काळाच्या मर्यादांना न जुमानणारे क्रांतिकारक : महात्मा फुले
■ दिवाकर शेजवळ ■
divakarshejwal1@gmail.com
महात्मा फुले यांचा आज स्मृती दिन। प्रत्येक महापुरुषाला काळाची मर्यादा असते हे खरेच आहे। पण त्या मर्यादेमुळे फुले हे वर्णव्यवस्थावादी हिंदू धर्माला पर्याय देऊ शकले नाहीत, हे काही विद्वानांचे मत मी तरी मान्य करत नाही। कारण फुले यांनी दिलेला सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांनी आपल्या परीने दिलेला पर्यायच होता। फक्त त्यांचा तो पर्याय रुजवण्यास त्या काळातील बहुजन म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ अपयशी ठरली इतकेच। त्यावरून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फुले यांचा वारसा सांगणाऱ्या तत्कालीन ब्राह्मणेतर नेत्यांना झापल्याचा दाखला आहे।
एकदा महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त काही बहुजन नेते विशेषांकासाठी ‘संदेश’ मागायला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे गेले होते। त्यावेळी बाबासाहेब उद्वेगाने म्हणाले होते:मी काय संदेश देऊ ? फुले यांच्या चळवळीचे तुम्ही लोकांनीच वाटोळे केले, हाच माझा संदेश आहे!
महात्मा फुले यांच्या बाबतीत काळाच्या मर्यादांपेक्षा त्यांनी ज्या काळात बंडाचे धाडस दाखवले, तो काळ आणि त्यांचे धाडसच त्यांना महात्म्य बहाल करते। डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उगाच काय त्यांना गुरू मानले होते? बाबासाहेबांनी बुद्ध, संत कबीर,फुले या आपल्या तीनही गुरूंना पाहिलेले नव्हते। ते तिघेही त्यांच्यापुर्वीच्या काळातील होते। पण त्या तिघांनीही आपापल्या काळात धाडसाने केलेल्या बंडालाच बाबासाहेबांच्या दृष्टीने महत्व अधिक होते।
स्वातंत्र्य लढ्याला समांतर असा अस्पृश्याच्या न्याय हक्काचा लढा चालवल्याबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनाही ब्रिटिश धार्जिणे आणि देशाचा शत्रू ठरवण्याचे कमी प्रयत्न झाले नव्हते। पुणे कराराआधी गांधीजींनी स्वतंत्र मतदारसंघाविरोधात उपोषण करून आपले प्राण पणाला लावले, तेव्हा तर बाबासाहेब हे अख्ख्या देशाच्या नजरेत खलनायक बनले होते। ते लक्षात घेता स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती शेण- दगड गोट्याचा मारा झालेल्या काळातील समाजाची मने कशी असतील, याची सहज कल्पना येऊ शकते। त्या काळात महात्मा फुले हे शिक्षण आणि आधुनिक विचारांचे वारे देशात आणलेल्या ब्रिटिश राजसत्तेला खुलेआम ‘ईश्वरी देणगी’ म्हणायचे! अन सफाईकाम करणाऱ्या अस्पृश्याना तुच्छ लेखत असाल तर मग आपले घर स्वच्छ ठेवणाऱ्या आईचीही गणती त्याच श्रेणीत करा, असे सनातन्यांना फुले हे बिनधास्तपणे सूनवायचे। हे धाडस आणि बंडखोरी काळाची पर्वा न करणारी होती।
अशा महान ज्योतिबा फुले यांना लाख लाख सॅल्युट!