आंबेडकर चळवळीतील एक वादग्रस्त झुंजार पर्व…..!.- ऍड बी सी कांबळे
६ नोव्हेंबर२००६ , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू व निष्ठावान सहकारी , त्यांच्या जनता साप्ताहिकाचे संपादक ,एकवेळ आमदार ,दोन वेळा लोकसभा खासदार , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे संस्थापक नेते ,निर्भीड,अभ्यासू विद्वान लढावू झुंजार संसदपटू ,घटनातज्ञ, अॅड.बापुसाहेब तथा बी सी कांबळे साहेब यांना आज 13 व्या स्म्रुतीदिनी विनम्र अभिवादन …..
बापु चंद्रसेन तथा बापुसाहेब बी सी कांबळे साहेब यांचा जन्म१५ जुलै १९१९ रोजी सांगली जिल्ह्यातील पलुस गावी झाला .कुशाग्र बुध्दीच्या बापुचे बालपण हलाखीत गेले.शालेय शिक्षण संपवून ते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मधून बी. ए. तर न्यु लाॅ काॅलेजमधून एल एल बी झाले . विद्यार्थी दशेपासूनच ते आंबेडकरी चळवळीशी जोडले गेले.त्या काळच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी किर्लोस्कर मासिकात लिहिलेला एक लेख बाबासाहेब आंबेडकरांच्या वाचनात आला ,
बाबासाहेब हे रत्नपारखी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या नजरेने ते हेरले . लेखकाच्या नावाव्यतिरिक्त लेखकाची माहितीच नव्हती. पण मासिकाचे संपादक मुकुंदराव किर्लोस्कर बाबासाहेबांचे मित्र होते त्यांचेशी संपर्क साधून बाबासाहेबांनी बापुसाहेबांना त्वरीत मुंबईस बोलावून घेतले औपचारिक चर्चा झाल्यावर बाबासाहेबानी त्यांना “जनता” साप्ताहिकाचे संपादक म्हणून नेमणूक करून त्वरीत जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले . बापुसाहेब कांबळे साठी हा सुखद व आश्चर्याचा धक्का होता . बापुसाहेबानीही कुशलपणे व कार्यक्षमतेने जनता साप्ताहिक यशस्वीपणे चालवून बाबासाहेबांनी व त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला तेव्हापासून ते बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू ,निष्ठावान व समर्पित सहकारी बनले व शेवटपर्यंत आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीशी एकनिष्ठ राहीले . पुढे १९५३ साली सार्वत्रिक निवडणुकीत शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ला विशेष यश मिळाले नाही बाबासाहेबही लोकसभेवर निवडून आले नाही . पण वरळी मुंबईतून बापुसाहेब आमदार म्हणून निवडून आले.
त्यावेळी गुजरात महाराष्ट्र मिळून मुंबई राज्य BOMBAY STATE हे द्विभाषिक राज्य होते. १९५४ ला देशात विविध राज्यांची पुनर्रचना होऊन तेलगू भाषिकांसाठी आन्ध्र प्रदेश राज्य निर्माण झाले .त्याच धर्तीवर मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे म्हणून मराठी जनतेने आंदोलन सुरू केले .पण केंद्र सरकारने त्यास नकार दिला. राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी संयुक्त महाराष्ट्रात समिती स्थापन करुन राज्यभर लढा तीव्र केला . मोरारजी देसाई तेव्हां काँग्रेस सरकारचे मुख्य मंत्री होते पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात 106 आंदोलकांचा बळी जाऊन त्यांना होतात्म्य आले. महाराष्ट्रभर जनतेत उद्रेक व असंतोष पसरला. सर्व विरोधी पक्षाच्या आमदारांनी राजीनामे दिले. पण बाबासाहेबांनी बापुसाहेबाना रोखूनी विधानसभेत हा लढा लढण्याचे आदेश दिले.तेव्हा विधानसभेत अभूतपुर्व दृष्य होते . सत्ताधारी बाकावर पूर्ण मंत्रिमंडळ व काँग्रेस चे सर्व आमदार व पूर्णपणे रिकाम्या बाकावर एकमेव आमदार बापूसाहेब बी सी कांबळे साहेब .पण बाबासाहेब आंबेडकरांच्या तालमीत तयार झालेल्या या अभ्यासू ,कायदा व घटनातज्ञ आमदाराने एकट्याने विधानसभेत महिनाभर किल्ला लढवून मोरारजी व त्याच्या काँग्रेस सरकारला अचूक घटनात्मक पेचात पकडत सरकारची कोंडी केली .दररोज प्रश्न उपप्रश्न ,स्थगन प्रस्ताव, लक्षवेधी सूचना , अशा विविध संसदीय आयुधे व अस्त्राचा मारा करत सरकारला हतबल केले .विधानसभेत हा लढा तर महाराष्ट्रात जनतेचा रस्त्यावर लढा चालू होता विधानसभेतील बातम्या महाराष्ट्रात आगीच्या वणव्यासारख्या पसरून बापुसाहेब सर्व महाराष्ट्रास परिचित झाले. अखेर मोरारजीना नमते घेऊन गोळीबाराच्या चोकशी साठी न्यायिक आयोग नेमून राज्यासंबंधी केंद्र सरकारने निर्णय घ्यावा असा ठराव पाठवावा लागला .
