“देहूरोड धम्मभूमी विहार निर्माण अभियान”
डॉ.बाबासाहेबांचे स्वप्न साकार झालेच पाहिजे…धम्मभूमी विहार पुनर्निर्माण झालेच पाहिजे…..!
२५ डिसेंबर १९५४ म्हणजेच नागपूर येथील धर्मांतर धम्मदीक्षेच्या दोन वर्ष पूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देहूरोड, ता. मावळ, जि. पुणे येथे स्वतंत्र भारतातील पहिल्या बुद्धमुर्तीची स्थापना केली.”हि स्थापना करताना बाबासाहेबांनी देहूरोडच्या मंदिराचे रूपांतर भव्य बुद्धविहार व ज्ञानकेंद्रात व्हावे अशी अपेक्षा अनुयायांकडून केली होती.”
“समाज मंदिर ते ऐतिहासिक बुद्ध विहार”
गेल्या ६६ वर्षांमध्ये बाबासाहेबांचे हे स्वप्न साकार होणे दुरच परंतु विहार बांधणीच्या हक्कावरून सतत भांडणे होऊन समाजाची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली जात आहे. देहूला संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी ऊन, वारा, पाऊस व थंडीत कुडकुडत वारीला जाणाऱ्या महार बांधवांचा निवऱ्यासाठी जलसाकार भीमशाहिर हरिष चौरे, मधुकर रोकडे व सहकारी या मावळ पंचक्रोशीतील समाजबांधवांनी देहूरोड रेल्वेलाईन जवळ समाजमंदिर बांधले होते. सुरुवातीला तेथे महार संत चोखामेळाची मुर्ती बसवण्याचे ठरले होते परंतु आद. चौरे, आद. रोकडे मंडळींनी बाबासाहेबांचे मार्गदर्शन घेतले असता बाबांनी नविन भगवंतांची मूर्ती बसवण्याचे आश्वासन दिले.
“महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा सहभाग आणि त्यांच्या हस्ते बुद्ध मूर्ती ची स्थापना”
देहूरोडला बाबांनी बुद्धमूर्ती बसवली आणि देहूरोड धम्मभूमी म्हणून प्रसिद्ध झाले. ही मूर्ती ऐतिहासिक आहे कारण ब्रम्हदेशात संपन्न झालेल्या जागतिक बौध्द धम्मपरिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाबासाहेबांच्या भाषणाने प्रभावित झालेल्या ब्रम्हदेशाचे ऊनू महाराज यांनी बाबासाहेबांना पांढऱ्या रंगाच्या, अर्धमिटल्या डोळ्यांच्या दोन बुद्धमूर्ती भेट दिल्या त्यापैकी एक राजगृहात असून दुसरी मुर्ती बाबासाहेबांनी स्वहस्ते देहूरोडला २५ डिसेंबर १९५४ रोजी बसवली आणि देहूरोडची धम्मभूमी क्रांतिभूमी म्हणून प्रसिद्ध झाली.
“दोन संघटना मधील वाद अन धम्मभूमी ची उपेक्षा..!”
महापरिनिर्वाणानंतर डॉ.बाबासाहेबांच्या काही अस्थीं या ऐतिहासिक धम्मभूमिच्या परिसरात ठेऊन त्यावर एक स्तुपही बांधला आहे.सन १९६६ला हया मंदिराच्या देखरेखीसाठी “बुद्धविहार विश्वस्त समिती ” नावाची ट्रस्ट धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत झाली. कालांतराने बुद्धविहाराचे भव्य निर्माण होत नाही म्हणून जुन्या ट्रस्टींपैकी काहींनी “बुद्धीविहार कृती समिती” नावाने दुसरी संस्था धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी केली. त्यानंतर एकप्रकारे बुद्धीविहार निर्माण कामावरून स्पर्धा व वाद सुरू झाले. बुद्धीविहाराच्या विकासकामात मुख्य अडथळा हा जागेच्या हक्काचा होता कारण बुद्धविहार हे मिलिटरीच्या (संरक्षण विभाग) जागेत होते या कामी नविन स्थापन झालेल्या कृती समितीने संरक्षण विभागाकडून जागा खरेदी करून मिळवली परंतु तरीही विहाराचे काम सुरू झाले नाही. एका संस्थेने बांधकामाची तयारी केली की दुसरी संस्था न्यायालयात हरकत घेते व न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सातत्याने अपील करतात. एकप्रकारे तारीख पे तारीख मध्ये विहाराचा विकास अडकला आहे.
दरवर्षी आरोप -प्रत्यारोप करत लाखोंचा चुराडा- खोदलेले खड्डे व भग्न अवस्थेतील बुद्धविहार ,काम मात्र अपुर्ण……..!
