दिवाकर शेजवळ : ओघवती शैली, आक्रमक शब्दावली आणि परिवर्तनाची समर्पित पत्रकारिता.
=================
◆ चंद्रकांत व्ही सोनावणे◆
=================
उंच अन् धिप्पाड शरीरयष्टी, उंच कपाळ, अशा भारदस्त देहाला साजेसा खर्जातला उंचपट्टीतील आवाज. खिशाला किमान दोन चांगले पेन. चेहऱ्यावर चिंतनशील भाव अन् टेबलावर पुढ्यात असणाऱ्या कागदावर सरसावलेली लेखणी, ज्यातून ओघवती शैली अन् आक्रमक शब्दावलीच्या माध्यमातून आंबेडकरी पत्रकारितेतील परिवर्तनाची साक्ष देणारी सक्षम बातमी, लेख किंवा संपादकीय जन्माला येते, असे माझ्या मनात बिंबलेले व्यक्तिमत्व म्हणजे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता पत्रकार दिवाकर शेजवळ सर.
दिवाकर शेजवळ यांचा दोन वर्षांपूर्वी मुंबई मराठी पत्रकार संघात सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार समारंभ पार पडला. या समारंभाला मला उपस्थित न राहता आल्याची बोचणी मला जाणवते. मात्र त्यावेळी त्यांना मोबाईल काॅल करून 3 ways Media वर त्यांच्या समर्पित पत्रकारितेवर एक दीर्घ मुलाखत घेण्याविषयी बोललो होतो. त्यांनीही होकार कळवला. परंतु गेल्या दोन वर्षांत प्रत्यक्ष मुलाखत शक्य झाली नाही. परंतु दिवस अन् क्षण हे प्रतिक्षा करित नाहीत. दोन वर्षे झपाटय़ाने निघून गेली अन् लक्षात आले की दिवाकर शेजवळ सरांची षष्ठ्यब्दीपदार्पन देखील ३० एप्रिलला म्हणजे उद्याच येऊन ठेपली. अशा वेळी त्यांचा पत्रकारितेच्या क्षेत्रात अनुभवलेला सहवास शब्दबद्ध करावा, असे उस्फूर्तपणे वाटले.
दिवाकर शेजवळ सर आणि माझी पहिली भेट ही साधारणतः २००६ मध्ये झाली. तेव्हा दैनिक लोकनायक’ चे कार्यकारी संपादक म्हणून ते कार्यरत होते. लोकनायक सुरू होवून आठ महिने झाले असतील बहुधा. लोकनायक’चे संस्थापक संपादक दिवंगत कुंदन गोटे यांनी दैनिकात काम करण्याची संधी दिली, तो दिवस होता १६ जून २००६. यादिवशी कुंदन गोटे यांच्याशी भेट व चर्चा झाल्यानंतर आपण ज्या दैनिकात काम करणार त्या दैनिकाच्या कार्यकारी संपादकांची भेट घेणे हा भाग एक शिरस्ता म्हणून पाळताना मी कार्यकारी संपादक दिवाकर शेजवळ सर यांच्या कॅबिनकडे वळलो. कॅबिनमध्ये डोकावून पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी त्यांचे मला दिसलेले अन् माझ्या मनावर बिंबलेले त्यांचे व्यक्तिमत्व पहिल्याच पॅऱ्यात मी मांडले.
दिवाकर शेजवळ सर हे त्या वेळेपर्यंत एक प्रख्यात पत्रकार असण्याबरोबर आंबेडकरी चळवळीतील एक समर्पित कार्यकर्ते होते, याची मला जाणीव होती. परंतु प्रत्यक्षात प्रथमच मी त्यांना पाहत किंवा भेटत होतो. या भेटीत त्यांच्या व्यक्तिमत्वातील काही पैलू आणखी ठळकपणे जाणवले. त्यांच्या भारदस्त देहयष्टी ला साजेसा त्यांचा कणखर आवाज आणि याच व्यक्तिमत्त्वाची साक्ष देणारी त्यांच्या लेखणीची आक्रमक शैली पाहता असे वाटायचे की, त्यांचा स्वभावही कडक असेल. परंतु त्यांच्या कॅबीनमध्ये गेल्यावर अवघ्या दोन ते तीन मिनिटातच कळते की, त्यांचा आतिथ्यशील स्वभाव, संवाद करण्याची मनस्वी आपलेपणा वाटणारी शैली आणि एक सहकारी म्हणून मदतीची भावना.
दैनिक लोकनायक’मध्ये कार्यरत असताना त्यांची वेळेतच कार्यालयात उपस्थित होण्याची पध्दत एक शिस्त वाटे. जाताना मात्र मग कितीही वेळ होवो त्याचे भान न ठेवता दैनिकाचे काम संपेपर्यंत कार्यालय सोडायचे नाही हा नियम ते काटेकोरपणे पाळत. अकरा वाजता कार्यालयात दाखल झाल्यानंतर ते काम संपवूनच बाहेर पडायचे.