एकटा अभ्यासू आमदार काय करू शकतो हे बापुसाहेब कांबळे यांनी कृतीने दाखवून दिले .आचार्य अत्रे यांनी … एकाकी लढणारा लढावु झुंजार आंबेडकरी शिलेदार …..असा त्याच्या मराठा दैनिकात अग्रलेख लिहून त्याचा गौरव केला . संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे 1१९५७ साली झालेल्या निवडणुकीत शे का फे चे लोकसभेवर १२ खासदार निवडून गेले तर मुंबई विधानसभेत ३५ आमदार निवडून आले स्वत: बापुसाहेब साखरसम्राटाच्या नगरजिल्ह्यातील कोपरगाव या जनरल मतदार संघातून विजयी होऊन लोकसभा खासदार झाले .
३आक्टोबर१९५७ साली नागपुर येथे बाबासाहेबांच्या संकल्पनेतील व त्यांनी भारतीय जनतेस खुल्या पत्रात अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. शे का फे च्या केंद्रीय कार्यकारिणी व नेत्यांनी रिपब्लिकन पार्टीच्या स्थापनेचा ठराव मांडण्याचा मान बापुसाहेब कांबळे यांना दिला व त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना होत असल्याची घोषणा करून तो ठराव सर्वसंमतीने संमत झाला . लोकसभेतही बापुसाहेबानी ,बौध्दाच्या सवलती , मागासवर्गावरील अन्याय ,कायदा सुव्यवस्था ,आर्थिक धोरण , परराष्ट्र धोरण अशा विविध विषयांवर प्रश्न विचारून व चर्चेत भाग घेत संसदीय कामाकाजतही बहुमोल योगदान दिले . पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू देखील त्याचे भाषण लक्षपूर्वक ऐकत असत व विरोधी पक्षही त्याचा आदर करत असत .१९६० नंतरच्या काळात त्याना सत्तेचे आमिष दाखवून काँग्रेस मधे सामील करण्याचे प्रयत्न झाले. पण निष्ठावान बापुसाहेबांनी आपला आंबेडकरी बाणा कायम राखून नकार दिला . व आयुष्यभर काँग्रेस विरोधात लढत राहिले ..
१९७१ च्या लोकसभा निवडणूकीत सत्तेचा गैरवापर केला हा आरोप सिद्ध होऊन जून १९७५ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यावर त्यांनी देशात आणीबाणी लागू केली . तेव्हा ही बापुसाहेबानी त्याला कडाडून विरोध केला मुंबईत आणीबाणी विरोधात प्रचंड मोठी जाहीर सभा घेतली . नंतर १९७७ ला झालेल्या निवडणूकीतही ते मुंबईतून लोकसभेवर निवडून गेले व लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचा आवाज उठवत राहीले .
।
१९८४ साली भारताच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली . काँग्रेस तर्फे आर वेंकटरमण हे उमेदवार होते . तेव्हा सर्व विरोधी पक्षांनी मिळून एकच संयुक्त उमेदवार लढवण्याचे ठरवले . अनेक नावावर चर्चा झाली. पण एकमत होत नव्हते तेव्हा चर्चेत एक नाव पुढे आले व सर्व विरोधी पक्ष त्यावर सहमत झाले ते नाव होते बापुसाहेब बी सी कांबळे यांचे. तेव्हां त्यांनी नम्रपणे नकार दिला. पण सर्व पक्षानी आग्रह धरल्याने त्यांनी ती निवडणूक लढविली . रिपब्लिकन पक्षासाठी हा बहुमान व ऐतिहासिक क्षण होता की देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी विरोधी पक्षांनी रिपब्लिकन नेत्याला उमेदवारी दिली होती .
असे हे निष्ठावान बापुसाहेब शेवटपर्यत आंबेडकरी विचारांशी , रिपब्लिकन चळवळीशी आयुष्यभर निष्ठावान राहीले . सत्ता संपत्तीची कधी हाव धरली नाही मुबईत त्यांचा बंगला नव्हता ना गाडी होती .ना ते कोट्याधीश होते . आज नगरसेवक ही लगेच कोट्याधीश होतो ,पण एकवेळ आमदार दोनदा लोकसभेचे खासदार राहीलेले बापू साहेब शेवट पर्यत सामान्यच राहीले .
६नोव्हेंबर २००६ ला वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत त्यांनी शेवटचा श्वास घेवून जगाचा निरोप घेतला .
या निष्ठावान स्वाभिमानी , लढावू झुंजार आंबेडकरी शिलेदाराला व थोर रिपब्लिकन नेत्याला भावपूर्ण आदरांजली , विनम्र अभिवादन व सहस्त्र वंदन ……….!
अभिवादनकर्ते अॅड रमेश सपकाळे मुंबई .
(सभार फेसबुकवरून )