रा.स्व.संघ २१/ संघाचे छ.शिवराय गोब्राह्मण प्रतिपालक आणि मुस्लीमद्वेष्टेच का?- प्रा. हरी नरके
⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛
बहुजनांचे महापुरूष पळवायचे, त्यांचे दैवतीकरण करायचे आणि त्यांना स्वत:च्या कब्ज्यात ठेवायचे, आपल्या फायद्यासाठी हत्त्यार म्हणून वापरायचे ही रा. स्व. संघाची कपटनिती आहे. महाराजांचा जन्म १६३० चा. शिवराय १६८० ला गेले. त्यांचा जीवनकाळ ५० वर्षांचा होता. या ३९० वर्षातली २६० वर्षे या मंडळींना शिवरायांची साधी आठवणसुद्धा का आली नाही? या मंडळींचे शिवरायांबद्दलचे प्रेम पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात तसे अचानकच का उद्भवले? गेल्या ५०/६० वर्षातच ते उतू का जाऊ लागले? संघाचे छ. शिवराय “गोब्राह्मण प्रतिपालक” का? “कुळवाडीभूषण” का नाहीत? ते मुस्लीमद्वेष्टेच का? संघाने महाराजांना अवतारी पुरूष का बनवलेय? संघाचे मनोहर भिडे त्यांचा उल्लेख “शिवप्रभू” असा का करतात? ३२ मण सोन्याचे सिंहासन, खडा पहारा या नावाखाली हजार बाराशे कोटी रूपयांचा ” एमबी [मनोहर भिडे] केयर्स फंड” त्यांना का जमवायचा आहे? रायगडावर त्यांना कब्जा का मिळवायचा आहे? यामागे मराठा तरूणांना संमोहित करण्याचा कोणता कट, कोणती कपटनिती आहे?
देवाचे पेटंट भटजीचे- ही तर रोजगार हमी-
यांचे एक वचन आहे. ” देव मंत्राधीन आहेत. म्हणजे आधी दगडाची किंवा शाडूची साधी मुर्ती असते. तिच्यात मंत्राद्वारे भटजी प्राण निर्माण करतो. विसर्जनाआधी ते पुन्हा काढून घेतो. मंत्र भटजीच्या ताब्यात असतात. अंतिमत: देवांवर मालकी कोणाची असते तर भटजीची.” म्हणून प्रत्येक महापुरूषाचा यांना देव करायचा असतो. त्याचा देव झाला की त्याचे पेटंट यांच्या नावे जमा होते. त्याची रॉयल्टी पिढ्यानुपिढ्या यांना मिळते. म्हणजे मानवनिर्मित देव ही यांची हजारो वर्षांची रोजगार हमी योजना आहे तर!
म
जातपात नाही मानत मग दलित शंकराचार्य का नाही? दलित सरसंघचालक का नाही?
एरवी बहुजनांच्या आरक्षणाला प्राणपणाने विरोध करणारे हे लोक भटजीची नियुक्ती मात्र जन्माच्या आरक्षणाद्वारे करण्याबद्दल आग्रही असतात. तिथे का गुणवत्तेवर नियुक्त्या नको असतात? या एकाच जातीला दिलेल्या १०० टक्के आरक्षणाबद्दल सगळेच गप्प कसे असतात? तिथे का सगळ्या हिंदुंना प्रवेश नाही? आजपर्यंत एकही ब्राह्मणेतर शंकराचार्य का झाला नाही? संघ जातपात मानत नाही तर आजपर्यंत किती सरसंघचालक अनुसुचित जातींचे झालेत? किमान एक तरी शूद्र या पदावर का बसला नाही? आजही संघाच्या पहिल्या श्रेणीच्या श्रेष्ठींमध्ये एकही शूद्र किंवा अतिशूद्र का नाही?
