केंद्रीय गृहमंत्र्याची सभा उधळणारे पँथर्स!-दिवाकर शेजवळ
राज्याचे नवे सामाजिक न्याय राज्य मंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांचा उद्याचा वाढ दिवस हा त्यांचे चाहते आणि रिपाइं कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित करणारा असेल। कारण मंत्रीपदावर विराजमान झाल्यानन्तर लगेचच आलेला त्यांचा हा पहिलाच वाढ दिवस आहे। त्यानंतर तीन दिवसांनी केंद्रीय राज्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, महातेकर या दोघाही नेत्यांचा मुंबईत सत्कार समारंभही पार पडणार आहे।
महातेकर हे राज्य मंत्री झाल्यानन्तर सोशल साईट्सवर उमटलेल्या प्रतिक्रिया भलेही संमिश्र असतील। तो राजकीय मतांतराचा भाग असल्याने ते स्वाभाविकच होते। पण महातेकर यांना व्यक्तिशः टीकेचे लक्ष्य केले जावे, असे ते वादग्रस्त व्यक्तिमत्व खचितच नाहीत।
दलित पँथर पासून त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि रामदास आठवले यांच्या रिपाईमध्ये मोठे आणि प्रदीर्घ योगदान दिलेले आहे। त्यामुळे त्यांच्याबद्दल वृत्तपत्रांतून बरेच आणि चांगलेच लिहिले गेले आहे। त्यांना सत्तेचा मिळालेला लाभ औट घटकेचा ठरणार आहे, याची खंत आंबेडकरी चळवळीतील अनेकांना वाटते आहे। त्यामुळे महातेकर यांच्या राज्य मंत्री पदाबद्दल मुखमंत्र्याचे कौतुक करण्यासारखे काय आहे, असे उद्वेगाने मीही याआधो लिहिले आहे। असो।
महातेकर हे दलित पँथरच्या ‘पंचका’ पैकी म्हणजे पाच संस्थापक नेत्यांपैकी एक आहेत। नेतृत्वाच्या त्या फळीने आता वयाची पंचाहत्तरी ओलांडली आहे। काल परवाच अर्जुन डांगळे यांनीही 75 व्या वर्षात पदार्पण केले। जे इतिहास विसरतात,ते इतिहास घडवू शकत नाहीत, असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बजावले होते। त्यामुळे
आंबेडकरी विचाराने भारावलेली 1970 च्या दशकातली ती पिढी अधाशा सारखी वाचत होती। अन पँथरच्या मंतरलेल्या काळात शिरावर कफन बांधून अत्त्याचारांविरोधात लढत होती। अत्त्याचार घडेल,तिथे परिणामांची पर्वा न करता धडकत होती।
1977 ते 1979 चा तो काळ होता। आणीबाणीपायी इंदिरा गांधी यांनी सत्ता गमावल्यानंतर केंद्रात जनता पक्षाचे सरकार येऊन मोरारजी देसाई हे पंतप्रधान बनले होते। तर, चरणसिंग हे उप पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री होते। त्या काळात आंबेडकरी चळवळ बौद्धांच्या सवलतीच्या प्रश्नावर केंद्रित झाली होती। पण मोरारजी आणि चरणसिंग या दोघांनींही उघडपणे बौद्ध जनतेविरोधात भूमिका घेतली होती। ‘ तुम्हाला बौद्ध व्हायला मी नव्हते सांगितले’ असे उर्मट उदगार काढत मोरारजी यांनी भैयासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा अवमान केला होता। तर, चरणसिंग यांनी बौद्धांना सवलती देण्यास कडाडून विरोध केला होता।
त्यावेळी राजा ढाले- नामदेव ढसाळ यांच्यातील वादाची परिणती दलित पँथरच्या बरखास्तीत झाली होती। पण चवताळलेला पँथर काही संपलेला नव्हता। मुंबईत त्यावेळी भाई संगारे यांचा पँथर गट तगडा होता। समोर कोणीही असो,त्याच्यावर तुटून पडणारे बेडर पँथर्सचं छावणी छावणीत होते।
अन एके दिवशी मुंबईत शिवाजी पार्कवर देशाच्या गृह मंत्र्याची, चरणसिंग यांची सभा चक्क उधळली गेली। त्या पँथर्सचे नेतृत्व केले होते अविनाश महातेकर यांनी। त्यावेळी गृह मंत्र्याच्या व्यासपीठावर धडक मारतांना त्यांच्यासोबत होते संग्राम पगारे, तानसेन ननावरे, बाबुराव शेजवळ, रमाकांत गवळी, चिंतामण गांगुर्डे असे शेकडो पँथर्स। या पँथर्सना त्यावेळी पोलिसापेक्षा अधिक चोप जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मिळाला होता।
आंबेडकरी चळवळीचा हा घनघोर संग्रामाचा इतिहास किती लोकांना ठाऊक आहे ? आजची फेसबुकी तरुण पिढी स्वतः चळवळ न जगता आपल्या पूर्वसूरींना अज्ञानातून जेव्हा लाखोली वाहते,तेव्हा तीव्र दुःख होते।
महातेकर साहेब, आपणास दिर्घआयुरोग्य लाभो यासाठी भरभरून शुभेच्छा आणि तथागता चरणी प्रार्थना।
लेखक-जेष्ठ पत्रकार ,संपादक -दिवाकर शेजवलकर
छायाचित्रे:
अविनाश महातेकर, संग्राम पगारे
-प्रस्तुत लेखक आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ पत्रकार,संपादक आहेत.