राष्टपिता महात्मा जोतिबा फुले यांना विनम्र अभिवादन..!

 

वरील सचित्र रेखाटले आहे विनोद पवार ,कल्याण प  यांनी महत्मा फुले यांचे  त्यांच्या जयंती निमित्त

The Pioneers of WOMEN’s Education in India…
One of the most important figures of the Social Reform Movement in India…Let’s Salute this Legend !
on his Birth Anniversary…
Happy Mahatma Jyotiba Phule Jayanti To All

स्त्री पुरुष असमानतेच्या विरोधात दंड थोपटून मनुवाद्यांच्या पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढून भारतभूमीला समानता शिकवणारे महागुरू राष्ट्रपिता ज्योतीराव फुले यांची आज(११ फ) जयंती निमित्य लाख लाख शुभेच्या !!

१९ व्या शतकाचा शेवटचा कालखंड; धर्मसुधारणा, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींचा काळ ! या काळात काहीशा वेगाने सामाजिक बदलांची प्रक्रिया घडत होती. या चळवळींचे नेतृत्व सखोल चिंतन करणार्‍या, समाजहित जपणार्‍या व धडक कृतीशील असणार्‍या महात्मा फुले यांच्याकडे होते. शिक्षण व समता या दोन शब्दांत त्यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांमध्ये केलेल्या सामाजिक कार्याची मूळ प्रेरणा स्पष्ट होते.
महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्म १८२७ साली झाला. त्या वेळी संपूर्ण भारतात बहुजन समाज अंध:कारात चाचपडत होता. अज्ञान, अंधश्रद्धा व अस्पृश्यता यांचे भयंकर चटके सोसत होता. स्त्री आणि (तत्कालीन) अस्पृश्य समाज हे या समाजव्यवस्थेतील सर्वाधिक उपेक्षित घटक होते. त्यामुळेच स्त्रीशिक्षण व अस्पृश्योद्धार हे त्यांचे जणू जीवितकार्यच झाले. त्या वेळच्या स्त्रिया ह्या शिक्षण नसल्यामुळे स्वत:ची मूळ अस्मिताच हरवून बसल्या होत्या. या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता होती. मुळात समाजोद्धारासाठी शिक्षण हेच प्रमुख अस्त्र आहे हे ज्योतिरावांनी ओळखले. एक स्त्री सुशिक्षित म्हणजे पुढच्या सर्व पिढ्या सुशिक्षित हे समीकरण त्यांनी जाणले व या पवित्र कार्याची सुरुवात आपल्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांनी केली. १८४८ साली हिंदुस्थानातील पहिली मुलींची शाळा पुणे येथे त्यांनी सुरू केली. त्यांनी व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, लोकविरोधाला उत्तर देत १८५१ ,१८५२ साली व पुढील काळात अनेक कन्या शाळा सुरू केल्या.
स्त्रियांना सबला बनविण्यासाठी, स्त्रीउद्धारासाठी त्यांनी बालविवाह, कुमारीविवाह, विधवांचे केशवपन या परंपरांना प्रचंड विरोध केला. या परंपरांच्या विरोधात जाऊन त्यांनी १८६४ साली पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला. ही एक क्रांतिकारक अशी घटना होती. त्याचबरोबर त्यांनी केशवपनाच्या विरोधी आंदोलन करून नाभिकांचा अभिनव असा संप घडवून आणला. पण तरीही पुनर्विवाह समाजाला पचणे अवघड होते. एखाद्या विधवेला दुर्दैवी परिस्थितीत संतती झाल्यास त्या विधवेस भ्रूणहत्या किंवा आत्महत्येशिवाय पर्याय राहत नसे. ही समस्या ओळखून त्यांनी १८६३ साली पुण्यात पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह उघडले. त्यांनी याच प्रतिबंधक गृहातील एक मुलगा दत्तक घेतला. यावरूनच त्यांचे स्त्रीविषयक विचार किती आधुनिक व पुरोगामी होते हे स्पष्ट होते. आजच्या समाजाचे स्त्रीविषयक विचार, दृष्टीकोन पाहता त्यांचे द्रष्टेपण लक्षात येते.
स्त्री उद्धाराबरोबरच अस्पृश्योद्धार व अस्पृश्यता निर्मूलन हा त्यांचा ध्यास होता. त्या वेळीचा अस्पृश्य समाज हा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक हक्कांपासून वंचित होता. त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या प्राथमिक मानवी हक्कांच्या प्राप्तीसाठी ते सामाजिक समता चळवळीचे आद्य प्रवर्तक बनले. १८५२ साली त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढली. अस्पृश्यांसाठी त्यांनी पाण्याचा हौद खुला केला. गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब या ग्रंथांतून त्यांनी जातिव्यवस्थेवर प्रहार केला. अस्पृश्य समाजामध्ये आमिविश्र्वास निर्माण होण्यासाठी, समस्यांची जाणीव निर्माण होऊन विकासाकडे वाटचाल होण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची इ.स. १८७३ मध्ये पुणे येथे स्थापना केली. या संस्थेच्या स्थापनेतून त्यांनी बहुजन समाजाच्या विकासाचे बीज रोवले.
सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून काही तत्त्वांचा प्रसार त्यांनी केला. ‘ईश्र्वर एकच व निर्गुण-निराकार आहे. ईश्र्वराच्या भक्तीसाठी कोणालाही कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. धार्मिक कर्मकांडावर विश्र्वास ठेवू नका.’ हे विचार बहुजनांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांनी `ईश्वर’ नव्हे, तर `निर्मिक’ असाच शब्द नेहमी वापरला. राजर्षी शाहू महाराजांना प्रेरणा मिळाली ती महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांतूनच ! महात्मा फुलेंना गुरू मानत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन विकासाची चळवळ पुढे नेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर व कार्यावर महात्मा फुले यांचाच प्रभाव होता.
भारत देश हा कृषिप्रधान आहे आणि तरीही येथील शेतकरी अज्ञानी, कर्जबाजारी, दरिद्री, मागासलेला असा होता (आहे). यामुळेच या समस्या लक्षात घेऊन शेतकर्‍यांची बाजू मांडण्यास आणि त्यांचे संघटन करण्यास महात्मा फुले यांनी सुरुवात केली. शेतकरी, शेतमजूर यांच्या हालाखीच्या परिस्थितीचे त्यांनी ’शेतकर्‍यांचा आसूड’ या ग्रंथात वर्णन केले आणि या ठिकाणी शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही भूमिका परखडपणे मांडली. तसेच शेतकर्‍यांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षण मिळावे, वार्षिक कृषी प्रदर्शन भरवले जावे, पाणीपुरवठ्यासाठी तलाव-विहिरी-धरणे बांधावीत, पीकसंरक्षणासाठी बंदुक परवाने मिळावेत या मागण्यांचा पाठपुरावा केला. १८८८ साली त्यांनी ड्यूक ऑफ कॅनॉटसमोर भारतीय शेतकर्‍यांच्या वेषात शेतकर्‍यांचे प्रतिनिधित्व केले. शेतकर्‍यांच्या समस्या व त्या अनुषंगाने त्यावरील पर्यायी योजनांची बाजू मांडली.
महात्मा फुले यांनी असंघटित कामगारांच्या समस्यांचाही विचार केला होता. कामगार संघटक नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८८४ मध्ये मुंबईत गिरणी कामगारांची संघटना स्थापन केली. लोखंडे यांनी महात्मा फुले यांच्या प्रेरणेतून ही संघटना स्थापन केली होती. हीच भारतातील पहिली कामगार संघटना मानली जाते. महात्मा फुले काही काळ पुणे नगरपालिकेचे सदस्यही होते. त्यांच्या चळवळीचे केंद्र पुणे हेच होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीचा जिर्णोद्धार महात्मा फुले यांनी केल्याचा उल्लेख त्यांच्याविषयीच्या लेखनात सापडतो.
महात्मा फुले हे उत्कृष्ट लेखकही होते. त्यांनी आपल्या लेखनातूनही सुधारणाविषयक विचारच समाजासमोर ठेवले. त्यांनी तृतीय रत्न (नाटक), छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, सार्वजनिक सत्यधर्म (ग्रंथ) या लेखनाबरोबरच ’अखंड’ (काव्य) रचनाही केली. (महात्मा फुले यांनी लिहिलेल्या अन्य पुस्तकांचा उल्लेख वरील मजकुरात आला आहे.)
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
या रचनेतून त्यांची निरीक्षणशक्ती, नेमकी जाणीव व प्रतिभा स्पष्ट होते.
पीढीजात चालत आलेल्या अमानवी अशा धार्मिक रूढी व परंपरा बंद झाल्याशिवाय समाजामध्ये परिवर्तन होणार नाही हे त्यांनी ओळखले होते. सामाजिक सुधारणांसाठी व्यापक योगदान देऊन, आपल्या मानवतावादी भूमिकेतून वंचित आणि उपेक्षित घटकांना मुख्य समाजप्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महात्मा फुले यांनी केले. आजच्या आधुनिक भारतातील समाजात झालेल्या सामाजिक सुधारणांचे मूळ हे महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्यातच आहे.
`निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’
हा त्यांचा सत्यधर्माचा व मानवताधर्माचा संदेश आजही अनुकरणीय ठरतो.

