पत्रकारितेतील तेजस्वी ‘दिवाकर’
**************************************
■ भीमराव गवळी ■
२००६ उजाडेपर्यंत दिवाकर शेजवळ सर कोण आहेत हे माहीत नव्हतं. कधी त्यांच्याशी संपर्कही आला नव्हता. तसं कारणही घडलं नव्हतं. पण दैनिक ‘लोकनायक’ला रुजू झालो आणि शेजवळ सरांची ओळख झाली. अत्यंत शांत स्वभाव, प्रचंड नम्र, कमालीचा न्यूज सेन्स, मोजक्याच शब्दात मोठा आशय मांडण्याची हातोटी, आक्रमक आणि कॅची हेडिंग देण्याचा हातखंडा, अप्रतिम इंट्रो, बांधीव, घोटीव बातमी आणि शब्दांवरील हुकूमत… ही शेजवळ सरांची अस्त्र आहेत. त्यांच्या बातमी किंवा लेखात हा संपूर्ण दारुगोळा ठासून भरलेला असतो. आणि हो, एखादा अर्ज लिहायचा असेल तर तो शेजवळ सरांनीच लिहावा, इतकं त्यांचं ड्राफ्टिंग अप्रतिम आहे. त्यांच्या या वैशिष्ट्यांचं निरीक्षण करत करतच आम्ही ‘लोकनायक’मध्ये पत्रकार म्हणून घडलो.
२००६च्या पावसाळ्यात मी ‘लोकनायक’मध्ये रुजू झालो. त्यावेळी ठाण्याच्या पश्चिमेला दादोजी कोंडदेव स्टेडियमकडे जाणाऱ्या खारटन रोडवर लोकनायकचं ऑफिस होतं. ऑफिसच्या आजूबाजूला वखारी, फर्निचरची दुकानं आणि हाकेच्या अंतरावर स्मशानभूमी. त्यामुळे स्मशानभूमीत प्रेत जळालं की त्याचा धूर हमखास नाकातोंडात जायचा. ऑफिस तसं बरं होतं. तळमजला अधिक एकमजली. तळमजल्यावर जाहिरात सेक्शन तर वरच्या मजल्यावर संपादकांची केबिन होती. तिथंच सर्व ऑपरेटर, उपसंपादक आणि रिपोर्टर बसून काम करायचे. तर तळमजल्यावर एका कोपऱ्यात कोंदट जागेत शेजवळ सरांची केबिन होती. शेजवळ सरांसहीत दोन माणसं जेमतेम बसतील अशी ही जागा होती. त्या केबिनमध्ये पेपरचा प्रचंड ढिग असायचा. तिथंच बसून कार्यकारी संपादक असलेले शेजवळ सर अग्रलेख आणि मुख्य बातमी लिहायचे. अग्रलेख, बातमी लिहिण्याची किंवा हेडिंग देण्याची सरांची खास स्टाइल होती. कोणतीही बातमी किंवा अग्रलेख लिहिण्यापूर्वी ते हमखास सिगारेट पेटवायचे. मग सिगारेटचे झुरके घेत घेत त्यांचं विचारमंथन सुरू व्हायचं. विचाराची तंद्री लागायची अन् त्यांच्या जाड्या ठसठशीत पेनातून शब्द मोत्यासारखे कागदावर उतरायचे. कागदावर एकटाकी बातमी किंवा अग्रलेख उतरायचा. मी अनेक पत्रकारांसोबत काम केलं. अनेकांची कामाची पद्धत पाहिली. बातमी किंवा लेख लिहिताना कागदावर कागद फाडणारेही पाहिले आणि कागदाला पेन न लावणारेही पाहिले. (अर्थात जीव ओवाळून टाकावा अशी बातमी लिहिणारेही पाहिले आणि त्यांच्याकडूनही खूप काही शिकायलाही मिळाले.) पण, त्यात शेजवळ सर अनोखे आहेत. शेजवळसरांसोबत मी ‘लोकनायक’ आणि ‘सामना’त अशी आठ वर्षे काम केलं. या काळात त्यांना कधीच बातमी किंवा लेख लिहित असताना कागदावर कागद फाडताना पाहिलं नाही. लिहायचं ते एकटाकी आणि परफेक्टच. त्यांचं हे लिखाण पाहून थक्क व्हायला व्हायचं. शेजवळ सरांना पहिल्यांदा याच केबिनमध्ये भेटलो. धिप्पाड शरीरयष्टी, अंगात सफारी, तेजस्वी माथा, खर्जातला आवाज… सरांचं मला झालेलं हे पहिलं दर्शन. विशेष म्हणजे लोकनायकचे संपादक, मालक दिवंगत कुंदन गोटे सरांनी मला शेजवळ सरांच्यासोबत पहिल्या पानावर काम करण्याची संधी दिली. त्यामुळे सरांशी मैत्री जमली आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं.