भिती दाखवण्यासाठी शत्रू हवा, म्हणून मुस्लीमद्वेश-
हिंदु संघटन करायचे तर भिती दाखवण्यासाठी शत्रू हवा. यांनी मुस्लीमांना शत्रू ठरवले. सतत मुस्लिम समाजाचा द्वेश करीत बोलायचे. लिहायचे. वागायचे. मुस्लीमद्वेश वगळला तर संघ संपला.यांचे शिवराय कट्टर मुस्लीमद्वेष्टेच का? याचे उत्तर यात आहे. भारतीय संस्कृती ही मुलत: गंगाजमुना तहजीब आहे. म्हणजे गंगा आणि यमुना या दोघींच्या एकत्रित पाण्यावर पोसलेली. या देशात हिंदु राजे महाराजे व मुस्लीम नबाब, सुलतान यात संघर्ष झाले, हे खरे आहे. पण ते धर्माचे नव्हे तर सत्तेचे संघर्ष होते. इथली सामान्य हिंदुमुस्लीम जनता गुण्यागोविंदाने नांदत होती. गावोगावी हिंदुलोक मुस्लीम पिरांच्या यात्रा करीत होते. पिराच्या पुजा करीत होते. कोकणात मुस्लीम लिगची स्थापना झाली तर ती गावच्या मारूतीला नारळ फोडून. [ संदर्भ- हमीद दलवाई]
सत्तेसाठी झालेल्या लढाया या धार्मिक लढाया नव्हत्या. म्हणून इंग्रजी राज्य यायच्याआधी या देशात कधीही हिंदुमुस्लीम जातीय दंगली झाल्या नाहीत. १८५७ चे स्वातंत्र्यसमर ते दोघे एकत्रितपणे लढले. इंग्रजांनी त्यांच्यात पद्धतशीरपणे फूट पाडली म्हणून आठशे वर्षांच्या इतिहासात ११ ऑगष्ट १८९३ ला भारतातली पहिली हिंदुमुस्लीम दंगल झाली. पुढे मुस्लीम लिगने घडवलेल्या दंगली व पाकीस्तानची निर्मिती यातनं कटुता वाढत गेली. पाकच्या कारवायांनी तर आता ही कटुता, द्वेशभावना, आकसभावना गु्णाकाराच्या वेगाने वाढते आहे.
गंगाजमुना तहजीब-
इथले संगित, खाणेपिणे, कपडेलत्ते, भाषा, साहित्य, कला, विद्या या सार्यांमध्ये सरमिसळ आहे. अगदी रक्तातसुद्धा. भांडारकर नावाच्या शास्त्रज्ञांनी १०० वर्षांपुर्वीच हे सिद्ध केलेले आहे की शुद्ध रक्त नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. हजारो, लाखो वर्षांच्या मानवी प्रवासात सगळ्यांचे रक्त एकमेकात मिसळलेले आहे. शुद्ध रक्ताच्या निव्वळ थापा आहेत.
एक हिंदू व दोन मुस्लीम सत्ता मिळून मुघलांशी का लढत होते?
आज महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांचे सरकार अस्तित्वात येण्यामागे ज्या पत्राचे सुत्र आहे, तिकडे आपले लक्ष वेधतो. पत्र शिवाजी राजांचे आहे. मार्च १६७७ मधले आहे. राज्याभिषेकानंतरच्या राजकारणावरचे आहे. मालोजीराजे घोरपडे यांना लिहिलेले आहे. महाराज पत्रात म्हणतात, “संप्रती राजकारण वर्तमान म्हणजे, दक्षिणेचे पातशहा तीन.निजामशाह, आदिलशहा, कुतुबशाहा. त्यातली निजामशाही बुडाली… पठाण [दिल्लीकर मुघल] बळावला म्हणजे एका उपरी एक दक्षिणीयांची घरे बुडविल. कोणास तगो देणार नाही. ऎसे आम्ही समजोन कुतुबशहा यांसी पहिलेपासून रूजुवात राखिली होती… आम्ही त्यांच्या भेटीस गेलो. या भेटीत असे ठरले की, “आपली पादशाही जितकी वाढवू तितकी वाढवणे. पठाणाची नेस्तनाबूत करणे. दक्षिणेची पादशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती राहे ते करावे.”
शिवाजी महाराजांचे हे पत्र हा सज्जड पुरावा आहे की लढाई हिंदुमुस्लीम अशी नव्हती. १ हिंदू आणि २ मुस्लीम सत्ताधिश एकत्र मिळून मुस्लीम असलेल्या मोगलांशी लढत होते. कारण लढाई धर्माची नाही तर सत्तेची होती.
क्रमश:….
प्रा.हरी नरके, ६/५/२०२०
संदर्भासाठी पाहा: दि. वि. काळे, छत्रपति शिवाजी महाराज, पुणे विद्यापीठ, पुणे, १९७१, पृ. २७१
संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR1wyrOJM-Z-vA7dsV47JiWtcD0MoB4SNG4ykT0bG9U1akS6hQtPCgm-Ybg