उमाकांत रणधीर : पँथरवरचे ‘वार’ परतवणारा नेता!

उमाकांत रणधीरही आता काळाच्या पडद्याआड

■ दिवाकर शेजवळ ■
divakarshejwal1@gmail.com

१९७० चे दशक.
स्थळ: हुतात्मा चौक.

दलितांच्या सत्कार्यामाजी
कुणी करील हस्तक्षेप
या दलितांचा चित्ता घेईल
ऐसी ऐसी झेप…..

एकी जोडो, बेकी तोडो
सारी दुनियासे कहीयो
ये पँथर रंग लायेगी
तुम देखते रहियो…..

पँथरच्या नामांतर मोर्चात प्रख्यात आंबेडकरी कवी- गायक नवनीत खरे हे लाऊड स्पीकर लावलेल्या टॅक्सी- माल ट्रकवर चढुन गीत गात असायचे. अन मोर्चातील वक्त्यांच्या भाषणांच्या सूत्र संचालनासाठी त्यांच्या शेजारी उभे असायचे उमाकांत रणधीर. दलित पँथरचे संस्थापक- सदस्य असलेले नेते. कवी आणि विचारवंत.

काल गुरुवारी रात्री ११ वाजता वयाच्या ८५ वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आंबेडकरी चळवळीत सान- थोरांशी, आबाल- वृद्धांशी सख्य, संवाद,मैत्री जपणारा आणि ‘दिखाऊ थाट’ कधीही न मिरवलेला एक विनम्र, निगर्वी नेता काळाच्या पडद्याआड गेला.

दलित पँथरच्या बरखास्तीनंतर त्यांच्या पुढाकाराने पँथर कवितांचे एक थ्री – फोल्ड म्हणजे तीन घड्यांचे एक पत्रक प्रकाशित करण्यात आले होते.
त्याच्या मुखपृष्ठावर-

कुणी पँथर सोडली,
पण कविता सोडली नाही
कुणी कविता सोडली
पण पँथर सोडली नाही
या ओळी होत्या. पँथर चळवळीबाबतचे ते त्रिवार सत्य होते.

आंबेडकरी विचारांचे वारे प्यायलेले बहुसंख्य तरुण पँथर्स हे जात्याच वक्ते आणि लिहिते होते. प्रतिभासंपन्न आणि विचारवंत होते. त्यातील रणधीर हे अग्रणी पँथर नेत्यांपैकी एक. आंबेडकरी विचारांचे वारे प्यायलेले बहुसंख्य तरुण पँथर्स हे जात्याच वक्ते आणि लिहिते होते. प्रतिभासंपन्न आणि विचारवंत होते. त्यातील रणधीर हे अग्रणी पँथर नेत्यांपैकी एक.पण प्रसिद्धिविन्मुख आणि व्यासपीठावरील चढाओढीपासून अलिप्त राहणारे अपवादात्मक नेते होते. चमकोगिरी त्यांच्या स्वभावात नव्हतीच. तरीही चळवळीतील त्यांचे स्थान आणि मान अबाधित होता.

रामदास आठवले हे आता केंद्रात राज्यमंत्री आणि राष्ट्रीय नेते आहेत. पण साहित्य क्षेत्राशी संबंधित काही कार्यक्रम- घडामोडी असोत, वैचारिक परिषदा-परिसंवादाचा विषय असो, चळवळीत काही भूमिका- धोरण ठरवायचे असो की, आंबेडकरी चळवळीवर खास मुलाखत द्यायची असो, आठवले यांनी उमाकांत रणधीर यांना आवर्जून बोलावून घेतले नाही, असे घडणे शक्य नव्हते.

दलित पँथर.


१९७१ च्या दशकात वाढत्या हिंसक अत्याचारांच्या विरोधात संतप्त दलित तरुणांच्या उद्रेकातून जन्मलेली आणि यंदा सुवर्ण महोत्सव साजरा होत असलेली चळवळ. दलित साहित्यासोबतच आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेली ही चळवळ आहे. ‘ संघटना’ हा शब्द जाणीवपूर्वक इथे टाळला आहे. कारण ‘बळी’ देण्यात आलेला मूळचा ‘पँथर’ हा संघटना म्हणून कधीचाच इतिहासजमा झाला आहे. मात्र चळवळ म्हणून कुठे ना कुठे तो आजही गुरगुरताना,डरकाळी फोडताना दिसतोच. तो त्याचा स्थायीभाव आहे.

पण पँथर ही आता संघटना रुपात शिल्लक नाही,हे वास्तव स्वीकारण्यास कवी हृदयाचे आणि अतिशय हळवे,संवेदनशील पँथर नेते नामदेवदादा ढसाळ यांचे मन कधीच तयार झाले नव्हते. ते दर वर्षी नित्य नेमाने ९ जुलै रोजी पँथरचा वर्धापन दिन अखेरपर्यंत दणक्यात साजरा करत राहिले होते. पँथरबद्दलचे ते वास्तव एका वर्धापन दिनी दैनिक ‘ लोकनायक’ च्या अग्रलेखातून मी मांडल्यानंतर दादा कमालीचे नाराज झाले होते.

पँथरचा खऱ्या अर्थाने बळी १९८८-८९ च्या रिपब्लिकन ऐक्यात गेला. त्यापूर्वी बरखास्तीचा वार झेलून घायाळ झाल्यानंतरही पँथर १९७७ ला वाढीवाची लागला होता. महाराष्टाबाहेर अन्य राज्यांतही खेड्या पाड्यात पँथरच्या छावणीचे फलक झळकत होते. पँथरच्या त्या काळातील राज्याबाहेरील सभा- मेळाव्यांमध्ये डॉ माईसाहेब आंबेडकर, मनोहर अंकुश, रमेशचंद्र परमार, बापूराव फक्कीड्डे या दिवंगत नेत्यांचा सहभाग असायचा. त्या आठवणी आजही छायाचित्रांच्या रुपात आजही अनेक जुन्या पँथर्सनी जीवापाड जपल्याचे पाहायला मिळते.