शेजवळ सर साधारणपणे सकाळी ११ वाजता ऑफिसला यायचे आणि मी १० वाजता. त्यामुळे सर येईपर्यंत काही घटना घडामोडी असेल तर त्याची नोंद करून महत्त्वाच्या बातम्या असतील तर रिपोर्टरशी फोनाफोनी करून बातम्या करून ठेवाव्या लागायच्या. सर आल्यानंतर त्यांना सर्व अपडेट्स द्यावे लागायचे. तसेच दिवसभरात काही बड्या घडामोडी असेल तर त्याही सांगाव्या लागायच्या. त्यानुषंगाने मग पुढचं काम सुरू व्हायचं. साधारण ५ वाजेपर्यंत आम्ही पहिल्या पानाच्या बातम्या करायचो. त्यानंतर ६च्या सुमारास सर पान लावायला यायचे. त्याचं कारण असं की छोटं वर्तमानपत्रं असल्याने रात्री ९ वाजेची डेडलाइन असायची. ९वाजेपर्यंत पानं मेलवर गेली नाही तर छपाई लांबली जायची आणि दुसऱ्या दिवशी अंक वाचकांपर्यंत पोहोचायचा नाही. शिवाय राज्यातील काही जिल्ह्यातही पेपरचं वितरण व्हायचं नाही. त्यामुळे ९ची डेडलाइन पाळणं हे बंधनकारक होतं. सर पान लावत असताना फॅक्स, टीव्हीकडे नजर ठेवून फोनकडे कान ठेवावे लागायचे. कारण कोणत्यावेळी कोणती बातमी येईल याचा भरवसा नसायचा. पान लावताना शेजवळ सरांच्या मागे उभं राहून ते पान कसं लावतात. कोणत्या बातमीला प्राधान्य देतात, बातमी कुठे घेतात, लीड काय करतात? किती कॉलम करतात? अँकरला कोणती बातमी घेतात? हे सारं पाहून पाहूनच शिकणं व्हायचं. सरांची खासियत म्हणजे ते कधीच कागदावर पहिल्या पानाची डमी तयार करायचे नाहीत. अख्खं पान त्यांच्या डोक्यात असायचं. विशेष म्हणजे कधीही त्यांनी तोच तोच लेआऊट दिला नाही. रोज वेगळा लेआऊट असायचा.
