मार्क्स – सचिन माळी-सत्यशोधक

मार्क्स,-सचिन माळी-सत्यशोधक
*************************************

परवा, तुझं चरित्र वाचताना कळलं की तुझा स्वभाव कसा होता. तुझ्याशी वाद घालायला तुझा कुणी विरोधक आला की तू मंद स्मित करून बस म्हणायचा. विरोधक तावा-तावाने बोलू लागायचा. तुझं फक्त हुं…. हं… हां… हुं… हं… चालायचं. तू काहीच बोलायचा नाहीस. फक्त तू कान देऊन ऐकायचास. समोरच्याला पुरता बोलता करायचास. सगळा ओपन होऊ द्यायचास. समोरचा बोलू बोलू थकला आणि पुनरावृत्ती करू लागला की तुझ्या लक्षात यायचं की, याच्याकडे आता बोलण्यासारखं काही उरलेलं नाही. याचं पात्र रिकामं झालं आहे. मग तू त्याला प्रतिसवाल करायचास…तुझ्या विरोधकाच्या मांडणीला आड ही नाही आणि बुड ही नाही हे तू लीलया दाखवायचास…रोमॅन्टिसिझम मध्ये बेशुद्ध झालेल्यांना तू शुद्धीवर आणायचास…कल्पनांच्या हवेत उडणाऱ्यांना तू जमिनीवर आणायचास…त्यांना डोळे देऊन मंदस्मित करीत त्यांच्या खांद्यावर हात ठेवायचास आणि न थकता त्यांना Dialectical Materialism सांगायचास.

मार्क्स, तू दास कॅपिटल लिहिलंस तवा तू युरोप बघत होतास…पण जेव्हा तुझी भारतावर नजर पडली तेंव्हा तू ही थक्क झालास क्षणभर…आणि भारताचे अर्थशास्त्र युरोप सारखं नाही हे सत्य तू स्वीकारलंस उमदेपणाने…मार्क्स, तू भारतावर लिहलेल्या १२ लेखांत तुझं भारतातील जातिव्यवस्थेच्या बळी असणाऱ्या शोषित-पीडित जनतेबद्दल असणारं प्रेम आणि त्यांच्या मुक्तीसाठी तुझ्या मनातील तळमळ आम्ही पाहिली आहे रे…

“वर्ग ही परिवर्तनीय व्यवस्था आहे तर जात ही अपरिवर्तनीय व्यवस्था आहे त्यामुळे जातीअंत केला पाहिजे” हा तुझा आवाज इथल्या सुरूवातीच्या काळातील कम्युनिस्ट नेतृत्वाला ऐकूच गेला नाही असं वाटतं बघ. का त्यांनी कानांवर हात ठेवले होते, माहीत नाही…ते त्यांच्या चिंतनातून जात अदृश्य करून ‘वर्ग’ ‘वर्ग’ करीत राहिले. मला कुणालाही दुखवायचं नाही रे…पण हे असं का घडलं? याचा कार्यकारणभाव तपासला तर उत्तर ‘जात’ हेच येतंय बघ.

मार्क्स, तुला एक धक्कादायक गोष्ट किती दिवस झालं सांगायची म्हणतोय, अरे तीस-चाळीसचं दशक असावं…मुंबईत कापड गिरणीमध्ये सवर्ण कामगारांना वेगळा पाण्याचा माठ असायचा तर अस्पृश्य कामगारांना वेगळा पाण्याचा माठ…तुझ्या नावानं युनियन चालवणाऱ्यांना यातला एक माठ फोडावा असं वाटलं नाही बघ. कारखान्यात भेदभाव पाळला रे…यावेळी तू तिथं आला असतास ना, तर त्यांचे नक्कीच कान उपटले असतेस. माझे बाबासाहेब तिथं पोहोचले आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जातीअहंकाराचे ते माठ फटा-फट फोडून टाकले…तू तिथं असतास ना, तर बाबासाहेबांना मिठी मारून आलिंगनच दिलं असतंस…बघ.

तू भारतात एक जरी चक्कर मारली असतीस ना, तर तू सहज सोडवलं असतंस जात-वर्गाचं कोडं…”जातीव्यवस्था ही केवळ श्रमाची विभागणी नाही तर श्रमिकांची ही विभागणी आहे” ह्या बाबासाहेबांच्या सिद्धांताला तू दिली असतीस मनापासून दाद…आणि बाबासाहेबांच्या Annihilation of Caste बाबत तू हसत हसत म्हणाला असतास “अरे वा, हा तर समस्त भारतीयांच्या मुक्तीचाच जाहीरनामा!”

