निसर्ग वादळाने उडविली माणसाच्या बुद्धीची छपरे!…

निसर्ग वादळाने उडविली माणसाच्या बुद्धीची छपरे!…
**************
मा राजाराम पाटील
**************

3 जून 2020! अलिबाग रायगड.ताशी 120 किमी वेगाने धावणाऱ्या चक्री वादळाने अलिबागला झोडपले.वादळाने का होईना,कोरोनाग्रस्त मोदी मीडियाने एका दिवसासाठी तरी, ‘अलिबाग’ देशाच्या नकाशावर आणले. सारा महाराष्ट्र ओल्या सुक्या दुष्काळाची शासकीय नुकसान भरपाई घेतो.कोट्यावधींचे कर्ज घेतो आणि माफ़ही करून घेतो.साखर सम्राट यात माहीर आहेत.आता मोदींनी म्हणे 20 लाख कोटी दिल्लीहून पाठविलेत. अलिबागकर शेतकरी मच्छिमार मात्र कधी यासाठी याचक होऊन रडला नाही.चिडला नाही.

सागरी मार्गाने मुबंई फक्त अर्धा तासाच्या अंतरावर असलेल्या या रायगडच्या राजधानीवर सरकारचे दुर्लक्ष का झाले?.छत्रपती शिवरायांचे सत्तेसाठी नाव घ्यायचे,मात्र त्यांच्या राजधानिकडे,राष्ट्रीय इतिहासाकडे कायम दुर्लक्ष करायचे?. हीच महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्याची नीती राहिलीआहे. मग त्यात क्षत्रिय कुळावन्तस म्हणविणारे मराठा मुख्यमंत्री देशमुख,पवार,चव्हाण असोत किंवा गोब्राम्हण प्रतिपालक म्हणविणारे जोशी फडणवीस असोत!.
आता केंद्रातील संघनिष्ठ, मोदीनिष्ठ म्हणतील “अलि” बाग नाम ही बदल डालो!. स्वतःतील नथुरामी परशुधारी आतंकवाद लपविण्यासाठी,नेहमीच मुस्लिम,पाकिस्तानी आतंकवाद,कुत्र्याच्या गन्ध कौशल्याने शोधणाऱ्या धर्माध राज्यकर्त्यांना, अलिबाग समजून घेण्यासाठी प्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवराय समजून घ्यावे लागतील. कालच्या चक्री वादळास “निसर्ग” हे नाव देणाऱ्या आणि पहिल्यांदा खरा अंदाज वर्तविणा-या हवामान खात्याचे मी मनापासून आभार मानेन. याचे कारण छत्रपती शिवराय हे राजनैतिक दृष्टीने कधीच गोब्राह्मण प्रतिपालक अर्थात ब्राह्मण धार्जिणे नव्हते. त्याचप्रमाणे ते स्वतःस क्षत्रिय कुलोत्पन्न समजणारे जमीनदार मराठा राजे नव्हते. जात, धर्म, लिंग, वर्ण अगदी हिंदू मुस्लिम आणि आंतरराष्ट्रीय मैत्री जपणारे ‘रयतेचे ‘राजे होते. जगातल्या सर्व पूजा पाठ पद्धती आणि उपासना पद्धती यापेक्षा, मानवता आणि निसर्ग धर्म जाणनारे जाणते राजे होते.