दलित अत्याचार प्रश्नः
एखादा प्रश्न हातात घेतल्यावर खासकरून दलित अत्याचाराचा प्रश्न हाती घेतला की तो सोडवल्याशिवाय ते स्वस्थ बसायचे नाहीत. खैरलांजीप्रकरण त्याचंच एक उदाहरण. रिपाइं (खोब्रागडे गट) नेते राजाराम खरात हे तेव्हा भंडाऱ्याच्या दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांना खैरलांजीत दलित कुटुंबाचं हत्याकांड झाल्याचं कळलं. त्यांनी गावात जाऊन माहिती घेतली आणि आम्हाला फोन करून ही माहिती दिली. त्यानंतर आम्ही फोनाफोनी करून अधिक माहिती मिळवून लोकनायकला पहिली बातमी दिली. कोणत्याही दलित वर्तमानपत्रात तोपर्यंत ही बातमी नव्हती. या घटनेनंतर शेजवळ सर थांबले नाहीत. त्यांनी त्यांचे सोर्स वापरले आणि लोकनायकमध्ये रोज खैरलांजी हत्याकांडाशी संबंधित बातम्या येऊ लागल्या. बातम्या देतानाच या हत्याकांडाचा शासकीय यंत्रणेला जाब विचारणाऱ्या परखड अग्रलेखांची मालिकाही सुरू केली. या हत्याकांडाची दखल ‘तहलका’नेही घेतली, प्रस्थापित वर्तमानपत्रेही खडबडून जागी झाली. या हत्याकांडाच्या निषेधार्थ आंदोलनेही उभी राहिली आणि खैरलांजी प्रकरणाची जगानेही दखल घेतली. त्यावेळी पेटलेल्या आंबेडकरी जनतेच्या आंदोलनात उल्हासनगर येथे डेक्कन क्वीन पेटवण्यात आली होती. त्या बातमीची हेडलाइन करताना सरांनी रिपब्लिकन पक्षाचे पहिले अध्यक्ष एन. शिवराज यांच्या ऐतिहासिक उद्गाराची लोकनायकला स्कायलाइन केली होती. ती होती: ‘डेड आंबेडकर इज मोअर डेंजरस दॅन अलाइव्ह’. या प्रकरणामुळे दलित समाजात लोकनायकची लोकप्रियता वाढली. समस्या, अत्याचाराच्या बातम्यांचा खच पडू लागला. प्रत्येक बातमीची शहानिशा करून त्या लोकनायकमध्ये छापल्या जाऊ लागल्या. दलित समाजातील कार्यकर्ते, नेते, कलावंत आणि विद्यार्थ्यांचा लोकनायकच्या कार्यालयात राबता सुरू झाला. अर्थातच शेजवळ सरांना हे सर्व लोक आधी भेटायचे आणि नंतर संपादकांना. त्याला कारणही तसंच होतं. सर केवळ पत्रकारच नाहीत, तर ते दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते, कार्यकर्तेही आहेत. पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे सरांनी नामांतराच्या काळात ‘दलित मुक्ती सेने’ची स्थापना केली होती. त्या दलित मुक्ती सेनेचे शेजवळ सर मुंबईचे अध्यक्ष होते. चळवळीत त्यांना ‘भाई’ किंवा ‘दिवाकर भाई’ म्हणूनच संबोधलं जातं. त्यामुळे भाईला भेटायला हे लोक हमखास लोकनायकला यायचे.
तसं पाहिलं तर शेजवळ सरांच्या स्वभावाचा थांग लवकर लागत नाही. म्हटलं तर ते मितभाषीही आहेत आणि म्हटलं तर गप्पीष्टही आहेत. बऱ्याचदा ते अत्यंत शांत असतात. वायफळ बोलणं, गॉसिप करणं त्यांना आवडत नाही. मात्र, जेव्हा गप्पांची मैफल रंगते तेव्हा ते किश्श्यांचा अक्षरश: पाऊस पाडतात. चळवळीतील घटना घडामोडींपासून आंबेडकरी जलसे ते पत्रकारितेतील किस्से ते आवर्जून ऐकवतात. पण हे किस्से ऐकवताना कोणत्याही व्यक्तीची मानहानी होणार नाही, याची खबरदारीही घेतात. प्रसिद्ध गीतकार आणि गायक नवनीत खरे, राजस जाधव, प्रतापसिंग बोदडे यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न कलावंतांवर सरांचं प्रचंड प्रेम. त्यांच्याशी चर्चा करताना ते यावर भरभरून बोलायचे. नवनीत खरे यांची काव्य प्रतिभा, त्यांच्या गीतातील सौंदर्यस्थळे, शब्द सामर्थ्य आणि गीत लेखनाची त्यांची हातोटी… या गोष्टी ऐकाव्यात तर त्या शेजवळ सरांकडूनच. त्यांनी लोकनायकसाठी लिहिलेल्या पहिल्या अग्रलेखाचे ‘सांग, तुला चीड कधी येणार?’ हे शिर्षकच मुळी खरे यांच्या एका कवितेतील ओळींचे होते.