मार्क्स, तुला आठवतंय का बघ. तू भारतावर लिहिताना म्हणाला होतास की…”भारतात मुस्लिम आले ते जातिग्रस्त झाले, त्यांचे ब्राह्मणीकरण (अनुवादकाने ‘हिंदुकरण’ असा शब्दप्रयोग केला आहे) झाले. भारतात ख्रिश्चन आले ते ही जातिग्रस्त झाले, त्यांचे ही ब्राह्मणीकरण झाले.” पण तुला सांगू का, तुला ज्यांनी भारतात आणला त्यांनीही तुझं ब्राह्मणीकरणच केलं. एक प्रकारे मार्क्सवाद ही जातिग्रस्तच झाला..अरे ते पंडित महापंडित वेदात आणि भगवतगीतेत मार्क्सवाद शोधत बसले रे..! पण घाबरू नकोस. चित्र सगळंच नकारात्मक नाही मार्क्स…कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या सारख्या काही हाडाच्या कम्युनिस्टांनी मात्र सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत. बदल होतो आहे. तरीही अधून मधून “जात मिथ्यां वर्ग ब्रह्म” म्हणत सुटलेले काही शंकराचार्य भेटतातच. तेव्हा मात्र हसावे की रडावे हेच सुचत नाही मला…त्यावेळी तू एकदा उद्वेगाने केलेले विधान आठवते मला…तू बोलला होतास की, हे असे असेल तर “I am not Marxists!”

मार्क्स, तुझ्या करारी नजरेत प्रज्ञेचे सूर्य तळपत असत आणि तरीही जराही अभिनिवेश नसायचा तुझ्या चेहऱ्यावर. तुझ्या हृदयातील करुणेचा महासागर ओघळायचा तुझ्या लेखणीतून…जगातील दुःखमुक्तीचं…शोषणमुक्तीचं कोडं उलगडण्यासाठी बैचेन असायचास तू…तुझी ‘टोटल मॅन’ ची थेरीच सांगते की, तू तर बुद्धासारखाच या निसर्गावर,जीवसृष्टीवर आणि माणसांवर प्रेम करायचास. म्हणूनच तुझ्या पश्चात डॉ.बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासूर्याने तुझी तुलना तथागत बुध्दाशी केली…संपूर्ण मानव इतिहासात बुध्दाशी तुलना करण्याच्या उंचीचा महामानव फक्त तुझ्याच रूपात दिसला माझ्या बाबासाहेबांना…खरं तर तुही एक बोधिसत्वच…

मार्क्स, तू तत्वज्ञानाशी नव्हे तर सत्याशी बांधिलकी जपणारा खरा सत्यशोधक! तू आमचा दुश्मन नाहीस तर तू ही आमच्या मुक्ती लढ्यातला सखाच आहेस. तुला जन्मदिनाच्या लाख लाख सदिच्छा!!

<#सत्यशोधक
सचिन माळी
shahirsachinmali@gmail.com

ता.क. : ही पोस्ट म्हणण्यापेक्षा मार्क्सशी केलेला संवाद वाचून आमचे चित्रकार आणि कवी मित्र तसेच कलासंगिनीचे राज्य उपाध्यक्ष गोपाल गंगावणे यांनी तातडीने मार्क्सच्या हातात बुद्धाचा ग्रंथ असलेले पेंटिंग पाठवले.एका चित्रात सारा आशय सामावला गेला!
Do Share

(सभार मा सचिन माळी -साहित्यिक,विचारवंत व सामाजिक आणि राजकीय नेते)

Next Post

बौद्ध संस्कृतीचा शब्द 'पल्ली' 'Palli' word related to Buddhism.

बुध मे 6 , 2020
बौद्ध संस्कृतीचा शब्द ‘पल्ली’ ‘Palli’ word related to Buddhism. ⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛ -संजय सावंत,नवी मुंबई -www.ambedkaree.com ‘पल्ली’ म्हटल्यावर हा एक दक्षिण भारतीय शब्द आहे हे लक्षात येते आणि ते बरोबरच आहे. पण हाच शब्द आशिया आणि इतर खंडात सुद्धा पहायला व ऐकायला मिळतो […]

YOU MAY LIKE ..