“वारणेचा वाघ जर सिंहाच्या कळपात आला असता तर”.. ….
वाटेगाव , वारण्याचं खोरं आणि माटुंगा लेबर कॅम्प ह्याच माझं पहिल्यापासून नातं. माझं आजोळ कराड जवळ विंग, आईच्या आईच (आजीच) माहेर वाटेगाव. माझ्या आईच्या मामाला सगळे वाटेगावकरच म्हणायचे. लहानपणी बहुतेक वेळा आम्ही वाटेगावला जायचो. वारणा खोरे डोळे भरून पहायचो. त्यावेळी समजल कि इथे एक दरोडेखोर होता आणि तो गरिबांचा संरक्षक आणि आधारही होता. वारणेचा वाघ चित्रपट बघितल्यावर त्या वारणे खोऱ्यावर मी जास्तच प्रेम करू लागलो. नंतर चळवळीत काम करताना इतर साहित्य वाचू लागलो आणि त्या साहित्यात मला खरा वारणेचा वाघ भेटला.
‘मनात विचार येत होता हा माणूस आंबेडकर चळवळीतील इतिहासात का दिसत नाही? बाबांचा काळ आणि अण्णांचा काळ जवळ जवळ सारखाच होता.मी मूकनायक,बहीष्कृत भारत यांचे अंक, धनंजय किर, चांगदेव खैरमोडे ह्यांचं बाबासाहेबांचं चरित्र वाचुन काढलं, त्यावेळेचे लिखाण शोधू लागलो पण अण्णांचा संदर्भ मला कुठे दिसत नव्हता. मी अस्वस्थ होयचो, शोषितांची दुःख हा माणूस मांडताना बाबासाहेबांच्या चळवळीत सामील का झाला नाही?’
अण्णांचा वाटेगाव ते माटुंगा लेबर कॅम्प आणि नंतर कमुनिस्टांची चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि शेवटी एका चाळीतील छोटयाशा खोलीत आलेला मृत्यू. अण्णांचा पिंड खरा तर शायरी, प्रतिभा ठासून भरलेली, पण ह्या प्रतिभेला वाव भेटला तो माटुंगा लेबर कॅम्प मध्ये. आंबेडकरी चळवळीत बाबासाहेब हयात असतानाही आणि त्यांच्या मृत्यू नंतरही जलशाला खूप महत्व होत. त्याला सत्यशोधकी जलसे म्हणत. चळवळीचे विचार सर्व सामान्यापर्यंत पोहचवण्याचं काम ही मंडळी करीत असे. साधारण 1930 ते 32 ह्या कालावधीत अनेक जलसा मंडळे स्थापन झाली. आर .एच अढांगळे, के.के.साळवे, बनसोडे, केरुजी घेगडे,दीनानाथ भोसले, भीमराव कर्डक ह्या मंडळीचे जलसे प्रमुख होते. लेबर कॅम्प ही प्रामुख्याने कामगारांची वस्ती असल्याने कामुनिस्टांच इथे प्राबल्य होत. बहुतेक इथे राहणारा महार समाज हा कम्युनिस्ट पक्षाचे काम करत असे. लेबर कॅम्पच्या ह्याच वस्तीत आण्णा राहू लागले. ह्या कॅम्पच्या नाक्यावर इराण्याचं एक हॉटेल होत त्याच नाव “लेबर रेस्टोरंट” असं होत. ह्याच हॉटेलच्या बाजूला अण्णांची झोपडी होती. हा परिसर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गजबजलेला असे. बहुतेक जातीने महार आणि मातंग असेच कामगार इथे राहत होते. ( अजूनही तसंच आहे) अण्णा भाऊंची प्रतिभा ही उपजत होती. शायरी, तमाशा ह्यात त्यांचं बालपण गेलं होतं. एकदा लेबर कॅम्प मध्ये खूप मच्छर झाले आणि आण्णानी त्यावर एक पोवाडा लिहिला. हा पोवाडा त्यांनी गमतीने हॉटेल मधल्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना म्हणून दाखविला आणि अण्णांची कामगिरी सुरु झाली.
