८ मार्च
जागतिक महिला दिन नुकताच जागतिक मोठ्या उत्साहात साजरा झाला पण खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांना स्वतंत्र बहाल करणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांविषयी ची माहिती देणारा अड मुकेश शहारे यांचा अभ्यासपूर्ण लेख-
स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून बाबासाहेबांची इच्छा होती कि तमाम स्त्रियांना या जाचक रूढी आणि परंपरा मधून मुक्त करावे आणि ते आपले कर्तव्य आहे असे समजून त्यांनी हिंदू कोड बिल बनवायला घेतले.
१९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस बाबासाहेबांनी अविरत कष्ट करून हिंदू कोड बिल तयार केले होते.
२४ फेब्रुवारी १९४९ रोजी संसदेत मांडले.
स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पाहिले. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक खालीलप्रमाणे-
१. जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या (स्त्री आणि पुरुष दोघांच्याही) मालमत्तेच्या हक्कांबाबत.
२. मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार
३. पोटगी
४. विवाह
५ . घटस्फोट
६. दत्तकविधान
७. अज्ञानत्व व पालकत्व.
हिंदू कोड बील लोकसभेत मंजूर झाले नाही म्हणून डॉ. बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदावर लाथ मारून राजीनामा पंतप्रधान नेहरुंच्या तोंडावर फेकल्याचे भारतातील एकमेव उदाहरण आहे. त्याचवेळी हे विधेयक पास झाले असते तर आज भारत आज जगात महासत्ता म्हणून राहिला असता. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीय महिलांवर जे उपकाराचे कर्ज केले आहे त्याचे व्याज मरेपर्यंत न फिटणारे आहे. याची जाणीव खरचं किती महिलांना आहे ?? हेच मोठ गुढ आहे.
पण बाबासाहेबांचे कष्ट निरर्थक ठरले नाहीत. ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला. हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चारही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे म्हणजे-
१) हिंदू विवाह कायदा.
२) हिंदू वारसाहक्क कायदा
३) हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा
४) हिंदू दत्तक व पोटगी कायदा.
हे कायदे मंजूर होणे म्हणजे कायद्याच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होय. या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली.
ब्राह्मणी साहित्यात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला आहे तसेच सती ची चाल , बाल विवाह आणि विधवा विवाह सारख्या प्रथा अतिशय चलाखीने बनउन स्त्रियांना संपत्ती मधून हद्दपार केले होते या बाबतचे काही पुरावे खाली देत आहे (संदर्भासह)-
१) अथर्व वेद – ६/११/३-
हे परमेश्वरा तू हा गर्भ बनवला आहेस, त्यातून मुलाचा जन्म होऊदे, स्त्री काय कुठेही जन्माला येईल.
२) अथर्व वेद – २/३/२३
हे वरा तू पुरुष जन्माला घाल.
३) शतपथ पुरण-
मुलाला जन्म देऊ न शकणारी स्त्री दुर्दैवी असते
४) रीग वेद- ८/३३/१७-
इंद्र म्हणाला : स्त्रियांना उपजतच कमी बुद्धिमता असते , ती ज्ञान ग्रहण करू शकत नाही
५) रीग वेद – १०/९५/१५-
स्त्रियांसोबत मैत्री करू नका त्यांचे हृदय तरस (लाकड्बाग्घा / hyena ) पेक्षा क्रूर / कपटी असते
६) यजुर वेद — ६/५/८/२-
(तैतरीय संहिता )
स्त्रियांमध्ये कार्य शक्ती नसते म्हणून त्यांना संपत्ती मध्ये हिस्सा देऊ नये
७) शतपथ पुरण – (यजुर्वेदाचे प्रवचन )-
स्त्रिया / शुद्र / कुत्रा / कावळा हे सारखेच आहेत, त्यांच्यामध्ये असत्य, पाप आणि अज्ञान वाढत असते
८) मनुस्मृती – त्रिष्णा ९/९३-
कुठल्याही धार्मिक परंपरेतील समस्या असतील तर २४-३० वयोगटातील पुरुषाने ८-१२ वर्षाच्या मुलीशी लग्न करावे
९) मनुस्मृती- अति कार्माय ९/७७-
बेकार (काम धंदा नसलेला /lethargic), नशाबाज, आणि रोगी नवऱ्याची आज्ञा जी स्त्री मानणार नाही तिला ३ महिन्यासाठी जंगलात सोडून द्यावे आणि तिचे दागिने काढून घ्यावे
१०) मनुस्मृती- अशीला काम्व्रतो — ५/१५७-
नवरा विकृत, बाहेख्याली, अनैतिक असला तरी पत्नी ने त्याची पूजा आणि सेवा करावी.
