मुंबईत कोरोना विरुद्ध युद्ध प्राणपणाने लढत आहेत महानगर पालिका कर्मचारी आणि प्रशासन …..!

मुंबई मुंबईत कोरोना विरुद्ध युद्ध प्राणपणाने लढत आहेत महानगर पालिका कर्मचारी आणि प्रशासन …..!
***************************************
गीतेश पवार-www.ambedkaree.com

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आणखी एका कामगारांचा कोविड-19 ने मृत्यू किंवा मुंबई महापालिकेच्या कामगारांना कोरोना व्हायरसची लागणं…….. ह्या हेडलाईन खाली रोज प्रिंट मिडिया आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून बातम्या समोर येत आहेत. अशा बातम्या वाजताना मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना त्याचा प्रादूर्भाव आपल्या भारतातील विविध राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सुध्दा दिसू लागला होता. देशातील विविध शहरांपैकी मुंबई ह्या शहरात कोविड-19 ने थैमान घालायला सुरुवात केली तेव्हा मनात एका प्रश्नाने काहूर माजवले होते. “मुंबई शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये आणि महापालिकेच्या मुंबईतील वसाहती मध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला तर”…… मुंबईतील महापालिका प्रशासनाला कोरोना व्हायरस लवकर आटोक्यात आणणे शक्य होईल का ॽ

मुंबई हे शहर योग्य नियोजनाअभावी चहुबाजूने वाढत गेलेले शहर. मुंबई या शहराचे नियोजन पाहणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी सुध्दा आहे आणि इतर लहान मोठ्या झोपडपट्ट्या सुध्दा येतात. ह्या सर्व झोपडपट्ट्या नियम धाब्यावर बाधून उभ्या राहिलेल्या आहेत. ह्या ठिकाणी असलेली शौचालयांची व्यवस्था सार्वजनिक स्वरुपातील आहे त्यामुळे ह्या ठिकाणी जर कोरोना व्हायरसने शिरकाव केला तर, महापालिका प्रशासनाला त्या ठिकाणची परिस्थिती आटोक्यात आणताना अधिक मेहनत ह्यावी लागणार असे विचार मनात येत होते आणि आज तेच विचार खरे होताना दिसत आहेत. मुंबई महापालिका प्रशासन आपल्याकडे असलेल्या जास्तीत जास्त कर्मचा-यांचा उपयोग कोरोना व्हायसरची लागणं झालेल्या झोपडपट्ट्यातील प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वापरत आहे. बृहन्मुंबईत तयार करण्यात आलेल्या Containment Zone, Covid care center ह्या ठिकाणी मुंबई महापालिका प्रशासन आपल्या कर्मचा-यांचा वापर करत आहे. परंतु ह्या ठिकाणी नियुक्त केलेल्या कर्मचा-यांना प्रशासन पुरेशी सुरक्षा साधने उपलब्ध करुन देण्यास कमी पडल्याने आज त्या कर्मचा-यांना सुध्दा कोविड-19 चा प्रादुर्भाव झाल्याच्या आणि काही कर्मचा-यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास येत आहे.
‘महापालिकेच्या मुंबईतील सफाई कामगारांच्या वसाहती’ मुंबई महापालिकेने आपल्या सफाई कामगारांना मुंबई मध्ये राहण्यासाठी अनेक वसाहती बांधल्या आहेत. सफाई कामगारांच्या ज्या काही वसाहती आहेत त्यापैकी अनेक वसाहतीमध्ये शौचालयांची व्यवस्था सार्वजनिक स्वरुपातील आहे आणि त्या सर्व वसाहती पुर्वीच्या चाळ संस्कृतीच्या आठवणी सांगणा-या असल्यामुळे एक कर्मचारी, एकाच वेळी चाळीतील अनेक लोकांच्या संपर्कात येत असल्यामुळे एका जरी सफाई कामगाराला कोरोना व्हायरसची लागणं झाल्यास संपुर्ण चाळ धोक्यात येण्याची शक्यता होती. सफाई कामगारांना ह्या परिस्थितीची जाणीव असताना देखील आपले कर्तव्य निभावत आहेत. आपले कर्तव्य निभावतांना हे कर्मचारी रोज अनेक लोकांच्या संपर्कात येत आहेत त्यापैकी एका तरी व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागणं झालेली असल्यास, मुंबई महापालिकेच्या कर्मचा-यांना सुध्दा कोविड-19 ची लागणं होण्याची शक्यता होती. तसेच मुंबई महापालिकेने काही सफाई कामगारांना सुरुवातीला कस्तुरबा रुग्णालयात सफाईच्या कामासाठी रोज वेगवेगळ्या विभागातून पाठविण्याचा निर्णय सुध्दा घेतला होता. त्या ठिकाणी काम करणा-या कामगारांपैकी कोणत्याही कामगारांच्या संपर्कात कोरोना व्हायरसची लागणं झालेली व्यक्ती आल्यास त्या कामगारांना सुध्दा कोविड-19 ची लागणं होण्याची शक्यता होती. परंतु त्या कर्मचा-यांची तपासणी वेळेत केलेली नाही.

