(लेख जुनाचं आहे, फक्त किंचित बदल केला आहे)
३० सप्टेंबर १९५६ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्ली येथे तत्कालीन शेकाफेच्या कार्यकारीणीची बैठकीत, एक जातीय राजकारण संपुष्टात आणून सर्वसमावेशक अशा रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली आणि बाबासाहेबांच्या पश्चात ३ अॉक्टोबर १९५७ रोजी नागपूरमध्ये रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडियाची स्थापना करण्यात आली. तत्पुर्वी, प्रबुध्द भारत’मध्ये बाबासाहेबांचे १ अॉक्टोबर १९५७ रोजी भारतीय जनतेला उद्देशून खुले पत्र प्रकाशीत झाले होते. हे पत्रचं रिपब्लिकन पक्षाचा आराखडा मानला जातो. दोन लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने सामान्य उमेदवारांकडून बाबासाहेबांचा पराभव केला होता. कर्तृत्वापेक्षा पक्षाला महत्त्व आले होते. आणि या पक्षाचे असेचं प्राबल्य राहिले तर, बाबासाहेबांनी महत् प्रयासाने उभारलेला लोकशाहीचा डोलारा उध्वस्त व्हायला वेळ लागणार नव्हता. तसे झाले असते तर, एकाचं पक्षाला महत्त्व प्राप्त झाले असते. अन् हा पक्ष आपल्या पाशवी बळाच्या आधारे अभूतपूर्व अशी अंधाधुदी माजवू शकला असता. यावर एकच पर्याय म्हणून त्यांनी सामर्थ्यवान विरोधी पक्ष निर्माण करण्याच्या व्यापक, सर्वसमावेशक हेतूने काही नेत्यांना पत्रे पाठवून, भारतीय जनतेला उद्देशून खुले पत्र लिहून रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यात बाबासाहेब म्हणतात, न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हि पक्षाची ध्येय असतील, पक्षाचं स्वरुप प्रादेशिक न राहता, ते देशव्यापी असेल असे स्पष्ट करुन बाबासाहेब आपल्या अनुयायांना लिहितात, हा पक्ष देशातील सर्व दलित, पिडीत आणि शोषीत जनतेच्या हिताचा रक्षणकर्ता असेल. शासनकर्ती जमात बनतांना जो पक्ष आपलं कल्याण करील, त्यांच्याशी हातमिळवणी करा. दुसऱ्या पक्षांशा सहकार्य करतांना आपला पक्ष, त्याचे तत्त्वज्ञान, ध्येय यांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. नेता एकचं असावा, पक्षाचं चिन्ह हत्ती हे बुध्दकालीन संस्कृतीमधील प्रतीक तर, अशोक चक्रांकीत निळा झेंडा हे निशाण असाव असे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या पक्षाबद्दलचे मत स्पष्ट, व्यापक, प्रभावशाली आणि सर्वसमावेशक होते
.आता केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी राज्यात रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नसल्याचे एका मुलाखतीत वक्तव्य केले. पण त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्या गटाबद्दल वक्तव्य केले हे माहित नाही. कारण, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पक्षाची किती शकले उडाली हे सर्वज्ञात आहे. मात्र, अनेकजण रिपब्लिकन चळवळ संपली नसल्याचे दावे करतात, पण तिच्या जीवंतपणाची लक्षणे कोणती ह्याबाबत कोणीही अन् अस्तित्व ह्याबाबत ठामपणे स्पष्टीकरण देत नाहीत. आज आंबेडकरी चळवळीची दशा स्पष्ट झाली असली तरी दिशा का स्पष्ट नाही ? जनतेच्या दबावामुळे अनेक वेळा रिपब्लिकन ऐक्याचे भावनिक प्रयोग झाले, परंतु ते फार काळ का टिकले नाहीत ?
बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या पक्षात समाजवादी मंडळींना सामावून घ्यायची बाबासाहेबांची इच्छा होती. तसे ५ डिसेंबर १९५६ रोजी त्यांनी आचार्य अत्रे, एस. एम. जोशी यांना पत्रे लिहिली तर, ३० सप्टेंबर १९५६ च्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी डॉ. राम मनोहर लोहियांनाही पत्र लिहिल होत. डॉ. राम मनोहर लोहिया, अशोक मेहता, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, मधु लिमये, आचार्य अत्रे रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी झाले असते तर, मग आपले काय असा प्रश्न तत्कालीन नेत्यांच्या मनात आल्यामुळेचं त्यांनी समाजवाद्यांना दूर ठेवले असावे असे वाटते.
माहे सप्टेंबर १९५७ च्या पहिल्या आठवड्यात, १५ जनपथ, नवी दिल्ली येथे दादासाहेब गायकवाड यांच्या निवासस्थानी शेकाफेच्या खासदारांची बैठक झाली. या बैठकीत शेकाफेच्या धर्तीवर रिपब्लिकन पक्षाची घटना लिहिण्याच काम, बी. सी. कांबळे यांच्याकडे सुपुर्द करुन, त्या घटनेवर त्यांनी स्वतःच नाव लिहू नये असा सल्ला दादासाहेबांनी दिला. तो सल्ला बी. सी. कांबळे यांच्या एवढा वर्मी बसला आणि वादाचे एक कारण तयार झाले.
