क्रांतिसूर्याचा प्रकाश मेंदूत जाऊ द्या !.


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती जवळ येत आहे, कोरोनाची भीतीमुळे लॉक डाऊन लागण्याची शक्यता आहे, सरकारने कडक प्रतिबंध लावले आहेत. त्यांचे उल्लंघन आपल्या हातून भिमजयंती निमित्ताने झाले नाही पाहिजे.झाले तर भारतीय घटनेचे शिल्पकार क्रांतिसूर्य,विश्वभूषण बोधिसत्त्व या शब्दांचे महत्व राहणार नाही. कारण हे फक्त शब्द नाहीत,तर क्रांतिकारी तत्वज्ञानाचे मंत्र आहेत.कारण आपण उठता बसता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून करतो.त्यांचा आदर आपण ठेवलाच पाहिजे. यासाठी घराघरांत भिमजयंती साजरी करून स्वताचे आरोग्य आणि इतरांचे आरोग्याची काळजी घ्यावी. भविष्यात आंबेडकरी क्रांतिकारी विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी आपले लोकप्रतिनिधी निवडून आणण्याचा संकल्प करा, एकच नेता एकच पक्ष म्हणूनच क्रांतीसुर्याचा प्रकाश मेंदूत जाऊ द्या !.


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या राज्यघटनेमुळे माणसाला माणसासारखे जगण्याचे स्वतंत्र व मूलभूत अधिकार मिळाले.सर्वात मोठा मताधिकार मिळाला.पण त्यांचा वापर निर्भयपणे करता आला नाही. बंदुकीच्या नळीवर व तलवार,भाले यांच्या भीतीने देशभरातील गोरगरीब असंघटित कष्टकरी मजूर कामगार मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक समाज मालक सांगेल त्यालाच मतदान करीत होता.त्यावर चर्चा करण्याची कुणातच हिंमत नव्हती.

उत्तर भारतात अनेकदा जमीनदार,सावकार, शेटजी भटजी यांनी ह्या सगळ्या समाजाची सामुदाहिक हत्याकांड घडविले होते.१९९० पर्यत ही हत्याकांड होत होती. मान्यवर कांशीराम यांच्या दलित शोषित समाज संघर्ष समिती (डी एस फोर) मुळे मागासवर्गीय बहुजन समाज संघटित झाला.त्यामुळेच बहुजन समाज पार्टीचा जन्म झाला.त्यातुनच सर्व बहुजन समाज राजकीय दृष्ट्या जागृत झाला.म्हणूनच १९९४ साली बहन मायावती देशातील सर्वात मोठ्या राज्याच्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या.हा इतिहास झाला. बाबासाहेबांनी संविधानात सर्व अधिकार दिले पण ते आज ही काही समाजाला घेता येत नाही.कारण भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यासाठी जी प्रामाणिक,निःपक्षपाती निर्भय यंत्रणा लागते ती आज ही आपल्या देशात नाही.मग निर्भयपणे हे मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक समाजाचे असंघटित कष्टकरी मजूर कामगार मतदान कसे करतील?.


देशातील एकूण मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या पाहूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १५ ऑगस्ट १९३४ स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. त्यातील पन्नास टक्के असंघटित कष्टकरी मजुर कामगार या पक्षात सहभागी झाले असते तर राज्यात व केंद्रात स्वतंत्र मजुर पक्षाची सत्ता आली असती. मजुर हा स्वतंत्र नाही तो रोजीरोटी साठी कोणा कोणाकडे बांधलेला असतो. यांची जाणीव बाबासाहेबांना झाल्यावर मजूर पक्षाची भूमिका त्यांनी सोडून दिली.रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली होती. स्वतंत्र मजदूर युनियनची संकल्पना मांडली १२ व १३ फेब्रुवारी १९३८ मनमाड येथे रेल्वे गॅंगमॅन कामगारांची दोन दिवसीय कामगार परिषद झाली तेव्हा त्यांनी सांगितले होते की मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक यांची स्वतःची कामगार कर्मचारी संघटना युनियन स्थापना करून ती स्वतंत्र मजदूर युनियनशी राष्ट्रीय पातळीवर संलग्न करावी. कामगारांचे मुख्य ध्येय हे शासन यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे असावे.त्यातुन राजकीय परिवर्तन घडवून आणल्या जाईल.


