‘तृतीयपंथीयांना आज बाबासाहेबांमुळेच ओळख’- दिशा पिंकी शेख

‘तृतीयपंथीयांना आज बाबासाहेबांमुळेच ओळख’

     -डॉ.आंबेडकर आणि मी : -दिशा पिंकी शेख

जोपर्यंत बाबासाहेब मला माहिती नव्हते तोपर्यंत माझ्या कविता कमालीच्या निगेटीव्ह होत्या. जेव्हा मला बाबासाहेब कळायला लागले, उमगायला लागले ते माझ्या लिखाणात यायला लागले, त्यानंतर माझ्या कवितांमधील नकारात्मकता संपून संघर्षाच्या काही ओळी त्यामध्ये यायला लागल्या आणि मला वाटतं ते बाबासाहेब आहेत. पारंपरिक जगणं सोडा, पारंपरिक वाट सोडा आणि एक नवीन परिवर्तन घडवूयात, असे जिथे जिथे शब्द येतात तिथे तिथे बाबासाहेब आहेत.” हे शब्द आहेत तृतीयपंथी कवयित्री दिशा पिंकी शेख यांचे.

‘जय भीम सगळ्यांना. मी दिशा पिंकी शेख,’ अशा शब्दांत दिशा यांनी आमच्याशी बोलण्याला सुरुवात केली. दिशा यांच्यात कमालीचा आत्मविश्वास दिसतो.

“बाबासाहेब माझी नजर झाले आहेत आणि त्यातून मी सध्या सर्व जग पाहते, असं मला वाटतं” 

तृतीयपंथी समाजातील समस्या त्या अत्यंत प्रभावीपणे आपल्या कवितांमधून सोशल मीडियावर मांडत असतात. त्यांच्या या कवितांना वाचक भरभरून प्रतिसादही देतात.
त्यांच्या कवितांमधून तृतीयपंथी समाजातील जीवन, त्यांच्या भावभावना, त्यांचा जगण्याकडे बघण्याची दृष्टिकोन या सर्वांचं यथार्थ चित्रण आपल्याला दिसतं. या सर्वाचं श्रेय त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देतात.

बाबासाहेब आपल्या आयुष्यात येण्याआधी आणि आल्यानंतर काय बदल झाला, असं विचारलं असता, दिशा यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रभाव दिसला.
त्या सांगतात, “बाबासाहेब माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझ्यात कमालीचा बदल झाला. लहानपणी मी भीकसुध्दा मागितली आहे. त्यानंतर मी भंगार वेचण्याचंही काम केले आहे. आणि यासर्वांबद्दल मी एकदम निश्चिंत होते.”
“माझ्या वाट्याला जे काही भोग येत होते ते माझ्या नशिबाचाच भाग आहे, असं मी समाजायचे. पण जेव्हा बाबासाहेबांसारखं एखादं शस्त्र म्हणा, आधार म्हणा, लढण्यासाठीची मशाल म्हणा, ती हातात आल्यामुळे आता प्रत्येक गोष्टीकडे मी सजगपणे पाहू शकते.”

“बाबासाहेब माझी नजर झाले आहेत आणि त्यातून मी सध्या सर्व जग पाहते, असं मला वाटतं. आता मी बाजारात मागायचं काम सोडलंय आणि मी आता पुस्तकांचे स्टॉल लावते. शाळा, महाविद्यालय आणि विविध कार्यक्रमांमध्ये मी जेंडर आणि सामाजिक प्रश्नांवर बोलते आणि त्यावरच माझा उदरनिर्वाह चालतोय,” असं त्या पुढे सांगतात.
बाबासाहेब आपल्या आयुष्यात कसे आले, याबाबात बोलताना दिशा जुन्या आठवणी सांगतात.