सागर प्रवास हा मनुस्मृतीच्या मूर्ख नीतीने नाकारलेला असताना,स्वराज्याची राजधानी ही सागर किनारी रायगड किल्यावर आणून बौद्ध सम्राट अशोकांतर देशाचे आरमार उभे करणारे ते विज्ञानवादी राजे होते. मूळ आगरी कोळी भंडारी या मातृसत्ताक सागरपुत्राच्या अपरांत प्रदेशातील मुबंईला देशाची आर्थिक राजधानी होण्यात, “निसर्ग” न्याय आहे. ती पुणे बारामती किंवा गुजरातला नेण्याचा कुविचार शरद पवार नरेंद्र मोदी या नव्या राजकीय गुरू शिष्यानी कधीच करू नये. अर्थात “त्यांना कोरोना व्हावा ..!” असा शाप आम्ही अलिबागकर देणार नाही. कारण आगरी कोळी “शूद्र” ओबीसींना तो अधिकार नाही व आमची ती नीतीही नाही! फक्त ब्राह्मणांनाच मनुस्मृतीच्या निर्मात्यांनी तो अधिकार दिला.
दोन हजार वर्षांपूर्वी बौद्ध सम्राट अशोकाच्या काळात चौल हे बंदर मुबंई बंदरापेक्षा अधिक मोठे आणि जागतिक हालचालींचे व्यापाराचे,सांस्कृतिक केंद्र होते. जगातील सारे व्यापारी येथे येत असत. अर्थात सर्व धर्म पंथ आणि भाषा इथले भूमिपुत्र बोलत होते समजत होते. रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या खाडीवर आणि चौल खाडीवर असलेल्या बौद्ध लेण्या या भागाचा आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक इतिहास आजही सांगत आहेत. आगरी कोळी कराडी भंडारी माळी ईस्ट इंडियन मुस्लिम आदिवासी (कातकरी ठाकूर ) हे इथले मूळ भूमिपुत्र आहेत. सागरपुत्र असलेले हे समाज आजही आंतरधर्मीय आंतरजातीय बंधुत्वाचा संदेश पर्यटकांना नेहमीच देतात.

रायगड जिल्ह्याच्या शेवटच्या दक्षिण भागावरच्या बाणकोट खाडीवर केळशी हे रत्नागिरी जिल्ह्यातील देखणे निसर्गरम्य गाव आहे. येथे मुस्लिम मौलवी संत याकूत बाबा याचा दर्गा छत्रपती शिवरायांनी बांधला. या दर्ग्याच्या व्यवस्थेसाठी 700 एकर जमीन दान देणारे रयतेचे राजे देशातील पवार मोदी फडणवीस यांना कळणे शक्य झाले असते तर अयोध्येत सापडलेल्या पुराव्यानुसार तेथे बुद्ध स्मारक (विहार) होऊन हा धार्मिक हिंसेने पेटलेला, मानवी रक्ताने माखलेला प्रश्नच मिटला असता. अलिबाग हे नावही अशाच आंतरधर्मीय आंतरराष्ट्रीय बंधुत्व जपणाऱ्या शांत सुसंस्कृत मानवी संस्कृतीचे प्रतीक आहे. जसे छत्रपती शिवराय मुस्लिम संत याकूत बाबा यांना आपले गुरू मानीत त्याचप्रमाणे अलिबागच्या आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी अलिशाह बाबा या मुस्लिम मौलविना आपले गुरू मानले होते. त्याचाही दर्गा आज अलिबाग शहरात पहायला मिळतो. सागरी हालचाली बाबत अलिबागच्या आलिशाह बाबा आणि केळशीचे याकूत बाबा हे तत्कालीन राज्यकर्त्यांचे मार्गदर्शक होते. सद्याच्या उदंड झालेल्या दादा,नाना,बाबा सारखे आरमार बुडविणा-या पेशव्यांचे धार्मिक वारसदार नव्हते.

