ताराबाई शिंदे – स्त्री जातीचा हुंकार… काल आणि आज.

ताराबाई शिंदे – स्त्री जातीचा हुंकार… काल आणि आज.

  सत्यशोधक समाजाच्या तालमीत वाढलेल्या ताराबाई शिंदे 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना नामक छोटासा ग्रंथ लिहिला होता. ताराबाई शिंदे यांचे वडील बापूजी हरी शिंदे सत्यशोधक समाजाचे उपाध्यक्ष होते . ताराबाई यांच्या कुटुंबावर सत्यशोधक चळवळीच्या विचारांचा वारसा होता . बापूजी शिंदे यांनी आपली मुलगी ताराबाईचा बालविवाह केला होता. विधवा झाल्यावर ताराबाईंना पुनर्विवाह करू दिला नाही. सक्तीचे वैधव्य त्यांच्या वाट्याला आले .
ताराबाई शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वावर ‘स्त्रीपुरुष तुलना’ या पुस्तकातील विचारावर महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव आहे. स्त्रियांच्या दुर्बलतेला पुरुषाप्रमाणे धर्मग्रंथ कारणीभूत आहे.
स्त्रियांच्या दुर्बलतेला पुरुषाप्रमाणे धर्मग्रंथ कारणीभूत आहे. पुरुषसत्ताकतेबरोबरच धर्मग्रंथातील विरोधाभासाला सुरुंग लावण्याचे काम ताराबाईंनी केले आहे.ग्रंथाच्या सुरुवातीला ताराबाई म्हणतात की, ज्या परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली आहे त्याच परमेश्वराने स्त्री पुरुष निर्माण केले आहेत . मग पुरुषाच्या हिताचे सर्वकाही व स्त्री विरोधाचे असे काही परमेश्वर का निर्माण करीन? हा ग्रंथ मी स्त्री पुरुष तुलना म्हणून सादर करत आहे. कुठल्याही जातीशी याचा संबंध नाही. केवळ स्त्री-पुरुष तुलना आहे.19 व्या शतकामध्ये पुनर्विवाह न करण्याची चाल सर्वच जातीत मूळ धरू लागली होती.

