संयुक्त महाराष्ट्र लढा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर..

संयुक्त महाराष्ट्र लढा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
**************************************
गीतेश पवार,www.ambedkaree.com

भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतांच्या मागणीचा प्रश्न देशामध्ये जोर धरु लागला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषावार प्रांतांच्या निर्मितीचा प्रश्न लांबणीवर न टाकता त्यावर लवकर तोडगा काढण्याबाबत आपले विचार मांडले होते. तसेच त्यांनी असेही मत मांडले की, भाषेच्या आधारावर प्रांतांची पुनर्रचना करण्याची मागणी मान्य करताना घटनेत अशी तरतूद केली पाहिजे की, मध्यवर्ती सरकारच्या अधिकृत भाषेतील भाषा प्रत्येक प्रांताची अधिकृत भाषा असायला हवी.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषावार प्रांतरचनेला विरोध केलेला नाही, पण प्रत्येक प्रांताची भाषा जरी त्या प्रांताची अधिकृत भाषा असली तरी ती भाषा मध्यवर्ती सरकारच्या अधिकृत भाषापेक्षा वेगळी असू शकते, याला डॉ.आंबेडकर यांनी विरोध केला होता. भाषावार राज्यांची निर्मिती केल्यानंतर जर, प्रत्येक राज्याची (प्रांताची) भाषा त्या राज्याची अधिकृत भाषा करुन भाषावार प्रांत निर्माण केल्यास, काही कालावधीनंतर प्रांतीय राष्ट्रीयत्व निर्माण होण्यासाठी चळवळ उभी राहून अखंड भारताचा नाश होण्याचा धोका असल्याचे विचार बाबासाहेबांनी मांडले होते.

स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन होऊन ६० वर्षे होत असताना संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या लढ्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वाचे होते. परंतु महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्याच्या अगोदरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दि. ०६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले त्यांचे योगदान झाकोळले गेले.

१ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन ६० वर्षे होत आहेत. ०१ मे १९६० रोजी मराठी भाषिकांचे राज्य सहजासहजी अस्तित्वात आलेले नाही. मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाषावार प्रांतांच्या मागणी नुसार मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या भागाचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येणे अभिप्रेत होते. त्यासाठी मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या भागातील साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय आणि कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली. ह्या चळवळीतील महत्त्वाचे नेते सेनापती बापट, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, एस.एम.जोशी प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख, भाई उद्धवराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे होते. एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. अत्र्यांनी आपल्या मराठा या दैनिकात मुंबईसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्याला विरोध करणा-या लोकांवर आपल्या लेखणीतून प्रहार केला. शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर ह्या शाहीरानी आपल्या पोवाड्यातून लोकांच्या मनात मराठी अस्मिता जागृत करण्याचे काम केले.