आंबेडकरी कलावंतावर विशेष माया असणारे
कलावंतांचा विषय निघाला आहे म्हणून एक गोष्ट सांगावीशी वाटते. लोकनायकमध्ये आंबेडकरी कलावंतांवर माझा एक कॉलम होता. पुढे त्याचं ‘आंबेडकरी कलावंत’ हे पुस्तकही आलं. त्यातील प्रत्येक लेखाला सरांनीच हेडिंग दिल्या आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर, ‘बाबासाहेब जिंदाबाद’साठी कांचन मोडीत काढणारे कुंदन कांबळे!, सर्वस्पर्शी ‘डोंबिवली फास्ट’ गीते लिहिणारा दीपशाम मंगळवेढेकर, विठ्ठल शिंदे: बंद रेडिओने घडवलेला ‘रेडिओस्टार’, हरेंद्र जाधव: पक्षाघाताने ‘मूक’ झालेला प्रतिभासंपन्न कवी!, यमराज पंडित: दुफळी सांधण्यासाठी ‘पार्टी’शिवाय धडपडणारा कलावंत!, साजन शिंदे: उर्दू-मराठी अंकलिपीने घडवलेला कवी, मधुकर घुसळे: ‘होऊ द्या दमानं’चा अज्ञात ‘कारभारी’ आदी. या प्रत्येक हेडिंगमधून त्या कलावंताचं व्यक्तित्त्वच त्यांनी अधोरेखित केलं आहे. माझ्याच नव्हे तर दिवंगत कवी, गायक बाळहरी झेंडे साहेब यांच्यासह इतर लेखकांच्या लेखांनाही सरच हेडिंग द्यायचे. दिवंगत कवी दया हिवराळे यांच्या नामांतर लढ्याचा इतिहास जागवणाऱ्या ‘नामांतर लढ्यातील लढवय्ये’ या पुस्तकातील प्रत्येक लेखाचं हेडिंग सरांच्याच लेखणीतून उतरलं आहे.
त्यांचे पहिल्या पानावरील आठ कॉलमी अग्रलेख हे तर लोकनायकसाठी आकर्षण नव्हे, तर शक्तीस्रोत होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आंबेडकरी जनतेला त्यांच्या राजकीय शक्तीची जाणीव करून देण्याचं काम त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या अग्रलेखांनी त्याकाळात केलं. बसपा नेत्या मायावती यांनी एकहाती स्वबळावर आणलेली सत्ता हा त्या काळात चमत्कार म्हणून प्रसारमाध्यमांत चर्चेचा विषय ठरला होता. त्यावर अग्रगण्य दैनिकांच्या नामवंत संपादकांनी लिहिलेल्या अग्रलेखांचे संकलन असलेला एक ग्रंथ ‘सुगावा’ प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला आहे. त्यात दलितांच्या वृत्तपत्रांतील फक्त आणि फक्त लोकनायकमधील शेजवळ सरांच्याच अग्रलेखाला स्थान मिळाले आहे. ‘बसपाच अडकली मनुवाद्यांच्या मायाजालात!’ या गाजलेल्या अग्रलेखात त्यांनी केलेले विश्लेषण बिनतोड होते. कारण त्या सत्ताप्राप्तीनंतरच बसपाचे त्या राज्यात नष्टचर्य सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.