         ताराबाई शिंदे

ब्राह्मणांप्रमाणे प्रभू, शेणवी मारवाडी, गुजराती, महाडिक या जातीत पुनर्विवाहस सक्त विरोध होता. बालविवाह होत त्यामुळे बाल विधवांना सक्तीचे वैधव्य त्यांच्या वाट्याला येत. ताराबाईच्या वाट्याला पण असे वैधव्य आले होते. अशा स्त्रियांना त्या गृहबंदीशाळेतील अबला म्हणतात!!
स्त्रियांच्या हातून काही चुकीचे घडले तर संपूर्ण स्त्रियांवर त्याचा रोष असतो. बालविधवा स्त्रियांना समाजामध्ये काडीचीही किंमत नसे. नवरा मेला की काळ तोंड करून त्यांना अंधाऱ्या खोलीत केसावरून वस्त्रा फिरवून घ्यावा लागतो. केशवपन केले म्हणून स्त्रियांच्या मनातील भावना मरतात का ? असा प्रश्न त्या करतात.एखाद्या पुरुषाची बायको मेली तर तो तिसऱ्याच दिवशी दुसरा विवाह करतो. धर्मग्रंथात पुनर्विवाहाची उदाहरणं आहेत. ताराबाई म्हणतात कुंतीचा पांडू बरोबर झालेला विवाह पुनर्विवाहच आहे.द्रौपदीला पाच नवरे असून द्रौपदी मनोमन करणाचा विचार करतच होती. रामाने वालीचा वध करून तारेचा विवाह सुग्रिवा बरोबर लावला होता. जेव्हा तारेने नकार दिला. तेव्हा राम म्हणाला की, तुझा विवाह सुग्रीव बरोबर झाला तरी तू पतिव्रता मानली जाशील. अशाप्रकारे धर्मातील खूळचट कल्पना, पुराणकथा यावर ताराबाई हल्ला करतात.धर्म ग्रंथ लिहिणारे शास्त्रीबुवा हेही पुरुष आहेत की , त्यांनी मुद्दाम लबाडी केली असावी. ताराबाई म्हणतात की, आम्ही स्त्रीयांनी का शास्त्रीबुवाचे घर कधीकाळी जाळले होते का? म्हणून आमच्यावर हा अन्याय केला !!
   स्त्री-पुरुष एकमेकांना पूरक व अपरिहार्य!!‘स्त्री पुरुष तुलना’ या ग्रंथात ताराबाईंनी एक विचार मांडला की, स्रीयाच पापी, दुर्वर्तनी आहेत का ? उच्चवर्णीय असो वा शूद्र वर्णीय स्त्रियांकडे अविश्वासाने पाहिले जाते. स्त्रिया या पापाच्या कुटिलतेच्या खाणी आहेत.अशी समज भारतामध्ये विकसित झाली आहे. स्त्री व पुरुष हे परमेश्वराने निर्माण केले आहे. तर दोघेही समानच आहेत . स्रीशिवाय कुटुंब म्हणजे स्मशान वाटते तसेच पतीशिवाय एखाद्या स्त्रीचे जीवन सुखमय असू शकत नाही. पशुपक्षापासून झाडाझुडपातही स्री जाती निर्माण केली आहे. प्रपंचाचे शेत तुम्ही एकटे नांगरू शकता का? असा खडा सवाल ताराबाई करतात.
स्त्रियांच्या दैन्य अवस्थेस पुरुषच जबाबदार!ताराबाई म्हणतात की, स्त्रियांची जी काही दुरावस्था आहे ती पुरूषांच्या अहंकारामुळे झाली आहे. स्त्रियांना अज्ञानात ठेवल्यामुळे तिची अवस्था अशी झाली आहे. अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवल्यामुळे अज्ञानात खितपत राहिली. अज्ञानामुळे अंधश्रद्धेत जीवन जगतात. पुरुषांच्या भूलथापांना बळी पडतात. पुरुषी अहंकाराने स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले.’स्त्री असो की पुरुष असो दुर्गुण ही असणारच ‘यासंदर्भात ताराबाई शिंदे लिहितात, “दुर्गुनापासून दुर्गुण उत्पन्न होतो. त्याचे काही कोठे शेतमळे नाहीत. तुम्ही स्वतः अनेक दुर्गुणांनी कडू वृंदावन वेला सारखे लगडलेले असून स्त्रियांवर ढकलतात ही तुमची मोठी कुशलता आहे.” ताराबाई शिंदे यांचे हे लेखन म्हणजे महात्मा फुले यांच्या विषमतेविरुद्ध च्या लढ्याला पूरक असे लिखाण आहे.
नवऱ्या आधी बायकोने मरावे ही खुळचट कल्पना!कोणत्या बाईला असे वाटेल की ,आपल्या नवर्‍याने आधी मरावे. कारण नवऱ्याच्या प्रीती पोटी म्हणा किंवा नवरा मेल्यावर आपल्या वाट्याला येणाऱ्या दुःखामुळे म्हणा असा विचार करू शकत नाही . नवरा कसाही असला तरी ती संसार करते. हिंदू धर्मामध्ये अशी कल्पना आहे की,
 नवऱ्या आधी बायकोने मरावे मृत्यु हा काही स्त्री किंवा पुरुषाच्या हातात नाही.स्त्रियांमध्ये अधिक दोष आहेत व पुरुषात कमी आहेत असेही काही नाही.स्रीयामध्ये जसे दोष आहेत तसे पुरुषामध्येही आहेत .किंबहुना पुरुषांमध्ये अधिक दोष आहेत असा विचार ताराबाई मांडतात. स्त्रिया म्हणजे अविचारी, स्त्रिया म्हणजे गोठ्यातील म्हशीप्रमाणे मूर्ख असा समज काढून टाकला पाहिजे. तुरुंगामध्ये स्त्रियांपेक्षा पुरुष अधिक असतात…कोणत्याही गुन्ह्यात पुरुषांची संख्या स्त्रियांच्या तुलनेत अधिक असते…स्त्रिया दारू पिऊन रस्त्यात लोळत नाहीत.. लुटारूंच्या टोळ्यात स्त्रीया नसतात…असे अनेक उदाहरणं देतात. ढोंगी साधूचे रूप पुरुष घेतात स्त्रिया नाहीत!
