भारतीय इतिहासात शिल्पकलेतील मानबिंदू ठरलेली मौर्य शिल्पकला….!

भारतीय इतिहासात शिल्पकलेतील मानबिंदू ठरलेली मौर्य शिल्पकला….!
***********************************
सूरज रतन जगताप www.ambedkaree.com

भारतीय शिल्पकलेच्या इतिहासात मानबिंदू ठरते ती म्हणजे “मौर्य काळातील” शिल्पकला. मौर्य काळात “प्रस्तर” हे माध्यम वापरुन तयार करण्यात आलेल्या लेण्या व स्तंभ हे आश्चर्यचकित करून टाकणारे आहेत.


सतराव्या शतकात आलेल्या प्रवाशांनी तर हे मानव निर्मित नसून एखाद्या “जीन” ने निर्माण केले आहे असा उल्लेख आपल्या प्रवास वर्णनात करून ठेवलेला आहे.तर अनेक इंग्रज अधिकार्यांना चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी तयार केलेले पिवळ्या “बलूवा” दगडाचे आज्ञा स्तंभ हे धातूचे असावेत असे वाटत होते.


चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी तयार केलेले स्तंभ हे धातू सारखे आजही चमकतात त्याचे कारण आहे की या #बलूवा दगडात तयार केलेल्या स्तंभाला झिलाई आणण्यासाठी दुसर्‍या एका दगडाने घासून घासून गुळगुळीत केले जाई व झिलाई आणली जाई त्या दगडाचे नाव होते “अगेट”.भारतीय शिल्पकलेतील हे वैशिष्ट्य जगात अन्यत्र आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही.

मौर्य काळा नंतर तीन प्रमुख शिल्प शैली विकसित झाल्या १) गांधार शैली २) मथुरा शैली आणि ३) अमरावती शैली.

ज्या भागात या शैली विकसित झाल्या उदयास आल्या त्या भागाच्या विभागाच्या नावाने त्यांची ओळख निर्माण झाली.जसे गांधार म्हणजे वर्तमान काळातील “कंधार”.या भागात ही शैली विकसित झाली म्हणून तिचे नाव “गांधार शैली” तसे मथुरा या भागत ही शैली विकसित झाली म्हणून “मथुरा शैली” तसेच अमरावती इथे ही शैली विकसित झाली म्हणून “अमरावती शैली”. तिन्ही शैलीत जर पहिली मूर्ती कुणाची तयार केली गेली होती तर ते होते तथागत गौतम बुद्ध.

आजपर्यंत बुद्धांच्या आधी कोणाचीही मूर्ती उत्खननातून सापडलेली नाही.

आता आपण या शिल्प शैली त्यांचे माध्यम आणि राजाश्रय देणारे कोण होते या बाबतीत जाणून घेऊ.
मौर्य कुळातील “सम्राट बृहद्रत” यांची हत्या करणारा त्यांचा सेनापती “शुंग” हा राज्य बळकावतो आणि राज गादीवर बसतो.मौर्य घराणे जोपर्यंत सत्ताधारी होते तोपर्यंत बाह्य आक्रमणे झालेली नव्हती , शुंग राजसत्तेत आल्या नंतर अनेक बाह्य आक्रमणांना सुरुवात होऊ लागली होती व जे स्थानिक घराणी होती त्यांनी शुंगांचे नेतृत्व नाकारले होते, आणि स्वतःला स्वतंत्र राजे घोषित केले होते.

१) “गांधार शैली”( वर्तमान काळातील “कंधार” )-

इ स पहिल्या शतकात कुषाणांनी ( राजे कनिष्क आध्यात्मिक असल्याने त्यांनी बौध्द धम्म स्वीकारला होता ) बुध्दांची पहिली मूर्ती तयार केली होती .
त्या आधी मानवीय स्वरूपात बुध्दांचे प्रकटीकरण करण्यात आलेले नव्हते त्या ऐवजी चिन्हांच्या माध्यमातून त्यांचे अस्तित्व दाखवले जात होते.