(काही उदाहरणे इतके विक्षिप्त आहेत कि इथे देऊ शकत नाही.)
प्राचिन भारतातील मनुस्मृतीचे कायदे व प्रथा स्त्रियांसाठी कसे जाचक होते व हे अन्यायी कायदे फुले-आंबेडकरांनी कसे बदलविले ते पुढिल आलेखावरुन दिसून येईल.
१. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-१८ व २-२६ नुसार स्त्रियांना वेदाभ्यास व विद्या संपादन करण्याचा अधिकार नाकारण्यात आला. एवढेच नव्हे तर आपस्तंभ धर्मसुत्र ६-११ नुसार एखादा विद्यार्थी वेद वाचत असतांना स्त्री समोर आली असेल तर त्याने वेद वाचणे थांबवावे असे लिहीले आहे.
महात्मा फुलेंनी १ जानेवारी १८४८ रोजी मुलींसाठी देशात पुण्यात पहिली शाळा काढून स्त्रियांसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. सावित्रीबाई फुले ह्या प्रथम शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्यात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या कलम २९ नुसार प्रत्येक स्त्रीस शिक्षणाचा मुलभूत अधिकार बहाल केला.
२. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-३ नुसार स्त्रीचे स्वातंत्र्य नाकारुन ती स्वातंत्र्यास लायक नाही असे सांगितले.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम १४ नुसार देशातील सर्व स्त्री पुरुषास कायद्याने समान ठरविले व तिला स्वातंत्र्य उपभोगण्याचे समान हक्क दिले. एवढेच नव्हे तर घटनेच्या कलम ३१ (घ) नुसार स्त्री आणि पुरुषास असे दोघानांही समान कामाबद्दल समान वेतनाचा अधिकार दिला.
३. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-३ नुसार पतीला पत्नीची विक्री करण्याची मुभा देण्यात आले. याचे उदाहरण म्हणजे महाभारतातील द्रोपदीला जुगारात हरण्याचे आहे.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम २३(१) नुसार स्त्री-पुरुषांचा व्यापार व विक्री करण्यास मनाई केली आहे.
४. मनुस्मृतील श्लोक क्रमांक २-६६ नुसार स्त्री ही अमंगल ठरविण्यात आले असून तिला धार्मिक विधी अथवा मंत्र म्हणता येत नाही. मनुस्मृतील श्लोक क्रमांक १६-३६-३७ नुसार ती जर मंत्र म्हणत असेल तर नरकात जाते.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम २५ नुसार धर्म स्वातंत्र्याचा व धार्मिक विधीत सहभागी होण्याचा स्त्री-पुरुषांना समान अधिकार आहे.
५. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ५-१४८ नुसार स्त्रीला नवर्यापासून घटस्फोट घेण्यास मनाई केली आहे. नवरा कसाही असला तरी तिने नवर्यासोबतच राहावे असे तिच्यावर बंधन टाकले. पुरुषावर मात्र असे कोणतेही बंधन टाकले नाही.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम ६ अनुसूची ३ (झ) नुसार नवरा जर अन्यायी असेल तर त्याच्या जाचापासून मुक्त होण्यासाठी घटस्फोट घेण्याचा अधिकार दिला आहे.
६. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-४१६ नुसार पत्नीला कुटुंबाच्या संपत्तीत हक्क नाही. तिने जरी स्वकष्टाने संपत्ती मिळवली असली तरीही त्यात तिचा हक्क नाही.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम ३०० (क) नुसार स्त्री किंवा पुरुषाला संपत्तीच्या हक्कापासून वंचित करता येत नाही. तसेच बाबासाहेबांनी मांडलेल्या हिंदु कोड बिलाच्या आधारावर जो कायदा तयार करण्यात आला, त्यानूसार स्त्रिला कुटुंबाच्या संपत्तीत समान हक्क देण्यात आला आहे.
७. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ८-२९९ नुसार स्त्रिला जबर शिक्षा म्हणून मारण्याचा पतीला हक्क देण्यात आला. तसेच श्लोक क्रमांक ११-६७ नुसार स्त्री हत्त्या झाली असेल तर मद्यपानाच्या अपराधाएवढा क्षुल्लक गुन्हा ठरविण्यात आला. एवढेच नव्हे तर, तुलशीदास यांनी रामचरित मानस मध्ये म्हटले आहे की, ‘ढोल गवॉर शुद्र पशु नारी, सब ताडन के आधिकारी।’
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या अनुसुची ७ क्रमांक ३ (१)(२) नुसार स्त्रिला मारहान करणे व स्त्रीची हत्या करणे फौजदारी गुन्हा ठरविण्यात आला आहे.
