मुक्ती कोण पथे? -डॉ.बाबासाहेब आंबेडकर
ही परिषद मी केलेल्या धर्मांतरच्या घोषणेचा विचार करण्याकरिता मुद्दाम बोलवण्यात आलेली आहे हे तुम्हास कळून चुकले आहेच.धर्मांतरचा विषय हा माझ्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा आहे .इतकेच नव्हे,तर तुमचे पुढील सर्व भवितव्य माझ्या दृष्टीने त्याच्यावर अवलंबून असल्या कारणाने तो विषय मला अत्यंत महत्त्वाचाही वाटतो.हे महत्त्व तुम्हा सर्वांना पटले आहे असे म्हणण्यास काही हरकत वाटत नाही .तसे नसते तर आज एवढया मोठ्या समुदायाने तुम्ही येथे जमला नसता आणि म्हणून तुम्ही सर्वजण जे या ठिकाणी जमला आहात ते पाहून मला अतिशय आनंद वाटतो.
धर्मातराची घोषणा केल्यापासून अनेक ठिकाणी लहानमोठ्या प्रमाणात सभा भरवून आपल्या लोकांनी या विषयावरील आपले मत व्यक्त केलेले सर्वांच्या कानी आलेले आहे.परंतु सर्वानी एके ठिकाणी जमून ,विचारविनिमय करून धर्मांतरच्या प्रश्नांची निर्णयात्मक चर्चा करायची संधी आजपावोतो आपल्याला प्राप्त झालेली नव्हती.तशा संधीची तुमच्यापेक्षा मला अत्यंत जरुरी होती.धर्मांतराची मोहीम सफल होण्याकरिता पूर्वतयारीची फारच आवश्यकता आहे ही गोष्ट तुम्हा सर्वांना काबुल करावी लागेल.धर्मांतर हा काही पोरखेळ नव्हे .धर्मांतर हा मौजेचा विषय नव्हे . हा प्रश्न माणसाच्या जीविताच्या साफल्याचा प्रश्न आहे.जहाजातून एका बंदराकडून दुसऱ्या बंदराला नेण्याकरिता नावड्याला जेवढी पूर्वतयारी करावी लागते तेवढीच पूर्वतयारी धर्मांतराकरता करावी लागणार आहे.त्याशिवाय हा तीर सोडून पैलतीर गाठणे शक्य होणार नाही .परंतु नावेत किती उतारू येतात याचा अंदाज समजल्याखेरीज नावाडी सामानसुमान जमविण्याच्या प्रयत्नास लागत नाही .त्याचप्रमाणे माझी ही स्थिती आहे,किती लोक धर्मांतर करण्यास तयार आहेत याचा कयास लागल्याशिवाय मला धर्मांतराची पूर्वतयारी करण्याच्या उद्योगास लागणे शक्य नाही.परंतु आपल्या लोकांची कोठे तरी एकत्रित अशी परिषद झाल्याशिवाय लोकमताचा ठाव मिळणे शक्य नव्हते .अशा प्रकारे लोकमताचा ठाव घेण्याची संधी मला प्राप्त झाली पाहिजे ,असे जेव्हा मी मुंबईच्या कार्यकर्त्या लोकांस सांगितले तेव्हा त्यांनी ,खर्चाची अगर परिश्रमाची सबब पुढे न करता ,परिषद भरवण्याची जबाबदारी आपल्या आंगावर मोठ्या खुशीने घेतली .ती जबाबदारी पार पाडण्याकरिता त्यांना कष्ट सोसावे लागले याची हकीकत आपले परमपूज्य पुढारी व स्वागत मंडळाचे अध्यक्ष राजमान्य राजेश्री रेवजी दगडूजी डोळस यांनी आपल्या भाषणात सविस्तरपणे सांगितली आहे.इतक्या खस्ता खाऊन त्यांनी माझ्याकरिता हा जो सभेचा घाट घडवून आणला ,त्याकरिता मी परिषदेच्या स्वागत मंडळाचा अत्यंत ऋणी आहे.
