जेष्ठ पत्रकार मा गुणाजी काजीर्डेकर यांचा हा
प्रस्तुत लेख हा विश्वपथ दैनिकात प्रकाशित झाला आहे.
प्रस्तुत लेखात मांडलेले विचार याच्या शी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही कारण माने यांचा विषयावर आता मत मांडून त्यांना जास्तीतजास्त महत्त्व देण्यासारखे होते त्यांच्या सोबत दुसरा कोणताच नेता नाहीय.दुसरा मुद्दा हा की काहीच नसलेल्या पक्षाला 40 लाख मतदारांनी स्वीकारले याचा अर्थ 30 % मतदारांनी वंचित आघाडीला स्वीकारले किंवा ते त्यांच्या बरोबर आहेत हा सकारात्मक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे .प्रस्तुत लेख आम्ही www.ambedkaree.com वर जशा आहे तसा प्रकाशित करीत आहोत.
सध्या वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात सर्व राजकीय आणि सामाजिक पातळीवर बरीच उलथा पालथं केली आहे.आदरणीय अड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील राजकारणात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर चळवळीत व चळवळीच्या बाहेर स्वागत आणि विरोध बऱ्याच मोठ्या प्रमाणात व्यक्त होतो व समाजात त्याच्या प्रतिक्रिया ही उमटत असतात.
कधी नव्हते ते आंबेडकरी राजकारण आता केंद्र बिंदू ठरू पाहत आहे.मात्र हे घडत असताना समाजातील,चळवळीतील लोक,विचारवंत,राजकीय पक्षातील पुढारी यांच्या समवेत चळवळीतील लोक आणि चळवळीतील बाहेरचे लोक असे बरेच लोक अड. आंबेडकरांना सल्ले देत असतात.
जेष्ठ पत्रकार मा गुणाजी काजीर्डेकर यांनी ही मांडलेले विचार आम्ही प्रकाशित करत आहोत.आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात .
राजकारणात ‘स्व’मताला थारा नाही
अहंकाराने भूमिकांना वाळवी लागते.
– गुणाजी काजीर्डेकर
वंचित आघाडीचे नेते व मार्गदर्शक अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर ते धरसोडीचे राजकारण करीत असल्याचा आरोप होत आहे. ‘वंचित’ नेते ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी मागील आठवड्यात केलेल्या आरोपात अॅड. बाळासाहेब आंबेडकर आम्हाला निर्णयप्रक्रियेत घेत नाहीत. तेच निर्णय घेतात आणि तेच सारे ठरवतात असा आरोप केला आहे. अर्थात या आरोपाची पार्श्वभूमीही त्यांनी सांगितली असून, राष्ट्रीय स्वयंसेवेक संघातून आलेले पडळकर यांना महाराष्ट्राचे सरचिटणीस पद का दिले?
वंचितमध्ये आधीपासून कार्यरत असलेल्यांवर हा अन्याय असल्याचा आक्षेप लक्ष्मण माने यांनी केला असून, आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी जाहीर केले. अॅड. बाळासाहेब आंबेडकर मनमानी करतात हे फक्त लक्ष्मण माने यांनाच कसे खटकले? संघटनेत अन्य जबाबदार पदाधिकारी नाहीत का? की, त्यांच्यावर तोंड न उघण्याविषयी दबाव आहे? पक्ष असो अथवा संघटना.. काही गोष्टी अंतर्गतच सोडवायच्या असतात हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माहित असायला हवे. सारेच सोडून भोंगळे होण्याने प्रश्न सुटत नाहीत.उलट उरली सुरलेली चव्हाट्यावर येते.
अॅड. बाळासाहेबांना या गोष्टी सांगण्याची गरज नाही. ते विद्वान आहेत हे स्वयं लक्ष्मण मानेच कबुल करतात. ते सांगतील त्या मार्गाने आम्ही जावयास तयार आहोत असेही म्हणतात मग बाळासाहेब मनमानी करतात असेही सांगायचे हे मखलाशीचे राजकारण सोडून द्यायला हवे. तुमचे अंतर्गत भांडण जे काही असेल त्याचा इश्यु केल्याने या संघटनेला मानणार्यांवर होत असतो याचे भान संबंधितांनी ठेवणे गरजेचे आहे. 17 व्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात सुमारे 30 टक्के जनतेने मतदानाच्या स्वरूपात पाठिंबा दिला. 40 लाखांपेक्षाही अधिक मते मिळाली याचा अर्थ 70 टक्के लोकांपर्यंत ‘वंचित’ आघाडीला अभिप्रेत असलेला विचार पोहचलेला नाही असा अर्थ होतो.
पहिल्याच प्रयत्नात 40 लाखांपर्यत मते मिळविणार्या ‘वंचित आघाडी’मध्ये पिछाडीचे राजकारण सुरू व्हावे हे कशाचे लक्षण म्हणायचे? राजकारणात लागेबांधे हा प्रकार असला की, त्याची लागण सुरू होते हे वास्तव आम्ही नजरेस आणून देत आहोत.
अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी येणार्या विधानसभेच्या 288 जागा ‘वंचित आघाडी’ लढविणार असल्याची घोषणा करताच ‘वंचित’ राजकारणात अंतर्गत लाथाळ्यांचे प्रकार सुरू झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. लक्ष्मण मानेंनी केलेल्या आरोपाचा विचार करता, लोकसभेत काँग्रेसला जागा दाखविण्यासाठी ‘वंचित आघाडी’ने मोठा जुगार खेळला हे अॅड. बाळासाहेबांनीच जाहीर केले आहे.
काँग्रेसने बहुजनवाद्यांचा केवळ वापर केला हे मानेंनाही बर्यापैकी माहित असताना, 288 जागा लढविण्याची अॅड. बाळासाहेब आंबेडकरांची स्वतःची असू शकते? पक्षांतर्गत विचारविनिमिय झाला नसेल का? अॅड. बाळासाहेबांनी याचा खुलासा का केला पाहिजे. याचे कारण लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मस्तावाल राजकारणाची नशा उतरविणे हाच एकमेव उद्देश होता तोतडीस गेला असून, आजही काँगे्रंसवाल्यांचे चेहरे कसे बघण्यासारखे असतात याबाबतचे चित्र आपल्यासमोर आहे. काँग्रेसवाल्यांना त्यांच्या मर्यादा कळून चुकल्या असून, मागील 67 वर्षात ( युती सरकारचा कालखंड वगळता) काँग्र्रेसचा महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव होता.
सहा दशकं म्हणजे पाच पिढ्यांनी हा सत्ताबदल अनुभवला असून, बहुजनवादी काँग्रेसच्या बाजूने उभे राहिले. 1964 पासून सुरू झालेला मागासवर्गीयांवरील अन्याय अत्याचार नगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी बलात्काराच्या घटनेपर्यंतचा धांडोळा काँगे्रंसवाल्यांनी डोळ्याखालून घालावा. काँग्रेसमध्ये अनुकरा जेवढ्या जलदगतीने होते तेवढे अअवलोकन होत नाही. अवलोकनात विचारप्रक्रियेशी संबंध असतो. सामाजिक हिताचा संबंध कशाशी जोडावा हे काँग्रेसवाल्यांना कधीच कळले नाही.
मागासवर्गीय घटकातील कार्यकर्त्याने यावर आवाज उठविण्याचा प्रयत्न केला की, एखादे पद देऊन तोंड बंद करण्याचे प्रकार अनेकदा झाले आहेत. गंमत अशी की, ज्यांनी ही पदे घेतली त्यांना तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा विसर पडला. पदाच्यारूपाने ते लोभ,मोहादी विकारांना कधी बळी पडले ते त्यांचे त्यांनाच कळले नाही. अर्थात सत्तेच्या जोरावर मनमानी राजकारण करून लोकशाही आणि संविधानाला अभिप्रेत असलेल्या भूमिकांवर आधारित राजकारणाला फाटा देण्याचे काम झाले, जे कालपर्यंत म्हणजे 2014 पर्यंत अव्याहतपणे सुरूच राहिले. बहुजनवादी हा काँग्रेसचा प्राण आहे.मागासवर्गीयांतील या घटकांनी काँंग्रेसला एवढे मोठे केले की, सत्तेच्या कैफात या पक्षाला कर्तव्याचे भान राहिले नाही. मंडल प्रश्नासारखा एखाद दुसरा अपवाद सोडला तर बहुजनवाद्यांची मोट बांधण्याचे काम काँग्रेसने केले असते तर आज या पक्षाला इतरांचा पाठिंबा घेण्याची वेळ आली नसती. मंडल प्रश्नी जे आक्षेप घेण्यात आले त्यामागे बोलविते धनी कोण होते.
आम्ही ही चर्चा करताना केवळ बहुजनवाद्यांच्या उत्थापन हाच एकमेव मुद्दा अपेक्षित असून, काँग्रेसने महामानवांच्या नावाचा बेमालूम वापर करताना धर्मप्रामाण्यवादी भूमिकांना बढावा देण्याचे काम केले. धर्माच्या आधारावर विषवल्ली वाढविण्याचे काम होत गेले. ही वेल तेव्हाच तोडली असती, तर या पक्षाचे नेते राहुल गांधींवर 17 व्या लोकसभेच्या निवडणुकीत संघ-भाजपविरोधात एकट्याने लढण्याची वेळ आली नसती. देशभरात फक्त दोनच नेते संघाविरोधात बोलत होते. राष्ट्रीय स्तरावर राहुल गांधी आणि महाराष्ट्रात फक्त अॅड. बाळासाहेब आंबेडकर! आम्ही याआधीही मत व्यक्त केले आज त्याचा पुर्नरूच्चार करीत आहोत.
