हाथरस चा आक्रोश ऐकू येतोय का? की ! आपल्या गावात, आपल्या घरात घडल्यावर संवेदना जागृत होतील! बातमी म्हणून वाचली,पाहिली आणि केलंय दुर्लक्ष! पण परिणाम दूरगामी होत आहेत, हे ही ध्यानी असू द्या!
हाथरस या उत्तरप्रदेशातील छोट्या गावात १४ सप्टेंबर २०२० ला एका एकोणीस वर्षीय मुलीवरील पाशवी बलात्काराच्या घटनेने संवेदना जिवंत असणाऱ्या प्रत्येक मनाला वेदना झाल्या. आपण सध्या अशा कालखंडातून जात आहोत जिथे बलात्कार,एकतर्फी प्रेमप्रकरणातून हत्या झालेल्या लेकींच्या आईवडीलांचा न्यायासाठीचा गगनभेदी आक्रोश उठतो.काहीना या कानठळ्या ऐकू ऐतात..तर काही जण ठार बहीरेच!
पहिल्या घटनेचा आक्रोश सरत नाही तोवर दूसरी घटना कानी पडते. महीला अत्याचाराच्या बाबतीत अमानुषतेची परिसीमा गाठली जातेय.अशा हिंसक घटनांची चाके वेगाने धावत आहेत. ही आपण माणूस म्हणून जगत असलेल्या समाजाला काळीमा फासणारी घटना आहे.अशा घटना म्हणजे मनुवादी वर्णवर्चस्ववादी पितृसत्ताक पद्धती जिवंत आसल्याचे धोतक आहे. जी माणसाला कोणत्या जातीत जन्म घेतला यावरुन त्याच माणूसपण ठरवते.या जातीव्यवस्थेच्या उतरंडीत खालचा दर्जा हा बाईचा.त्यामुळे तीचे माणूसपण नाकारणारी हीच ती मनुवादी व्यवस्था!.
स्त्री म्हणजे भोगदासी अशा घृनास्पद,नासक्या विचारसरणी असलेल्या घरात जन्माला येणाऱ्या,स्वतःला स्वयंघोषित उच्चजातीचा माज असलेल्या घरातील हे बाळकडू! डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ मध्ये वर्णवर्चस्ववादी पितृसत्ताक पद्धतीचे धोतक असलेल्या मनुस्मृतीचे दहन केले होते. पण अजूनही हा विखार स्वतःला जन्माने श्रेष्ट समजणार्यांच्या मनातून गेलेला नाही.
त्याचाच परीपाक म्हणजे अशा घटना. त्या लेकीचा चा गुन्हा काय ? तिचा जन्म एका बहुजन, गरीब कुटूंबात झाला.चार नराधमांनी कोवळ्या जीवावर अत्याचार करुन,वाच्यता होवू नये म्हणून निघृणपणे जीभकापली.. जीवाच्या आकांताने तीने केलेल्या झटापटीत मोडलेला कणा…. .पंधरा दिवस मृत्यूशी झुंज देत जिवंतपणीच काय मरणयातना भोगल्या असतील या कल्पनेनेही थरकाप उडतो. अक्षरशः मन सून्न करणारी व ह्रदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. इतकेच कमी होते तर मृत्युनंतरही तिच्या वाट्याला हिंसाच आली.सपशेल सर्व पूरावे नष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मृतदेहाचे रात्री नातेवाईकांशिवाय कुठल्याही रितीरीवाजाशिवाय दहन केले. “सदरक्षणाय खलनिग्रहनाय” अशी थपथ घेतलेले पोलिसच भक्षक बनले आहे.प्रशासनाकडून सतत कुटूंबाला धमकावले जात आहे. ज्या कुटूंबाचा ‘काळजाचा तुकडा’ इतक्या निघृनपणे मारला जातो, त्यांना ‘कोरोनासे मर जाती तो क्या करते?’
अशाही प्रकारे दमदाटी ऐकावी लागत आहे. यातूनच तेथील सत्ताधारी शासन,प्रशासन, व्यवस्था गुन्हेगारांना वाचवण्यासाठी किती निष्ठावान आहे हे दिसत आहे. निर्भया केस लढलेल्या वकील सीमा कुशवाह यांनी अनेक प्रयत्न करुनही भेटूही दिले जात नाही. पिडीतेच्या कुटूंबाला मिडीयापासूनही लांब ठेवण्यात येत आहे. आज तक च्या पत्रकार तनुश्रीने पिडीतेचा मृतदेह जाळण्याची पोलिसांची केलेली अपराधजनक कृती लपून चित्रित केल्यामुळे तरी हे प्रकरण देशाला समजले. या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ही सजगता मिडियाने मनिषाच्या मृत्युपूर्वी दाखवली असती तर कदाचित मनिषा वाचली असती. पण मिडीया तेव्हा सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण चघळत होता.
