कोरोना आणि आदरणीय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस!प्रकाशामबेडकर
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
-मा.राजाराम पाटील
कोरोना महामारीत साऱ्या सार्वजनिक उत्सव, जयंत्या आणि कार्यक्रमावर मृत्यूचे सावट आहे. परन्तु जेथे विचार आहे तेथे तेथे लिहिणे बोलणे आवश्यक आहे. या अर्थाने एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून मी बाळासाहेब आंबेडकर यांच्या उद्याच्या 10 मे 2020 च्या वाढदिवसा निमित्त ,माझी सामाजिक कृतज्ञता मनापासून व्यक्त करून ,कोरोना ग्रस्थ बंधू भगिनींच्या मदतीचे कार्य जे पहिल्या दिवसापासून सुरू आहे ते उद्या थोडे अधिक करीन!.
सार्वजनिक जीवनात वयाच्या 35 वर्षी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मला चळवळीची ओळख करून दिली. याअर्थी माझे चळवळीतील वय फक्त 12 वर्षे आहे. म्हणूनच या काळात मला भेटलेल्या असंख्य आंबेडकरी कार्यकर्त्यांना मी प्रथम धन्यवाद देईन. त्यांनी समोर आणलेले बुद्ध फुले शाहू आणि बाबासाहेबांचे साहित्य, विचार, आचरणधर्म या शिदोरीवर मी लोकसभेच्या अगोदर काही दिवस आदरणीय बाळासाहेबांना भेटलो. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून मी त्यांच्यात बाबासाहेब पाहणे हे सहज घडणार होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आगरी कोळी, भंडारी,कुणबी या ओबीसी सागरपुत्र समाजाला घेऊन कोकणात जमीन, पाणी, जंगले, शिक्षण, आरक्षण या चळवळींचा दिलेला आदर्श माझ्या डोळ्यासमोर होता. केवळ बाळासाहेबच नव्हे तर प्रत्येक आंबेडकरी बंधू भगिनीमध्ये मी हा अहिँसक संघर्षाचा इतिहास पाहत आलोय. मला नेहमीच, सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात अनेक पक्ष, राजकीय नेते आहेत. परन्तु महाराष्ट्रातील असंख्य मागासवर्गीय जातींच्या हक्काची,राजकीय प्रबोधनाची चळवळ हे बाळासाहेबांचे विशेष कार्य आहे, हे विविध प्रसार माध्यमातून मी वाचले होते.
2005 नंतर शिक्षकी पेक्षा सोडल्यानंतर वर्षाकाठी एखादे मोठे शेतकरी आंदोलन आणि रोज शेतकरी प्रश्नावर काम करणे ते प्रश्न सोडवून न्याय देण्यापर्यतचा पाठपुरावा करणे,नवं नवे कार्यकर्ते गावे जोडणे,हेच माझ्या जगण्याचे सूत्र झाले आहे. लोकांच्या प्रश्नातच आणि समाधान होईपर्यंत सोडविण्यात माझे व्यक्तिगत सुख आणि सौख्य आहे हे सत्य स्वीकारल्यामुळे सत्ताधारी जातीतील,प्रस्थापित यशस्वी राजकारणी माझ्यात नाही हे मी मान्य करतो. याच नजरेने मी बाळासाहेबाकडे पाहिले आहे.
जमीन हक्कांचा लढा मग तो कूळ कायद्याची अंमलबजावणी असो, सेझ विरोधी दत्ता पाटील यांचे आंदोलन, सिडको विरोधी दि बा पाटील यांचे आंदोलन, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प,कोकणातील प्रदूषणकारी कोळसा प्रकल्प, पेण धरमतर खाडी मच्छिमार आंदोलन, नवी मुबंई सिडको एमआयडीसी प्रकल्पग्रस्त, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्थानचे आंदोलन या साऱ्या आंदोलनाचे कळस अध्याय ठरलेले मुबंई च्या कोळीवाडा गावठाण हक्कांच्या, आंदोलनात मातृसत्ताक एकविरापुत्र बुद्ध आणि संविधान कार डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन मी मुबंईत धडक मारली!
महाराष्ट्राच्या विधिमंडळात भाजपा सरकारातील आमदार आशिष शेलार मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि कॉग्रेस पक्षाचे भाई जगताप यांनी या प्रश्नावर वाचा फोडून 200 गावठाणांचे सीमांकन जमीन हक्कासाठी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.सामाजिक चळवळीचा हा यशस्वी राजकीय प्रभाव होता.
आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी हे भूमिपुत्र या लढ्यात पूर्ण जागे झाले आहेत.सर्व प्रकारच्या हिंदुत्ववादी आणि जुलूम जबरदस्तीच्या प्रचाराला भीक न घालता आपल्या हक्क अधिकारांसाठी लढायला ते उतरले आहेत. अर्थात मुबंई च्या समुद्र किनाऱ्याच्या अत्यन्त मौल्यवान जागा ताब्यात घेण्यासाठी भ्रष्ट प्रशासन, मुबंई महानगरपालिका एसआरएवाले, भूमाफिया राजकीय नेते आणि त्यांचे खरे पाठराखे असलेल्या पडद्यामागच्या बिल्डर लॉबीनेही गावठाण चळवळ संपविण्याचा विडा उचलला होता. आता केवळ आगरी कोळी ओबीसी जाती हा लढा यशस्वी करणे अवघड आहे यासाठी जुन्या खोती विरोधी आंदोलनातील बाबासाहेबांची चळवळ सोबत असेल तर? मी बाळासाहेबांना माझी व्यथा सांगितली. मुबंई च्या जमीन हक्कांबाबत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे कायद्यातील ज्ञान, इंग्रज पोर्तुगीज यांच्या काळातील महत्वाचे दस्त याचे प्रचंड अनुभव आणि सामाजिक भान आहे. मी कोकणातल्या बेदखल कुळांचा ,ओबीसी नेतृत्वाचा आणि अगोदरच अभ्यास दौरा केला होता.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यापूर्वी जोडलेल्या कुणबी, भंडारी आगरी, कोळी या सर्वांना घेऊन वंचित आघाडी भक्कमपणे बांधण्याचा मनसुबा रचला होता.
परन्तु हिंदू कट्टर पंथीयांनी ओबीसींच्या मनावर केलेला,मुस्लिम विरोधी प्रचार ओबीसींना वंचित बरोबर जोडण्यात मोठा अडथळा होता. कल्याण येथील सभेत बॅरिस्टर ओवेसी आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या डोक्यात जागतिक मैत्री सांगणारी, मानाची कोळी टोपी घालून माझे सहकारी जयेंद्र खुणे यांनी,आई एकविरा पुत्र बुद्धाच्या मैत्रीने एकाचवेळी मुस्लिम बांधव आणि आंबेडकरी भाऊ जोडण्याचे ऐतिहासिक काम केले.यानंतर ठाणे जिल्ह्यातील माझ्या कट्टर आगरी कोळी तरुणांनी केलेल्या प्रखर टिकेस सामोरे जाताना प्रबोधनाची आणि मैत्रीची किंमत काय असते हेही समजून घेतले.आज ठाणे जिल्ह्यात खूप चांगले सामाजिक बदल दिसताहेत! वंचित बहुजन आघाडी मध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी, मुस्लिम आणि समस्त आंबेडकरी बंधू भगिनींना जोडण्याचे जे ऐतिहासिक काम केलंय त्याबद्दल “कोरोना” नसता तर बाळासाहेबांचा, नक्कीच भव्य नागरी सत्कार आपण करायला हवा होता हे अंतर्मनात जाणवतेय.
भारत पाकिस्तान फाळणी नंतर भारतीय नागरिकांनी अल्पसंख्याक समाज बांधवांना खऱ्या खुऱ्या बंधुत्वाने कसे जोडावे ?या देशाला एकसंघ कसे ठेवावे,हा माझ्या मनातील सुप्त भावानेस, ईस्ट इंडियन आणि मुस्लिम बांधवांना ओबीसी बरोबर जोडण्याच्या प्रयत्नशील समाजकारणास बाळासाहेबांचा मिळालेला जाहीर पाठींबा, आशीर्वाद हे त्यांचे व्यक्तिगत राष्ट्रीय कर्तृत्व आहे. सर्व समर्थक आणि विरोधी पक्षातील देशबांधव आणि बॅरिस्टर ओवेसी यांनीही राजकारणा पलीकडे जाऊन, बाळासाहेबांच्या दूरदृष्टीचा नेतृत्व गुणांवर बोलायला हवे !लिहायला हवे. मी एकविरा पुत्र भगवान बुद्धाच्या तत्वाने या मैत्रिकडे आजही पाहतो.
शिवाजी पार्कची अठरा पगड जातीच्या लाखो लोकांना,त्याच्या नेत्यांना घेऊन,ओबीसी आरक्षण परिषद , ज्या भव्यपणे झाली ,जीचे वर्णन पत्रकारांनी शिवाजी पार्कचे नवे “बाळासाहेब” असे केले ती 1001 टक्के यशस्वी झाली. कोरोना नंतर ती शिवाजी पार्क च्या खऱ्या खुऱ्या रयतेच्या राजाच्या,छत्रपती शिवरायांच्या विचारांनी पुन्हा वाढायला हवी!कोणत्याही राजकीय नेत्याने किंवा राजकीय पक्षाने मुबंईच्या भूमिपुत्र समाजाला जमीन हक्क मांडण्यासाठी एवढा मोठा आदर मान सन्मान यापूर्वी कधीच दिला नव्हता.यासाठी आम्ही मुबंई ठाणे रायगड चे भूमिपुत्र बाळासाहेबांचे पुनः पुन्हा आभार मानू! यापेक्षा अधिक मोठे यश म्हणजे शिवाजी पार्क वरील खासदार ओवेसी यांचे जागतिक दर्जाचे,समस्त टीकाकारांना लाजविणारे, संविधानिक आदर्श देणारे, मुस्लिम समाजाचे मनोगत सांगणारे धीरगंभीर भाषण. हे सारे एवढे वेगवान होते की मागचे वर्षभर आम्ही यावर चिंतन मनन केले नाही. शिवाजी पार्कची सभा लाखो आंबेडकरी, ओबीसी, एससी, एसटी, विजेएनटी, अल्पसंख्याक आणि विरोधक यांच्या मनात खरे राष्ट्रीयत्व घडविण्यासाठी केलेला खूप मोठा संस्कार होता.शिवाजी पार्कच्या कानसेन लोकांना भारतरत्न आंबेडकरांच्या खऱ्या राष्ट्रवादाचा जाहीर परिचय होता. आंबेडकरी जनतेच्या मनातील लाखो संकल्पांचा एक सगुण साकार सोनेरी क्षण होता. अड बाळासाहेब आंबेडकर बॅरिस्टर ओवेसी हे अत्यन्त विदवत्ता प्रचुर, प्रभावी वक्ते ,राष्ट्रीय संघटक,दोन राष्ट्रीय नेते आम्हास मिळाले. आजही देशाचे राजकीय भवितव्य घडविण्याची क्षमता या नेत्यांमध्ये आहे ,असा माझा विस्वास आहे.या सर्व सभांमध्ये मी तृप्त झालो समाधानी झालो.
