भिवा रे sss तू भेट मला एकदा !- स्टार प्रवाह वरिल मालिकेच्या निमित्ताने

भिवा रे sss तू भेट मला एकदा !
***********************
■ दिवाकर शेजवळ ■
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

सुभेदार रामजीबाबा सकपाळ हे शेवटच्या घटका मोजत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर हे गुजरातमध्ये बडोदा येथे असतात। आजारी वडिलांना भेटण्यासाठी ते लगबगीने निघतात। ते प्रवास करत असलेली रेल्वे गाडी सुरत स्टेशनात येते।
तिथे अनाउन्समेंट होते की, ही गाडी रखडणार असून उशिराने सोडली जाईल। ते ऐकून बाबासाहेब गाडीबाहेर पडतात। स्टेशनबाहेर जाऊन चहापान करावे आणि वडिलांसाठी सुरतची प्रसिद्ध मिठाई घ्यावी, असा विचार त्यांच्या मनात येतो। ते अल्पोपहार, चहापान घेतात। मिठाईची खरेदी करून स्टेशनवर येतात। अन फलाटावर पाहतात तर त्यांची गाडी निघून गेलेली असते। दुसऱ्या गाडीसाठी प्रतीक्षा करण्याची वेळ त्यांच्यावर येते।
तर, दुसरीकडे रामजीबाबा भेटीसाठी भिवाचा धावा करत असतात।

फोटो: रामजीबाबांच्या भूमिकेतील मिलिंद अधिकारी

स्टार प्रवाहवर ‘ महामानवाची गौरव गाथा’ ही मालिका सध्या सुरू असून त्यात रामजीबाबा यांची मिलिंद अधिकारी यांनी केलेली भूमिका संस्मरणीय ठरली आहे।
मरणासन्न रामजी बाबा यांची भिवाच्या भेटीसाठीची व्याकुळता दाखवणारा अखेरचा प्रसंग प्रख्यात कवी गायक दिवंगत नवनीत खरे यांनी एका गीतातून प्रभावीपणे सादर केलेला आहे। या गीताची मिलिंद शिंदे यांच्या कारुण्य असलेल्या आवाजातील ‘ऑडिओ कॅसेट’ येण्याची गरज आहे.

भिवा रे भेट मला एकदा……

(चाल: प्रल्हाद शिंदे: इकडे तिकडे शोधीत कारे फिरशी वेड्यापरी, वसे तो देव तुझ्या अंतरी)

नाही भरवसा, क्षणभरचाही
बघ , येईल ती आपदा
भिवा रे, तू भेट मला एकदा ।। धृ ।।

मृत्यूला मी, थांब म्हणालो
तव भेटीला आतुर झालो
या जीवनातील सर्वस्वाची
तूच माझी रे संपदा ।। 1।।

शरीरातील या, सरले त्राण
नेत्री माझ्या उरले प्राण
पलभरचेही झाले मजला
जगणे आता गदा ।।2।।

इच्छा माझी, इतुकी साधी
हे लोचन माझे मिटण्याआधी
बस, डोळा भरोनी, पाहावे तुजला
हे आले मनी कैकदा ।।3।।

भिवा तुजसाठी मी, ‘नवनीत’ खपलो
माझ्यापरीने तुजला जपलो
या जीवनातील संकटकाळी
भ्यालो ना मी कदा ।।4।।

कवी- गायक: नवनीत खरे

दिवंगत नवनीत खरे

divakarshejwal1@gmail.com

Next Post

महामानव बाबासाहेब डॉ.बी.आर आंबेडकर यांच्या बाबतीत काही माहीत नसलेल्या अनोख्या महत्त्वाच्या गोष्टी.

शनी सप्टेंबर 7 , 2019
महामानव बाबासाहेब डॉ.बी.आर आंबेडकर यांच्या बाबतीत काही माहीत नसलेल्या अनोख्या महत्त्वाच्या गोष्टी. भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांना जागतिक दर्जाचे वकील, राजकीय नेते आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. अस्पृश्य पूर्वाश्रमीच्या महार कुटुंबात जन्मल्यामुळे त्याना आपले सर्व आयुष्य नरक यातनांमध्ये व्यतीत […]

YOU MAY LIKE ..