सक्तीचे वैधव्य भयंकर शिक्षा होती याचे ताराबाईंनी  विवेचन केले आहे. स्त्री-पुरुष तुलना हा ग्रंथ शंभर वर्षे उपेक्षित राहिला. ताराबाईचे लेखन म्हणजे तत्कालीन समाजाला हादरवून सोडणारे आहे . स्वतःसर्व प्रकारचे दुःख भोगले यामुळे त्यांच्या वेदना प्रत्येक शब्दात प्रतीत होतात… प्रत्येक स्त्री-पुरुषाने हा ग्रंथ वाचलाच पाहिजे…
स्वातंत्र्याची 70 बहात्तर वर्ष झाली. आधुनिक युगाची दीडशेपेक्षा अधिक वर्षे झाली तरी आजही बालविवाह होत आहेत. तसेच आजही काही जाती आहेत की त्या जातीत पुनर्विवाह होत नाही. विधवा स्त्रिया, परित्यक्त्या स्त्रिया यांची अवस्था आजही काही बदललेली नाही. धर्मव्यवस्थेने त्यांच्यावर घातलेली बंधने तशीच आहेत. समाजाची त्यांच्याबद्दलची मानसिकताही बदलत नाही. आपण स्त्रियांनी धर्मव्यवस्थेने आपल्यावर घातलेली बंधने झुगारून दिली पाहिजेत. आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या विधवा स्त्रिया, परित्यक्त्या स्त्रियानासुद्धा समाजामध्ये मानाचे ,प्रतिष्ठेचे स्थान मिळवून दिले पाहिजे. आपल्या घरी असलेल्या प्रत्येक शुभ कार्यामध्ये विधवा स्त्रियांना समाविष्ट करून घेतले पाहिजे. विधवा असल्यामुळेत्यांच्या स्त्रीत्वाच्या भावना काही मरत नाही. हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल.
     स्त्रीला स्वातंत्र्य दिल्यास समाजाचे संतुलन बिघडेल असा विचार आपण करू कसा शकतो? कारण स्त्रीला स्वातंत्र्य दिल्यास समाजाचा बिघडलेला तोल सांभाळला जाईल. तसेच समाजाची एक अंग लुळे पडले आहे त्यात नव्याने शक्ती संचारेल . समाजामध्ये स्थैर्य निर्माण होईल. स्त्रीला स्वातंत्र्य दिले तर स्वैराचार वाढेल हा विचार चुकीचा आहे. मला असं वाटतं की , हा शोध पुरुषांनी स्वतःच्या स्वातंत्र्यातून लावला काय ? स्रीची सर्जनशीलता अपत्यनिर्मितीपुरतीच मर्यादित न ठेवता तिला उमलण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे .येथे कुणाचा आवाज ,कोणाचे हसणे, कोणाचे जगणे बंदिस्त करता येणार नाही. स्त्रियांनीही अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्याचा उपयोग करून आपल्या भावना सक्षमपणे मांडल्या पाहिजेत. स्त्रीस्वातंत्र्य हा काही पुरूषाविरुद्धचा लढा नाही. तर स्त्रियांनाही पुरुषाबरोबर स्वाभिमानाने, सन्मानाने जगता यावेम्हणून एक लढाई आहे! स्त्री स्वातंत्र्याचा पुरुषांनी  व्यापक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे . स्त्रीला फक्त आपल्या पत्नीच्या रुपात न बघता स्त्री ही कुणाची तरी आई , बहीण , मुलगी आहे. स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले तर आपल्या आईला, बहिणीला ,मुलीलाही स्वातंत्र्य मिळेल या व्यापक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. स्त्री सक्षमीकरण हा शब्द प्रत्येकाच्या तोंडून उच्चारून उच्चारून गोलमटोल होत चालला आहे . त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. स्त्री सक्षमीकरण म्हणजे तरी काय तर महत्त्वाचे निर्णय स्त्रियांना घेता आले पाहिजे !
       स्त्रियांचे सक्षमीकरण झाले तर याचा फायदा समाजाला पर्यायाने राष्ट्राला होणार आहे.
