पत्रमहर्षी दिनू रणदिवे:आंबेडकरी चळवळीचा पाठीराखा!
********************
■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com
********************
देशात काँग्रेसची सत्ता आणि पंतप्रधानपदी इंदिराजी गांधी असतानाची ही गोष्ट। त्या काळात मी प्रा Jogendra Kawade यांच्या नेतृत्वाखालील दलित मुक्ती सेनेच्या मुंबई प्रदेशचा आधी सरचिटणीस आणि नंतर अध्यक्ष होतो।
इंदिराजी गांधी यांच्या राजवटीत रशिया हा भारताचा मित्र देश होता। त्या काळात केंद्र सरकारला विरोधी पक्षांनी सततच्या आंदोलनाद्वारे जेरीस आणले होते। अनेक राज्यांत सामूहिक दलित हत्त्याकांडे घडत असल्याने दलित संघटनांची आंदोलनेही सर्वत्र जोरात होती। त्या परिस्थितीत विरोधी पक्षांवर विशेषतः कम्युनिस्टांवर इंदिराजी अधिक रुष्ट झाल्या होत्या। डाव्या पक्षांचा उपद्रव थांबविण्यासाठी त्यांनी मग एक शक्कल लढवली होती। देशातील कम्युनिस्टांना रशियाने समज द्यावी, यासाठी त्यांनी त्या राष्ट्राचे प्रमुख युरी आंदरोपोव्ह यांना गळ घातली होती। पण स्वतःच्या राजकीय सोयी-स्वार्थासाठी देशांतर्गत मामल्यात हस्तक्षेप करण्यास परकीय राष्ट्राला निमंत्रण देण्याचाच तो प्रकार होता।
दलित मुक्ती सेनेने त्यावेळी ‘ रशियाच्या राष्ट्र प्रमुखांनी आधी दलितांवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या भारत या मित्र देशाला समज द्यावी’ अशी जशास तशी भूमिका घेतली होती। अन त्याच भूमिकेतून रशियाला जाब विचारणारा एक जबरदस्त मोर्चा त्या राष्ट्राच्या मुंबईतील नेपीयनसी रोडवरील वकालतीवर काढला होता।
त्या काळात एरवी सारे मोर्चे आझाद मैदानातून बाहेर पडून काळा घोडा म्हणजे हुतात्मा चौकाकडे जात असत। अशावेळी दलित मुक्ती सेनेचा तो मोर्चा उलट्या दिशेने निघून मेट्रो सिग्नलपासून गिरगावमार्गे रशियन वकालतीवर धडकला होता। त्यामुळे तो मोर्चा मुंबईकरांसाठी नवलाचा आणि चर्चेचा विषय बनला होता।
मला त्या मोर्चाच्या आयोजनासाठी रशियन वकालतीचा ठावठिकाणा आणि फोन नंबर्स त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांनी पुरवले होते। त्यानंतरच त्या आगळ्या वेगळ्या मोर्चाची पोस्टर्स आम्ही छापू शकलो होतो!
रणदिवे हे तेवड्यावरच थांबले नव्हते। मोर्चाच्या दिवशी त्यांनी महाराष्ट्र टाईम्स मध्ये दिलेली बातमी होती:
दलित मुक्ती सेनेची
युरी आंदरोपोव्हकडे धाव!
आंबेडकरी चळवळीला अखेरपर्यंत साथ दिलेल्या पत्र महर्षीला भावपूर्ण श्रद्धांजली!
पँथरच्या काळात संघर्षनायक रामदास आठवले हे संध्याकाळी 6-7 वाजता लेटरहेडवरील स्वतःच्या हस्ताक्षरातील पत्रक-बातमी ‘महाराष्ट्र टाईम्स’ मध्ये जाऊन ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या हाती द्यायचे….
अन काही तासांनी म्हणजे त्याच रात्री 12- 12.30 वाजता एखादे वेळी रणदिवे घरी परतत असताना दादरच्या रेल्वे ब्रिजवर आठवले यांची त्यांच्याशी भेट व्हायची. रणदिवे आपल्या हातातील ओलसर शाईचा, किंचितसा गरम असलेला ‘ मटा’ चा दुसऱ्या दिवशीचा अंक आठवले यांना देऊन टाकायचे. वर सांगायचे की, तुझी बातमी आलीय, बघून घे!तेव्हा आपण संध्याकाळी दिलेली बातमी इतकी तत्पर छापली जाऊन काही तासात पेपरही बाहेर आला, याचे आठवले यांना मोठे अप्रूप वाटायचे.
आंबेडकरी चळवळीचा पाठीराखा हरपला!
दिनू रणदिवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली।