जिंदाबाद…! जिंदाबाद लॉंगमार्च जिंदाबाद ssss
*********************
◆ दिवाकर शेजवळ ◆
divakarshejwal1@gmail.com
आज 11 नोव्हेंबर 2019 बरोबर 40 वर्षांपूर्वी म्हणजे 1979 सालात याच दिवशी मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळवण्यासाठी नागपूरच्या दिक्षाभूमीवरून हजारो भीमसैनिकांनी ‘ लॉंगमार्च’ द्वारे औरंगाबादकडे कूच केली होती। प्रा जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखाली डोईला कफन बांधून पुन्हा घरी न परतण्याच्या पुरेपूर तयारीनिशीच ते सारे भीमसैनिक मराठवाड्यात धडकले होते।
त्या भीमसैनिकांनी आणि पँथर्सनी नन्तर नोकऱ्या, रोजगार, घरदार, संसार यांची धूळधाण सोसत तब्बल 16 वर्षे सरकारशी आणि पोलिसांच्या दमनशाहीशी घनघोर संघर्ष केला। पण नामांतर लढ्याची तीव्रता तसूभरही कमी होऊ दिली नव्हती।
त्या संघर्ष पर्वात नामांतराचा प्रश्न गाडून टाकण्यासाठी राज्यकर्त्यांनी तोडबाजांना उभे करत वेगळ्या विद्यापीठाचे पर्याय पुढे रेटले। त्याचवेळी कोणी लॉंगमार्चला ‘ WRONG MARCH’ म्हणत आणि कोणी बाबासाहेबांच्या प्रतिष्ठेच्या नामांतर प्रश्नाला ‘डेड इशू’ म्हणत आंबेडकरी समाजाचा अवसानघात करण्याचा प्रयत्न केला होता। पण तमाम भीमसैनिकांनी आणि पँथर्सनी त्या साऱ्या दुष्ट कारवायांना मोडून काढत नामांतराची लढाई जिंकली होती!
त्या लढ्याच्यावेळी जन्मही न झालेले काही फेसबुकी अभ्यासक नामांतर आंदोलनाचा खोटानाटा इतिहास आज फैलावताना पाहिल्यावर अक्षरशः त्यांची कीव येते। त्या पार्श्वभूमीवर, नव्या आंबेडकरी पिढीने खरा इतिहास नामांतर लढ्याच्या साक्षीदारांकडून जाणून घेतला पाहिजे।
त्यादृष्टीने धनराज डाहाट यांचे ‘ नामांतराचा प्रश्न’, त्या लढ्याला ऊर्जा देणारी समरगीते लिहिणारे कवी इ मो नारनवरे गुरुजी यांचे ‘ लॉंगमार्च’,का रा वालदेकर यांचे ‘ लॉंगमार्च: आक्षेप आणि इतिहास’ हे ग्रँथ आवर्जून वाचले पाहिजेत।
मराठवाड्यातील नामांतरविरोधी अत्त्याचारी आंदोलनांनंतर काही वर्षांनी पुण्यातील वसंत व्याख्यानमालेप्रसंगी शरद पवार यांना एक प्रश्न विचारला गेला होता। तो म्हणजे, तुमच्या आयुष्यातील सतावणारी एखादी खंत किंवा बोचणारे शल्य सांगाल काय? त्यावर पवार यांनी ‘ मराठवाडा विद्यापीठ नामांतर ठरावाची अंमलबजावणी मला करता आली नाही याचे शल्य कायम बोचते’ असे उत्तर दिले होते। त्यानन्तर मध्ये बराच काळ गेला। पवार यांनी दिलेले उत्तर किती जणांना आठवत असेल, याबाबत शंका असतानाच त्यांनी 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार केला।
शरद पवारांची धमक
—————–
तब्बल 16 वर्षे रखडलेला तो प्रश्न शरद पवार यांनी मोठ्या कल्पकतेने आणि तितक्याच हिमतीने अखेर सोडवला। मराठवाडा विद्यापीठ नामांतर ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी ‘ नामविस्तार’ हा नवा शब्द तर योजलाच। शिवाय, त्यासाठी दिवसही मकर संक्रांतीचा म्हणजे तिळगुळ वाटपाचा निवडला होता। पवार हे तेवढ्यावरच थांबले नव्हते। नामविस्तारावरून कोणतीही अनुचित प्रतिक्रिया उमटू न देण्याची पुरेपूर दक्षता त्यांनी घेतली होती। मुंबईचे तत्कालीन सह पोलीस आयुक्त (गुन्हे) एम एन सिंग यांना खास मोहिमेवर धाडून मराठवाड्याच्या सीमेवर फौजफाट्यासहित त्यांनी तैनात केले होते। अशी धाडसी कामगिरी करण्याची धमक त्यांच्याशिवाय अन्य कुण्या मुख्यमंत्र्याने दाखवली असती, असे कोणीही म्हणू शकणार नाही।
नामविस्तार म्हणजे काय?
————————-
मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीला ‘नामांतर’ म्हटले गेले होते। नामांतर म्हणजे एखादे नाव हटवून नवे नाव देणे असे त्यातून ध्वनित होते। पण नामांतरवाद्यांच्या मागणीला अधिष्ठांन होते,ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने संमत झालेल्या ठरावाचे। त्यामुळे ते आंदोलन खरे तर लोकशाहीची बूज राखण्याचा आग्रह धरणारे होते। अन विधिमंडळाचा ठराव हा मराठवाडा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही अस्मितांचा सुवर्णमध्य साधणारा होता। पण ही गोष्ट तो ठराव संमत झाल्यानन्तर मराठवाड्यात उसळलेल्या आगडोंबात हरवली गेली होती।
त्यांनतर 16 वर्षांनीं मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी ‘नामविस्तार’ या नव्या गोंडस शब्दाचा वापर करून तो प्रश्न सोडवला। त्यांनी नामांतर या शब्दाऐवजी वेगळा शब्द योजला असला तरी त्यांनी केलेली कृती ही विधिमंडळाने एकमताने संमत केलेल्या ठरावाच्या अमलबजावणीहुन वेगळी होतीच कुठे?
शिवाय, एखाद्या गोष्टीचा विस्तार जेव्हा केला जातो, तेव्हा टाकली जाणारी ‘भर’ किंवा दिली जाणारी ‘ जोड’ ही त्या गोष्टींच्या ‘पुढे’ केली जात असते। आधी नव्हे। त्यामुळे शरद पवार यांनी केलेला मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार म्हणजे त्या विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या विधिमंडळाच्या ठरावाची अमलबजावणी आहे। त्यात कुठलाही उणेपणा नाही। नामविस्तारावरही नाके मुरडलेल्या आणि शुद्ध नामांतरवाद्यांचा आव आणत त्या लढ्याला प्रारंभीच्या काळात फाटे फोडणाऱ्यांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे.