पँथर वसंत कांबळे यांचे दुःखद निधन – हे आंबेडकरी चळवळीतील प्रत्येकाला धक्का देणारे वृत्त!

एका खंद्या कार्यकर्त्याचे आज दुपारी आकस्मिक निधन व्हावे हा आंबेडकरी चळवळीतील प्रत्येकाला धक्का देणारे वृत्त!
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
गुणाजी काजीर्डेकर -www.ambedkaree.com
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

महालक्ष्मी-वरळी-सातरस्ता विभागातील आंबेडकरी चळवळीतील एक प्रखर ,परखड आणि धाडसी नेता काळाच्या पडद्याआड गेला.काल दिनांक १५ मे २०२० दुपारी त्यांचे आकस्मित निधन झाले .आंबेडकरी चळवळीतील अनेक कर्तृत्वान कार्यकर्ते उपेक्षितच राहिले ते प्रमाणिकपणे जगले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी एकरूप होत आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले आंबेडकरी जेष्ठ कवी जयवंत कांबळे यांनी बंधू आणि स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करून सर्वसामान्य जनतेच्या सोबत राहून त्यांच्या साठी कार्य करणारे दि वसंत धोंडिराम कांबळे संक्षिप्त! लिहीत आहेत पत्रकार गुणाजी काजीर्डेकर

कांबळे पँथर, कवी, गायक आणि एक डॅशिंग अभ्यासू वक्ता अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केलेल्या एका खंद्या कार्यकर्त्याचे आज दुपारी आकस्मिक निधन व्हावे हा आंबेडकरी चळवळीतील प्रत्येकाला धक्का देणारे वृत्त!
वसंत धोंडिराम कांबळे- बावडेकर, मुळचे गगनबावड्याचे असले तरी नंतर कोकणातील खारेपाटणमध्ये स्थायिक झाले. पाच भाऊ एक बहीण, पत्नी, मुलं, भावांची मुलं , आजही हा परिवार एकत्रित पहावयास मिळतो. धोंडिराम बावडेकर उंचापुरा मनुष्य, त्यांचे खारेपाटणमधील सांगेलकर यांच्या मोठ्या मुलीशी जून्या पद्धतीने अर्थात हिंदू धर्म परंपरेनुसार लग्न झाले. तीन बहिणी एकुलता एक भाऊ असा सांगेलकर परिवार मोलमजुरी करून दिवस कंठीत होते. धोंडिराम कांबळे यांना यशवंत व हिरा ही मुलगी झाली. मात्र पहिली पत्नी हयात असतानाही धोंडिराम कांबळे यांची वर्तणूक पाहून, दुसरी मुलगीही त्यांच्या गळ्यात बांधली! धोंडिराम बावडेकर नोकरी सांभाळून असत. जयराज भाई लेनमध्ये जेथे नामदेव ढसाळ यांचे वास्तव्य होते. जी ढोर चाळ या नावाने चळवळीत प्रसिद्ध आहे.पाठीमागेही एक अरब गल्लीत ढोर चाळ असून ती जूनी ढोर चाळ या नावाने ओळखली जाई. पँथर उमाकांत रणधीर येथलेच! जून्या ढोर चाळीत सर्व कोकणातील चाकरमान्यांची वस्ती. बहुतेक देवगड, राजापूर या दोन तालुक्यातील बांधव राहत होते. यासंदर्भात मी पुढे लिहिणारच आहे. जयवंत, वसंत, व धर्मा यांचे पहिलीत नाव दाखल केले ते कामाठीपुरा व्होकेशनल प्राथमिक शाळेत. ज्या जागेत वास्तव्य होते ते धोंडिराम बावडेकर यांच्या पुतण्याच्या जागेत, कुटुंब वाढल्याने नंतर महापालिकेच्या महालक्ष्मी येथील कामगार वसाहतीत राहायला आले. ‘ डी’ ब्लॉक मध्ये दुसऱ्या मजल्यावर खोली मिळाली.तेव्हाचा काळ लक्षात घेता, मासिक वेतन दीडशेच्या आत असे! खाणारी तोंडे वाढली, मग आमच्या मावशीने वसंताच्या आईने वाडीच्या साफसफाईचे काम सुरू केले. अगदी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत म्हटले तरी चालेल पण काम करत राहिली!