महाराष्ट्र राज्यात मुंबई देण्याबाबतीत अनेक लोकांनी विरोध केला. कारण मुंबई ही भारताचे आर्थिक केंद्र बनले होते. मुंबई आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यामध्ये मराठी भाषिक लोकांप्रमाणे अभाषिक लोकांचे सुध्दा योगदान मोठे होते. अभाषिक लोकांनी मुंबई मध्ये उद्योगधंदे उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक भांडवल दिले होते. त्यामुळे भाषावार प्रांतांच्या मागणीचा प्रश्न महाराष्ट्रातही उभा राहिला तेव्हा अभाषिक लोकांनी मुंबईला महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यास विरोध केला. उद्योग-धंद्यात असलेल्या अभाषिक लोकांप्रमाणे देशाच्या राजकारणात असलेल्या लोकांना सुध्दा मुंबई महाराष्ट्र राज्यात नको होती. मुंबई महाराष्ट्र राज्यात नको ह्या साठी प्रयत्न करणा-या अभाषिक लोकांमध्ये गुजारातील लोक जास्त होते. मुंबई मध्ये असलेल्या उद्योग-धंद्यामध्ये सर्वात जास्त उद्योग गुजराती लोकांचे असल्यामुळे त्यांनी जास्त विरोध केला. त्यांना मुंबई केंद्रशासित किंवा गुजरात मध्ये समाविष्ट असावी असे वाटत होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महापरिनिर्वाणा अगोदर मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याबाबतीत अनेक महत्वाचे मुद्दे केंद्राच्या समोर ठेवण्याचे काम केले. भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्र प्रांताच्या संदर्भात मुंबईचे स्थान पुढील प्रमाणे सांगितले. महाराष्ट्र प्रांताची निर्मित झाल्यावर तो आकाराने त्रिकोणी असेल. या त्रिकोणाची एक बाजू भारताच्या पश्चिम किना-यांवरील उत्तरेकडील दमण आणि दक्षिणेकडील कारवार यांनी बनलेले असेल. गुजरात प्रंत दमण पासून सुरु होतो आणि उत्तर दिशेला पसरत जातो. कन्नड किंवा कर्नाटक प्रांत कारवारपासून सुरु होतो आणि दक्षिणेकडे पसरत जातो. गुजरातची सुरुवात दमणच्या दक्षिणेकडे 85 मैलांपासून सुरु होते आणि कर्नाटक प्रांताची सुरुवात कारवारच्या उत्तरेला 250 मैलांपासून सुरु होते. जर दमण आणि कारवारमधील सलग भाग भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्र प्रांताचा भाग असेल तर मुंबई महाराष्ट्राचा भाग न मानणे कसे शक्य आहेॽ
मुंबई आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात अभाषिक लोकांचे योगदान असल्याने जर, मुंबई केंद्रशासित करण्याचा किंवा महाराष्ट्र राज्यापासून वेगळे ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार असेल तर, मुंबई प्रमाणेच कलकत्ता हे शहर सुध्दा भारताच्या पूर्व भागातील मुख्य बाजारपेठ आहे. मुंबईतील महाराष्ट्रीयन लोकांप्रमाणेच कलकत्त्यातील बंगाली लोकांकडे व्यापार आणि उद्योगाची मालकी नाही. मुंबईतील महाराष्ट्रीयनांच्या परिस्थितीपेक्षा कलकत्त्यातील बंगाली लोंकाची परिस्थिती अधिक वाईट, कारण महाराष्ट्रीयन लोक मुंबईतील व्यापार आणि उद्योगासाठी भांडवल नाही तरी कामगार पुरवत आहे, असा निदान दावा करु शकतात पण बंगाली लोक हे ही म्हणून शकत नाहीत. जर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा प्रस्ताव कमिशनने स्वीकारला तर पश्चिम बंगालकडून कलकत्त्याला वेगळे करण्याचा समान प्रस्ताव ठेवण्याची तयारी ठेवावी. अशा पध्दतीचे मुद्द्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले होते.

१ नोव्हेंबर १९५६ ला केंद्राने सौराष्ट्र, गुजरात,मराठवाडा, विदर्भ व मुंबई ह्या प्रांताचा मराठी प्रदेश मिळून (परंतु बेळगाव-कारवार वगळून) द्विभाषिक राज्य स्थापन केले. परंतू या द्विभाषिक राज्याला महाराष्ट्र व गुजरात ह्या ठिकाणी कडाडून विरोध झाला. द्वैभाषिकाची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याने गुजरात राज्याला १० कोटी द्यायचे व पुढील ४ वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली. तसेच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असल्याचा दावा गुजराती भाषिक करत असल्याने, ‘व्याज’ म्हणून एकूण ५० कोटी देऊन मुंबई महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यात आली व राज्याची स्थापना १९६० सालच्या कामगारदिनी म्हणजे १ मे १९६० रोजी झाली.
(प्रस्तुत लेखक मुंबई महानगरपालिकेच्या कामगार संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.)

Next Post

आम्ही कुठे उभे आहोत ?

शनी मे 2 , 2020
आम्ही कुठे उभे आहोत? ************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com महाराष्ट्राने 60 वा वर्धापन दिन आज साजरा केला। हे मराठी राज्य साकारणाऱ्या घनघोर संघर्षाचा इतिहास आठवताना त्या लढ्यातील नेमके डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याच योगदानाचे सगळ्यांना विस्मरण कसे होते, अशी खंत फुले-आंबेडकरी […]

YOU MAY LIKE ..