“बिहारचे पलटू चाचा”.
■ दिवाकर शेजवळ ■
divakarshejwal1@gmail.com
अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या प्रकरणाला नितीशकुमार यांच्या राज्यात ‘बिहार विरुद्ध महाराष्ट्र’ असा रंग चढवला जात आहे. त्यामागे राज ठाकरे यांच्या मनसेने काही वर्षांपूर्वी मुंबईसह काही शहरांमध्ये उत्तर भारतीयांविरोधात घडवलेल्या उद्रेकाचे उट्टे काढण्याचे इरादे मुळीच नाहीत. त्यामागे आहे बिहारमधील जदयु- भाजपची सत्ता आगामी निवडणुकीत वाचवण्याची धडपड. त्यातून पाच टक्क्यांहुन अधिक लोकसंख्या असलेल्या राजपूत समाजाच्या मतांच्या बेगमीला भारी महत्व प्राप्त झाले आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपुत याच्या मृत्यूचे मुंबईतील प्रकरण म्हणूनच तापवण्यात आले आहे.त्यासाठी मुंबई पोलिसांना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला नाहक बदनाम केले जात आहे.पण सुशांतसिंग याच्या कुटुंबीयांनी कोणावरही संशय व्यक्त न केल्यामुळेच वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ शकला नाही, हेच सत्य आहे.
●●●●●●●●●●●●
बिहारचे मुख्यमंत्रीपद पाच वेळा भूषवलेले जनता दल-युनायटेडचे नेते नितीशकुमार हे तीन महिन्यांनी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यावेळी त्यांच्या जदयु आणि भाजप युतीच्या सरकारच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. मुंबईतील अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येचे प्रकरण बिहारमध्ये कमालीचे तापले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात सुरुवातीला चर्चेचा विषय बनलेला नेपोटीझमचा म्हणजे गोतावळ्याच्या भल्यासाठी बॉलिवूडमध्ये चालणाऱ्या वशिलेबाजीचा मुद्दा अचानक मागे पडला. अन त्या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. मुंबई पोलिसांना आणि राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला संशयाच्या भोवऱ्यात ओढण्यात आले. त्यातून सुशांतसिंगच्या मृत्यूचे प्रकरण नितीशकुमार यांच्या सरकारने तपासासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हाती सूत्रे असलेल्या सीबीआयकडे धाडले.त्याला केंद्र सरकारने तत्परतेने मंजुरीही दिली.
मोदी सरकारच्या त्या निर्णयाला अर्थातच, महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपला सत्तेतून हद्दपार करणारे सत्तांतर घडवल्याची पार्श्वभूमी आहे. त्यातून केंद्र आणि राज्य यांच्यात खटके- खडाजंगी होणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला खिंडीत गाठण्यासाठी केंद्र सरकारने नवी नवी संधी शोधणे हे राजकारणात नवलाचे नाही. पण अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या प्रकरणाला नितीशकुमार यांच्या राज्यात ‘बिहार विरुद्ध महाराष्ट्र’ असा रंग चढवला जात आहे. त्यामागे मनसेने काही वर्षांपूर्वी मुंबईसह काही शहरांमध्ये उत्तर भारतीयांविरोधात घडवलेल्या उद्रेकाचे उट्टे काढण्याचे इरादे मुळीच नाहीत. त्यामागे आहे बिहारमधील जदयु- भाजपची सत्ता आगामी निवडणुकीत वाचवण्याची धडपड. त्यासाठी एकेकाळी मोदींना पंतप्रधान होऊ न देण्यासाठी ‘एनडीए’ तून बाहेर पडलेले नितीशकुमार आता मोदींच्याच व्यासपीठावरून मते मागणार आहेत. त्याचवेळी नितीशकुमार यांच्या डीएनएमध्ये गडबड आहे, असे पूर्वी म्हणणारे मोदी यांनी तर बिहारींच्या रक्तात असलेल्या शौर्याचे पोवाडेही सुरू केले आहेत.