ज्याप्रमाणे छ.शिवाजी महाराज,शाहू महाराज अशा महान राजांनी राज्यकारभार चालवला त्याप्रमाणे न्यायव्यवस्था बदलून अशा गुन्ह्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी.तुर्तास प्रत्येकाने भूमिका घेण्याची वेळ आलीय
पीडितेच्या संपूर्ण गावाला सध्या छावणीचेच स्वरुप आलेय.गरीबाला आपले म्हणणे मांडण्याचा ,न्याय मागण्याचा अधिकार नाही त्याचे कशाही प्रकारे शोषण होवू शकते हे सिद्ध होतेय.या हिंसेला बलात्कारी जेवढे जबाबदार त्यापेक्षा किंबहूना जास्तच त्यांची पाठराखण करणारे जबाबदार आहेत. या आरोपींना कठोरात कठोर शासन झाले पाहीजे तरच न्याय मिळेल.फास्ट ट्रक कोर्टात इन कमेरा सुनावनी होऊन लवकरात लवकर न्याय मिळावा, ही स्रीवादी संघटनांची अनेक वर्षांची मागणी आहे. त्याची तात्काळ अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षे चालणाऱ्या केसेस,पुराव्यांचे नष्ट करणे,साक्षीदार फिरवणे याला चालना देतात.समाजात अशा गुन्ह्याविषयी जरब निर्माण होत नाही तोपर्यंत हे दूष्टचक्र थांबणार नाही. प्रशासन काही घडलंच नाही आसा आव आणतंय.त्यात कहार म्हणजे बीजेपीचे आमदार सुरेंद्र सिंह यांचे वक्तव्य, “बलात्कारासारख्या घटनांना मुलींचे पालकच जबाबदार असतात.पालकांनी मुलींना चांगले संस्कार दिले पाहीजेत.”
मुलांना संस्कारांची गरज नाही असाच याचा अर्थ! या देशात २ वर्षे वयापासून ते ८० वर्षापर्यंतच्या म्हाताऱ्या स्रीवरही बलात्कार झालेत.जरा आठवून पहा म्हणावं.
“यत्र नार्यस्तु पुज्यंते रमन्ते तत्र देवतः” म्हणणाऱ्या आपल्या देशात एकूण गुन्हेगारीमध्ये बलात्कार हा गुन्हा सर्वात अव्वलस्थानी आहे. साधारणतः दरवर्षी ३०ते ४० हजार बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद होते.हे आकडे फक्त नोंद झालेले आहेत.नोंद न झालेलेही असतीलच की! दर सतरा मिनिटाला भारतात एक बलात्कार होतो असे राष्ट्रीय गुन्हे विभागाच्या नोंदी सांगतात.ही खूपच शरमेची व निंदाजनक बाब आहे.हे हैवान नेमके घडतात कसे यावरही चर्चा होणे गरजेचे आहे.
या घटनेचा मुळापासून विचार केला तर प्रत्येक पालक आपल्या मुलींना संस्कार करतच असतात.पण वेळ आलीय मुलांच्या अंतर्मनात खोलवर रुजतील अशा संस्कारांची. नुसत्या शालेय शिक्षणात लिंगसमभाव,समानता या घटकांचा अंतर्भाव करुन पुरेसे नाही. ते शिक्षण प्रत्येक घरातूनच मिळाले पाहीजे. मुल जन्माला येते तेव्हा तो मातीच्या गोळ्यासारखा असतो. आपणच मुलगा मुलगी असे भेद करुन त्याच्यावर तसे संस्कार करतो. मुलींचा सन्मान करणे हे शिकवणे प्रत्येक पालकाचे आद्यकर्तव्य हवे.मुली,स्रीयांबद्दलबद्दल अश्लिल भाषेत बोलणे,लैंगिकतेवर शिव्या देणे यावरही कठोरपणे बंधने हवी.मुलींचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी निर्णयप्रकियेत त्यांना घेतले जावे.
समाजाने आता नुसत्या बघ्याची भूमिका न घेता पिडीत मुलगी आपली बहीण,मुलगी आहे अशा भावनेने प्रश्नांचे मोहोळ उठवून कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.अन्यथा नाव बदलून हे दूष्टचक्र सुरुच राहणार आहे. ज्याप्रमाणे छ.शिवाजी महाराज,शाहू महाराज अशा महान राजांनी राज्यकारभार चालवला त्याप्रमाणे न्यायव्यवस्था बदलून अशा गुन्ह्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी.तुर्तास प्रत्येकाने भूमिका घेण्याची वेळ आलीय. अन्यथा सारेच येथे षंढ आता बंड करेल कोण? म्हणायची वेळ आलीय.
श्रीमती ज्योती थोटे-गुळवणे 9850211943 अंबड जि.जालना.