तो काळ चळवळीचा होता, पण मेलेल्या मुडद्यावानी माणसं जगत होती. बाबासाहेबांनी उभी केलेली माणसं, व चळवळ त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर रिपाइं चे गट स्थापन करून राजकीय पक्षांच्या दावणीला बांधली ! मी तर म्हणतो ही एकप्रकारे आत्महत्याच होती! पँथरच्या स्थापने दरम्यान जयवंत, वसंत, धर्मा जयराजभाई लेन मध्येच होते. मी पाठीमागच्या ढोरचाळीत! मावसबंधू यानात्याने माझे माझे येणे-जाणे असे. माझी आई लहानपणीच गेलेली! त्यामुळे मावशीच्या घरी गेल्यावर जयवंत-वसंतच्या आधी मावशी मला खायला देत असे! पँथरच्या आंदोलनाचा मोठा परिणाम या दोन्ही भावांवर झाला. त्यात जयवंत सातवीच्या पुढे गेला नाही, पण बुद्धी कुशाग्र होती. त्यात पँथरचे संस्थापक ढसाळ आमच्या चाळीतला असल्याने छाती अधिकच फुगून यायची.

( वाचकहो, या आठवणी सांगत असताना मी अनेकदा काही प्रसंग लिहिले. पण पँथरमधील काही जख्खड म्हाताऱ्या नेतृत्वाने माझ्यावर टीकाच केली. या लोकांचे म्हणणे असे की, पँथरचा आणि या कालच्या पोरांचा संबंध तो काय? चळवळीत कितीतरी शाळकरी विद्यार्थ्यांनी स्वतःला झोकून दिले होते. पण त्यांचे नाव नाही, ना दखल घेतली. मी प्रयत्न केला असता, मलाच नाउमेद केले. ज्यांनी आमचे पाय ओढले तेच कालांतराने एकमेकांपासून फुटले, फुटताना एकमेकांना कुटत होते! कुटताकुटता अर्धमेले होत होते. जे आधीच्या कार्यकर्त्यांनी केले तेच नंतर पँथर फूटीत झाले! यालाच तर मळलेली पायवाट म्हणतात! माझ्या भूमिकेवर नामदेव, ज.वि. व भाई संगारे वगळता बहुतेकांनी नाराजी व्यक्त केली! पँथरने मंडल प्रश्नावर रान माजवले, पण सामान्य कार्यकर्त्याला मंडल आयोग समजला नाही. १९८० च्या दरम्यानची स्थिती होती. मी ‘नवाकाळ ‘ मध्ये लेख लिहिल्यानंतर जयवंत कांबळे, मोतीराम भिवा जाधव ( कुणकवणकर), के.डी. पवार यांनी मान्य केले, गेली दोन वर्षे आम्ही आंदोलनात आहोत पण आयोगाची पार्श्वभूमीच माहिती नाही! नेत्यांनी आयोग कठीण करून सांगितला ! आजही केडी पवारांचे धाकटे बंधू प्रकाश दाजी पवार या घटनेचे साक्षीदार आहेत! )

जयवंतकडून वसंत चळवळ कशी जगावी हे शिकला! मात्र त्यामागे होती ती वाचनाची प्रचंड आवड! आणि चळवळीत ज्यांनी हौतात्म्य पत्करले अशा कार्यकर्त्यांचा त्याग या दोन्ही भावांना खेचून आणत होता. शहीद भागवत जाधव आणि रमेश देवरूखकर यांच्या बलिदानाने जे तरूण पेटून उठले त्यात हे माझे दोन्ही बंधू होते! शहीद भागवत जाधव यांच्यावर जयवंत कांबळे यांनी लिहिलेली कविता आजही अनेकांच्या संग्रही आहे. शहिदांच्या स्मृतीस अभिवादन करताना विद्रोही कवी विवेक मोरे यांनी कित्येकदा या कवितेच्या ओळी खड्या आवाजात सादर केल्या आहेत!

तोच वारसा जयवंतच्या हयातीत वसंतने चालवला! आक्रमकता, स्वभावातच असल्याने वसंत आपल्या कवितेत जिते जागते वास्तव मांडत असे. माझ्यासारखे त्याने लांबलचक लेखन करण्याच्या भानगडीत न पडता, तो काव्यातून वास्तव मांडत राहिला. विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर ठाम राहिलेला हा आमचा बंधू भारतीय दलित पँथरच्या नेत्यांनी घेतलेली आडवळणे पाहून व्यथीत झाला आणि रामदास आठवलेंना त्यांची जागा दाखविण्याचे काम जयवंत-वसंत या दोन्ही बंधूंनी केले! आम्हाला मोठ्या मानाच्या नोकऱ्या नका देवू, कारण तीदेण्याची ऐपत नेत्यांमध्ये नाही. किमान नेत्यांनो आपला स्वाभिमान गहाण तरी ठेवू नका ही या बंधूंची अपेक्षा होती.

मी बाप्टीरोडला,तर वसंत महालक्ष्मीला, कधीकाळी कचऱ्याच्या गाड्या मोकळ्या भूखंडावर खाली केल्या जात असत त्यामुळे हा विभाग कचरपट्टी या नावाने प्रसिद्ध! कधीतरी गेल्यावर हे दोघेही मला अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडत. तू शिकला आहेस रे, विश्वनाथ वाबळेंच्या सांजदैनिक
‘ शिवनेर’ मध्ये माझे लेख यायचे. यांनी त्याचा संग्रह केलेला. मावशी कामाला जायची. बहिण संगीता ताडदेवच्या समाजवादी पक्षाचे नेते यांचे स्वतःचे नाव असलेल्या ‘ युसुफ मेहरअली हायस्कूल ‘ मध्ये जायची ( ती सर्वात लहान असल्याने आम्ही तिला बेबी म्हणत असू! आजही वयाची पन्नाशी केव्हाच उमटली तरी आम्ही तिला बेबी या नावानेच हाक मारतो) मी पहिल्यांच टर्ममध्ये जून्या ‘एस एस सी’ परीक्षेत तेही नाईट हायस्कूलमध्ये शिकून उत्तीर्ण झालो याचा जयवंतला फार अभिमान ! वसंत अंगापिंडाने मजबूत, त्यात गोरापान, पण वयाने लहान असल्याने जयवंत त्याला माझ्याविषयी खूप काही सांगायचा! खरेतर वसंतविषयी लिहिताना माझ्याविषयी काही येणार नाही दक्षता घ्यायचा मी खूप प्रयत्न केला, पण जयवंत च्या कधीही न आटलेल्या प्रेमाखातर मला काही आठवणी उद्युक्त करणे गरजेचे वाटते. तो काळ मला घडविणारा ठरला. जसा ज.वि.चा सहवास लाभला, तद्वतच शिवराम जी.येळवणकर, विश्राम हरी जाधव (शिवणकर), नायगावचे बौद्धाचार्यांचे प्रशिक्षक बी. एस.ताम्हणेकर गुरूजी, रत्नागिरी जिल्हा समाज समता संघाचे सचिव (१९३२), व राजापूर तालुका महार ज्ञाती पंचायतीचे पहिले अध्यक्ष विश्राम बाळू वडगावकर गुरुजी यांचा सहवास लाभला. यांचे मी या जन्मी तरी ऋण फेडू शकत नाही. या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मला अनेक पुस्तके वाचावयास दिली. माझ्यातील दडलेल्या लेखकाला बाहेर काढण्याचे काम केले. महालक्ष्मी येथे एका कार्यक्रमात मी याची वाच्यता केल्यानंतर जयवंतने वसंताला वाचनाचे किती फायदे असतात हे सांगितले. त्यानंतर वसंत झपाटल्यागत वाचत सुटला. त्यांना पडलेल्या कोड्याचे स्पष्टीकरण करण्यास मी होतोच! दोन नंबरचे असूनही धर्मा मात्र शांत प्रकृतीचा! त्याचा कल अखंडपणे धम्म चळवळीकडे राहिला धम्मचारी बोधीसेन यांच्या संपर्कात आल्यानंतर संगीता व धर्मा दोघाही बहिण-भावानी त्रिरत्न बौद्ध सहाय्यक संघासाठी झोकून दिले!

राजकारणात आलेले अपयश, नेत्यांचा अवसानघातकीपणा, कार्यकर्त्यांची चमकेशगिरी, चळवळीत हरवत चाललेली शिस्त अर्थात बेशिस्तपणा यावर वसंत पोटतिडकीने बोलत असे. अनेकदा त्याने विचारपीठावरून बोलूनही दाखविले आहे.
चळवळीसाठी नोकरीच्या फंदात कधीच पडला नाही. मुले मोठी झाली, त्यांच्या भविष्याचा विचार कोणी करायचा? पत्नीच्या खांद्यावर प्रपंचाचा बोजा टाकून या अवलियाने चळवळीत स्वतःला झोकून दिले. जयवंत-वसंत या दोन्ही बंधूंना चळवळीने इतके वेड लावले की, स्वस्वार्थही त्यांच्यापुढे लाजला असेल का? पॉकेटमनी कोण देणार? पण खिशात पैसा नसल्याने पाय घरात कधीच थांबले नाहीत! चळवळीत एक नवे मन्वंतर आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्यारूपाने चळवळीच्या क्षितिजावर नवे नेतृत्व पुढे आले. वसंतने येथेही झोकून दिले. घणाघाती भाषणाने भल्याभल्यांची झोप उडविणाऱ्या वसंतची रिपब्लिकन सेनेची तोफ अशी नवी ओळख निर्माण झाली. तोफ या शब्दावरून भाई संग्रह, प्रा.जोगेंद्र कवाडे, आणि महाराष्ट्र राज्य ओबीसी संघाचे नेते, व आगरी समाजसुपुत्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ वाचले नाहीत, तर कृतीत आणणारे, ज्येष्ठ विचारवंत जगन्नाथ कोठेकर ही नावे माझ्या डोळ्यापुढे येतात. या पंक्तीत वसंत कांबळे या एका नावाचा मी आज समावेश करीत आहे!