श्रमिकांचे शोषण व विभाजन करणाऱ्या ब्राम्हणशाही ,भांडवलशाही ,गांधीवादी अर्थव्यवस्था आणि साम्राज्यवादा विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार दर्शन समजून घेण्यासाठी कामगार चळवळीवरील निवडक भाषण व लेख प्रत्येकांनी वाचलेच पाहिजे.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या या महत्वपूर्ण गोष्टीकडे सर्वच आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले. फक्त राजकारणावर भर दिला त्यामुळेच बहुसंख्येने मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक समाज मतदार असूनही आपल्याच समाजातील पक्षाच्या उमेदवारांना मतदान करीत नाही. कारण मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक समाजाच्या मूलभूत प्रश्नावर त्यांच्या रोजीरोटीसाठी कोणत्याही प्रकारची नियोजनबद्ध कृती आराखडा ह्या मतदारासाठी राबवित नाही.राज्य व केंद्र सरकारच्या योजनांची माहिती नाही. केवळ अन्याय अत्याचार झाल्यावर मोर्चे ,निदर्शने आंदोलन करणे हाच एकमेव कार्यक्रम कार्यकर्ते नेते राबवितात. पाच वर्षातुन एकदाच विधानसभा, लोकसभा निवडणूक येते तेव्हाच मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक जातीची लोकसंख्या मतदारसंघ म्हणून लक्षात घेतली जाते. आणि त्यावर हक्क सांगणारा एकच पक्ष नसतो. तर सगळेच असतात.

पाच वर्षात यांनी मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक समाजासाठी कोणत्याही प्रकारचे काम केलेलं नसतांना यांच्याकडून मतदान मागण्याचा या पक्षांना काय अधिकार आहे.म्हणूनच १३० व्या भिमजयंती निमित्ताने एकच नेता एकच पक्ष स्वीकारण्याची प्रतिज्ञा करा,राज्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताच्या वारसदारांने आपली संघ शक्ती दाखवून दिली.जिसकी संख्या भारी उसकी उतनी भागेदारी नुसार राजकीयदृष्ट्या नेतृत्व मान्य केलेच पाहिजे. म्हणूनच जास्त चिकित्सा न करता बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारांच्या क्रांतीसूर्याचा प्रकाश मेंदूत जाऊ द्या !.


बहुजन समाजात आंबेडकरी चळवळीमुळे कार्यकर्ते नेते झाले.बहुजन समाजातील अनेक बुद्धिजीवी लोकांना आंबेडकरी चळवळीने मोठे केले असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही. ज्यांना त्यांच्या जातीत कुत्रं विचारत नाही ते सेना भाजपाचे नगरसेवक,आमदार खासदार झाले.राष्ट्रपती होऊन सुद्धा त्यांची लायकी तीच जी मनुस्मृती नुसार आपल्या पायरीने वागण्याची.आता तर बहुजन समाजात बुद्धिजीवी खूप झाले.पण ते स्वतःपुरता विचार करतात.समाज व देशासाठी त्यांना कोणता ही धोका पत्कारायचा नाही.मग ते बुद्धिजीवी कसले?.


दोन हजार सतरा पासुन एक नेता धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक आणि राजकीय प्रगल्भता दाखवीत आहे. बुध्दीजीवी “माणूस” कोणताही निर्णय स्वत: ला योग्य वाटेल तेव्हाच स्विकारतो.त्यांच्यावर कोणी “कितीही” दबाब किंवा इतर “तंत्राचा”वापर जर केला तरी “बुध्दीजीवी” माणूस त्यांचा निर्णय बदलत नाहीत.ते त्यांच्या निर्णयावर ठाम असतात.जो माणूस डोळे बंद करुन वाटेल त्या गोष्टी स्विकरतो त्या गोष्टीची “चिकित्सा” करत नाहीत.असा माणूस एक तर भक्त असतो किंवा बुध्दीजीवी नसतो. आजच्या घडीला क्रांतीसूर्याचा प्रकाश वंचित बहुजन समाजाच्या घराघरात नव्हे तर मेंदूत सुद्धा जात आहे. महाराष्ट्र राज्यात एक ठोस राजकीय पर्याय समोर आहे. आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या प्रत्येक मतदारांनी सर्वच नेत्यांच्या मागे राहून एक नां धड भारा भर चिंद्या केल्या पेक्षा क्रांतीसूर्याचा प्रकाश शंभर टक्के स्वीकारला पाहिजे.कारण त्यांनी राजकारणातील चाणक्य गारद करण्याची क्षमता दाखवुन दिली आहे.