दरवर्षी २५ डिसेंबरला विहाराच्या वर्धापणदिनी लाखों रुपयांच्या चुराड्यासह वर्धापनदिन साजरा केला जातो.२५ डिसेंबरला लाखोंच्या गर्दीने जत्रेचे स्वरूप येते. दोन्हींकडून विहार बांधणीचे दावे व एकमेकांच्या आरोप-प्रत्यारोप होतात. सगळ्याच राजकीय, सामाजिक व धार्मिक संस्थांच्या स्टेजवरून विहार बांधणीवर मोठमोठी भाषणे होतात आणि हा सालाबादचा उपक्रम अनेक वर्षांपासून सुरू आहे, परंतु क्रांतिभूमी धम्मभूमीला वंदन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना बांधकामासाठी खोदलेला प्रचंड मोठा खड्डा व पडलेल्या विहाराचे भग्नावशेष व दोन्ही संस्थेच्या भांडणांव्यतिरिक्त काहीच दिसत नाही.
“प्रेरणादायी बुद्ध विहार ,महामानवांचे स्वप्न अपुर्ण…!” “जनतेला सामाजिक कार्यकर्ते व स्थानिम आंबेडकरी जनतेचे खुले आव्हान.”
मावळ येथील राहणारे सामाजिक कार्यकर्ते मा दादासाहेब यादव यांनी या संदर्भात www.ambedkaree. com शी बोलताना आंबेडकरी जनतेला आव्हान केले ते म्हणतात “बांधवांनो बाबासाहेबांचे स्वप्न असलेल्या धम्मभूमी बुद्धविहाराची ही हेळसांड कुठपर्यंत चालु द्यायची?धम्मभूमीवर आजपर्यंत महाराष्ट्रातून अनेक लोक येऊन गेले आहेत. देहूरोड धम्मभूमी हे तमाम भिम अनुयायांचे प्रेरणास्थान आहे. आता फक्त २५ डिसेंबरला जागे होणे ही प्रवृत्ती सोडली पाहिजे. महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनतेने आता एक होऊन, ऐतिहासिक धम्मभूमीवर आपल्या मुक्तिदात्याने पाहिलेल्या स्वप्नातील भव्य विहार व ज्ञान केंद्राचे निर्माण करण्यासाठी वर्षभर पाठपुरावा केला तरच ही समस्या सुटेल व विहार निर्माणाला सुरुवात होईल.”
शासनाचा निधी उपलब्ध होऊन ही विकास झाला नाहीय.दोन संस्थांच्या स्पर्धेत ऐतिहासिक बुद्धविहाराची उपेक्षा थांबवा.
शासनाने एकदा चार करोड तसेच बाबासाहेबांच्या १२५व्या जयंतीनिमित्त ५१लाखाचा निधी मंजूर केला होता. निधी उपलब्ध होऊनही ऐतिहासिक धम्मभूमीचा विकास मात्र होऊ शकला नाही.हे चित्र बदलने आवश्यक आहे. पुणे, मावळ, देहूरोड पंचक्रोशीतील आंबेडकरी जनता विहारासाठी लागणारे पैसे धम्मदाणातुन सहज जमवु शकते परंतु संस्थांच्या ह्या स्पर्धांमध्ये वेळ वाया जात आहे.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा .दादासाहेब यादव व त्यांचे सहकारी उभारत आहेत अभियान..!
देहू रोड ऐतिहासिक धम्म भूमी च्या विकासासाठी महाराष्ट्रातून अभियानाला जोरदार सुरुवात झाली असल्याची माहिती या निमित्ताने जेष्ठ आंबेडकरी व सामाजिक कार्यकर्ते आद .दादासाहेब यादव व सामाजिक कार्यकर्ते सचिन भावर यांनी www.ambedkaree.com शी संवाद साधताना सांगितले की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका, शहर, गाव व खेड्यापाड्यातुन देहूरोड धम्मभूमी बुद्धविहार बांधकामासाठी आग्रह धरणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र स्तरावर “देहूरोड धम्मभूमी बुद्धविहार निर्माण अभियान” सुरू झाले आहे.
महाराष्ट्र राज्यातील तमाम आंबेडकरी अनुयायानी देखील आपल्या जिल्हा तालुका स्तरावर ह्या मागणीसाठी प्रचार प्रसार करवा म्हणजे लवकरच आपल्याला देहूरोड धम्मभूमीवर बाबासाहेबांनी पाहिलेल्या भव्य बुद्धविहार व ज्ञानकेंद्राचे स्वप्न साकार झालेले पहावयास मिळेल. ह्या अभियानात विविध आंबेडकरी पक्ष, संघटना व संस्थांतील बौद्धांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व बंधु भगिनींनी सहभागी व्हावे” असे आवाहन करण्यात येत आहे.