काही दिवसांनी मी सिद्धार्थ नगर बाप्टीरोड येथे राहायला गेलो. नेमके डी. ब्लॉक मध्येच.. तेथे दुसऱ्या मजल्यावर ज.वि.पवार राहत होते. मी आमचा च्आत्या ‘नाजाक्का ‘ ची मुलगी मंदा, मेहुणे अनंत गोवळकरांना दिलेली. तेथे भाडेकरू म्हणून आम्ही राहायला गेलो. मी डी-३१, मध्ये व बाजूच्याच खोलीत डी-३२ मध्ये जीव राहत असत. दिवसा कारखान्यात काम व रात्रीचा जिन्याखालील अतिशय मंद प्रकाशात अभ्यास हा आमचा नित्यक्रम असे! ज.वि.आंदोलने मोर्चे व सभा आटोपून पहाटे चार पाचच्या सुमारास यायचे त्यावेळी मी वाचन करीत असे! एकदोनदा त्यांनी मला दम भरला. ” काय रस झोपायचे नाही का? काय वाचतोस बघू, ” माझ्या हातात लायब्ररीतून आणलेले खरातांचे पुस्तक पाहून, ते फक्त हसले!

कधीतरी महालक्ष्मीला गेलोच तर दोन दिवस राहण्याचा आग्रह ठरलेला. ” काय आणलेस दादा? हा वसंता नित्याचा प्रश्न? मी सोबत पिशवीत कोंबलेली पुस्तक दाखवल्यावर जयवंत सांगायचा, “बघ, एकतरी माझा भाऊ लेखक-पत्रकार आहे ना? वसंत, चळवळ समजून घ्यायचा असेल तर वाचन हवे.” या दोन्ही भावांवर शहीद भागवत जाधवांचे बंधू दिवंगत सि.रा.जाधव आणि सुमेध यांचा खूप जीव! सि.रा. जयवंतविषयी कळकळीने बोलायचे!!
या आठवणीबरोबरच एक महत्त्वाची आठवण आणि सत्य बंधू-भगिनींपुढे ठेवणे माझे कर्तव्यच समजतो. जयवंत कवी होता, तोच वारसा वसंतकडे आला. या दोघांकडून लंकेश जयवंत कांबळे याने काव्याबरोबरच गायनकला आत्मसात केली. मीदेखील अधूनमधून गाणी लिहिली. प्रबोधनपर्वातही गीतांचे कार्यक्रमही केले. आम्हा भावंडांना(काजिर्डेकर-बावडेकर) ह्यांना जो वारसा मिळाला तो बापू खारेपाटणकर ह्यांच्याकडून हे कबूल करावेच लागेल! बापू पाटणकर सनईवर अतिशय उत्तम असा ताशा वाजवीत. खरे तर तेही एक संगीतच असे. असे म्हणतात की, (१९४० ते १९६५) त्याकाळी बापू याचे त्यातील कसब पाहण्यास रात्रीच्यावेळी पेट्रोमॅक्सच्या बत्या, कंदीलाच्या उजेडात लोक येत असत! आमचे मामा कालकथित गंगाराम सांगेलकर हे स्वतः उत्कृष्ट तबलापटू होते. आता अस्तित्वात नसलेली पूर्वीच्या कोलकाता इस्टेट या बेलासिस रोडवरील चाळीत जयंत गायन पार्टी चालत असे. या संचात यशवंत आजिवलीकर हे अतिशय भारदस्त आवाजात गाणारे मुख्य गायक होते. तर सहाय्यक म्हणून अनंत राजापूर होते!

