काँग्रेस स्वतःमध्ये सुधारणा करणार आहे की नाही?

जेष्ठ पत्रकार आणि दै.बहुजन लोकनायक या दैनिकाचे माजी कार्यकारी संपादक मा दिवाकर शेजवळ सध्या सोशल मीडियावर बौद्धांची राजकीय वाताहात या विषयावर लेखमालिका लिहीत आहेत त्यांच्या या लेखमालेत भाग चौथा यात त्यांनी नोंदवलेले मत त्यांच्या शब्दात….!

बौद्धांची राजकीय वाताहत
भाग:4

आठवले आणि बाळासाहेब;
कॉंग्रेसवरील रागात चुकीचे काय?
-दिवाकर शेजवळ


बाळासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसवरचा राग हा केवळ लोकसभा निवडणुकीतील त्या पक्षाच्या ताठर भूमिकेमुळे उफाळलेला नाही। त्यांचा तीव्र झालेला राग अवास्तव, अनाठायी तर मुळीच नाही। शिवाय, बाळासाहेब यांचा कॉंग्रेसवरील राग हा जुनाच असून रास्तच आहे। किंबहुना आंबेडकरी जनतेचा तो प्रातिनिधिक राग आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये। कारण सध्या भाजपसोबत असलेले रिपाइं नेते रामदास आठवले हे भले बाळासाहेबांचे राजकीय प्रतिस्पर्धी असले तरी त्यांचाही कॉंग्रेसवरील राग हा बाळासाहेबांपेक्षा खचितच कमी नाही। हे दोघेही नेते काँग्रेससोबत केलेल्या युतीच्या राजकारणात आजवर चांगलेच पोळलेले आहेत।

काँग्रेससोबतच्या 15 वर्षांच्या युतीच्या राजकारणात आठवले यांच्या रिपाइंचा कोणीही उमेदवार विधानसभेत निवडून जाऊ शकला नव्हता। 1990 च्या निवडणुकीत शरद पवार यांनी रिपाईला 12 जागा सोडल्या होत्या हे खरे। पण त्याचवेळी त्या सर्व जागांवर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्याची खेळी पवार यांनी केली होती। त्यामुळे आमदाराअभावी रिपब्लिकन पक्षाची काँग्रेससोबत सत्तेसाठी सौदेबाजी करण्याची ताकदच संपुष्टात आली होती। अर्थात, हे झाले आठवले यांच्या पक्षाचे।

बाळासाहेब आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाशी काँग्रेसने केलेल्या विश्वासघातकी राजकारणाचा किस्सा त्याहून निराळा आहे। किनवटच्या भीमराव केराम यांच्यापासून अनेक आमदार बाळासाहेबांनी स्वबळावर लढून विधानसभेत पाठवण्याचा करिष्मा दाखवलेला आहे। पण त्यांच्या पक्षाने काँग्रेसला सरकारसाठी पाठिंबा दिल्यानन्तर काँग्रेसने बाळासाहेबांच्या आमदारांना फोडून भारिप बहूजनला कंगाल करण्याचे राजकारण केले होते।

आठवले यांनी शिवसेना -भाजपशी केलेल्या युतीची गेली पाच वर्षे सोडली तर, रिपब्लिकन सेनानी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्यापासून रा सु गवई, रामदास आठवले, बाळासाहेब आंबेडकर या नेत्यांनी काही दशके काँग्रेसला साथ दिलेली आहे। तर, आर डी भांडारे, दादासाहेब रुपवते यांच्यापासून चंद्रकांत हंडोरे यांच्यासारख्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये दाखल होऊन त्या पक्षाचा दलितांमध्ये जम बसवला। अपवाद राहिला तो फक्त ऍड बी सी कांबळे यांचा। आणीबानीनन्तरच्या जनता पक्षाच्या लाटेत मुंबईतून लोकसभेत निवडून गेलेल्या कांबळे यांनी आयुष्यभर काँग्रेसविरोधात एकाकी संघर्ष केला।

मात्र बहुसंख्य आंबेडकरवादी, रिपब्लिकन नेत्यांनी काँग्रेसची सतत पाठराखण करूनही आंबेडकरी समाजाला न्यायासाठी नेहमीच रस्त्यावर येऊन झुंजावे लागले। त्याला मराठवाडा विद्यापीठ नामांतरापासून इंदू मिल स्मारक आणि खैरलांजी हत्त्याकांडासारखी अत्त्याचाराची अनेक प्रकरणे साक्षी आहेत। त्याचा इतिहास सर्वश्रुत असल्याने तो इथे उगळण्याची गरज नाही।
आज इथे प्रश्न आहे, तो काँग्रेससोबतच्या युतीतून आंबेडकरी समाजाला काय मिळाले? ही युती कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि यशवंतराव चव्हाण यांच्यापासून चालत आली असली त्या दोघांचा कालखंड आणि त्या युतीचे फलित हा स्वतंत्र मुद्दा आहे। इथे त्यांनंतरच्या युतीच्या आध्यायाचे ऑडिट करण्याचा हेतू आहे।
हा अध्याय रा सु गवई यांच्यापासून आठवले-बाळासाहेब यांच्या पर्यंतचा आहे।