३ अॉक्टोबर १९५७ रोजी नागपूर मुक्कामी लाखो आंबेडकर अनुयायी, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया च्या स्थापनेसाठी उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजले तरी, नेत्यांचे आगमन न झाल्यामुळे, जनसुदायात हलचल माजली. मात्र, इकडे एका बंद खोलीत नेत्यांच्या अंतर्गत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. यादवी बाहेर पडू नये म्हणून, शेवटी सर्व नेते त्वेष गिळून सभास्थानी आले. त्यानंतर रिपब्लिकन पक्ष स्थापनेचा संमत ठराव बी. सी. कांबळेंनी मांडला त्याचा काही भाग – हा नवनिर्मित पक्ष साम्यवाद, समाजवाद, गांधीवाद किंवा आणखी कोणत्याही तत्सम वादाला बांधून घेणार नाही. भारतीय जनतेच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व नैतीक प्रगतीसाठी हा पक्ष बुध्दीवादी आणि आधुनिक दृष्टीने काम करेल. काँग्रेसच्या प्रतिगामी शक्तीला पर्यायी विरोधी पक्ष म्हणून राहिल. मात्र, रिपब्लिकन पक्षाची स्थापना ३ अॉक्टोबर १९५७ ची प्रेसिडीयमच्या सर्व सदस्यांनी ठरविल्याप्रमाणे हा पक्ष, ३ अॉक्टोबर १९५८ पर्यंतच टिकला. वर्षभरात या पक्षाच्या धुरीणांनी विशेषतः एन. शिवराज, दादासाहेब गायकवाड आदी मंडळींनी या काळात पक्षाचा जाहिरनामा, घटना, राज्य, केंद्रिय कार्यकारीण्यांच्या परिपूर्तता न केल्याचे कारण सांगून बी. सी. कांबळे, आवळे बाबू, दादासाहेब रुपवते यांनी नवा रिपब्लिकन पक्ष स्थापन करुन, दादासाहेब गायकवाड, एन. शिवराज, बँ. खोब्रागडे यांच्यावर मात केली. हा नव्याने स्थापन झालेला रिपब्लिकन पक्ष म्हणजे दुरुस्त रिपब्लिकन पक्ष तर जुना, नादुरुस्त रिपब्लिकन पक्ष म्हणजे, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेपुर्वीचं वादविवाद आणि गट होते दुर्लक्षित करता येत नाहित. आणि त्यानंतरची वाटचाल समोरचं आहे.
आंबेडकरी चळवळ संपली आहे, अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकरुपी निष्कर्षानंतर प्रा. जोगेंद्र कवाडेंनी सन २००९ पुर्वी रिपब्लिकन नेते सावरले नाहित तर, रिपब्लिकन चळवळ नावापुरती शिल्लक राहिल असा धोक्याचा गंभीर इशारा दिला होता. बाळासाहेबांनी आंबेडकरी चळवळीच्या वाताहताची शोधून काढलेली कारणे आणि मांडलेले निष्कर्ष पाहता त्यावर सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे होती. त्यानंतर आता केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी राज्यात रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नसल्याचे एका मुलाखतीत वक्तव्य केले. पण त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्या गटाबद्दल वक्तव्य केले हे माहित नाही. कारण, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पक्षाची किती शकले उडाली हे सर्वज्ञात आहे. मात्र, अनेकजण रिपब्लिकन चळवळ संपली नसल्याचे दावे करतात, पण तिच्या जीवंतपणाची लक्षणे कोणती ह्याबाबत कोणीही अन् अस्तित्व ह्याबाबत ठामपणे स्पष्टीकरण देत नाहीत. आज आंबेडकरी चळवळीची दशा स्पष्ट झाली असली तरी दिशा का स्पष्ट नाही ? जनतेच्या दबावामुळे अनेक वेळा रिपब्लिकन ऐक्याचे भावनिक प्रयोग झाले, परंतु ते फार काळ का टिकले नाहीत ?
बाबासाहेबांनी अस्पृश्य मुक्तीचा विचार आपल्या लढ्यातून आणि प्रत्यक्ष कृतीतून स्पष्ट केला होता. त्यांचे सारे जीवन हे समता संघर्षाचे पर्व होते.अस्पृश्यांच्या अस्मितेचे लढे लढवून, त्यांच्या मुक्तीसाठी क्रांतीकारी संघर्षमय मार्ग अवलंबला, चळवळीला प्रगल्भ केले. स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहून, उपेक्षित, वंचित, मागासवर्गीयांच्या प्रश्नांना व्यापक परिणाम मिळवून दिला. परंतु बाबासाहेबांच्या नावाचा वारसा सांगणार्या नेत्यांना गटा तटात राहून, परावलंबी कुबड्या घेऊन विकासाची भाषा करावी लागते ही किती लज्जास्पद गोष्ट आहे ? बाबासाहेब ज्या ध्येय धोरणांसाठी उभे ठाकले होते, आणि ज्यासाठी त्यांनी अक्षरशः आपले जीवन कुर्बान केले होते, त्यांच्या ध्येय धोरणांशी, कार्याशी आपण प्रामाणिक राहिलो असतो तर, राज्याच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या राजकारणातही रिपब्लिकन पक्षाचे निश्चितच वेगळे अढळ अन् निर्णायक स्थान निर्माण झाले असते.
📝 - मिलिंद कांबळे चिंचवलकर