स्वामी तिन्ही जगाचा गाडीविना…..?

स्वामी तिन्ही जगाचा गाडीविना…………?
*******************

■ दिवाकर शेजवळ ■
divakarshejwal1@gmail.com
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

साधा जिल्हा परिषदेचा सदस्य असो की कुठलाही नगरसेवक, तो एसटी वा बसमधून ये जा करताना कोणाला कधी दिसतो काय? तरीही अनेक दिग्गज नेते ‘बिचारे’ गाडीविनाच असल्याचे निवडणुकांवेळी त्यांचा संपत्तीचा तपशील जाहीर होताना उघड होत असते। ते पाहून स्वतःची गाडी घेण्याची ऐपत नसलेल्या तमाम मतदारांना आपल्या शल्याचा क्षणभर का होईना विसर पडत असेल,यात शंका नाही।

गाडीशिवाय कधीच फिरताना न दिसणाऱ्या बड्या नेत्यांकडे स्वतःची गाडी नसते, हे वास्तव दस्तावेज म्हणून मान्यच करावे लागते। त्यानिमित्ताने दलित चळवळीत सर्वाधिक गाड्या वापरलेले पँथर नेते नामदेव ढसाळ यांची आज हटकून आठवण झाली। किंबहूना, सर्वात आधी वाहन हाताशी आलेले ते पहिले दलित नेते गणले गेले होते। कारण ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा सु गवई हे संसदीय राजकारणात असल्यामुळे त्यांच्याकडे गाडी आधीपासून असली तरी ती लाल दिव्याची सरकारी गाडी होती! खासगी नव्हे।

मी ‘आज दिनांक’ या सायं दैनिकात असतानाची ही गोष्ट। त्या काळात निळ्या रंगाची खेळण्यातील गाडीसारखी एक छोटेखानी स्पोर्ट्स कार नामदेव ढसाळ यांच्या हाताशी आली होती। त्यावेळी ती गाडी देशात एकमेव असल्याने ‘स्टाईल’ या हिंदी सिनेमात वापरण्यासाठी निर्मात्याने नामदेवदादांकडून नेली होती . ड्रायव्हर आणि त्याच्या शेजारी एक माणूस बसेल इतकीच जागा त्या गाडीत होती। त्या गाडीचे छप्पर खोलल्यानंतर त्या दुमडलेल्या छप्परावर अवघडल्या अवस्थेत एकाला बसता यायचे। नामदेवदादा स्वतःच ती गाडी चालवायचे। त्यांच्या शेजारी आपण बसलो की बस्स। मग त्या गाडीच्या दुमडलेल्या छप्परावर बसण्याचा प्रयत्न करणाऱ्याला ते पैसे देऊन मागाहून टॉक्सिने ये, असे सांगत पिटाळून लावायचे। अन म्हणायचे तो गोरापान इसम वरती बसला असता तर लोक त्याला गाडीचा मालक आणि मला ड्राइवर समजतील।

त्या विदेशी गाडीच्या पार्श्वभूमीवर, सर्वात आधी वाहनातून फिरणारे पहिले दलित नेते या अर्थाने नामदेव ढसाळ यांच्यावर एका दिवाळी अंकात माझे पत्रकार मित्र बंधुराज लोणे यांनी एक लेख लिहिला होता। ढसाळ यांच्याकडे पैसा आणि गाड्या कशा आल्या याच्या कहाण्या त्या लेखात होत्या।

आपल्याविरोधात लेख, बातमी दिल्याबद्दल चिडणाऱ्या नेत्यांपैकी नामदेव ढसाळ नव्हते। त्यामुळे पत्रकारांचे ते लाडके होते। त्यांनी बंधुराज लोणे यांच्या त्या लेखावर नाराजी, राग नव्हे तर त्यातील मजकुराशी असहमती व्यक्त केली होती। बंधुराजने थेट माझ्याशी बोलून तो लेख लिहिला असता तर त्यातील कहाण्यातील अचूक आणि वस्तुनिष्ठ माहिती लोकांपर्यंत गेली असती। त्याला अधुरी, चुकीची माहिती देणारे कोण हे मला ठाऊक आहेत, असे नामदेवदादा म्हणाले होते।

Next Post

खाकी वर्दीतला देव....!

बुध मे 13 , 2020
खाकी वर्दीतला देव ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ धनश्री सुगावकर -वागरे, ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ “देशात आणि जगात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले आहे .डॉक्टर,नर्स,पॅरामेडिकल स्टाफ,हॉस्पिटलमधील इतर कामगार,सफाई कर्मचारी,पोलीस,वीज कर्मचारी,रेल्वे,एसटी ,आणि अत्यावश्यक सेवा देणारे सर्व कामगार आणि वरिष्ट सर्वजण आपला जिवमुठीत घेऊन कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहेत. पोलीस म्हटले […]

YOU MAY LIKE ..