ऐका सत्य नारायणाची(आगळी) कथा sss

ऐका सत्य नारायणाची(आगळी) कथा sss
**********************
◆ दिवाकर शेजवळ ◆
divakarshejwal1@gmail.com

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑक्टोबर 1935 मध्ये येवला येथे धर्म परिवर्तनाची ऐतिहासिक घोषणा केली होती। अन समतानंद अनंत हरी गद्रे यांना जणू विजेचा शॉकच बसला होता। आपला हिंदू धर्म खरोखर इतका श्रेष्ठ असेल तर डॉ आंबेडकर यांच्यासारखे पूज्य महात्मे त्या धर्माला सोडून का जात आहेत, हा प्रश्न त्यांना छळू लागला होता। त्या अस्वस्थतेतून गद्रे यांनी अस्पृश्यासोबत सत्य नारायणाची महापूजा आणि सहभोजनाची चळवळ हाती घेतली। पण त्यांचा सत्य नारायण सर्वार्थाने वेगळा होता!

त्यांचा महापूजेचा तीर्थ प्रसाद दूध, तूप, साखरेच्या शिऱ्याऐवजी झुणका भाकरीचा असायचा। अन पूजेला बसलेल्या दलित दाम्पत्याचे पाय एका थाळीत घेऊन धुतले जायचे।मग ते पाणी तीर्थ म्हणून अनंत हरी गद्रे हे सपत्नीक प्राशन करायचे!

त्यावेळी ते सांगायचे: मी स्वतः जन्माने ब्राह्मण असल्याने माझ्या पोटातील अहंकाराचे पाप मारून टाकण्यासाठी अस्पृश्याच्या पायाचे तीर्थ प्राशन करतो। जाती जातीतील भेदभाव नष्ट होऊन सर्व समाजात समताभाव नांदो, अशी हरीजवळ शुद्ध मनाने प्रार्थना करतो। अस्पृश्याच्या पायाचे तीर्थ फक्त ब्राह्मणांनीच घ्यायचे आहे। कारण त्यांनीच पूर्वी सगळ्यांना आपल्या पायाचे तीर्थ पाजलेले आहे।

गद्रे यांना असे एक हजार आठ सत्य नारायण घालावेत, असे संत गाडगेबाबा यांनी सांगितले होते। पण त्यांनी मात्र शिवाशिवीचे भूत गाडून टाकण्यासाठी अस्पृश्य समाजासोबत साडेतीन हजारावर सत्य नारायण घातले होते।

पुढे 1950 च्या दशकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गावकीची पारंपारिक कामे सोडून देण्याचा आदेशच दलितांना दिला होता। स्वाभिमानाच्या त्यांच्या या लढाईला प्रतिसाद देत दलितांनी मृत जनावरांची मढी वाहून नेण्याचे, त्यावरील चामडे सोलायची कामे बंद केली होती। त्यातून गावोगावी रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होता। तो निवारण्यासाठी कोकणातील देवरुख येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि आप्पासाहेब पटवर्धन यांनी जातीभेद निरपेक्ष चर्मालय उभारले। जनावरांच्या चामड्याच्या वस्तू तयार करणारे ते चर्मालय पन्नास वर्षे आजही सुरू आहे। त्यासाठीची आपल्या कुटुंबाच्या मालकीची दोन एकर जमीन समतानंद अनंत हरी गद्रे यांनीच डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि पटवर्धन यांना दान केली होती।


बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बुद्धाचा धम्म स्वीकारून नागपूर येथे ऐतिहासिक धम्मक्रांती केली। त्यापूर्वी त्यांनी समतानंद गद्रे यांना भेटीसाठी आवर्जून बोलावून घेत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या होत्या। ‘तुमच्या प्रचारात बुद्धाच्या मानवतावादी तत्वज्ञानाचा समावेश करा’ असा संदेश गद्रे यांना बाबासाहेबांनी गद्रे यांना दिल्याची नोंद प्रबुद्ध भारतच्या 26 मे 1956 च्या अंकात सापडते। अन बाबासाहेबांनी स्वीकारलेला बुद्ध 1911 सालातच समतानंद यांच्या कीर्तन आख्यानात प्रकटलेला असतो, हे वाचून आपण चकित होतो। भानू काळे यांनी लिहिलेले गद्रे यांचे चरित्र डायमंड पब्लिकेशन्सने गेल्याच आठवड्यात प्रकाशित झाले आहे।

पत्रकारितेत सामाजिक बांधीलकीतून प्रदीर्घ कार्य केलेल्या पत्रकारांना गेली तीन दशके दरवर्षी मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे समतानंद अनंत हरी गद्रे पुरस्कार दिला जातो। 2018 सालात त्याचे मानकरी होण्याचे भाग्य मला लाभले। त्या पूर्वी तो पुरस्कार माधव गडकरी,रंगा वैद्य, यदुनाथ थत्ते, नारायण आठवले,दिनू रणदिवे यांच्यासारख्या नामवंत पत्रकारांना मिळालेला आहे।

Next Post

' मूकनायक' ची शताब्दी विद्यापीठ पातळीवर साजरी करा; गणराज्य अधिष्ठानची मागणी.

बुध जानेवारी 22 , 2020
‘ मूकनायक’ ची शताब्दी विद्यापीठ पातळीवर साजरी करा; गणराज्य अधिष्ठानची मागणी. ठाणे,दि 23 ( प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या जागृतीसाठी चालवलेल्या ‘ मूकनायक’ या पहिल्या पाक्षिकाची शताब्दी राज्य सरकारने विद्यापीठ पातळीवर साजरी करावी, अशी मागणी गणराज्य अधिष्ठानचे अध्यक्ष […]

YOU MAY LIKE ..