‘Let’s break the wheel!’ , -वंचित बहुजन आघाडी नवी ताकत नवी उमेद

राजकारण समजायला, त्यातल्या खाचाखोचा उमजायला माझ्यासारख्या युवकांना तशी बरीच वर्षे लागली. त्यातल्या त्यात कळायला लागल्यापासून महाराष्ट्राचं राजकारण हे काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपी आणि शिवसेना एवढ्या चार स्पोक असणाऱ्या एका चाकातच कित्येक वर्षे फिरत राहिलेलं. सत्तेचा व्यास वेग गतीमानता हे सर्व ह्या चार पक्षातच फिरत राहिलं. ह्यांना टाळून कुठलं वेगळं राजकारण उभं राहू शकतं हे मला कुणी दहा वर्षांपूर्वी सांगितलं असतं तर विश्वास बसलाच नसता. गेल्या वर्ष-दोन वर्षात मात्र हे चित्र झपाट्याने बदलत चाललंय. त्याला कारण आहे वंचित बहुजन आघाडीचा उदय.

महाराष्ट्रातील माध्यमांच्या राजकीय चौकटीत दलितांचे वंचितांचे स्वतंत्र राजकीय भावविश्व कायमच अस्पृश्य मानले गेले. ह्या समाजाची मतं म्हणजे धर्मनिरपेक्ष मतं एवढ्यावरच त्याची कायम बोळवण केली गेली. आज जो वंचित बहुजन आघाडीचा स्वतंत्र हुंकार दिसतो तेव्हा त्याबद्दल बहुतांश माध्यमात जो ‘धर्मनिरपेक्ष मतं फुटली जातील’ वगैरे तिरस्काराचा सूर उमटतो तो सूर खरं तर मतं फुटली जातील ह्या चिंतेचा कमी असतो आणि हेटाळणीचा अधिक असतो. कारण धर्मनिरपेक्ष मतांवर मालकी सांगण्याचा हक्क प्रस्थापित पक्षांना कुणीही दिलेला नाही.

कोणतेही पूर्वाश्रमीचे आर्थिक राजकीय पाठबळ नसताना एक प्रचंड मोठा समूह – जो आतापर्यंत वर नमूद केलेल्या प्रस्थापित राजकीय चाकाच्या चार स्पोकमध्येच आपल्या अस्तित्वाची लाईन कायमच शरणार्थी लावत असे, तो समूह आज राजकारणाच्या पारंपारिक चाकाला, त्याच्या मनमानी वेगाला मोडून त्याचा मार्ग आणि वेग अधिकाधिक मानवताकेंद्री करू पाहत आहे. नव्या मार्गाची प्रामाणिकपणे चाचपणी आणि उभारणी करू पाहत आहे. ह्या विलक्षण प्रक्रियेला निव्वळ धर्मनिरपेक्ष मतांची फूट म्हणून मोडीत काढण्याचा सरंजामीपणा करणाऱ्यांची कीव करावी तितकी कमी आहे. प्रस्थापित पुरोगाम्यांना आणि त्यांच्या थियरींमधल्या गृहीतकांना अभिप्रेत असलेलं धर्मनिरपेक्षतेचं ओझं ह्या वंचित समूहांनी स्वतःचे हक्क, न्याय, प्रतिनिधित्व पणाला लावून उचलायची गरज नाही हे आज ठळक होत आहे.

स्व:हक्कांची जाणीव, न्याय्य प्रतिनिधीत्व मिळण्याची आकांक्षा आणि त्या प्रतिनिधीत्वाची सर्वंकष अकाउंटेबिलिटी, समाजाच्या समस्यांची पडताळणी, भूतकाळाचा लेखाजोखा आणि समाजाची वर्तमानातली आर्थिक सामाजिक शैक्षणिक स्थिती…कुठल्याही समाजात राजकीय भावविश्वाची उभारणी करताना इतक्या साऱ्या पैलूंची घुसळणी होणं आवश्यक ठरतं. वंचित बहुजन आघाडीने वेळोवेळी ह्याबाबत ठोस मांडणी करून आपण राजकारणातले नवे गतीमार्ग उभारण्यास सक्षम आहोत हे दाखवून दिलेले आहे. नुसत्या अस्मितेवर वा निवळ पूर्वीच्या अत्याचारांच्या मालिकांचा फक्त आणि फक्त बदला घ्यायचा म्हणून उभे केलेले हे निवळ उपद्रवी राजकारण नसून ते समग्र समाजाची ठोस आधुनिक मूल्ये समता समानता बंधुत्व स्वातंत्र्य वृद्धिंगत करणारी जडणघडण घडावी म्हणून उभे झालेले स्वयंस्फूर्त आणि सम्यक राजकारण आहे.

