एससी, एसटी लोकप्रतिनिधींची ‘व्हीप’ मधून मुक्तता करावी;
पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी
।
मुंबई, दि 1 ऑक्टोबर: राखीव मतदारसंघातून निवडून जाणाऱ्या अनुसूचित जाती,जमातींच्या लोकप्रतिनिधींची पक्षीय ‘व्हीप’ मधून मुक्तता करण्यात यावी,अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या एका पत्रात ‘गणराज्य अधिष्ठान’ या संघटनेचे अध्यक्ष प्रा डॉ जी के डोंगरगावकर यांनी केली आहे।
उद्या देशभरात साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रपिता गांधीजी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित हे पत्र पंतप्रधानांना आज पाठवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले।
गांधीजी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक पुणे कराराची बूज राखण्यासाठी अनुसूचित जाती, जमातींना संविधानिक अधिकार म्हणून राखीव मतदारसंघ आणि शिक्षण, नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात आले आहे। मात्र पक्षीय व्हीपच्या बंधनामुळे एससी, एसटी लोकप्रतिनिधी हे आरक्षण, अत्त्याचार, अर्थसंकल्प, विकास निधी अशा प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवण्यास असमर्थ ठरत आहेत। त्यामुळे गांधीजी आणि डॉ आंबेडकर यांच्या पुणे कराराच्या उद्दिष्टांचा पराभव होत आहे, असे डॉ डोंगरगावकर यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे।
अनुसूचित जातींच्या यादीत नव्या नव्या जाती
घुसवण्याच्या सरकारी धोरणालाही ‘गणराज्य अधिष्ठान’ ने पत्रात तीव्र आक्षेप घेतला आहे। 1936 सालात अनुसूचित जाती आदेश कायदा अंमलात आणतांना अस्पृश्यतेचे दाहक चटके सोसलेल्या जातींचाच अनुसूचित जातीच्या यादीत समावेश करण्यावर कटाक्ष होता। त्याला आता फाटा देण्यात येत असल्याने सुरुवातीला 600 ते 700 च्या दरम्यान असलेल्या अनुसूचित जातींची संख्या फुगून 1200 च्यावर गेली आहे, असे डॉ डोंगरगावकर यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले आहे।
नव्या जातींच्या बेलगाम समावेशामुळे मूळच्या अस्सल अनुसूचित जातींना संविधानिक अधिकारांपासून वंचीत होण्याची वेळ आली आहे, असे सांगून याबाबत ताज्या लोकसभा निवडणुकीतील उदाहरण पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रात देण्यात आले आहे। राज्यात लोकसभेच्या 48 जागांपैकी 5 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत। त्यातील सोलापूर आणि अमरावती या दोन राखीव जागांवर नवख्या अनुसूचित जातींचे उमेदवार जिंकले आहेत,असे गणराज्य अधिष्ठानने पत्रात म्हटले आहे।
अनुसूचित जातीच्या यादीत नव्या जातींच्या करण्यात आलेल्या समावेशाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी डॉ डोंगरगावकर यांनी केली आहे.