पण युतीवरून फुटलेले रिपब्लिकन ऐक्य आणि १९९० च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत सहभाग मिळाल्यावर पँथर नेतेच ‘ रिपब्लिकन नेते’ बनले. अन पँथरचा ऐक्यात ‘बळी ‘ दिला, यावर एकदाचे शिक्कामोर्तब झाले! १९७७ ते१९९० या कालखंडात रामदास आठवले यांनी पँथरच्या पुनरुज्जीवनासाठी जीवाचे रान केल्यामुळे पँथरचे तेच खऱ्या अर्थाने ‘ चेहरा’ आणि सर्वेसर्वां बनले होते. त्यामुळे आठवले ‘वजा’ असलेली आणि त्यांचा सहभाग नसलेली पँथर नंतरच्या काळात लोक पातळीवर स्वीकारली जाणे शक्यच नव्हते.

पुढील काळात रिपाइंमध्ये काही जमले- पटले नाही म्हणून पँथरची ‘ गुढी ‘ उभारण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण त्यात कुणालाही यश आले नाही. नामदेवदादा ढसाळ यांनी तर रिपब्लिकन पक्षात राहून समांतरपणे आणि बाहेर पडूनही पँथर कायम राखली, चालवली होती. विशेष म्हणजे, तरीही रामदास आठवले यांनी ढसाळ यांना कधी दूर लोटले नव्हते. राजा ढाले आणि आपल्यात तब्बल ४० वर्षे राहिलेली दरी- दुरावाही आठवले यांनी ढाले यांच्या अमृत महोत्सवाचा योग साधून संपवून टाकला. पँथरच्या चळवळीतील हे हृदयस्पर्शी भावनिक अनुबंध, ऋणानुबंध गहिवर आणतात.

भाई संगारे, एस एम प्रधान, रमेश इंगळे, टी एम कांबळे, नामदेव ढसाळ, राजा ढाले या पँथर नेत्यांच्या पाठोपाठ उमाकांत रणधीरही आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. पँथरच्या चित्याच्या ‘ लोगो’ ने दलित तरुणांना अन्यायावर तुटून पडण्यासाठी कायम प्रेरणा, ऊर्जा आणि बळ दिले. दलित पँथर या नावाची एकेकाळी राज्यकर्त्यांना आणि अत्याचारी प्रवृतींना जरब होती. तो इतिहास संस्मरणीय आणि अमीट आहे. त्यामुळेच पँथर या नावानेच पुन्हा एकदा अत्याचारांविरोधात चवताळून उठण्यासाठी आजही नव्या तरुणांचे रक्त सळसळताना दिसते. त्यानिमित्ताने उमाकांत रणधीर यांची एक आठवण सांगितल्यावाचून राहवत नाही.

१९८८-८९ च्या रिपब्लिकन ऐक्याच्या वेळची ही गोष्ट आणि घटना आहे. त्या ऐक्यासाठी भारतीय दलित पँथर विसर्जित करण्यास सर्वांत आधी पुढाकार घेत आवाज उठवला होता, तो उमाकांत रणधीर यांनी! त्यांची ती भूमिका ही ऐक्यविरोधी जशी नव्हती, तशीच ती आठवले यांच्याविरोधात बंडाचीही नव्हतीच. त्यांचा तो पिंडही नव्हता. एकेकाळी पँथर बरखास्त करण्याच्या राजा ढाले यांच्या निर्णयाविरोधात पँथरच्या पुनरुजीवनासाठी आठवले यांना साथ दिलेल्या रणधीर यांनी पँथरला जगवण्यासाठी पुन्हा एकवार हाक दिली होती इतकेच.

पण रणधीर यांचा तो ‘आवाज’ ऐक्यविरोधी मानला गेला. शिवाय, ऐक्याच्या त्या क्षणी अवघे वातावरण रिपब्लिकनमय झाल्याने रणधीर हे बिचारे एकाकी पडल्याचे दुर्दैवी चित्र उभे राहिले. अन त्यांना ऐक्यवादी तरुणांच्या रोषाला, उद्रेकाला सामोरे जावे लागले. पँथरच्या एका संस्थापक नेत्यावर ओढवलेला तो प्रसंग अतिशय दुःखद आणि वेदनादायक होता. आंबेडकरी तरुणांनी भावनेच्या भरात वाहवत न जाण्याचे भान राखले तर अशा घटनांची पुनरावृत्ती टळू शकेल.

पँथर उमाकांत रणधीर यांना भावपूर्ण आदरांजली!

Next Post

"आंबेडकरी संग्राम" चे स्वाक्षरी अभियान

रवि डिसेंबर 5 , 2021
AMBEDKAREE SANGRAM ■ सोमवार 6 डिसेंबर 2021सकाळी 11 वाजता■ स्थळ: चैत्यभूमी ( दादर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रारंभी), दादर ( पश्चिम ) मुंबई. आपणांस कल्पना आहेच की, नागपूरच्या रुग्णालयासाठी वळवण्यात आलेले दलित विकास निधीतील 875 कोटी रुपये परत मिळण्यासाठी आंबेडकरी संग्रामने जंग […]

YOU MAY LIKE ..