धम्म चक्र ( ज्याला आपण अशोक चक्र म्हणतो ) स्तूप, खाली आसन, बौध्दी वृक्ष ( पिंपळाचे झाड ) आणि पद्म चिन्ह ही ती चिन्हे होती. गांधार शैलीतील मूर्ती तयार करण्यासाठी जे माध्यम वापरले गेले होते ते राखाडी निळसर रंगाचे दगड होते.कुषाण वंशीय राजा कनिष्क हे या शैलीला राजाश्रय देणारे राजे होते.कलाकार जरी बाह्य होते जरी राज्यकर्ते बाहेरचे होते तरीपण विषय मात्र स्वदेशी होता ते म्हणजे… “बुध्द”.

२) “मथुरा शैली”-

इथल्या मातीत जन्माला आलेल्या कलाकारांनी तयार करून घेतलेली बुध्दांची मथुरा शैलीतील मूर्ती आपल्या आजही वस्तू संग्रहालयात पाहायला मिळते, लाल दगडात तयार केलेली बुध्दांची मूर्ती ही बघताच क्षणी देशी बनावटीचे आहे हे लक्षात येते. मूर्तीची ठेवण बसण्याची पध्दत या वरून ही मूर्ती आपल्याला इथल्या कलाकारांनी तयार केलेली आहे हे कोणी तज्ञांनी सांगण्याची गरज भासत नाही. या शिल्प शैलीला राजाश्रय देणारे राजे होते सम्राट कनिष्क तसेच.सहाव्या शतकातील गुप्त घराण्याने देखील राजाश्रय दिले होते.

३)”अमरावती शैली”-

चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे मांडलिक असणारे “सातवाहन घराणे” ( इ स पुर्व २३० ते इ स २२० असे ४५० वर्षे राज्य केले. ) यांनी मौर्य घराण्याच्या पडावा नंतर स्वतःला स्वतंत्र राजे घोषित केले व आपली राजसत्ता प्रस्थापित केली होती . महाराष्ट्र , कर्नाटक आंध्र प्रदेश या भूभागावर यांनी राज्य केले. महाराष्ट्राच्या जडणघडणीत या घराण्याचा मोठा वाटा आहे. सातवाहनांची राजसत्ता असलेल्या अमरावती इथे ही शैली विकसित झाली. अमरावती शैलीत बुद्धांच्या जीवनाशी निगडित असलेल्या घटनांचा व अनेक जातक कथांचे या शैलीत शिल्पांकन करण्यात आले.अमरावती शैलीत शिल्प तयार करण्याचे माध्यम होते संगमरवरी दगड.राजाश्रय देणारे राजे होते सातवाहन घराणे. देशी आणि विदेशी कलाकारांनी अगदी सफाईदारपणे आपली कला प्रस्तुत केलेली आपण या शैलीत पाहू शकतो.

जगातील इतर देशात शिल्पकलेला इ स पुर्व पाचव्या शतकापासूनच सुरुवात झाली होती. आपल्या देशाला शिल्पकला ज्ञात झाली ती चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या मुळेच…. !

सूरज रतन जगताप -मुक्त लेणी अभ्यासक ,घणसोली,नवी मुंबई -९३२०२१३४१४

Next Post

बुद्ध तत्वज्ञानामुळे जग युध्दापासून दूर व शांततेच्या जवळ जाईल.- डॉ.बाबासाहेब आंबेडकर

शुक्र एप्रिल 24 , 2020
बुद्ध तत्वज्ञानामुळे जग युध्दापासून दूर व शांततेच्या जवळ जाईल.- डॉ बाबासाहेब आंबेडकर दि १५ फेब्रुवारी १९५३ रोजी दिल्ली येथे इंडोजपानी सांस्कृतिक संघटनेचे चिटणीस श्री मूर्ती व त्यांच्या पत्नी यांचा श्री राजभोज यांनी सत्कार केला. या सत्काराला पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर,आद.माईसाहेब आंबेडकर […]

YOU MAY LIKE ..