पूर्वापार नाडल्या गेलेल्या बहुसंख्य वंचित समाजाला सत्तेतला वाटा म्हणून दोनचार आमदार एखादा खासदार किंवा फारफार तर एखादं महामंडळ,एखादी शासकीय योजना, एखादी उच्चस्तरीय कार्यकारिणी ह्यांच्या अध्यक्षपदापलीकडे, किंवा फक्त आणि फक्त सामाजिक न्याय मंत्री वा आदिवासी विकास महामंडळच्या लाल दिव्याच्या पलिकडे हिस्सा देण्याची दानत आजवर कुणातही दिसलेली नाही. वंचित बहुजन समाजाच्या राजकीय इच्छा आकांक्षा ह्या तोंडाला नुसती पानं पुसणाऱ्या पदांच्या पलीकडच्या आहेत. महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून शिक्षण, पर्यावरण, अर्थकारण, संरक्षण ह्या क्षेत्रांच्या पॉलिसी मेकिंगमध्ये कायमच वंचित बहुजनांना अक्षरश: डावलण्यात आले. आजची स्थिती अशीय कि कुठल्याही तीस चाळीस पन्नास दीडशे वर्षाच्या पक्षापेक्षा वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा सर्वात जास्त चर्चीला जातोय. राज्याच्या पॉलिसीमेकिंग साठी प्रचंड मागर्दर्शक
ठरावा असा हा जाहीरनामा आहे.
कज
आजवर काँग्रेस राष्ट्रवादी भाजपा शिवसेना ह्या चार स्पोक्सच्या चार चाकांवर खड्ड्यात चाललेला महाराष्ट्राचा गाडा सावरायला, रुळावर आणायला वंचित बहुजन आघाडीचं अस्तित्व आणि आवाज आज, उद्या आणि येत्या भविष्यातही बुलंद होत राहील ह्यात मलातरी शंका वाटत नाही.
गेम ऑफ थ्रोन्स मध्ये एक लाईन आहे ‘Let’s break the wheel!’ , महाराष्ट्राच्या राजकारणाच्या गाड्याला खरी दिशा देण्यासाठी हे पारंपारिक गंजेलेलं चाक मोडण्याचं आणि त्याजागी नवं चाक बसवून नवा मार्ग धुंडाळण्याचं काम सकारात्मक अर्थाने ज्या पक्षाने कोणतीही पूर्वसत्ता हाताशी नसताना केलं असेल तर तो आहे वंचित बहुजन आघाडी! Let’s break the wheel!!
-मयुर लंकेश्वर
by Mayur Lankeshwar

#MaharashtraWithVBA

Next Post

भीम परतून आल्यासारखं वाटतंय.'-आमदार कपिल पाटील

शुक्र ऑक्टोबर 18 , 2019
शिक्षक भरतीचे आमदार आद कपिल पाटील म्हणतात- भीम परतून आल्यासारखं वाटतंय.’ वंचित बहुजन आघाडीच्या नव्या प्रयोगात आंबेडकरांनी महाराष्ट्रातील दलितेतर सत्ता वंचित छोट्या छोट्या बहुजन घटकांना एकत्र केलं आहे. लोकसभा निवडणुकीतील ४१ लाख मतांमध्ये या वंचित बहुजनांचा हिस्सा नाकारता येणार नाही. महाराष्ट्रातील […]

YOU MAY LIKE ..