नुसत्या असभ्य शब्दांच्या मांडणीने कोणी विद्रोही ठरत नाही: -डॉ विठ्ठल शिंदे
ठाणे , दि 8 नोव्हेंबर ( प्रतिनिधी): नुसती असभ्य शब्दांची मांडणी केल्याने कोणी विद्रोही ठरत नाही, असे सुनावतानाच
कवितेमधील एक शब्द जरी इकडचा तिकडे झाला तरी कविता विकृती निर्माण करू शकते, असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक प्रा डॉ विठ्ठल शिंदे यांनी केले.
कसारा येथे कवी देवाभाऊ उबाळे यांच्या ‘ जळजळीत वास्तव ‘ या कविता संग्रहाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते.
या कार्यक्रमाला माजी आमदार दौलत दरोडा, कवी केशव हंडोरे, राजेश घनघाव, रविंद्र शेजवळ, अण्णा पवार,मिलिंद राज पंडित, कविता बिरारी, माया आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.
कविता लिहितांना प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतो, असे सांगून डॉ शिंदे म्हणाले की, काव्य प्रसवताना तुमच्यावर वामनदादा कर्डक, अण्णाभाऊ साठ्ये यांचा प्रभाव असला पाहिजे. कवीने वास्तव लिहीले पाहिजे. कवी जन्माला येत नसतो तर तो आपल्या परिस्थितीतुन निर्माण होतो.
देवाभाऊ उबाळे हे विज्ञाननिष्ठ कवी आहेत. त्यांची निरीक्षणशक्ती दांडगी असून अनेक ठिकाणी त्यांनी अनुभव कथन केले आहेत. आपल्या भोवतालच्या पर्यावरणातील अनेक समस्यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला आहे, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
चळवळ, नात्यातले संबंध, मासिक पाळी सारख्या समस्याच्या बाबतीत कवी उबाळे यांनी वैज्ञानिक आधार शोधले आहेत, असेही त्यांनी काव्यसंग्रहावर बोलतांना नमूद केले।