महात्मा जोतिबा फुले यांचा जिवनपट:-

इ.स. ११ एप्रिल १८२७ – जन्म.
इ.स. १८३४ ते १८३८ – पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.
इ.स. १८४० – सावित्रीबाईंशी विवाह.
इ.स. १८४१ ते १८४७ – स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
इ.स. १८४७ – थॉमस पेन यांच्या ‘राईट ऑफ मॅन’ या ग्रंथाचा अभ्यास.
इ.स. १८४८ – मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
इ.स. १८४८ – भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
इ.स. १८४९ – वरील कारणांमुळे वडिलांशी मतभेद व गृहत्याग
सप्टेंबर ७, इ.स. १८५१ – भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
इ.स. १८५२ – पूना लायब्ररीची स्थापना.
मार्च १५, इ.स. १८५२ – वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
नोहेंबर १६, इ.स. १८५२ – मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
इ.स. १८५३ – ‘दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स’ स्थापन केली.
इ.स. १८५४ – स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी
इ.स. १८५५ – ‘तृतीयरत्न’ नाटकाचे लेखन.
इ.स. १८५५ – रात्रशाळेची सुरुवात केली.
इ.स. १८५६ – जोतीबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
इ.स. १८५८ – शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
इ.स. १८६० – विधवा पुनर्विवाहास साहाय्य केले.
इ.स. १८६३ – बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
इ.स. १८६५ – विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
इ.स. १८६४ – गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
इ.स. १८६८ – वडील गोविंदराव यांचा मृत्यू
इ.स. १८६८ – दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
इ.स. १८७३ – ‘गुलामगिरी’ ची लेखन
इ.स. १८७३ – सत्यशोधक समाजची स्थापना केली.
इ.स. १८७५ – शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
इ.स. १८७६ ते १८८२ – पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
इ.स. १८८० – दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
इ.स. १८८० – नारायण मेघाजी लोखंडे यांना ‘मिलहॅण्ड असोसिएशन’ या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
इ.स. १८८२ – ‘विल्यम हंटर शिक्षण आयोगा’ समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
इ.स. १८८३ – ‘शेतकऱ्याचा आसूड’चे लेखन
इ.स. १८८७ – सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
इ.स. १८८८ – मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून ‘महात्मा’ ही पदवी प्रदान केली.
२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० – पुणे येथे महापरिनिर्वाण झाले.

Next Post

आंबेडकरी साहित्यकारांचा सन्मान....!

बुध एप्रिल 11 , 2018
आंबेडकरी जेष्ठ साहित्यिक अन दलित पॅथर  चे एक लढवय्ये संस्थापक,भारिप बहुजन महासंघाचे नेते मा. ज.वि.पवारांचा सन्मान….! “तु झालास मुक समाजाचा नायक ” हि माहामानवांना  उद्देशुन लिहिलेली कविता यंदाच्या दहावीच्या कुमारभारतीत समाविष्ठ झालीय. ज.वि.पवारांनी आंबेडकरी चळवळिवर अन महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अन चळवळीवर […]
आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते मा.ज वी पवार यांचा गौरवग्रंथ

YOU MAY LIKE ..