मागासवर्गीयांच्या अधिकारांना देण्यात आलेली बगल. त्यांना वेळोवेळी बेदखल करण्यात आले. त्यांचे जमिनीच्या सातबाराच्या उतार्यांचे प्रकरण, सावकारांचा जाच, जमिन गहाण ठेवून घ्यायची आणि कागदपत्रात चक्क शेतकर्याने जमिन विकली अशी अनेक प्रकरणे 2007 ते 2013 या काळात घडली. पण सामान्य शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कधीच ‘इंटरेस्ट’ दाखविला नाही. त्यांचा सारा वेळ भ्रष्टाचारी मार्गाने खिसा कसा भरता येईल याकडे कल राहिला. अशी अनेक कारणे सांगता येतील की, ‘वंचित आघाडी’ निर्माण करण्यास कारण ठरली.
‘वंचित आघाडी’ने महाराष्ट्रात स्वतःचा ठसा उमटविला आहे यांत शंका नाही. तथापि हा ठसा वरवरचा आहे. ‘वंचित आघाडी’ ही प्रस्थापित राजकारणाला फाटा देत महामानवांना, सुधारकांना अभिप्रेत असलेल्या विचारावर उभी असलेली संघटना असून, जे प्रवाहाच्या काठावर असूनही त्यांना अधिकाराचा साधा स्पर्शही झाला नाही अशा घटकांना सामाजिक न्याय व अधिकार मिळवून देणे हा ‘वंचित आघाडी’च्या राजकारणाचा अजेंडा आहे. परंतु हा अजेंडाही आता अविश्वसनीय ठरू पाहत आहे. पक्षांतच आरोप-प्रत्यारोप होत असून, भूमिकांना छेद दिल्यावर ‘वंचित आघाडी’कडे वळलेला बहुजनवादी कसा विश्वास ठेवेल? ‘वंचित आघाडी’ने 288 जागा लढविण्याच्या केलेल्या घोषणेने हुरळून जाण्याची गरज नाही. जो प्रकार लोकसभेच्या निवडणुुकीत झाला त्याची पुनरावृत्ती झाल्यास रिकामटेकड्यांचे निरर्थक उद्योग यापलिकडे फारसे महत्व वंचित राजकारणाला राहणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत वंंचित उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी आपल्या समोर असल्याने त्यांच्या मर्यादा स्पष्ट होत जातात. काँग्रेसला विरोधासाठी विरोध हे लोकसभेपुरते ठीक होेते. परंतु आता त्या पक्षात ‘वंचित आघाडी’शी समझोता करायचा की नाही याच्या हालचाली सुरू असल्याने, आता पासूनच ‘वंचित आघाडी’ने आपल्याला अपेक्षित असलेल्या जागांवर ठाम राहायला हवे. दुसरे म्हणजे कालपर्यंत मतांसाठी आघाडी करायची आणि मागासवर्गीयांच्या उमेदवारांना जाणिवपूर्वक पाडायचे ही कुटनीती येथून पुढे चालणार नाही असे ठणकावून सांगायला हवे. तसे झाल्यास ‘वंचित आघाडी’कडे वळलेल्या बहुजनवाद्यांमध्ये नेतृत्वाविषयी असलेला विश्वास अधिक वाढत जाईल, आणि उर्वरित बहुजनही प्रवाहाच्या दिशेने वळविता येईल.
आश्वासनांवर राजकीय समीकरणे टिकवता येतात ते दिवस केव्हाच संपले असून, आता विश्वासाला कृतीची जोड असेल तरच लोकांमध्ये आदराची भावना निर्माण होते. या भावनेला लाथाळ्यांचा प्रसाद देऊन, भूमिका गोठविण्याचे काम होत असेल तर एक दिवस तिला वाळवी लागल्याशिवाय राहणार नाही. ‘वंचित आघाडी’मधील नेत्यानी अगदी अॅड. बाळासाहेब आंबेडकरासहीत सर्वानीच अहंकार सोडा आणि बहुजनांच्या उत्थापनासाठी भूमिकांना मुरड घाला. राजकारणात मुत्सुद्दीपणा असेल तरच टिकाव लागतो. ते भावनिक होता कामा नये. ‘वंचित आघाडी’ आघाडीतील नेत्यांना फोडण्याचे काम आतून होत राहणार ही खुणगाठ बांधूनच पावले उचला आणि आतापासूनच प्रस्थापित राजकीय पक्षांना बगलेत आवळायला शिका.
बाळासाहेब, ‘वंचित आघाडी’मध्ये सर्वच ज्ञाती घटकांचे कार्यकर्तेे व संंघटना आहेत. त्यात ज्यांच्याहाती वस्तरा आला आहे असेही असतीलच की? त्यांना हाताशी धरून प्रस्थापितांच्या बगला साफ करता येत नसतील तर ‘वंचित आघाडी’च्या नावाने राजकारण करणे सोडून द्या अशी तमाम परिवर्तनवादी जनतेच्यावतीने आम्ही जाहीर आवाहन करीत आहोत
गुणाजी काजिर्डेकर,
9323632320