छत्रपतींच्या आरमारात दर्यासारंग दौलत खान,दर्यासारंग मायनाक भंडारी, दर्यासारंग कान्होजी आगरे हे आरमार प्रमुख होते. आग्राव,आगरोळी,आग्रीपाडा,अशी शेकडो गावे असलेल्या दर्यावर्दी लाखो आगरी कोळी वाड्यातून नाही तर समुद्र माहीतही नसलेल्या पुणे जिल्यातून कान्होजी आगरे आले हा लेखणीचा चमत्कार महाराष्ट्रातले ब्राह्मणी इतिहासकारच करू शकतात?. वेदाध्ययन हा ब्राह्मणांचा तर राज्य करणे हा क्षत्रियांनी राखलेला आरक्षित मनुवादी विशेषाधिकार होता. आगरी कोळी भंडारी ओबीसींना सागरी आरमाराच्या इतिहासात राज्यकर्ते बनण्याची प्रेरणा मिळू नये याची काळजी इतिहासकार नेहमीच घेतात. जगजेत्त्या इंग्रजां विरोधातील सागरपुत्र ओबीसींच्या आरमाराचा विजय आणि भीमकोरेगावची विजयी लढाई या आपल्या ‘शुद्रातिशूद्र’ पूर्वजांच्या अस्सल महापराक्रमी गुणसूत्रांच्या सत्य कथा आहेत. हजारो वर्षे रायगडावर मातृसत्ताक आगरी कोळी भंडारी कराडी या सागरपुत्राचीच सत्ता होती, आहे आणि राहणार!..तीही छत्रपती शिवरायांच्या हिंदू मुस्लिम ख्रिशन बांधवांच्या अतुट मैत्रीच्या शिवबंधनासारखी मजबूत. आपले अर्धे अंगरक्षक मुस्लिम सैनिक ठेऊन अल्पसंख्याक समाजाच्या मनात दृढ विश्वास निर्माण करणाऱ्या छत्रपतींच्या रायगडची राजधानी म्हणूनच अलिबाग आहे.
जुलमी शोषक सत्ताधाऱ्यांशी उघड बंड म्हणजे जिजाऊपुत्र शिवराय! हीच परंपरा भिमाईपुत्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी, सागरपुत्र आगरी कोळी भंडारी कुणबी कराडी ओबीसींना सोबत घेऊन जपली. उचवर्णीय खोत सावकार यांच्या विरोधातील ऐतिहासिक ओबीसी शेतकरी लढा, अलिबाग तालुक्यातच झाला. येथल्या विरश्रीने नटलेल्या, बुद्धिमत्तेने सुपीक झालेल्या मातृसत्ताक मातीने कूळ कायद्याच्या निर्मितीतील प्रमुख ,बाबासाहेबांचे सहकारी आदरणीय नारायण नागु पाटील,सेझ विरोधी आंदोलनाचे शिल्पकार अॅड दत्ता पाटील,सिडको विरोधी आंदोलनाचे प्रेरणास्थान दि बा पाटील हे दोन लढवय्ये विरोधी पक्षनेते महाराष्ट्राला दिले.परन्तु महाराष्ट्राच्या ब्राह्मण मराठा राज्यकर्त्यांनी विकास अलिबागकर लोकांना पाहू सुद्धा दिला नाही.ओबीसींच्या जमिनी मात्र पूर्वीच्या खोत सावकारा प्रमाणेच सरकारी जबरदस्तीने लुटल्या,येथे एखादे मोठे हॉस्पिटल असायला हवे होते. छत्रपतींच्या आरमाराचे प्रमुख केंद्र असलेल्या अलिबाग (कुलाबा) मध्ये नेव्हीचे प्रशिक्षण देणारे, सागरी विद्यापिठ असायला हवे होते. रखडलेले दिघी बंदर पूर्ण होऊन चौल अलिबाग एव्हाना मुबंईशी दैनंदिन कारभाराची पर्यायी व्यवस्था म्हणून जोडायला हवे होते. मुबंई नवी मुबंई पनवेल येथील ट्रॅफिक पाहता अलिबाग हा खरा पर्याय ठरू शकतो.आगरी कोळी ओबीसींना काही द्यायचेच नाही म्हटल्या नंतर,रायगडची तटबंदी ढासळत असताना आम्ही समुद्रात शिवस्मारक बांधून जनतेचे पैसे आणि मच्छिमार बांधवांचा मासेमारी व्यवसायही बुडवायला निघालोय!.