मोदी आणि त्यांच्या भाजपला बिहार कोणत्याही परिस्थितीत गमावायचे नाही, ही नितीशकुमार यांच्यासाठी जमेची आणि दिलासादायक गोष्ट आहे.पण तिथली विधानसभेची लढाई ही नितीशकुमार आणि त्यांच्या जदयुसाठी अजिबात सोपी राहिलेली नाही. त्याला राज्यातील समस्यांसोबतच त्यांचे तत्वहीन आणि मित्रद्रोहाचे राजकारण कारणीभूत ठरले आहे. अस्तित्व टिकवण्याच्या संघर्षात सारे पर्याय वापरून झाल्याने ‘जाये तो जाये कहा’ या टप्प्यावर नितीशकुमार येऊन ठेपले आहेत. बिहारमध्ये भाजपला ‘बाजीगर’ बनण्याची संधी उपलब्ध करून देणारी स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे तीन महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक ही नितीशकुमार यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई असली तरी भाजपच्या दृष्टीने ‘बडा भाई’ बनण्यासाठी चढाई आणि मुसंडी मारण्याची ती घडी असेल.
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बिहारमधील ४० जागांपैकी भाजप-एनडीएने ३९ जागा जिंकल्या आहेत. त्यात नितीशकुमार यांच्या जदयुला १६ जागांवर विजय मिळाला असला तरी भाजपने १७ आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीने ६ जागा मिळवलेल्या आहेत. २०१४ची लोकसभा निवडणूक नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडून लढवली होती. त्यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षासोबत युती करून जदयुला फक्त दोन जागांवर विजय मिळवता आला होता. तर, भाजपने ३१ जागा जिंकल्या होत्या. त्यावरून नितीशकुमार यांनी गेल्या वर्षी जिंकलेल्या लोकसभेच्या १६ जागांवरील विजयातील भाजप- एनडीएचा वाटा किती मोठा आहे, ते अधोरेखित होते.
२४३ सदस्य संख्या असलेल्या बिहारच्या विधानसभेत सध्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जदयुच्या आमदारांचे सध्याचे संख्याबळ ७१ इतके आहे. तर, भाजप- एनडीएचे संख्याबळ ५८ इतके आहे. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे ८० तर काँग्रेसचे २७ आमदार सभागृहात आहेत. मात्र मागील म्हणजे २०१५ सालातील विधानसभा निवडणूक ही नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यांचे राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांची ‘महाआघाडी’ निर्माण करून लढवली होती.१७८ जागा जिंकलेल्या त्या महाआघाडीत सर्वाधिक म्हणजे ८० जागा जिंकून राजद हा सर्वात मोठा पक्ष बनला होता. असे असतानाही लालूप्रसाद यादव यांनी मुख्यमंत्री पदाची माळ नितीशकुमार यांच्या गळ्यात घातली होती!
मात्र दीड वर्षांनंतर नितीशकुमार यांनी ‘महाआघाडी’ फोडून पुन्हा भाजपशी घरोबा केला आणि जदयु- भाजप आघाडी सरकारचे मुख्यमंत्री बनले. त्यांचा हा निर्णय म्हणजे बिहारमधील जनतेने २०१५ च्या निवडणुकीत महाआघाडीला सरकारसाठी दिलेल्या जनांदेशाशी प्रतारणाच होती. तेव्हापासून राजदचे नेते तेजस्वी यादव हे नितीशकुमार यांची संभावना ‘ पलटू चाचा’ अशीच करतात.
‘ मोदी पंतप्रधान नकोत’ अशी भूमिका घेऊन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप- एनडीएची साथ नितीशकुमार यांनी सोडली, तेव्हा धर्मनिरपेक्षतावादी पक्षांसाठी ते ‘नायक’ ठरले होते. तिसऱ्या आघाडीसाठी त्यांच्याकडे आशेने पाहिले जाऊ लागले होते.पण बिहारच्या जनतेने भाजपविरोधी कौल देऊन राज्याचे नेतृत्व सोपवले असतानाही नितीशकुमार यांनी २०१७ सालात म्हणजे तीनच वर्षांत घुमजाव केले आणि मोदींच्या स्वागताचे यजमान बनले.
