संत रविदासांचे मंदिर जमीनदोस्त; ‘ईडी’ ने दिल्लीतील आंदोलन झाकले !

संत रविदासांचे मंदिर जमीनदोस्त;
‘ईडी’ मुळे दिल्लीतील आंदोलन झाकोळले !
-दिवाकर शेजवळ

संत रविदास हे देशातील चर्मकार समाजाचे मानबिंदू आहेत। दलितांचे ‘मसीहा’ डॉ बाबाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ‘अस्पृश्य मूळचे कोण?’ हा ग्रँथ संत रविदास यांना अर्पण केलेला आहे। बाबासाहेबांनी दलितांना दिलेला ‘ शिका , संघटित व्हा, संघर्ष करा’ हा संदेश 16 व्या शतकातील संत शिरोमणी रविदासांच्या गुरू वाणीत सापडतो। तसेच शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांनी ‘ ग्रँथ साहिबा’ मध्ये रविदास यांच्या दोह्यांना स्थान दिलेले आहे। त्यावरून रविदास यांची महती कळून चुकते।

राजधानी दिल्लीतील तुघलकाबाद येथे संत रविदास यांचे 60 वर्षे जुने मंदिर होते। त्याचे उदघाटन 1959 सालात तत्कालीन केंद्रीय मंत्री बाबू जगजीवन राम यांनी केले होते। ते मंदिर सरकारी जमिनीवरील अतिक्रमण ठरवून केंद्र सरकारच्या दिल्ली विकास प्राधिकरणाने जमीनदोस्त करून टाकले आहे। त्या विरोधात 10 ऑगस्टपासून पंजाब,हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यातील लढाऊ चर्मकार समाजाने प्रखर आंदोलन केले।

बुधवारी तर या आंदोलनाचे लोण दिल्लीत पोहोचले। रामलीला मैदानावर हजारो दलितांनी केंद्र सरकारला आंदोलनाचा तडाखा दिला। त्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी पाशवी बळाचा वापर केला। भीम आर्मीचे नेते ऍड चंद्रदेखर आझाद यांच्यासह शेकडो आंदोलकांना अटक करून 15 दिवसांसाठी तुरुंगात डाम्बले आहे।

पण ईडीने काँग्रेसचे माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या पी चिदम्बरम यांना केलेल्या अटकेच्या प्रकरणाने ते आंदोलन झाकोळून टाकले। तसेही संत रविदास मंदिराच्या डीमोलिशनचे प्रकरण गोदी मीडियाने महाराष्ट्रातील चर्मकार समाजापर्यंत पोहोचू न देण्याची काळजी घेतली। त्यामुळे रविदास यांचे मंदिर भुईसपाट केल्याच्या विरोधात महाराष्ट्रात कोणतीही प्रतिक्रिया उमटू शकलेली नाही।

आंतरराष्ट्रीय स्तरावर बौद्ध भिक्खू नी निषेध नोंदवला.भदंत पंचशीलरत्न

त्याची सल मनात बोचत असतांनाच काल शुक्रवारी संध्याकाळी माझे मित्र, शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांचा फोन आला। संत रविदास यांचे दिल्लीतील मंदिर जमीनदोस्त केल्याच्या विरोधात येत्या मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर चर्मकार समाजाचा मोर्चा धडकत आहे, असे त्यांनी सांगितले। त्याबद्दल मी त्यांचे खास अभिनंदन केले। मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी (24 ऑगस्ट) संध्याकाळी त्यांनी धारावीतील मनोहर जोशी महाविद्यालयात एक बैठकही बोलावली आहे।

बौद्ध, मातंग,ओबीसी, मराठा, धनगर असे अनेक समाज आपापल्या न्याय्य हक्कासाठी ‘चळवळे’ बनले असतांना चर्मकार समाजाने संघर्षापासून स्वतःला अलिप्तच ठेवल्याचे दिसते। त्याचा अर्थ त्या समाजाचे प्रश्नच शिल्लक नाहीत, असा मुळीच नव्हे। मात्र त्या प्रश्नावर जागृती करून लढ्यासाठी समाजाला संघटित करणाऱ्या चळवळीचा आणि नेतृत्वाचा अभाव दिसतो। महाराष्ट्राबाहेर तर दलित

चळवळीचे नेतृत्वच चर्मकार समाजाकडे आहे।

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संत रविदास यांच्यातील वैचारिक अनुबंध इतर राज्यातील चर्मकार समाजाने जाणले आहेत, समजून घेतले आहेत। त्याचा मायावती आणि चंद्रशेखर आझाद यांच्या उत्तर प्रदेशातील एक किस्सा इथे आवर्जून सांगण्यासारखा आहे। दोन वर्षांपूर्वी सहारनपूर येथे दलितविरोधी हिंसाचार माजवण्यात आला होता। त्यावेळी शेजारच्या एका गावातील लढाऊ चर्मकार समाजाने संत रविदास यांच्या मंदिरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या छोटेखानी पुतळ्याची स्थापना केली होती! संत शिरोमणी रविदास आणि बाबासाहेब यांच्यातील वैचारिक अनुबंध राज्यातील चर्मकार आणि बौद्ध या दोन्ही समाजानी जाणून घेण्याची गरज आहे।

संत रविदास यांचे मंदिर जमीनदोस्त केल्याच्या विरोधात बुधवारी मुंबईत निघणाऱ्या चर्मकार समाजाच्या धडक मोर्चाला आमच्या ‘गणराज्य अधिष्ठान’ या संघटनेतर्फे पाठिंबा देण्यात आला आहे। सर्वच आंबेडकरवादी पक्ष- संघटनांनी या मोर्चात सहभागी होऊन संत रविदास आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा समान वैचारिक वारसा लाभलेल्या दोन समाजाना सांधण्याची संधी साधली पाहिजे।

Next Post

ब्रम्हनाळ गाव वर्षभरात महाराष्ट्रातील 'आदर्श गाव' होईल.-आद.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर.

शनी ऑगस्ट 24 , 2019

YOU MAY LIKE ..