असंघटित कष्टकरी मागासवर्गीय,आदिवासी अल्पसंख्याक समाज वंचित बहुजन समाज म्हणून जागरूक झाला.तर राजकीय घराण्यातील परंपरा आणि जातदांडग्याचे धनदांडग्याचे थंडगे उध्वस्त केल्या शिवाय राहणार नाहीत.मान्यवर कांशीरामजी उत्तर भारतात जो न बिकने वाला समाज तयार केला होता.तसाच महाराष्ट्रातील वंचित बहुजन समाज न बिकनेवाला समाज झाला तर वंचित बहुजन आघाडी राज्यात नव्हे तर देशात राजकीय परिवर्तन घडवू शकते. १३० व्या भिमजयंती निमित्ताने भिमसैनिकांनी भिम अनुयायांनी प्रतिज्ञा घेतली पाहिजे.नाच गाणे करून जोश दाखून आज पर्यंत १२९ वेळा जयजयकार करून जयंती साजरी केली.पण सामाजिक,राजकीय परिवर्तन खऱ्या अर्थाने घडविले काय?.यशस्वी झाला की अपराजित झाला त्यांचे आत्मचिंतन कराल काय?.


डी.जे,ब्रेकडान्स,कव्वालीचे सामने लावून मनोरंजन करून घेतल्या पेक्षा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले पुस्तक रुपी निबंध, प्रबंध वाचा. “शासन कर्ती जमात बना” कामगारांचे मुख्य उद्धिष्ट शासन यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे असले पाहिजे” कामगार चळवळीचे लक्ष सत्ता काबीज करणे असले पाहिजे. हे मुख्य लक्ष्य यशस्वी करण्यासाठी वाचा,अभ्यास करा,नंतर नियोजन बद्ध अंमलबजावणी करा.


क्रांतीसूर्याचा प्रकाश वंचित बहुजन समाजाच्या मेंदूत गेला पाहिजेे.त्यानुसार लोकशाहीची चौकट मान्य करूनच पक्ष, संघटना बांधणी वार्ड, बूथ पातळीवर झाली तरच लोकसभेत विधानसभेत लोकप्रतिनिधी निवडून आणता येतील. नाहीतर प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतःला नेताच समजतो,बुद्धिजीवी लोक तर घराघरात आहेत.स्वता काही करणार नाहीत पण इतरांनी हे केले पाहिजे ते केले पाहिजे असे मोफत सल्ले देणारे खूप झालेत.म्हणूनच एक विचार करणारी गोष्ठ डॉ बाबासाहेब आंबेडकर दोनवेळा लोकसभा निवडणुकीला उभे राहीले आणि दोन्हीही वेळा पराजित झाले. कारण मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक समाज असंघटित कष्टकरी मजूर कामगार, शेतमजूर होता.त्यांच्या रोजीरोटीच्या आर्थिक नाळ्या धनदांडगे जातदांडग्याच्या हातात होत्या. त्यांनी भविष्यातील परिणामाची पर्वा व काळजी केल्यामुळेच बाबासाहेब पराभुत झाले.हा इतिहास आहे. मग त्याला लोक समाजाने गद्दारी,बेईमानी केली व विरोधकांनी साम,दाम,दंड,भेद नीती वापरली म्हणतात. तो इतिहास खोडून काढण्यासाठी क्रांतिसूर्यांचा प्रकाश मेंदूत जाऊ द्या.


मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक समाजातील अनेक नेते पार राष्ट्रपती,प्रधानमंत्री पदावर विराजमान झाले. पण समाजात त्यांची किंमत काय आहे?. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्तेपेक्षा देशाशी व समाजाशी नातं जोडले होते म्हणूनच ते आजही अमर आहेत, ते मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक समाजाला प्रेरणा देतात.त्याचं पद्धतीने प्रकाश आंबेडकर मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक बहुजन समाजाला आता राजकिय वंचित घटक म्हणून लढण्याची प्रेरणा देत आहेत. कांशीरामजी ने ते या अगोदर उत्तर भारतात करून दाखविले. वंचित बहुजन समाजात एक दोन जाती नव्हे ते सहा हजार जाती आहेत त्यातील राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या जातींना विविध पक्षांनी त्या त्या जातीतील गुलाम बनवून ठेवले आहेत. म्हणून ते त्या जातीचे लोकप्रतिनिधी नसुन पक्षाचे वैचारिक गुलाम आहेत. त्यांना सरळ करण्यासाठी क्रांती सूर्याचा प्रकाश मेंदूत जाऊ द्या.


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. तेंव्हाच स्वतःला आंबेडकरी म्हणवणारा हा समाज गद्दार म्हणून इतिहासात गणला गेला.

ज्या बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी आयुष्य चंदनासारखे झिजविले त्यांच्याशी हा समाज प्रामाणिक राहू शकला नाही. तो समाज दुसऱ्या कोणत्या व्यक्तीशी प्रामाणिक राहील याचा विचार करणे देखील सुद्धा मूर्खपणाचे ठरेल.अशी परिस्थिती असतांना प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात वंचित बहुजन समाजाच्या लाखोच्या सभा घेऊन शक्तिप्रदर्शन दाखविले. त्यामुळेच आज त्यांच्या तोडीचा आंबेडकरी चळवळीत दुसऱ्या नेता नाही.म्हणूनच सर्व नेत्यांचे विसर्जन करा.समाज खरोखरच जागृत असेल तर प्रथम आपल्या नगरातील,वार्डातील, मतदारसंघातील गद्दार ठोकून काढा.कारण आपल्या सुरक्षित घरात साप,विंचूकाटा निघाला तर आपण काय करतो?. साधा विचार करा मच्छर,खटमल झुरळ झाले तर काय करतो?.समाजात जी असुरक्षिता सुरु आहे ती संपविण्यासाठी संघटितपणे संघशक्ती निर्माण करणे कणखर अभ्यासू नेतृत्व असणे अति आवश्यक आहे.

भव्यदिव्य भिमजयंती मिरवणूक काढून ते साध्य होणार नाही.राजकीय परिवर्तन घडविण्यासाठी भिम जयंतीनिमित्त सज्ज व्हा!.


२०२१ ची भिमजयंती घराघरांत भिमप्रतिज्ञा घेऊन साजरी करा.एकच नेता एकच आघाडी “वंचित बहुजन आघाडी” कारण बाकी सर्वच कुऱ्हाडीचे दांडे झाले आहेत. त्यांना स्वतःचे अस्तित्व व स्वार्थ साधण्यासाठी समाजात फूट पडण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. ती ओळखूनच क्रांतीसूर्याचा प्रकाश मेंदूत जाऊ द्या. राजकीय परिवर्तन घडवा.असंघटीत कष्टकरी समाजाची संघशक्ती दाखवा.

मी त्या पक्षाचा सभासद नाही,भक्त किंवा शिष्य नाही.पण राज्यातील असंघटीत कष्टकरी कामगारांच्या समस्यावर गेली अनेक वर्ष काम करीत असल्यामुळे आणि आंबेडकरी चळवळीचा एक अभ्यासक म्हणून परीक्षण,आत्मचिंतन करत असल्यामुळे सदर लेख लिहला आहे.जे सत्य आहे ते समाजाने स्वीकारले पाहिजे, हा त्यामागचा मुख्य उदेश आहे.

-सागर रामभाऊ तायडे, भांडुप मुंबई 9920403859.

अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य.

Next Post

महात्मा ज्योतिबा फुले(1827 -1890) एक महान युगप्रवर्तक..!

रवि एप्रिल 11 , 2021
-प्रमोद रामचंद्र जाधवambedkaree@gmail.com संपुर्ण भारतीय समाजात आधुनिक समाजक्रांतीचे उद्गाते आणि भारताच्या समाजक्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती….! त्यांना प्रथम प्रत्येक भारतीय व्यक्तीने अभिवादन केले पाहिजे . शिक्षणासारखे शस्त्र भारतीय समाजात सहज त्यांनी उपलब्ध करवून दिले त्यासाठी ब्रिटिश सरकारच्या 1882 […]

YOU MAY LIKE ..