कोण म्हणतो, नामदेव ढसाळ कम्युनिस्ट होते?
*****************
◆ दिवाकर शेजवळ◆
divakarshejwal1@gmail.com
दादा,
निरर्थक भावनिक प्रश्नांना फाटा देऊन आंबेडकरी चळवळीत जो समाजाच्या थेट हिताशी निगडित मूलभूत प्रश्नांवर… म्हणजे रोजोरोटी, शोषणावर बोलेल त्याला कम्युनिस्ट ठरवले गेले। त्यातून कसेल त्याची जमीन, नसेल त्याचे काय असा रोकड सवाल विचारत भूमिहीनांचे ऐतिहासिक आंदोलन करणारे कर्मवीर दादासाहेब गायकवाडही सुटले नाहीत।मग तिथे तुमची काय कथा !
पण कम्युनिस्टांनी मला गिळले तर माझ्यापाशी भिमाची वाघनखे आहेत। मी त्यांची पोटे फाडून बाहेर येईन, असे ठणकावत दादासाहेबांनी त्यांना कम्युनिस्ट ठरवणाऱ्या, धोतऱ्या अशी संभावना करणाऱ्या सूट बुटातील विद्वान नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली होती। दुर्दैवाने, तुमच्या बाबतीत तसे घडले नाही। प्रवाहपतीत होण्याची वेळ तुमच्यावरच आली।
तुमच्यावर चपात्यांचा झालेला मारा हे तुम्हाला कम्युनिस्ट ठरवणाऱयांना असुरी आनंद देऊन गेला। विशेष म्हणजे, तुम्हाला अशा काळात कम्युनिस्ट ठरवले गेले की ज्या काळात शिवसेना आणि कम्युनिस्ट यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचलेला होता। त्यातच पँथर नेता म्हणून वरळी दंगलीनंतर तुम्ही निशाण्यावर आलाच होतात। अशा परिस्थितीत घराबाहेर पडणे, वावरणे जोखमीचे झाल्यानंतर तो काळ तुम्ही कसा कंठला असेल याची कल्पनाही करवत नाही।
पण दादा, तुम्ही हिकमती होतात। पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला पाठिंबा देऊन तुम्ही चक्रव्यूह भेदून टाकला। तुमची आणि इंदिराजी यांची भेट मुलाखत दूरदर्शनवरून प्रसारित झाल्यावर तर सारे चित्रच पालटून गेले होते। पँथरच्या सभेनंतर तुम्हाला जेरबंद करण्यासाठो टपून बसणारे पोलीस तुम्ही दिल्लीहून परतण्याआधी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यासोबत तुमच्या स्वागताला विमानतळावर हजर झाले होते। शिवाय, आणीबाणीला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर तुम्ही आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे समविचारी ठरल्याने वातावरण पालटून गेले ते वेगळेच।
नंतरची सुमारे चार दशके मायस्थेनिया ग्रेव्हीससारख्या दुर्धर आजाराशी सामना करत तुम्ही कसे जगलात ते जगजाहीर आहे। तुमच्यावर लाचारीचा, तडजोडीचा आरोप करणाऱ्यांना लाख करू देत। पण तुम्ही मतांची दलाली करत सौदेबाजी केली नाही। योग्यता असूनही संसदीय राजकारणात शिरकावासाठो धडपड केली नाही। स्वतःची साहित्यिक म्हणून असलेली महती, ख्याती, जागतिक कीर्ती या एकमेव भांडवलावर तुम्ही अक्षरशः हाताने कमवायचे अन पानावर खायचे असे बेभरवशाचे आयुष्य अखेरपर्यंत जगलात। पण दरवर्षी एक पुस्तक प्रकाशित करण्याचा परिपाठ कधी बिघडू दिला नाही। तुमची साहित्य क्षेत्रातील महान कामगिरी ही पद्मश्रीच्या नव्हे, खरे तर नोबेलच्या योग्यतेची होती।
अन कार्यकर्त्यांचे लाड करणाऱ्या, सहकाऱयांना, मित्रांना आवडीचे वाटेल ते मनसोक्त खाऊ पिऊ घालुन त्या आत्मिक आनंदाने तृप्त होणाऱ्या नामदेव दादाना कोणता पँथर विसरू शकेल? ‘ ये sss दिवाकर आलाय, सिग कबाब आणि लंबे पाव मागव लवकर’ असे फर्मान ते मल्लिकाताईंना सोडायचे। आजारामुळे हाताने लिहिणे अवघड व्हायचे, तेव्हा तेव्हा लेख, निवेदने,पत्रे तयार करून घ्यायला नामदेवदादा मला वरचेवर बोलावून घेत असत।
छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याने सुनावलेल्या आपल्या चुका निमूटपणे ऐकून घेणारा, त्या चुका खुल्या दिलाने मान्य करणारा निगर्वी आणि अहंकारमुक्त नेता आंबेडकरी चळवळीत दुसरा शोधून सापडणार नाही। नामदेव दादा यांना कोणी लाख कम्युनिस्ट ठरवले तरी हिंसा, सूड, मत्सर, द्वेष,असूया अशा विकारांपासून मुक्त असलेला बुद्ध विचारांनी संस्कारित झालेल्या सुसंस्कृत मनाचा तो विरळ नेता होता।
दादांना आजच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन।