक सुरू झालाच होता, तेव्हा पटकन भैरवी आटोपती घ्यावी, हे आप्पांनी वेळेबरहुकूम निभावलं आणि सुटकेचा निश्वास सोला. त्याचा डेसिबल कुणी तरी मोजला, तर तो चक्क १०४ भरला!
तर अशा रीतीनं अश्वमेधाची तट्टाणी झाल्यावर सत्तायज्ञ उधळला गेल्यानं या आधुनिक सत्ता(संधी)साधूंनी शापवाणी उच्चारायला सुरुवात केली- नवी आघाडी अभद्र आघाडी! ती तीन महिन्यातच मोडेल! इतकी तत्त्वशून्य माणसं (दोन दिवसांपूर्वी त्यातलीच एकगठ्ठा चालणार होती.) वगैरे सुरू झालं. चर्चा झालेल्या पराभवाची न करता पाळीव प्राण्यांनी पुढच्या पराभवाची सुरू केली.
तिकडे राजभवनात दुपारी तीन वाजता चहा घेऊन चार वाजता नव्या मंत्रिमंडळाची यादी येईल, याची वाट पहात बसलेल्या राजभवनाला अचानक आप्पा राजीनामा घेऊन आलेले दिसताच तोंडातल्या चकलीचा तुकडा पटकन गिळत राजभवन हताशलं. म्हणालं, ‘अरे, खात्रीचं काय झालं? किमयागार, जादूगार, सौदागार कुठे गेले सगळे?’ आप्पा विव्हळत म्हणाले, ‘तुम्ही फक्त अश्वमेध पाहिला, पण वर तिकडे सर्वोच्च न्यायालयात एक छोटासा पण दणकट हातोडा असतो. ते तो कपाळावर नाही, शेपटावर चालवतात, मग पळत माघारी येण्याशिवाय पर्याय राहत नाही!’ ‘असं का?’ म्हणत उरलेली चकली तोंडात टाकत राजभवन म्हणालं, ‘असो. तसंही या वयात तुम्हाला दगदगच झाली असती आप्पा. ठणका कमी व्हायचा असेल तर तुम्हीही कुणासाठी तरी राजीनामा द्या आणि हे असं राजभवन जवळ करा! इथं ना कसली दगदग, ना ददात. पुन्हा शपथ घेणारा होण्यापेक्षा शपथ देणारा हा मान मोठा. तो वेगळाच.’ आप्पांनी उपरण्यानं तोंड पुसत ‘काफी’ म्हटलं. राजभवन चमकून म्हणालं, ‘आप्पा, जिंकायचं तर ‘काफी’ सोडा नि ‘जिलेबी-फाफडा’ची सवय करा. त्यानं म्हणे सर्व जखमा लवकर भरतात!’
सभार : “अक्षरनामा’
http://www.aksharnama.com/client/article_detail/2091