अशा राजकारणापायी त्यांच्या प्रतिमेच्या पार ठिकऱ्या उडाल्या आहेत. भाजप- एनडीएची साथ सोडल्यानंतर नितीशकुमार हे धर्मनिरपेक्षतावादी पक्षांच्या नजरेत ‘नायक’ ठरले होते. तिसऱ्या आघाडीसाठी मोदींना पर्यायी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आशेने पाहिले जात होते. पण तेच अखेर मोदींच्या पालखीचे भोई बनले. सत्तालंपट आणि तत्वहीन राजकारणामुळे नितीशकुमार हे आता ‘पक्षनिरपेक्षतावादी’ राजकारणाचे आयडॉल बनले आहेत. ही बिघडलेली नवी प्रतिमा घेऊन ते ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. ते स्वतः ज्या कुर्मी जातीतील आहेत, तो समाज बिहारमध्ये अवघा चार टक्के असून त्याचा फारसा जनाधार त्यांच्यापाठिशी नाही. शिवाय, धर्मनिरपेक्षतावादी भूमिकेला सोडचिठ्ठी दिल्याने जदयुमध्ये ‘कॅडर’ किती उरलाय, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक! एकेकाळी जडयुचे अध्यक्ष असलेले ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी नितीशकुमार यांची साथ तर तीन वर्षांपूर्वीच सोडली आहे.
विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना बिहारमध्ये सारे काही आलबेल नाही.नितीशकुमार यांच्यासमोर आव्हानात्मक परिस्थिती आहे. कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या झपाट्याने वाढत असून टेस्टिंगचे प्रमाण कमी आहे. त्यावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून बोट ठेवले आहे. तसेच लॉक डाऊनमुळे इतर राज्यांतून परतलेले बेरोजगार बिहारी आणि महापूरामुळे लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावरून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि लोकजनशक्ती पार्टीचे खासदार चिराग पासवान या दोघा युवा नेत्यांनी नितीशकुमार यांना चांगलेच घेरल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे,लालूप्रसाद यादव हे ‘जेरबंद’ असतांना नितीशकुमार यांना जेरीस आणण्यात तेजस्वी यादव हे कुठेही कमी पडलेले नाहीत.अन रामविलास पासवान यांच्या पक्षाने तर येत्या निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांचा ‘चेहरा’ नको, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे जडयु आणि लोकजनशक्ती पार्टी यांच्यात कटुता वाढली असून गेल्या वर्षभरात चिराग पासवान आणि नितीशकुमार यांच्यात संभाषण होऊ शकलेले नाही. चिराग यांनी कोरोनाच्या संकटामुळे बिहारची निवडणूक पुढे ढकलावी, या तेजस्वी यांनी केलेल्या मागणीला पाठिंबा दिला आहे. तर, तेजस्वी यांनी रामविलास यांना वाढ दिवसानिमित्त आवर्जून शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार भाजपने घोषित करावा, यासाठी रामविलास हे आग्रही आहेत. भाजप त्यासाठी तयार झाला नाही तर आपला पक्ष वेगळा विचार करेल, असे संकेत पासवान यांनी दिले आहेत. त्याचवेळी काँग्रेसने चिराग पासवान यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बनवण्यास संमती दर्शवली आहे. बिहारच्या एनडीएमध्ये आजवर ‘मोठा भाऊ’ या भूमिकेत असलेल्या नितीशकुमार यांच्या जदयुला मागे सारण्यासाठी भाजपच्यादृष्टीने ही परिस्थिती अनुकूल आहे.
मागील विधानसभा निवडणूक लालूप्रसाद, नितीशकुमार आणि काँग्रेस यांनी महाआघाडी उभी करून लढवली होती. त्यावेळी जदयु आणि राजद यांनी प्रत्येकी ११० जागा लढवल्या होत्या. तर, भाजपसोबत राहिलेल्या पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीने ४० जागा लढवल्या होत्या.पण त्यावेळी महाआघाडीसमोर भाजप – एनडीएचा टिकाव लागू शकला नव्हता. ५८ जागा जिंकलेल्या एनडीएमध्ये तेव्हा लोजपाला फक्त दोन जागांवर विजय मिळू शकला होता. तर,१७८ जागा जिंकून महाआघाडीने नितीशकुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद बहाल केले होते.
आता परिस्थिती वेगळी आहे. नितीशकुमार हे भाजप- एनडीएसोबत आहेत. तर, त्यांच्या विरोधातील महाआघाडीत लालूप्रसाद, शरद यादव, जितनराम मांझी यांचे पक्ष आणि काँग्रेस, कम्युनिस्ट हे एकत्र आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमध्ये ‘मोठा भाऊ’ बनून मुख्यमंत्रीपद काबीज करण्याचीच भाजपची रणनीती राहील. त्यादृष्टीने नव्या राजकीय परिस्थितीत भाजप-एनडीएच्या जागा वाटपात भाजप नेते अमित शहा आणि रामविलास पासवान हे दोघेही नितीशकुमार यांना खिंडीत गाठण्याची संधी सोडणार नाहीत. कारण प्रसंगी भाजपची दादागिरी झुगारून देण्यासाठी टोकाचे पाऊल उचलण्याचा मार्ग नितीशकुमार यांच्यासाठी बंद झालेला आहे. त्यामुळे नितीशकुमार यांच्या जदयुला जागा वाटपात घाटा निमूटपणे सोसण्याची तयारी ठेवणे भाग पडणार आहे.
नितीशकुमार यांचे जदयुच्या आमदारांचे सध्याचे संख्याबळ ७१ इतके आहे. अर्थात, ती कमाई लालूप्रसाद यांच्यासोबतच्या महाआघाडीची होती. आता गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या जदयुने भाजपच्या मदतीने १६ जागा जिंकल्या आहेत. त्या हिशेबाने विधानसभेच्या ९६ जागांवर त्यांचा अधिकार सिद्ध होतो. तर, रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीचे सध्या ६ खासदार आहेत. त्या हिशेबाने त्या पक्षाचा ३६ जागांवर अधिकार आहे. पण मागील वेळी विधानसभेच्या ४० जागा लढवलेल्या पासवान यांची मागणी ५०-६० जागांपर्यंत पोहोचण्याचा रागरंग दिसत आहे. ‘ दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्वप्नातला बिहारचा मुख्यमंत्री मी आहे’ याची आठवण भाजपला रामविलास पासवान हे दरवेळी करून देत आले आहेत. पासवान यांची ती इच्छा अपुरी राहिली असली तरी त्यांचे खासदार पुत्र चिराग पासवान हे आता मुख्यमंत्री पदाच्या दावेदाराच्या भूमिकेत आले आहेत. त्यामुळे चिराग यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याचे पाहण्यास रामविलास यांचे सर्वोच्च प्राधान्य राहिल्यास नवल नाही. त्यासाठी कोणतेही दिव्य करण्याची त्यांची तयारी राहील. लालूप्रसाद यादव हे रामविलास पासवान यांना नेहमीच महान राजकीय हवामान तज्ञ म्हणत आले आहेत, हे नितीशकुमार यांना विसरून चालणार नाही. त्यामुळे भाजप आणि पासवान यांच्यातील सख्य आणि कदाचित वितुष्टही यावेळी नितीशकुमार यांच्या मुखमंत्री पदावर ‘संक्रांत’ आणू शकते. बिहारच्या एनडीएने निवडणुकीसाठी किमान समान कार्यक्रम तयार करावा, असा आग्रह धरतानाच नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यास चिराग पासवान यांनी केलेला विरोध भाजपला ताठर होण्यास बळ देत आहे. ही परिस्थिती नितीशकुमार यांची राजकीय कोंडी अधिक वाढवणारी आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