महाकवी नामदेव ढसाळ आणि शेजवळ सरांची खास मैत्री
महाकवी नामदेव ढसाळ आणि सरांची चांगली दोस्ती होती. सर नामदेवदादांना भेटायला नेहमी त्यांच्या घरी जायचे. दादाही नेहमी लोकनायकच्या ऑफिसला यायचे. शिवाय दादांचा लोकनायकमध्ये कॉलमही सुरू होता. त्यामुळे सर आणि दादांचं वारंवार बोलणं व्हायचं. नामदेवदादा हे दलित पँथर्सचा वर्धापन दिन दरवर्षी ९ जुलै रोजी मुंबईत मेळावा घेऊन साजरा करायचे. पण एकदा त्यानिमित्त लोकनायकमध्ये लिहिलेल्या अग्रलेखात शेजवळ सर यांनी ‘पँथर कधीचीच संपली आहे. तिचा वर्धापन दिन हा निव्वळ उपचार आहे. पण कवी हृदयाचे हळवे नामदेवदादा हे वास्तव स्वीकारायला काही तयार नाहीत,’ असे लिहिले होते. त्यावरून नामदेवदादा कमालीचे दुखावले होते. मग त्यांनीही त्या अग्रलेखाला प्रत्युत्तर देणारा लेख लिहिला.’ पँथर मेली साखर वाटा… ‘ असं त्या लेखाचं हेडिंग होतं. त्यात शेजवळसरांवर टीका करण्यात आली होती. त्यामुळे दादांचा लेख छापावा की छापू नये, या पेचात संपादक कुंदन गोटे पडले. पण त्यातूनही सरांनीच मार्ग काढला. त्यांनी दादांचा लेख जसाचा तसा छापला. हा सरांचा दिलदारपणा होता आणि ढसाळांवरचं निर्व्याज प्रेमही. पण, याप्रकरणामुळे दोघांच्या दोस्तीत कधीच वितुष्ट आलं नाही. पुढे एकदा नामदेवदादांची तब्येत बिघडली. दादा रुग्णालयात अॅडमिट झाले. उपचार महागडे होते. त्याचा खर्च दादांना परवडत नसल्याची कुणकुण लागताच सरांनी दादांच्या आजारपणाची बातमी छापली आणि मदतीचं आवाहन केलं. पँथर नेते ज.वि. पवारही त्यासाठी पुढे सरसावले. या बातमीमुळे दादा नाराजही झाले होते. पण सरांची भावना प्रांजळ होती आणि त्यावेळी ती गरजही होती. त्यानंतर एका इंग्रजी वर्तमानपत्राने सुद्धा दादांच्या आजारपणाची बातमी छापली. त्यामुळे दादांना बॉलिवूडमधून आर्थिक मदतीचा हात मिळाला आणि दादा बरे होऊन घरीही आले. त्यानंतर पुन्हा दादा आणि सरांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. आंबेडकरी चळवळीच्या मुशीत तयार झालेल्या शेजवळ सरांनी वैयक्तिक आयुष्यात कधीच कुणाबद्दल शत्रूत्व बाळगलं नाही. पुढे काही कारणाने सरांना आणि मला लोकनायक सोडावा लागला. आम्ही दोघेही एकाच दिवशी तिथून बाहेर पडलो. त्यानंतर आम्ही सामनात आलो. पण दलितांवर अत्याचार झाल्यावर स्वस्थ बसतील ते शेजवळ सर कसले? ‘लोकनायक’प्रमाणेच ‘सामना’तही त्यांनी दलितांवरील अत्याचाराच्या बातम्या आवर्जून छापल्या. अगदी सामनाच्या पहिल्या पानावर या बातम्या आल्या. सामनाच्या संपादकीय पानावर आणि उत्सव पुरवणीतही त्यांनी लेख लिहून दलित अत्याचाराला वाचा फोडली. दादरच्या आंबेडकर भवनच्या मध्यरात्रीनंतर घडवण्यात आलेल्या ‘खासगी’ डिमोलिशन विरोधातील लढ्याला तर सर्वाधिक बळ सामनानेच दिले होते, हे सर्वश्रुत आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत सरांनीही त्यांना पूर्ण मोकळीक दिली होती. आता सरांना, सामनातून निवृत्त होऊन एक वर्ष झालंय. सरांनी हयातभर सामाजिक जाणीवेची पत्रकारिता केली. त्यांच्या लेखणीने सातत्याने आंबेडकरी चळवळीत प्राण फुंकण्याचं काम केलं. आजही ते फेसबुकवरून सध्याच्या परिस्थिवर भाष्य करत असतात. सोशल मीडियावरून चळवळीचे भाष्यकार असल्याचा आव आणून शब्दांच्या वाफांचा वारू उधळणाऱ्या तरुणांना गाइडलाइन देण्याचं काम सर करत आहेत. हे सर्व सांगायचं म्हणजे सर ६० वर्षांचे झालेत. सरांची ही षष्ठ्यब्दी आहे. उत्साह आणि ऊर्जेने भरलेल्या ‘दिवाकरा’ची लेखणी आजही तळपत आहे. पुढेही तळपत राहील, याची खात्रीच आहे. सरांना दीर्घायुष्य लाभो हीच शुभेच्छा!