रायगडच्या विकासाला अगदी रस्ते,पाणी,आरोग्य,शेती पर्यंटन,शिक्षण,जलवाहतूक याना विरोध करणारे क्षत्रिय ब्राह्मण वैश्य हेच शिवरायांच्या रयतेच्या राज्याचेही शत्रू असावेत?. कोरोना नंतर अशा जुलमी राज्यकर्त्यांना अमेरिकन ट्रम्प तात्याप्रमाणे जनता खंदकात गाडेल. म्हणूनच शिडाच्या होडीत वादळी वारा भरून वीस मिनिटात अलिबाग ते मुबंई हे अंतर वाऱ्याच्या वेगाने आगरी कोळी सागरपुत्र सपासप कापत होते. कालच्या वादळात उंच इमारती वरील पत्रे उडताना पाहून आम्ही वाऱ्याची आणि उतरत्या छपरांची निसर्ग नीती विसरलोय असे जाणवले. सपाट छपरांची कॉक्रीट घरे कोकणच्या धुवाधार मुसळधार, पावसात गळतात. ही गोष्ट उच्चवर्णीय दैववादी आर्किटेक्ट लोकांना कळणे अवघड आहे. विज्ञानविरोधी निसर्ग विरोधी धर्म संस्कारात हे लोक लहानाचे मोठे झाले. म्हणूनच मुबंई गळतेय.आता म्हाडा सिडको आणि भाजपायी लोढा या शहर नियोजन कर्त्यांनी जी उघडी पत्र्याची छपरे घरावर लावली त्यात होडीच्या शिडासारखा वारा घुसला आणि पत्रे चक्क आकाशात उडाले!. ही येथल्या बांधकाम तज्ज्ञांच्या, राज्यकर्त्यांची डोक्यावरील हवेत उडालेली बुद्धीची छपरे होती. काही भूमिपुत्रांना हे अनुकरण खूपच महागात पडले.
मला आठवते तीव्र उताराचे गवताचे माडाच्या झावळ्याचे, ताडाच्या पानांनी शाकारलेले उतरते छप्पर कधी गळत नव्हते. छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळच्या इंग्रज कालीन अनेक हेरिटेज इमारतीची छपरे उतरत्या छपरांचीच,कौलाचीच आहेत. प्रचंड मुसळधार पाऊस क्षणात खाली आणण्यासाठी तीव्र उताराचे छप्पर असावे लागते,ज्यावरून चोरही घसरून पडावा. हे कोकणास कळते. माझ्या पणजोबांनी असे बांधलेले घर मी अनुभवले आहे. पाणी नेहमी उताराकडेच वाहते हे 2500 वर्षांपूर्वी एकविरापुत्र बुद्धांनी सांगितले. त्यांनी सांगितलेला स्त्री पुरोहित धवलारणीचा, हुंडा नाकारण्याचा, महिला सन्मानाचा, सागरी सामर्थ्याचा आरमाराचा विचार, मनुस्मृतिस लाथाडून आम्ही जपला. तसाच विज्ञानवादी निसर्गन्याय जपणारा आणि उतरत्या छपरांची आधुनिक घरे बांधून, पाऊस वादळे यात नव्या आत्मविश्वासाने जगू या. गळकी घरे वाचवू या. चक्री वादळात टिकण्यासाठी जुना निसर्गाच्या न्यायाचा धर्मच आम्हास वाचवेल. ज्यात आम्ही जागतिक व्यापारी होतो. काल वादळात उडालेली छपरे ज्यांच्या अकलेची होती त्यांना परत करून नव्या विज्ञान बुद्धीचे, निसर्ग न्यायाचे वारे डोक्यात भरू, शिडाच्या होडीत भरू आणि पुन्हा गोमुला बोटीने केवळ खांदेरी उंदेरी जंजीरा किल्ला, तळ कोकणच्या माहेरलाच नाही तर श्रीलंका आणि इजिप्तला घेऊन जाऊ. रायगडच्या सरकारी गॅझेट मधला हा सत्य इतिहास पुन्हा पुन्हा वाचू. अलिबागच्या चुंबकीय वेधशाळेतून दिल्ली आणि who च्या कोरोनाच्या क्रूर राजकीय हालचालींचे अंदाजही बांधू. छत्रपतींच्या आरमाराचा विजय असो.

राजाराम पाटील -मो 8928452112.
मु पो चिंचोटी,ता अलिबाग,जिल्हा रायगड.

Next Post

हत्तीणीच्या मृत्यूला न्याय मिळेल काय ?.

शनी जून 6 , 2020
हत्तीणीच्या मृत्यूला न्याय मिळेल काय ?. ************ सागर रामभाऊ तायडे www.ambrdkaree.com ************ अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवते ते शिक्षण देणारा देशच महासत्ता असतो. अमेरीकेने हे सिद्ध केले की तो सुशिक्षित लोकांचा देश आहे.एका अश्वेत (काळ्या किंवा कृष्णवर्णीय) अमेरिकन नागरिकाला वर्णद्वेषातुन झालेल्या पोलीसी […]

YOU MAY LIKE ..