दैनिक लोकनायक मध्ये दाखल होण्यापूर्वीच ते मुंबईतील एक ख्यातनाम पत्रकार म्हणून प्रसिद्ध होते. मुंबईतील अनेक बड्या पत्रकारांसोबत किंवा मोठ्या संपादकांसोबत काम केल्याचा त्यांना रास्त अभिमान वाटतो, हे त्यांच्या बोलण्यातून अनेकदा व्यक्त व्हायचे. त्यात निखिल वागळे आणि कपिल पाटील यांच्याबरोबर काम केल्याचे अनेक प्रसंग ते एखाद्या नाणावलेल्या कथाकथनकाराच्या शैलीत सांगत. त्यांच्या अनुभवांना ऐकणे ही एक पर्वणी असे. खुल्या पत्रकारितेतून थेट आंबेडकरी चळवळीतील पत्रकारिताच त्यांना करायची नव्हती तर त्या पत्रकारितेचा आयामही त्यांना घडवायचा होता. त्यामुळे एक स्वतंत्र आंबेडकरी पत्रकारितेचे आव्हान त्यांच्यासमोर होते. मात्र या आवाहनाला त्यांनी यथार्थपणे पेलले असे म्हणता येईल. मुलायमसिंह यादव राष्ट्रीय राजकारणासह उत्तर प्रदेशच्या राजकारणात हुकूमत ठेवून होते, तेव्हा त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात एक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला दैनिक लोकनायक च्या पेज हेडिंग मधून ज्या आक्रमक शब्दात त्यांनी शब्दबद्ध केली, ते वाचून दुसऱ्या दिवशी आख्खा महाराष्ट्र पेटला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मुलायमसिंह यादव यांच्याविरोधात आंदोलने, घोषणाबाजी तर केलीच पण ठिकठिकाणी मुलायमसिंह चे पुतळेही जाळले होते. महाराष्ट्रात उसळलेल्या त्या आंदोलनाला मुलायमसिंह यांच्या वक्तव्याची पार्श्वभूमी असली तरी वाचकांपर्यंत ज्या शब्दात ते पोहोचवलं गेलं त्याची ती किमया होती. ही किमया नक्कीच दिवाकर शेजवळ सर यांच्या आक्रमक शब्दांनी साध्य केली होती.
महाराष्ट्रात घडलेले परंतु जगातील सर्वात क्रूर अन भीषण हत्याकांड म्हणजे खैरलांजी. हे हत्याकांड होवून साधारणत: महिना लोटला होता. कुठेही क्रूर जातीयवाद्यांनी घडविलेल्या या अमानवीय हत्याकांडाची बातमी देखील आलेली नव्हती. मात्र लोकनायक ला तत्कालीन विधानपरिषदेचे एक आमदार शेंडे यांच्या लेटर हेडवर पाच ते सहा ओळीत खैरलांजी हत्याकांडाची माहिती देणारे एक पत्र आले होते. त्या पत्राच्या आधारे फोनवरून काही माहिती मिळवून शेजवळ सरांनी या हत्याकांडाची पेजहेडींग केली. ही बातमी दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या गावागावात जाताच आंबेडकरी कार्यकर्त्यांचे आंदोलन पेटले. दैनिक लोकनायक हे ठाणे जिल्ह्यातून असल्याने हे आंदोलन उल्हासनगर आणि ठाणे जिल्ह्यात किती उग्र स्वरूपात झाले होते, हे आपणास आठवतच असेल. लोकनायकसह आंबेडकरी दैनिकांनी खैरलांजी हत्यांकाडावर रान उठवले असताना प्रस्थापित मुख्य मिडिया मात्र मूग गिळून गप्प बसला होता. अशातच साधारणतः महिन्याभराने म्हणजे खैरलांजी हत्याकांडाला दोन महिने उलटल्यावर तरूण तेजपाल यांनी त्यांच्याच मॅगझिन मध्ये एक लेख लिहिला होता. खैरलांजी प्रकरणात आमची माणुसकी का गोठली’ साधारणतः याच आशयाचा त्यांच्या लेखाचा संदर्भ घेत दिवाकर शेजवळ सरांनी पुन्हा लोकनायक ला आक्रमक पेजहेडींग केली. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील म्हणजे मराठी दैनिके आणि चॅनल्स यांच्यावर झाला. त्यानंतर महाराष्ट्रात इतर मिडिया ने खैरलांजी प्रकरणाची वरकरणी का असेना पण दखल घेतली.
खरे तर दिवाकर शेजवळ सर यांच्या पत्रकारितेला पाहता ते निवृत्त होईपर्यंत लोकनायक चे कार्यकारी संपादक राहतील एवढा विश्वास त्यांच्याविषयी वाटत होता. वार्ताहरांचे कोणतेही जाळे नसताना पेजहेडींग आणि संपादकीय च्या भिस्तवर त्यांनी लोकनायक ला एका उंचीवर नेऊन ठेवले होते. परंतु नित्यनेमाने पाच वाजता पान नंबर एक लावण्यासाठी आपल्या नियोजित जागेवर येणारे शेजवळ सर त्यादिवशीही आले. म्हणजे २०१० हे वर्ष होते. दिवस आठवत नाही. त्यादिवशी पान लावायला आलेल्या कार्यकारी संपादक दिवाकर शेजवळ यांना ” आज मी पान लावतो”, हे शब्द संपादकांच्या तोंडून ऐकावे लागले. हे शब्द सर्वसाधारणपणे काही परिणाम करणारे होते, असे वाटलेच नव्हते; परंतु दुसऱ्या दिवसापासून मात्र दिवाकर शेजवळ सर पुन्हा कधी कार्यालयात आले नाहीत.
दिवाकर शेजवळ सर हे पुन्हा सामनामध्ये रूजू झाले. तेथून निवृत्तही झाले. आज म्हणजे ३० एप्रिल रोजी वयाची षष्ठ्यब्दीपदार्पन करित आहेत. गेल्या दहा वर्षात त्यांची माझी पुन्हा भेटही झाली नाही. त्यांच्या लगोलग मी लोकनायक सोडले होते. पण आज शेजवळ सरांच्याविषयी किमान शब्दातून व्यक्त व्हावं या भावनेने हा लेख प्रपंच. षष्ठ्यब्दीपदार्पनानिमित्त हार्दिक मंगलकामना.
( *लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि 3 ways Media चे संपादक आहेत*.)