नकोणत्याही पक्षाच्या, धर्माच्या कार्यक्रमांना, क्रीडा महोत्सवाना राज्यात परवानगी नाही: उद्धव ठाकरे
**********************
कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी जेंव्हा हात जोडून म्हणतो ते माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधु, माता- भगिनींसाठी कळकळीचे आवाहन असते जे अतिशय संयमाने, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने या कोरोना विषाणुविरुद्ध लढत आहेत.. पण समाजात आणखी एक समाजविघातक विषाणू पसरत आहे, सध्याच्या परिस्थितीचा दूरूपयोग करून जर कुणी माझ्या बंधू,माता-भगिनी आणि महाराष्ट्राला अडचणीत आणत असेल तर अशा समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
आज मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमांवरील थेट प्रसारणाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले.
प्रारंभी त्यांनी सोलापूरच्या 7 वर्षाच्या आराध्या नावाच्या मुलीने वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत केल्याचा आवर्जून उल्लेख केला व तिला शुभेच्छा दिल्या.
एकजुटीला गालबोट लावू देणार नाही
कोणत्याही धर्माच्या, पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांना मान्यता नाहीच
राज्यात पाडवा, रामनवमी, पंढरपुरची यात्रा यासारखे सर्व मोठे सण अगदी घरगुती स्वरूपात आयोजित झाले, कोणतेही मोठे उत्सव वा कार्यक्रम झाले नाहीत. ज्याप्रमाणे हे कार्यक्रम झाले त्याचप्रमाणे इतर धर्मियांनी सुद्धा आपले सण, समारंभ आणि कार्यक्रम करावेत, एकत्र येणे, गर्दी करणे टाळावे कारण राज्यात कोणत्याही धर्माच्या, राजकीय पक्षाच्या आणि कोणत्याही कारणासाठी कोणत्याही कार्यक्रमांना, खेळाच्या स्पर्धांना परवानगी दिली जाणार नाही म्हणजे नाहीच, तशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे असे कार्यक्रम आयोजित केलेच जाऊ नयेत असे कडक शब्दात स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, या विषाणुशी सगळे एकजुटीने लढत आहेत. याला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, ते सहन केले जाणार नाही.
इलाज म्हणून नाईलाजाने घरी बसा
हा विषाणु कोणताही जातधर्म पहात नाही. याची बाधा सगळ्यांना सारखीच होते. त्यामुळे इलाज म्हणून नाईलाजाने का होईना घरी बसा, गर्दी टाळा. संयम, जिद्द आणि आत्मविश्वासारखे दुसरे आयुध नाही, या आयुधाच्या मदतीने आपण हे युद्ध नक्की जिंकू असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी आज समाजविघातक कृत्ये करणाऱ्या प्रवृत्तींना आपल्या बोलण्यातून स्पष्ट इशारा आणि कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.
दिल्लीहून परतलेल्या १०० टक्के लोकांचा शोध आणि विलगीकरण
परवा प्रधानमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून संवाद झाल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, दिल्लीतील कार्यक्रम करून घरी परतलेल्या लोकांची माहिती देणारी यादी दररोज केंद्रशासन आपल्याला पाठवत आहे. आतापर्यंत कळवलेल्या जवळपास १०० टक्के लोकांचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करण्याचे काम आपण केले आहे. परंतू जर यातील कुणी शोधायचे राहिले असतील तर त्यानी स्वत:हून पुढे यावे, चाचणी करून घेऊन उपचार करून घ्यावेत, किंवा शेजारच्या नागरिकांनी अशा लोकांची माहिती द्यावी असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी केले.
५१ लोक सुखरुप घरी गेले
राज्यात कोरोना बाधितांच्या केसेस वाढताहेत, मला ही माहिती लपवायची नाही हे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण महाराष्ट्रात आणि मुंबईत चाचणीची केंद्रे वाढवली आहेत. आपल्याकडे येऊन तपासणी करून घेणाऱ्यांपेक्षा आपण स्वत:हून पुढे जाऊन संशयितांचा शोध घेत आहोत. आज या रुग्णांची संख्या ५०० च्या वर गेली आहे पण ५१ रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी सुखरूप गेले आहेत याचाही मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन उल्लेख केला.
राज्यात ५ लाख स्थलांतरीतांची सोय
इतर राज्यातील तसेच महाराष्ट्रातील स्थलांतरीत कामगार-मजुरांची महाराष्ट्र शासनाने जबाबदारी घेतली असून जवळपास ५ लाख लोकांची सोय केली आहे. त्यांच्या दोन वेळेसचे जेवण, नाश्ता, राहण्याची आणि औषधोपचाराची मोफत सोय केली आहे. त्यामुळे कुणी कुठेही जायची गरज नाही हे ही मुख्यमंत्री म्हणाले. इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रीयन माणसांनाही त्यांनी दिलासा दिला. आहे तिथेच रहा हे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी अडचण आल्यास मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क करा असे आवाहन करून मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले.
मुंबईकरांची एकजुट आणि जिद्द अतुलनीय
जिल्ह्याजिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढवल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सगळ्या जगाचे जसे मुंबईकडे लक्ष आहे तसेच विषाणुचेही. पण ही मुंबई आहे, या शहराने अनेक धक्के आणि अपघात पचवले आहेत. त्यांचे शौर्य नेहमीच अतुलनीय राहिले आहे. एकजुट आणि जिद्द हा या शहराचा स्थायीभाव आहे. या मुंबईचे हा विषाणु काही बिघडवणार नाही असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईत कोविड-१९ साठी स्वतंत्र रुग्णालये सुरु करण्यात आली आहेत. सर्दी, पडसे, न्युमोनियाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी नेहमीच्या दवाखान्यात न जाता सरकारी रुग्णालयात, कोविड चाचणी केंद्रात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी. त्यामुळे इतर दवाखाने सुरक्षित राहतील, बंद होणार नाहीत.
ज्येष्ठांना जपा
दुर्देवाने काही मृत्यू महाराष्ट्रात झाल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, मधुमेह, ह्दयविकार आणि इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्याचा या मृत्यूत समावेश आहे. आपल्याला आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांना विषाणुचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. यासाठी आपण सुरक्षित राहणे, गर्दीत,घराबाहेर न जाणे हा एक उपाय आहे. जेंव्हा केंव्हा जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी जाऊ तेंव्हा नाक, चेहऱ्याला रुमाल बांधून जाऊ यासारखा साधा उपायही आपल्यालाच करायचा आहे.
जीवनावश्यक वस्तुंची २४ तास उपलब्धता असतांना गर्दी का करता असा सवालही मुख्यमंत्र्यांनी जनतेस विचारला तसेच गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, तुम्ही अंतर ठेऊन वागाल तर कोरोनाचा धोका ही तुमच्यापासून दूर राहील. माझा माझ्या राज्यातील जनतेवर विश्वास आहे. माझ्या मनात आत्मविश्वास आहे. याबळावर एकजुटीने आपण कोरोनावर मात करू, संयमाची, जिद्दीची आणि आत्मविश्वासाची ही भिंत मनात अशीच मजबूत ठेवा, कोरोना तुमचं काही ही बिघडवू शकणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या लढाईत आपणच जिंकणार हा विश्वास देखील व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी मदत करणाऱ्या सर्व हातांचे आभार व्यक्त केले .