आंधळ्या शतकातील दोन डोळे

आंधळ्या शतकातील दोन डोळे’ हे पुस्तक माझ्या हातात आले. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि नाव वाचल्या नंतर, मी या पुस्तकाला वाचण्याशिवाय राहू शकलो नाही. या पुस्तकाचे लेखन केले आहे पेशाने पत्रकार असलेल्या श्री. वसंत वाघमारे यांनी. ‘एक अभ्यासू आणि वैचारिक लेखणीतून पुस्तकाचा जन्म झाला.’ असे विधानही अतिशयोक्त ठरणार नाही. लेखक चालवत असलेल्या प्रबुद्ध नेता या साप्ताहिकातून मांडलेल्या लेखांचा हे पुस्तक संग्रह आहे. लेखक सज्ञान झाल्यापासून आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत. चळवळीतल्या सक्रिय लेखणीने तोलून मापून योजलेले शब्दच जणू त्यांचे हे पुस्तक आहे .

आज डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजहर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले या सारख्या महापुरूषांच्या प्रतिमा समोर, त्यांच्या विचारांचा अभ्यास केलेल्या काही शिक्षितांना जेव्हा त्यांच्या विचारांना छेद देतांना पहातो. आणि मनात कुठेतरी चीड निर्माण होते. असे वाटते की, या महापुरूषांच्या विचारांना ही माणसं विसरली तर नसतील! मग अशा वेळेस वाटते की, लेखक वसंत वाघमारेंचे हे पुस्तक, त्या विसरलेल्या माणसाला पुन्हा आठवण करून देईल की, हे तुझे वर्तन महापुरूषांना मान्य नाही. .

दोन अडीचसे वर्षापूर्वीचा एक काळ होता आणि त्या काळात आजच्या इतका माणूस डोळस नव्हता. सलग एकमेकांना जोडणार्‍या वस्त्या नव्हत्या. प्रत्येक माणसासाठी अलिखित नियमावली बनवली होती. आणि प्रत्येक माणूस तिचा निमूटपणाने पालन करत होता. गावकूस हा शब्द बहु प्रचलित होता. गावकुसाच्या आतले आणि गावकुसाच्या बाहेरचे. आणि मुख्य म्हणजे हे नियम गावकुसाच्या आतल्यांनी त्यांच्या फायद्यासाठी ठरवले होते. आतली माणसं होती आणि बाहेरचीही माणसंच होती. आतली कुत्रा मांजर पाळत होती. पण गावकुसा बाहेरच्या माणसांची सावलीही त्यांना भ्रष्ट करायची. आतल्यामध्ये आणखी एक प्रकारची माणसं राहायची अन् ती माणसं होत्या स्त्रीया. त्यांना उपभोगाची वस्तू म्हणून जवळ बाळगले जायचे. पण जागा चप्पल स्टँडचीच होती. मूठभर पुरूषांनी स्वत:ला श्रेष्ठ ठरवत, अनेकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले होते. .पण यात एक समान दुवा हा होता की, अन्याय करणार्‍याला आणि तोच अन्याय सहन करणार्‍याला काही कमीपणाचे वाटत नव्हते. स्वत:च्या दैवाचा खेळ समजून सारे जगत होते. माणूस म्हणून कुणाची अस्मिता जागृत नव्हती. माणसं होती चालती फिरती पण जिवंतपणा नव्हता त्यांच्या जवळ. पुरूषप्रधानता व जातीपाती यांनी कळस गाठला होता. जोडीला पुर्वानुपार चालत आलेल्या अनिष्ट प्रथांनी मानव्य होरपळून निघाले होते. अनेक वर्ष एखाद्या भुमीवर सूर्यकिरण पडले नसेल तर, तेथील सजीवांची किती भयाण परिस्थिती असेल. या विचाराने अंगावर काटा उभा राहतो. पण अश्या भुमीवर सुर्याच्या प्रचंड ताकतीच्या दोन डोळ्यांची दृष्टी पडली. आणि खर्‍याअर्थाने मानवी जीवन रथाची प्रगतीकडे घोडदाैड सुरू झाली. आणि हे दोन प्रज्ञाचक्षू होते, एक डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे महात्मा ज्योतीबा फुले. .

जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक ज. वि. पवार यांनी ‘आंधळ्या शतकातील दोन डोळे’ या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. प्रकाशक राजेंद्र बनसोडे (कोमल प्रकाशन) यांनी मेहनतीने सुंदर पुस्तक बनवले आहे. .सदसद्विवेकबुद्धी वापरून माणूस जगू लागतो. त्यावेळेस खरा जगण्याचा आनंद लाभत असतो. काल्पनिक लिखाण मनाला तात्पुरता आनंद देईल. किंवा काल्पनिक लिखाणाकडे सहज विरंगुळा म्हणून वाचक वर्ग आकर्षित होईल. पण पुस्तकातून बाहेर आल्यावर ते पुस्तक विसरून जाईल. याचा अर्थ काल्पनिक लिहू नये किंवा वाचू नये, असे माझे मत नाही. जसे जेवण रूचकर बनवण्यासाठी ताटात लोणच्याची एक फोड घेतली जाते. पण त्या लोणच्याच्या फोडीचा उपयोग फक्त जेवण रुचकर व्हावे याचसाठी असतो. जेवढे प्रमाण भात भाकरीचे असते. त्या मानाने लोणचे अत्यल्प असते. काल्पनिक लिखाणाबाबत हा संदर्भ निश्चितच लागू पडतो. वास्तव आणि सत्याच्या नजदिक असणार्‍या लिखाणाची समाजाला खरीखुरी गरज आहे. जीवन विकासासाठी प्रेरणा देणार्‍या लिखाणाची समाजाला गरज आहे. खर्‍याखुर्‍या सुधारकांना समजून घेण्याची गरज आहे. त्यांच्या शब्द परीसाचा स्पर्श होण्याची गरज आहे. लेखन म्हणजे एक वैचारिक प्रवास असतो. आणि प्रवास हा एक प्रयास असतो. म्हणून कदाचित साहित्याला शब्दधन वदत असतील. ‘आंधळ्या शतकातील दोन डोळे’ ही वैचारिक साहित्यकृती हे काम इनामऐतबारे करणारे आहे असे वाटते. .

‘भारतीय संविधान निर्मिती एक सत्यता’ या खंडात संविधान निर्मितीची पार्श्वभूमी लेखक मांडतात. १९४५ चे दुसरे महायुद्ध संपले आणि आणि भारताच्या स्वातंत्र्याची प्राधान्यपूर्वक मागणी होऊ लागली. त्यासाठी ब्रिटीस सरकारने कॅबिनेट मिशन भारतात पाठवले. १६ मार्च १९४६ ला सत्ता हस्तांतरणाची घोषणा केली. तसेच भारताचा भावी कारभार चालविण्याच्या दृष्टीने संविधान निर्मितीसाठी, एक संविधानसभा स्थापन करण्यात यावी असेही सुचवले. त्या प्रस्तावानुसार संविधान सभेच्या स्थापनेसाठी भारतात निवडणूका घेण्यात आल्या. प्रांतिय सदस्यामधून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर निर्वाचत होऊ शकले नाही. काँग्रेसने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना विरोधामुळे बाबासाहेबांना बंगालच्या विधानमंडळातून जोगेंद्रनाथ मंडल व इतर अनुसूचित जातीच्या सदस्यांच्या पाठिंब्यावर विधानसभेत प्रवेश मिळवावा लागला. त्यावेळेस काँग्रेसला जुमानत डाॅ. बाबासाहेबांनी माघार घेतली असती. विधानमंडळात डाॅ. बाबासाहेबांचा प्रवेश झालाच नसता, सर्वात मोठ्या आदर्श लोकशाहीला भारताला मुकावे लागले असते. याच भागात पुढे लेखकाने संविधान निर्मितीची सत्य अधोरेखित केली आहेत. त्यासाठी अवर्जून हे पुस्तक वाचण्याची गरज आहे. .

‘आंधळ्या शतकातील दोन डोळे’ हे पुस्तकाचे नावाचा दुसर्‍या खंडात. .

हास्य का ? आनंद कारे ?

जळत असता नित्य कारे. .

घेरतो अंधार. . . .तरीही

शोधिशी ना दीप कारे ?. .