याशिवाय स्त्रिला त्रास होवू नये म्हणून इंडियन माईन्स ऎक्ट १९४६ ची निर्मिती करुन स्त्री कामगारांना खाणीत जमिनीच्या आंत काम करण्यास व रात्रपाळीस बंदी घातली. तसेच माईन्स मॅटर्निटी बेनेफिट ऎक्ट तयार करुन स्त्रियांना बाळंतपणाची रजा देण्याची शिफारस केली. पुढे घटनेने हा कायदा देशातील सर्व स्त्रियांसाठी लागू केला.
त्याच प्रमाणे घटनेच्या कलम ४२ नुसार गर्भवती व बाळंत स्त्रियांसाठी कामाच्या ठिकाणी सोयी व सुरक्षित व्यवस्था देण्यात यावी असे बंधन मालकावर टाकण्यात आले.
८. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ५-१४७ नुसार कुटुंबातील कोणत्याही स्त्रिला व्यवहाराबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नाकारला.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम १४ नुसार स्त्री किंवा पुरुषाला समान अधिकार असल्यामुळे स्त्रिला व्यवहाराबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे.
एवढेच नव्हे तर घटनेच्या कलम ३९ (क) नुसार उपजिविकेचे पर्याप्त साधन मिळविण्याचा अधिकार दिला.
तसेच घटनेच्या कलम ३२५ नुसार बाबासाहेबांनी पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही लोकशाही प्रक्रियेत भाग घेण्यासाठी मतदानाचा अधिकार दिला. या महत्वपुर्ण अधिकारांमुळे लोकशाहीतील सर्वश्रेष्ट असं शस्त्र स्त्रियांच्या हातात देवून व त्यांना सत्तेत सहभागी होण्याचा मार्ग सुकर करुन .बाबासाहेबांनी स्त्रियांवर अनंत उपकार केले आहे.
९. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९.१६ नुसार स्त्रीच्या बाबतीत असे म्हटले की परमेश्वराने जन्मताच तिच्यात अत्यंत विघातक दुर्गुण घातले आहेत. श्रीकृष्णाने भगवतगिता श्लोक क्रमांक ९.३२ नुसार स्त्रियांना पापयोनी म्हटले आहे.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या अनुसुची ७ क्रमांक ३ (१)(२) नुसार स्त्रियांची मानहानी करणे व कलम १४ नुसार लिंगभेद करण्यास मनाई केली आहे. तसेच घटनेच्या कलम ३९ (क) नुसार कायद्याने न्याय देतांना स्त्री पुरुष असा लिंगभेद करता येत नाही.
१०. विधवा स्त्रिचे केशवपन करणे, बालविवाह करणे, विधवा पुनर्विवाहास बंदी करणे, स्त्रिला सती जाण्यास प्रवृत्व करणे, होळीच्या दिवशी नग्न नाचविणे ( मध्यप्रदेशात होळीच्या दिवशी शुद्र स्त्रीला नग्न नाचविण्याची प्रथा आहे.) इत्यादी स्त्रियांना हिनत्व आणणार्या कुप्रथा स्त्रियांवर हिंदूधर्माने लादल्या.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम ५१ (ड) नुसार स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहचविणार्या सर्व सामाजिक व धार्मिक कुप्रथा व अनिष्ट परंपरांवर बंदी आणली.
हिंदु धर्मातील ब्राम्हणी व्यवस्थेतील मनुच्या कायद्याने व इतर धर्मग्रंथाने स्त्रियांना व बहुजन समाजाला गुलाम केले. म्हणूनच महात्मा फुल्यांनी, ‘मनुस्मृती जाळली पाहिजे’ असे जळजळीत उद्गार काढले होते. बाबासाहेबांनी आपल्या गुरुची आज्ञा समजून प्रत्यक्षात दिनांक २५ डिसेंबर १९२७ रोजी हा काळा कायदा जाळला. ते मनुस्मृती जाळून थांबले नाहीत तर त्या ठिकाणी समता, स्वातंत्र, बंधुत्व व न्यायावर आधारित भारतीय घटना २५ नोव्हेंबर १९४९ रोजी राष्ट्राला अर्पन करुन तिची अंमलबजावनी दिनांक २६ जानेवारी १९५० पासून सुरु झाली.
आज फुले-आंबेडकर यांच्या महान कर्तृत्वामुळेच भारतीय स्त्री देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती सारख्या सर्वोच्च पदावर विराजमान होत आहेत.
तेव्हा भारतीय स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे द्वार उघडून देणार्या या महामानवा समोर समस्त स्त्रियांनी कृतज्ञतेने नतमस्तक व्हायला पाहिजे.
-ॲड. मुकेश बी. शहारे