 हा व्यापक विचार करण्याची आज गरज आहे. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, राष्ट्राची प्रगती ही स्त्रियांच्या प्रगतीवर अवलंबून असते. हाच विचार करून महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली होती.स्त्री म्हणजे वास्तव्य स्री म्हणजे मांगल्य स्री म्हणजे मातृत्व स्री म्हणजे कर्तुत्व…पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळाले आहे .गेल्या अनेक वर्षात स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचारात वाढच होत आहे. प्रत्यक्षात जी आकडेवारी आपल्याला दाखवली जाते त्यापेक्षा जास्त असावी .समाजाच्या भीतीपोटी अत्याचारित महिला, मुली समोर येत नाहीत.कौटुंबिक हिंसाचार, सामाजिक हिंसाचार ,स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या आहे तशाच आहेत .आजही हुंडा न दिल्यामुळे मुलींना जाळून मारणारे आहेत. तसेच विनयभंग,बलात्कार यासारख्या सामाजिक हिंसाचाराच्या घटना आजही घडतात .घटना घडून गेल्यावर गल्ली पासून दिल्ली हादरते. परंतु अशा घटना घडू नये यासाठी काही ठोस उपाय  योजता येत नाहीत.आणि कितीही ठोस उपाययोजना केल्या तरी जोपर्यंत समाजाची स्त्रियांकडे बघण्याची मानसिकता निकोप होत नाही तोपर्यंत सर्व उपाय निरर्थकच!
आजही ग्रामीण भागातील मुलीचे शिक्षण म्हणजे त्या गावात ज्या इयत्तेपर्यंत शाळा त्या इयत्तेपर्यंत आमच्या मुलींचे शिक्षण. सरकारने मुलीच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या योजना वगैरे केल्या आहेत .परंतु ती मुलगी आहे शिकून तरी काय करणार आहे. शेवटी नवऱ्याच्या घरी जायचे .मुलगी म्हणजे परक्याचं धन! ही मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मुलीची प्रगती होणार नाही.’जो करी पाप त्याच्या घरी मुली आपोआप’ असंही म्हटलं जातं .मुलगा झाल्याशिवाय त्या स्त्रीला प्रतिष्ठा मिळत नाही .अगदी उच्चशिक्षित घरातही हीच मानसिकता आहे. मुलगा नाही होत म्हणून दुसरे लग्न करणारे महाभाग आहेतच!
आजही स्त्रियांविषयी अनेक समस्या आहेत. गर्भलिंगनिदान, बालविवाह, स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण, स्त्रियांचे उच्च शिक्षणातील स्थान, स्त्रियांवरील वाढते अत्याचार, हुंडाबळी अशा अनेक समस्या आहेत. जोपर्यंत स्त्रिया सक्षमपणे याविरुद्ध आवाज उठवणार नाहीत , तोपर्यंत या समस्या आहे तशाच राहतील…मुलीला एक चांगली मुलगी म्हणून स्वतःला सिद्ध कराव लागत, चांगली पत्नी म्हणून ,बहीण म्हणून आई म्हणून …शिक्षण पूर्ण करून मोठ्या पदावर गेल्यावरही मी या पदासाठी योग्य आहे हेही सिद्ध कराव लागत.. काल-परवापर्यंत एक महिला अधिकाऱ्याला मी लष्करप्रमुख पदासाठी योग्य आहे हे सिद्ध कराव लागल… एवढ सर्व करूनही समाजाचे बोट तिच्याकडे असते .स्त्रियांकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला पाहिजे. हे सर्व सहजासहजी बदलणार नाही परंतु हे बदलण्यासाठी आपण सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे .
चला तर मग स्त्रियांकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन विकसित करू या!‘स्री पुरुष तुलना’ या ग्रंथाच्या शेवटी ताराबाई शिंदे म्हणतात की, माझे म्हणणे बरोबर आहे किंवा नाहीये तुम्ही जर खरे निपक्षपाती असाल तर पुरता विचार करून यात जे काही कमी-जास्त असेल ते निवडा. पण एरवी आपलीच बाणी राखण्याकरता जर पुढे घोडे ढकलले तर मात्र नाईलाज आहे!.स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, प्रगतीसाठी ,उत्कर्षासाठी पुरुषांनी स्त्रियांबरोबर उभे राहून लढा देण्याची गरज आहे.तरच खऱ्या अर्थाने स्त्रियांचे सक्षमीकरण होईलस्री पुरुष तुलना सर्व स्त्री-पुरुषांनी वाचावा असा ग्रंथ आहे. तरी सर्व बंधू-भगिनींनी हा ग्रंथ वाचावा.
 
श्रीमती मनीषा अनंता अंतरकर (जाधव) 7588850627 
अंबड,जालना.शिक्षिकाजिल्हा परिषद जालना

Next Post

कालिना कॅम्पसची साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विद्यानगरी करा!

गुरू जुलै 30 , 2020
कालिना कॅम्पसची साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विद्यानगरी करा! ■ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी ■ आंबेडकरी लोक संग्रामचे निवेदन ================= मुंबई,दि,३० जुलै २०२०: देशाच्या सीमा ओलांडून जगभरात पोहोचलेले महाराष्ट्राच्या मातीतील उत्तुंग साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दीची सांगता शनिवारी (१ऑगस्ट) होत […]

YOU MAY LIKE ..