या धम्मपदाने लेखक सुरवात करातात. अंधार घेरतांना दीप न शोधण्याचा अज्ञानीपणा समाजात दिसतो आहे. साॅक्रेटीस, प्लेटो आॅरिस्टाटल या सारख्या अनेक जागतीक विचारवंतांनी प्रकाशमान विचार जगाला दिले. पण भारतात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले हे आंधळ्या समाजाचे खरेखुरे दोन डोळे होते. एखाद्या विद्यापीठाचे जसे कुलगुरू असतात. आणि या कुलगुरूंच्या वरचे एक कुलपती असतात. जर समाज सुधारक कुलगुरू असतील. तर महात्मा फुले कुलपती होते. .गढूळ समाज मनाच्या अंधारात वर्षानुवर्ष खितपत पडलेला समाजाला बाहेर काढणार्‍या या दोन असामान्य व्यक्तीरेखा. कुठल्याही प्रकारची तत्वात त्यांच्या तडजोड नव्हती. समाजाला पिचवणारे जे प्रश्न होते. त्या म्हणजे जातपात भेदाभेद त्यात अज्ञान व अंधश्रद्धा त्याचे मुख्य कारण होते. शिक्षणाचा अभाव हेच. या समाजाला बुद्धानंतर समतेच्या तत्वज्ञानाने प्रकाशमान करणार्‍या दोन डोळ्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. अत्यंत सुंदर अश्या दाखल्यातून व विवंचनातून या भागाला लेखक न्याय देतात. .तिसर्‍या प्रकरणात भिमा कोरेगावचा महार सैनिकांचा पराक्रम अधोरेखित केला आहे. संपूर्ण जगावर सत्ता गाजवणार्‍या या महार वीरांच्या पराक्रमाने ब्रिटीश राज्यकर्ते आवाक झाले. त्यांच्या स्मरणार्थ स्थंभ स्थापन झाला. .डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा लेखाचा समावेश लेखकानी केला आहे. तो समावेश नसता तर हे पुस्तकच अपूर्ण झाले असते. .’थेट आंबेडकरी चळवळीच्या वर्तुळातून’ या खंडात लेखक मांडतात की हे वैचारिक वर्तुळ असे घडले की, यातून कधी ते बाहेर नव्हते. आणि भविष्यात त्यांना बाहेर पडता येणार नाही. समाजात पेरली गेलेली विषमता आणि पिढीगणिक त्यात वाढ होता येणारा बाैद्धिक दुबळेपणाची साखळी तोडणारी ही आंबेडकरी चळवळ आहे. या अगोदर संतानी या बुरसटल्या विचार श्रेणीला, मुळापासून उपटून काढण्यासाठी हत्यार उपसले होते. पण कुठेतरी मर्यादा आल्याकारणाने त्यांना हत्यार म्यान करावे लागले. असे लेखकाचे म्हणणे आहे. लेखक ते सोदाहरणासहित विश्लेषण करतात. .

आंबेडकरी चळवळिचा मार्ग संघर्षाचा, भारतीय संविधान मानवमुक्तीचा जाहिरनामा, आरक्षण एक सामाजिक न्यायाचा लढा, जगातील लोकशाहीमध्ये भारतीय लोकशाहीचा २७ वा क्रमांक, महाड सत्याग्रह निर्मिती आणि शेवटचा लेख ‘कवितेतून सापडलेले ज. वि. पवार आणि प्रत्यक्ष सहवास अश्या अनेक लेखांचा सहभाग असणारी साहित्यकृती म्हणजे ‘आंधळ्या समाजाचे दोन डोळे’ ही होय. .पुस्तक हाती घेतल्यावर एका बैठकीत संपणारे वाटते. कारण पुस्तकाला एकूण ६४ पाने आहेत. पण प्रत्यक्ष वाचतांना जोडलेले संदर्भ सत्यता अनुभवा काही वेळ पुढील वाचनासाठी थांबावे लागते व मनन केल्याशिवाय पुढे सरकता येत नाही. आंबेडकरी चळवळीवरील निष्ठा, डाॅ. बाबासाहेबांबद्दलची आदरातून आलेली कृतज्ञता, समतेचे तत्वज्ञान अखिल विश्वाला देणारे बुद्ध, यांच्या विचाराला केंद्रस्थानी ठेऊन एकूणच पुस्तकाची निर्मिती झाली आहे. तरी प्रकाशित होऊन दोन वर्ष झाली असून हे पुस्तक दुर्लक्षित राहिल्या सारखे वाटते. लेखकाला पढील लिखाणाच्या शुभेच्छा. 

पुस्तकाचे नाव :- आंधळ्या शतकातील दोन डोळे

लेखक : वसंत वाघमारे

प्रकाशन : कोमल प्रकाशन (राजेंद्र बनसोडे)

किंमत:- ५० रुपये

प्रभाकर सुधाकर पवार

कल्याण जि. ठाणे

Next Post

हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का ? हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे.-डॉ.बाबासाहेब आंबेडकर

मंगळ मार्च 2 , 2021
सर्वाना समान संधी आणि समान अधिकार मिळावेत. माणसाच्या मूलभूत अधिकार मिळविण्यासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेकडिल काशी अर्थात नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करण्यात आला.भारतीय इतिहासात या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे!!. २ मार्च इ.स. १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक […]

YOU MAY LIKE ..