भाजपा शिवसेना हे डाकूंचे सरकार..!
– अड बाळासाहेब आंबेडकर
विरार ( प्रतिनिधी ) :- वंचितांची सत्ता येऊन घराणेशाही मिटली पाहिजे, घराणेशाही आहे तोपर्यंत लोकशाही वाढू शकत नाही, लोकशाहीचे कुटुंबीकरण झाले आहे म्हणून घराणेशाही संपविणे आणि लोकशाही वाचविणे ही आपली जबाबदारी राहिली पाहिली तसेच भाजपा शिवसेनेला वंचित बहुजन आघाडीचं हरवू शकते असा ठाम विश्वासही बाळासाहेब आंबेडकर यांनी विरार येथे व्यक्त केले. यावेळी उमेदवार सुरेश पाडवी, जिल्हाध्यक्ष गणेश प्रधान, जिल्हा उपाध्यक्ष प्रविण जाधव, विरार वसई अध्यक्ष मंगेश वाघमारे, वसई तालुका बौद्ध युवक संघाचे अध्यक्ष दत्तात्रेय धुळे, नरेश मोरे, सुरेश मंचेकर, श्रीधर साळवी, अमित खैरे, प्रकाश कांबळे, नितीन उबाळे, दिपक कदम, आत्माराम जाधव, दिलीप साळुंके, मनोज जाधव, दयानंद जाधव, प्रशांत तळगांवकर यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीचे पालघर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुरेश पाडवी यांच्या प्रचारार्थ विरार मनवेलपाडा येथे आयोजीत जाहीर सभेत ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा, नोट बंदी, काळा पैसा यांच्यावर सडकून टिका करुन, तुमचा खोटारडेपणा आता जगासमोर उघडा पडला आहे त्यामुळे तुम्ही कितीही निवडून येण्याच्या वल्गना केल्या तरी, मतदार राजा तुम्हाला धोबी पछाड केल्याशिवाय राहणार नाही, कारण लोकशाहीत मतदार राजाचं निर्णायक असतो असे आश्वासक वक्तव्ये त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की संविधानाने दिलेले आरक्षण, सवलती, अधिकार कोणीही काढून घेऊ शकणार नाहीत, सत्ता बदल झाला तर आपण केलेले सर्व घोटाळे बाहेर येतील म्हणून काही आदिवासी नेत्यांकडून वंचित बहुजन आघाडीबद्दल खोडसाळपणा चालू असल्याचा आरोप त्यांनी केला. वेगवेगळ्या पक्षात होणारा कोंडमारा आम्ही फोडण्याचे काम आम्ही केला असल्याने त्या सर्वांचा आम्हाला आतून पाठिंबा आहे, त्यामुळे सत्तेच्या तिजोरीची चावी आमच्या हाती देण्यासाठी सुरेश पाडवी यांच्या चावी निशाणीवर मतदान करा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.