एकदा यशवंतरावांच्या पाठीवर प्रल्हाद शिंदेंना शाबासकीची दिलेली थाप मी स्वतः पाहिली! आय विटनेस वाटलेही म्हटले तरी चालेल! मागील पिढीतील लोकांनी यशवंत आजिवलीकर यांचे गाणे ऐकले असेल त्यांनाच माझे म्हणणे पटेल! तरीही कोकणातील गायन पार्टी व कलाकारांना अपयश आले ही खंत आजही अस्वस्थ करते. मामा या गायन पार्टीत तबला वाजवीत असत. मामाही खारेपाटणमध्येच लहानाचे मोठे झालेले!

सनई व ताशा यांच्या मिश्र वाद्याला मालवणी भाषेत ‘घडशी ‘ वाद्य असे म्हटले जाते. याकामी बापूंना मामांनी अनेकदा साथ दिली आहे. ताशावर ‘ झपताल ‘वाजवावा तर बापू पाटणकर यांनीच!
गवळणीवर सनईचा पाठलाग करताना, गेली सोडून गौळण राधा ‘ ही बैठकीची लावणी असो की, ठुमरीवरचा लज्जतदार ठमका.. तसा घ्यावा तो बापूंनी! त्यावेळी बापूंची किती वाहव्वा होत असे! संगीताची ही मैफल संपू नये असे वाटे!
बापूंना दारूचे व्यसन होते, थोडी ढोसल्याशिवाय त्यांचा हात ताशावर चालत नसे. एकदा गगनबावडा तालुक्यातून एक संगीततज्ञ आले. ते चांगले तबलावादक होते. कणकवलीत लग्नासाठी बावडा घाट पायी चालत आलेले! त्यांनी बापू पाटणकरांची कीर्ती ऐकली होती. तबलापटूंही नावाजलेले होते. त्यांनी बाजूंची परीक्षा घ्यायचे ठरविले. वरात घरी पोहचल्यानंतर अंगणातच थांबा असा आदेश दिला. व बापूंना म्हणाले की ‘

” बापू तुझे सर्वत्र नाव आहे, पण तू खरा वादक कसा समजायचा? एक काम कर, तू पण वाजव आणि मी पण वाजवतो, होऊन जाऊ दे, पण एका अटीवर…”
” अरे खयची अट. आणि कित्यांक व्हयी ?”
” अट ही आहे की लग्नातला घोडा नाचला पाहिजे! “

बापू रंगात आले, गंमत अशी की, तबला वाजला की, घोडा थांबायचा. तबलजीने ठेका धरला की, घोडा शांत उभा राहायचा, पण तोच ठेका ताशावर बापूंनी वाजवताच घोडा, पाय उचलायचा, अधूनमधून गोल गिरकी घ्यायचा! नंतर नंतर बापू व घोडा थांबण्याचे नाव नाही! असे का घडले? इतक्या वर्षात मुक्या प्राण्यापर्यंत संगीताचे सूर पोहचविण्याचे केलेले काम नव्हे तर योगदान, व अनुभव कामी आला. संगीताच्या भाषेत साधना म्हटली जाते.
उपस्थितांनी बापूंचा सत्कार केला पाहुण्या कलाकारांनीही बापूंना दंडवत घालून त्यांच्यातील कलावंताला अभिवादन केले!

हाच वारसा आम्हा भावंडांकडे चालत आलेला आहे अशी माझी धारणा आहे. एकच खंत वाटते ती ही की,आयुष्याची अर्धरेषा ओलांडल्यावर मी संगीताच्या क्षेत्राकडे वळलो त्याचे! ह्या वारश्यानेच, यशवंत,जयवंत, वसंत अण्णा व त्यांची मुलेही यात सहभागी होत आहेत!

सामाजिक जीवनात वावरताना आपल्या मतावर ठाम राहून स्वार्थलोलूप प्रवृत्तीला चाप देऊन खऱ्या अर्थाने धम्म चळवळ जगणाऱ्या या माझ्या बंधूंच्या स्मृतीस अभिवादन!

गुणाजी काजिर्डेकर, चेंबूर

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2333220443448585&id=603597919798100

Next Post

राज्य सरकारने क्रिमिलेयरचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा...-सम्यक विद्यार्थी आंदोलन

रवि मे 17 , 2020
राज्य सरकारने क्रिमिलेयरचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा… ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● सम्यक विध्यार्थी आंदोलन ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने क्रिमिलेयरचा निकष लावुन त्यांच्यावर एकप्रकारे सामाजिक अन्याय केला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना डावलण्यासाठी आर्थिक निकष लावून त्यांच प्रतिनिधित्व रोखले […]

YOU MAY LIKE ..