“मी घिसाडी समाजातील आहे. माझ्यासाठी अगदी लहानपणी बाबासाहेब हे एका विशिष्ट जाती जमातीचे नेते आहेत, असा माझा एक समज होता. जशी मी वाचायला लागले. शिक्षणामध्ये माझं मन लागत नव्हतं, तेव्हा काही माणसं माझ्या आयुष्यात आली.”
“कॉ. रणजित परदेशी, प्रवीण अहिरे यांनी ‘माझी आत्मकथा’ हे पुस्तक माझ्या हातात दिलं. तेव्हा मला कळलं की या व्यक्तीचा संघर्ष काय आहे, सर्वसमावेशक विचार कसा केला, हे कळलं. यामुळे मी त्यांच्या विचारांकडे आकर्षित व्हायला लागले. त्यांच्याबद्दलचं वाचन वाढवलं. बाबासाहेबांचं कार्य भटक्या-विमुक्तांपर्यंत पोहोचलं नाही. अजूनही बऱ्याच अंशी भटक्या-विमुक्त जाती-जमातींना बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी काय केलंय, याची काहीच जाणीव नाहीये. पण ते मला कळायला लागलं,” त्या सांगतात.

“बाबासाहेब जगण्याचा मूलमंत्र आहेत. कुठलीही अशी जागा नाही की जिथे बाबासाहेब जगताना कामी येत नाहीत. सगळीकडे तुम्हाला बाबासाहेब जगण्याचा दृष्टिकोन देतात. त्यातनं उत्तरं शोधण्याचा दृष्टिकोन देतात.”

“बाबासाहेबांकडून मला बुद्ध कळाला. मला बुद्धांचं आकर्षण वाटायला लागलं. त्यांना समजून घ्यावंसं वाटायला लागलं. त्यानंतर मी बाबासाहेबांचं ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हे पुस्तक वाचलं आणि मग त्यानंतर मी बाबासाहेबांना पूर्णपणे समर्पित झाले,” हे सांगताना दिशाही मनातून बाबासाहेबांना नतमस्तक होतात.
बाबासाहेबांच्या विचारांचा त्यांच्या कामात कशाप्रकारे मदत होते याबद्दल बोलताना दिशा सांगतात, “बाबासाहेब जगण्याचा मूलमंत्र आहेत. कुठलीही अशी जागा नाही की जिथे बाबासाहेब जगताना कामी येत नाहीत. सगळीकडे तुम्हाला बाबासाहेब जगण्याचा दृष्टिकोन देतात. त्यातनं उत्तरं शोधण्याचा दृष्टिकोन देतात.”
“माझ्यासाठी तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे एखादी गोष्टी माझ्या आयुष्यात घडतीये तर मी बाबासाहेब जाणून घेण्याच्या आगोदर माझ्या दैवाचा भाग, माझ्या नशिबाचा भाग म्हणून सोडत होते. पण बाबासाहेबांनी त्याविरोधात बंड करायला शिकवलं. बाबासाहेब तुमच्या प्रत्येक गोष्टीला राजकीय, सामाजिक दृष्टिकोन देतात. आणि याच गोष्टी माझं जीवन समृद्ध करणाऱ्या वाटल्या. ज्यातून मी शिकत गेले. स्वतःला समजून घ्यायला लागले. जगायला लागले.”

“माझ्यासोबत होणारे अन्याय आणि अत्याचार हे कसे पितृसत्ता, योनीशुचिता, जातीव्यवस्था आणि एकंदर इथल्या शोषण व्यवस्थेशी निगडीत आहेत, हे समजून घेण्याचं ज्ञान मला बाबासाहेबांमुळे मिळालं,” 

बाबासाहेबांना आपले सर्वस्व मानणाऱ्या दिशा पुढे सांगतात की, “मला असं वाटतं की बाबासाहेब माझ्यासाठी आधारस्तंभासारखे आहेत. त्यांच्यामुळे मी सर्व घटनांना त्यांच्या दृष्टिकोनातून पाहू शकते. त्यामुळे ते मला खूप जवळचे वाटतात. आदर्श तर ते आहेतच, पण ते मित्र वाटतात, ते मार्गदर्शक तर आहेतच, ते दीपस्तंभ वाटतात. एवढेच नव्हे तर अगदी आईबापसुद्धा वाटतात.