माझी धर्मांतराची घोषणा जर सर्व अस्पृश्याकरिता आहे,तर मग सर्व अस्पृश्यांची सभा का बोलाविली नाही ,नुसत्या महारांचीच सभा का बोलावण्यात आली,असा आक्षेप काही लोक घेण्याचा संभव आहे.ज्या प्रश्नांची चर्चा करण्याकरितान ही सभा बोलविण्यात आली आहे,त्या प्रश्नांचा खल करण्यापूर्वी या आक्षेपाला उत्तर देणे मला आवश्यक वाटते.महारांचीच सभा का बोलाविली व सर्व अस्पृश्यांची सभा का बोलाविली नाही ,याला अनेक कारणे आहेत ,पाहिले कारण असे की, या परिषदेत कसल्याही प्रकारच्या मागण्या मागवयाच्या नाहीत ,सरकारपासून काही राजकीय हक्क मागावयाचे नाहीत .आपल्या जीविताचे काय करावयाचे ,आपल्या आयुष्याक्रमाची रुपरेषा कशी ठरवावयाची ,एवढाच प्रश्न या परिषदेपुढे आहे. तो प्रश्न ज्या त्या जातीला सोडवता येण्यासारखा आहे व तो ज्या त्या जातीने स्वतंत्र विचार करून सोडविणे बरे .ज्या कारणाकरिता सर्व अस्पृश्य लोकांची सभा एकत्रित करण्याची मला आवश्यकता वाटली नाही ,त्यापैकी हे एक कारण आहे.नुसती महारांचीच परिषद भरविण्याचे दुसरेही एक कारण आहे .धर्मांतराची घोषणा केल्यापासून आज जवळजवळ दहा महिन्यांचा कालावधी लोटलेला आहे.या अवधीत लोकजागृतीचे काम पुष्कळसे झाले आहे.आता लोकमत अजमाविण्याची वेळ आली आहे असे मला वाटते .हे लोकमत अजमाविण्याला निरनिराळ्या जातींची सभा करणे हे एक साधे आणि सोपे साधन आहे,अशी माझी समजूत आहे.धर्मांतराचा प्रश्न कृतीत उतरविण्याकरिता जो प्रयत्न करणे आवश्यक आहे तो प्रयत्न करण्यापूर्वी खरे लोकमत काय आहे याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.आणि माझी अशी समजूत आहे की,जातीजातींची सभा करून अजमाविलेल्या लोकमताबद्दल जशी खात्री देता येईल ,तशी सर्वसाधारण अस्पृश्यांची सभा भरवून अजमाविलेल्या लोकमताबद्दल देता येणार नाही.कारण ‘सर्व अस्पृश्यांची परिषद ‘असे नाव देऊन जरी सभा बोलाविली तरी ती सर्व अस्पृश्यांची प्रातिनिधिक स्वरूपाची सभा होऊ शकणार नाही.तसे होऊ नये व लोकमताची खात्री करून घेता यावी म्हणूनच नुसत्या महार लोकांची सभा भरविण्यास आलेली आहे.या सभेत इतर जातींचा समावेश न केल्यामुळे त्यांचे काही नुकसान होऊ शकत नाही .त्यांनी धर्मांतर कारवायाचे नसेल तर त्यांचा या सभेत समावेश न केल्यामुळे त्यांना वाईट वाटण्याचे काही कारण नाही .त्यांना धर्मांतर करावयाचे असेल तर या सभेत त्यांचा समावेश करण्यात आला नव्हता म्हणून त्यांच्या धर्मांतरात कसलाही आडकाठी येऊ शकणार नाही .जशी महार लोकांची सभा भरविण्यात आलेली आहे ,तशीच अस्पृश्यांतील इतर जातींना आपापल्या जातीच्या सभा त्यांनी कराव्या अशी मी त्यांना सूचना करतो व त्या कामी त्यांना माझ्याकडून जी मदत होण्यासारखी असेल ती अवश्य करीन.येथवर झाली ती केवळ प्रस्तावना झाली .आता मी आजच्या सभेच्या मुख्य विषयाकडे वळतो.
(क्रमशः)
सभार: सुगावा प्रकाशन