मुंबई महापालिकेने काही प्रमाणात सफाई कामगारांच्या बाबतीत हलगर्जी केली म्हणावी लागेल कारण आजच्या परिस्थिती मुंबई महापालिकेच्या प्रमुख मोठ्या वसाहती मध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले कर्मचारी समोर येत आहेत. मुंबई महापालिकेने योग्य वेळी आपल्या सफाई कामगारांची आरोग्य तपासणी केली असती आणि वसाहती मध्ये राहणा-या कामगारांच्या कुटुंबाना सुरुवातीलाच योग्य उपायोजना करुन मुंबई बाहेर त्यांच्या गावी जाण्याची परवानगी दिली असती तर, मुंबई महापालिका प्रशासनाला ज्या पध्दतीने आता दोन वेगवेगळ्या आघाड्यांवर लढावे लागत आहे ते लढावे लागले नसते.

मुंबई महापालिका प्रशासनाला आता एका बाजूला आपले कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला वाचविण्यासाठी लढावे लागणार आहे तर, दुस-या बाजूला मुंबईतील सामान्य नागरिकांना वाचविण्यासाठी लढावे लागणार आहे.

मुंबई शहरात वाढत असलेल्या कोविड-19 च्या प्रादुर्भावाला मुंबई महापालिका एकटीच जबाबदार आहे असे बोलणे योग्य ठरणार नाही आणि असे कोणी बोलत असेल तर, ते कर्तव्य निभावतांना मृत्यू पावलेल्या आणि कोविड-19 ची लागणं झालेल्या महापालिकेच्या कर्मचा-यांची मेहनत वाया गेल्यात जमा असेल. मुंबईतील एक नागरीक म्हणून मला असे वाटते. मुंबईतील परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात आणायची असेल तर, मुंबई महानगरपालिकेला महाराष्ट्र शासनाने सहकार्य करणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेचे अनेक कर्मचारी कोविड-19 ची लागणं झाल्याचे समोर येत असल्याने आणि मुंबई काही कर्मचारी मुंबई हद्दी बाहेर असल्याने महापालिका प्रशासनाला कर्मचा-यांची कमतरता जाणवत आहे. तसेच जर मुंबई माहापालिकेने सर्व कर्मचा-यांना मुंबईत एकाच वेळी घेऊन आली तर ते धोक्याचे ठरु शकते परंतु जर, महाराष्ट्र शासनाचे जे कर्मचारी मुंबई मध्ये राहत आहेत त्या कर्मचा-यांना शासनाने बृहन्मुंबईत तयार करण्यात आलेल्या Containment Zone, Covid care center ह्या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचा-यांच्या सोबत दिले तर, महापालिकेवर पडणारा अतिरिक्त ताण कमी होईल. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या मदतीला महाराष्ट्र शासनाने स्वत:चे मनुष्य बळ उपलब्ध करुन देणे योग्य ठरेल आणि मुंबई लवकर सुरक्षित करणे शक्य होईल…..

(प्रस्तुत लेखक “स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन” चे
अध्यक्ष आहेत.)

Next Post

मार्क्स - सचिन माळी-सत्यशोधक

बुध मे 6 , 2020
मार्क्स,-सचिन माळी-सत्यशोधक ************************************* परवा, तुझं चरित्र वाचताना कळलं की तुझा स्वभाव कसा होता. तुझ्याशी वाद घालायला तुझा कुणी विरोधक आला की तू मंद स्मित करून बस म्हणायचा. विरोधक तावा-तावाने बोलू लागायचा. तुझं फक्त हुं…. हं… हां… हुं… हं… चालायचं. तू काहीच […]

YOU MAY LIKE ..