काँग्रेस रिपब्लिकन युतीमध्ये गवई हे विधान परिषदेचे उपसभापती, सभापती, विरोधी पक्ष नेते, लोकसभेत खासदार, राज्यसभा सदस्य, राज्यपाल बनले। संसदीय राजकारणात 1990 पर्यंत ते एकमेव रिपब्लिकन नेते होते। सत्ता पदावर असताना त्यांनी आपल्या काळात ऐरणीवर आलेल्या प्रश्नांवर प्रसंगी संघर्ष करायला मागेपुढे पाहिले नाही। बौद्धांच्या सवलतींसाठी जनता सरकारच्या राजवटीत दिल्लीत जाऊन संसदेसमोर उपोषणालाही बसले होते। पण तो प्रश्न 1956 पासून भिजत ठेवलेल्या काँग्रेसने नन्तर पुन्हा सत्तेवर येऊनही 1989 पर्यंत सोडवलाच नव्हता। बौद्धांना केंद्रातील सवलती व्ही पी सिंग यांच्या सरकारने दिल्या। बाबासाहेबाना भारतरत्नही तेव्हाच मिळाला।

त्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात 1990 च्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन ऐक्य घडले होते। एकीकृत रिपाईने युती व्ही पी सिंग यांच्या जनता दलाशी करायची की काँग्रेसशी असा प्रश्न उभा ठाकला होता। त्याआधीच्या सुमारे दोन दशके काँग्रेसला साथ दिलेले गवई सुद्धा एका कृतज्ञतेच्या भावनेतून व्ही पी सिंग यांच्यावर फिदा झाले होते। बाळासाहेब आंबेडकर, प्रा जोगेंद्र कवाडे यांचीही तीच भावना होती। त्यातून ते तिघे नेते जनता दलाशी युती व्हावी, या मताचे होते।

मात्र त्यावेळी जातीयवादी शक्तींचा बिमोड करण्याचा नारा शरद पवारांनी दिल्यानन्तर रिपब्लिकन ऐक्यात काँग्रेसशी युती करण्यावर नेत्यांचे बहुमत झाले। अखेर युतीच्या मुद्यावरून ऐक्य फुटले। गवई, बाळासाहेब, कवाडे अलग झाले। त्यांनतर विधानसभा निवडणुकीच्या निमिताने पँथर नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाचा राजकीय क्षितिजावर उदय झाला। ते नवे रिपब्लिकन नेते बनले। अन काँग्रेस सत्तेवर आल्यावर त्यांना समाजकल्याण मंत्रिपद मिळाले।
o
शरद पवार यांनी युतीचा बयांना म्हणून त्यावेळी विधान परिषदेची एक आमदारकी पँथर नेते टी एम कांबळे यांना बहाल केली होती। रिपब्लिकन पक्षाला सत्तेत 10 टक्के वाटा देण्याचेही पवार यांनी कबूल केले होते।

विधानसभा निवडणुकीनन्तर मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस रिपब्लिकन युतीमुळे रिपाइंचे 12 नगरसेवक निवडून येऊन चंद्रकांत हंडोरे यांच्या रूपाने महापौर पदाचा मान दुसऱ्या वेळी रिपाईला मिळाला होता। मात्र राज्याच्या सत्तेतील रिपब्लिकन पक्षाचा सहभाग हा एका समाजकल्याण मंत्रीपदापुरताच मर्यादित राहिला होता।
मात्र नन्तरच्या 15 वर्षात आठवले यांनी काँग्रेसकडून मिळेल तसा सत्ता पदांचा लाभ आपल्या सहकारी नेत्यांना मिळवून दिला। त्यात अनिल गोंडाणे, सुमंतराव गायकवाड यांना विधान परिषदेचे सदस्यत्व, गंगाधर गाडे,दयानंद मस्के, प्रीतमकुमार शेगावकर, यांना मंत्रीपदे, अविनाश महातेकर यांना महामंडळ मिळाले।

मात्र लोकसभा, विधानसभा निवडणुकीतच रिपाईशी युती। महानगर पालिका निवडणुकीत रिपाईला वाऱ्यावर सोडून द्यायचे असे धोरण काँग्रेसने अवलंबले। त्यामुळे तळागाळातील आंबेडकरी, रिपब्लिकन कार्यकर्ता स्थानिक स्वराज्य संस्थातील सता पदापासून वंचितच राहिला। संसदीय राजकारणात त्याचा शिरकाव होऊन पक्षाला बळ मिळू शकले नाही। त्यातच शिवसेना भाजपला रोखण्याच्या नावाखाली आपल्यासोबत कायम राहण्याची परिस्थिती निर्माण करून काँग्रेसने रिपाईला असहाय्य, मजबूर बनवले। या मजबुरीमुळे रिपाईला गृहीत धरणाऱ्या काँग्रेसची मुजोरी, बेदरकार वृत्ती वाढत गेली आणि एके दिवशी रामदास आठवले यांचा शिर्डीत लोकसभा निवडणुकीत पराभव होताच दिल्लीच्या बंगल्यातील त्यांचे सामान रस्त्यावर फेकून देण्यापर्यंत काँग्रेस सरकारने मजल मारली।

आठवले मग बिनधास्त,उघडपणे शिवसेना भाजपसोबत गेले। त्यांना दोषी कसे धरता येईल ?

अन बाळासाहेब आंबेडकर हे काँग्रेसच्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास टाकण्यास, विसंबून राहण्यास आता तयार होत नसतील तर त्यात चुकीचे काय आहे?

काँग्रेस स्वतःमध्ये सुधारणा करणार आहे की नाही?

Next Post

बौद्ध समाजाची वाताहत-वरीष्ठ पत्रकार मा दिवाकर शेजवळ यांची विशेष लेखमला

शनी जून 8 , 2019
बौद्ध समाजाची वाताहत भाग :1 इतकी मोठी आत्म वंचना कोणती असू शकेल? -दिवाकर शेजवळ ** लोकसभा निवडणूक आणि आणि बौद्ध समाजाची राजकीय वाताहत यावर माझे ‘चिंतन’ रविवारपासून…. असे काल इथे मी जाहीर केले। त्यांनतर आंबेडकरी समाज बेदखल आणि किंमतशून्य झालेला नाही, […]

YOU MAY LIKE ..