“अनेकवेळा मी माझा रागही बाबासाहेबांना गृहित धरून सांगत असते. त्यानंतर पुन्हा बाबासाहेब वाचून त्यांना समजून मला पुन्हा नव्याने लढण्याची ताकद मिळते.” हे सांगताना दिशा भावनिक होतात.


बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानानं सर्वांना जगण्याचा हक्क तर मिळालाच. मात्र त्याचा खरा फायदा तृतीयपंथियांना कसा झाला याबद्दल दिशा मोठ्या अभिमानानं सांगतात.
“बाबासाहेबांनी भारताला दिलेला सर्वांत मोठा अनमोल ठेवा म्हणजे भारतीय संविधान. जे माझ्या सारख्यांच्या जगण्याचा खूप मोठा आधार आहे. जर मला कोणी सार्वजनिक ठिकाणी दुय्यम वागणूक देत असेल तर तिथे मी त्याला जाब विचारू शकते. हा अधिकार मला बाबासाहेबांमुळे मिळाला.”
“आज मला सर्वांपुढे व्यक्त होण्याचा अधिकारही मला त्यांच्यामुळेच मिळाला आहे. माझ्या सूक्ष्म अशा गरजांची जाणीव ठेवून त्यांनी जे संविधान बनवलंय ते परिपूर्ण संविधान मला माणूस असण्याचं, माणूस म्हणून जगण्याचं आत्मभान देतंय,” असं त्या सांगतात.

तृतीयपंथियांबद्दल बोलायचं झाल्यास मला वाटतं बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं, त्यामध्ये स्त्री पुरुष असं न लिहिता त्यांनी व्यक्ती हा शब्द टाकलाय, आणि त्या व्यक्ती या एका शब्दामुळे आम्हाला आमच्या हक्क आणि अधिकारासाठी बोलता आलं. आम्हाला संवैधानिक मार्गाने भांडता आलं. त्यामुळेच 2014 ला9 आम्हाला व्यक्ती म्हणून मान्यता मिळाली. त्यामुळे आम्हाला मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड आणि रेशन कार्ड हे सगळं मिळालं.”

“जर ते स्त्री पुरुषापर्यंतच त्यांनी ते मर्यादित ठेवलं असतं तर मी त्या व्याख्येत कधीच आले नसते. तर मला त्या एका शब्दावरून कळतं की बाबासाहेब किती पुढचा आणि विस्तृत दृष्टिकोनातून विचार करत होते. तेव्हा आमची संख्या एवढी नव्हती, होती ती लोक पुढे येत नव्हती. पण पुढे येणाऱ्या समुदायाला त्याच्यात मोजता यावं याची सोय त्यांनी संविधानामध्ये जागोजागी केली आहे. त्यामुळेच आमच्यासारखे घटक पुढे येऊन स्वतःच्या हक्कासाठी भांडू शकतात.”
“अगदी 377च्या विरोधात असो, स्वतःच्या माणूस असण्याच्या संदर्भात असो, आता नुकतेच मॉलमध्ये एका तृतीयपंथी व्यक्तीला रोखण्यात आलं. मात्र त्या व्यक्तीला संवैधानिक मार्ग माहीत होते त्यामुळे तिथे तिला प्रतिकार करता आलं. जर संवैधानिक मार्गांमध्ये त्यांनी माझ्यासाठी काही सोयच केली नसती तर मला हा लढा लढताच आला नसता,” हे ही सांगायला दिशा विसरत नाही.
—— दिशा पिंकी शेख.
सुनील निकळजे यांच्या FB वॉल वरून सभार

Next Post

PRABUDDHA BHARAT - FORTNIGHTLY NEWS PEPAR

रवि मे 27 , 2018
PRBUDDHA BHARAT

YOU MAY LIKE ..