डफावर हात पडला, लेखणीला धार आली , अण्णांचे पोवाड्यांचा पहाडी आवाज कम्युनिस्टांच्या सभेतून महाराष्ट्राच्या कामगार वस्त्यांमध्ये मध्ये घुमू लागला. अण्णांची फक्कड लावणी “माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतीया कायली” ऐकून इथला कामगार गहिवरू लागला, हक्कासाठी पेटून उठू लागला. अण्णांची उठबस कम्युनिस्टांच्या वरच्या नेत्यांमध्ये होऊ लागली. अमृत श्रीपाद डांगे ह्यांनी हा मोहरा ओळखला, हे चलती नाणं त्यांनी आपल्या सभेसाठी आणि तळागाळातील कामगारांची ऊर्जा टिकवण्यासाठी , आपला पक्ष वाढवण्यासाठी वापरात आणलं. नंतरआण्णाना त्यांनी मास्को सफारीलाही पाठवलं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. आण्णा , अमर शेख, घागरे ह्यांच्या पोवाड्यानी लाखोच्या सभेतील माणसं पेटून उठु लागली. आण्णा शोषितांचे , दिन दुबळ्यांच्या व्यथा लेखणीतून आणि शायरीतुन मांडत होते. एकीकडे साहित्य आणि दुसरीकडे पोवाडे असा अण्णांचा प्रवास कम्युनिस्टांच्या कळपात सुरु होता. पण संपूर्ण दलित समाज त्यातल्या त्यात महार समाज बाबासाहेबांच्या पाठीशी उभा होता. बाबासाहेबांचा संघर्ष सर्व स्थरावर चालू होता. हा सिंह आख्या भारतात जातीयतेविरुद्ध गुरगुरत होता. बाबासाहेबाना आडकाठी करण्यासाठी काँग्रेस जीवाचं रान करीत होती. त्यात कम्युनिस्टही होतेच.
चळवळीत काम करताना आणि शिक्षण घेताना मी अण्णा भाउंच साहित्य वाचत होतो. फकिरा, माकडाची चाळ, अगदी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या संपूर्ण साहित्यात डोकवलो. भन्नाटच वाटत होत साहित्य. मनात विचार येत होता हा माणूस आंबेडकर चळवळीतील इतिहासात का दिसत नाही? बाबांचा काळ आणि अण्णांचा काळ जवळ जवळ सारखाच होता.मी मूकनायक,बहीष्कृत भारत यांचे अंक, धनंजय किर, चांगदेव खैरमोडे ह्यांचं बाबासाहेबांचं चरित्र वाचुन काढलं, त्यावेळेचे लिखाण शोधू लागलो पण अण्णांचा संदर्भ मला कुठे दिसत नव्हता. मी अस्वस्थ होयचो, शोषितांची दुःख हा माणूस मांडताना बाबासाहेबांच्या चळवळीत सामील का झाला नाही?
कामुनिस्टांच आणि बाबासाहेबांचं कधी पटायच नाही. बाबासाहेबाना काँग्रेसला थेट विरोध करता येत नव्हता म्हणून महारेतर इतर मागस्वर्गीय मंडळी त्यांच्या विरोधात उभी करण्याची घाणेरडी नीती काँग्रेस वापरत होती. बाबासाहेबांच्या त्यावेळच्या चळवळीत चर्मकार आणि मातंग जास्त प्रमाणात नसायचे. पण एक मात्र खरं की बाबासाहेबाना जर ह्या दोन्ही समाजाने त्यावेळीस साथ दिली असती तर ह्या देशाचा इतिहास वेगळाच आसता. कमुनिस्टांची मुंबईतील मक्तेदारी नंतर संपत आली. अण्णांना त्यांच्या स्वतःच्या जातीने म्हणजे मातंग समाजानेही कधीच विचारलं नाही. शेवटी शेवटी अण्णांना बाबासाहेब काय आहेत हे कळायला लागलं होतं. बाबासाहेब गेल्यानंतर त्यांनी एक गीत लिहलं “जग बदल घालुनी घाव । सांगून गेले मला भीमराव। आणि संपूर्ण महाराष्ट्रात आंबेडकरी जनतेनं आण्णाना अक्षरशः हृदयात बसवलं तेंव्हा कुठे त्यांच्या स्वकीयांना त्याच महत्व कळलं.
आण्णा ज्या कळपात वावरत होते तिथे वर्ग विरोधी लढाई चालू होती. हळू हळू कम्युनिस्ट पक्षाला उतरती कळा आली. अण्णांचं साहित्य ही दर्लक्षित होऊन बंद खोली मध्ये पडून राहील. शेवटचा काळ अगदीच भयानक होता हा थोर साहित्यक एकाकी पडून मृत्यू पावला…प्रतिभेला रंग, रूप , वर्ण ,वंश , लिंगभेद , जातपात नसतात,पण शल्य एकच आहे की “आण्णा भाऊ सारखा वाघ जर त्या सिंहाच्या(बाबांच्या) कळपात खेळून वाढला आसता तर आजचा इतिहास वेगळाच असता”
ह्या थोर साहित्य रत्नास त्रिवार अभिवादन..
…राजा गायकवाड तारांगण .कल्याण प .