पुढे लोकसभेची निवडणूक लढण्याइतका मी आर्थिक आणि संघटनात्मक सक्षम नव्हतो.तरीही बाळासाहेबांनी व्यक्तिशः खूप मोठी मानसिक, आर्थिक आणि सामाजिक शक्ती देऊन मला मावळ लोकसभा मतदार संघातून उभे केले. या निवडणुकीत प्रस्थापित राजकीय पक्षांचे आव्हान स्वीकारून आम्ही मेहनतीने शर्थीने लढलो आंबेडकरी जनतेचे उपकार आणि प्रेम यातून मी कधीच मुक्त होणार नाही कायम कृतज्ञच राहीन. आगरी कोळी कराडी ओबीसी बांधवांनी मला पाठींबा दिला हे सुद्धा मोठे उपकार आहेत. अर्थात आतापर्यंत केलेल्या शेतकरी लढ्याची पुण्याई कामी आली!वैदिक मनुवादातून एखादा बाहेर पडू शकतो यास ओबीसी बांधवांनी दिलेली ती जाहीर मान्यता आहे!! माझ्या समाजातील ओबीसी बांधव आणि सर्वच सत्ताधारी,विरोधी पक्षातील नेतृत्वाने केलेले वंचित आघाडीच्या यशाचे कौतुक ही माझ्या व्यक्तिगत नेतृत्वगुणाची,सामाजिक चारित्र्याची अग्निपरीक्षा होती. मी ती उत्तीर्ण झालो.असे मला वाटते. आंबेडकरी चळवळीत मला खूप मोठे भाऊ आणि बहिणी आहेत. हा लेख वाचताना माझे मनापासूनची भावना ते जाणत असतील.तरीही हा वाढदिवस आपणा सर्वांच्या नात्याचा आहे,असे मी मानतो! जाहीरपणे सांगायची गोष्ट म्हणजे, आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांनी वडील भाऊ म्हणून फार मोठी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. आम्हा लहान भावंडांचे काही कर्तव्य असते. मला त्याची जाणीव आहे. या प्रवासात ओबीसी बांधवांना “हँडल विथ केअर,” या पद्धतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जपले होते. बाळासाहेब आंबेडकरानाही ते नाते जपलेय! म्हणूनच बाळासाहेबांना मी भारतीय राजकारणात आणि व्यक्तिगत जीवनात माझे “दादा” असे आदररार्थी नात्याने म्हणतो.
बाळासाहेब माझ्या घरी उरणला येऊन जाणे, मासे भाकरी खाऊन जाणे.. असे बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागु पाटील यांचे जुने बंधुत्व जपणारे नाते ,प्रत्येक ओबीसी आंबेडकरी मुस्लिम ख्रिशन भावा भावाने जपावे ..असेच नवे आदर्श देणारे हे नाते आहे! आई एकविरा मातृसत्तेचा, पंचशील मार्ग, हा अहिंसक लोकशाही परिवर्तन सांगणारा बुद्ध विचार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शेतकरी आंदोलनात, नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळात उध्वस्त होणाऱ्या माझ्या समस्त मागासवर्गीय समाजाला वाचविण्या बरोबरच मातृसत्ताक केरुमाता बौद्ध लेणी वाचविण्याचे आंदोलन हा जमीन हक्काच्या शेतकरी लढाईतील नवा जागतिक विचार आहे. तो समजून घेऊन पुढील सामाजिक, राजकीय आणि व्यक्तिगत जीवनाचा सर्वोच्च उत्कर्ष गाठण्याचा मार्ग आहे.कार्ला बौद्ध लेण्यातील आई एकविरेस आदर्श मानून सम्राट अशोकाच्या काळातील वैभवशाली भारत घडविण्यासाठी मला लोकसभेत जाण्याचे स्वप्न आणि पाठबळ देणाऱ्या बाळासाहेब तथा अड प्रकाश आंबेडकर यांना आणि आंबेडकर परिवारास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!!
(प्रस्तुत लेखक वंचित बहुजन आघाडी चे नेते आहेत)