‘मूकनायक’चे वंशज
———————-
◆ दिवाकर शेजवळ ◆
divakarshejwal1@gmail.com
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या ‘मूकनायक’ या पाक्षिकाची शताब्दी यंदा साजरी होत आहे. नवी मुंबईतील खारघर येथील सत्त्याग्रह महाविद्यालयाचा वार्षिक महोत्सव 10,11,12 फेब्रुवारीला सीबीडी बेलापूरच्या अर्बन हट येथे पार पडला. त्यात पहिल्याच दिवशी त्या महाविद्यालयाचे संस्थापक -प्राचार्य प्रा डॉ जी के डोंगरगावकर यांनी काही पत्रकारांना सत्याग्रही पत्रकार पुरस्कार देऊन गौरव केला. मुंबईनंतर नवी मुंबईत झालेला मूकनायकच्या शताब्दीचा हा दुसरा शानदार समारंभ ठरला. त्यापूर्वी 31 जानेवारीला मुंबई मराठी पत्रकार संघ आणि राजस्थानातील जयपूर येथून प्रकाशित होणाऱ्या ‘प्रभात पोस्ट’ या साप्ताहिकाने मुंबईत शताब्दीचा दिमाखदार सोहळा पार पाडला होता.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत अशी नियतकालिके अस्पृश्य समाजाच्या जागृतीसाठी चालवली. प्रबुद्ध भारतासाठी तर त्यांनी दादरच्या ‘आंबेडकर भवन’ नजीक स्वतःचा बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेससुध्दा थाटला होता. त्या ऐतिहासिक छापंखान्याची सूत्रे गेली बरीच वर्षे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हाती आहेत. त्यांच्याच हस्ते नवी मुंबईत सत्त्याग्रही पत्रकार पुरस्कार देण्यात आले,ही गोष्ट मानकरी पत्रकारांसाठी अभिमान वृद्धिंगत करणारी ठरली.
रा सो नलावडे –
सत्याग्रह महाविद्यालयाच्या
मूकनायक शताब्दी सोहळ्यातील एक मानकरी होते रा सो नलावडे. उपेक्षेमुळे अमृत महोत्सव साजरा न झालेले नलावडे हे 1980 च्या दशकाच्या प्रारंभी नियमित प्रकाशित होणाऱ्या ‘आम्रपाली’ पाक्षिकाचे संचालक -संपादक. त्याला चार दशके उलटून गेल्याने त्यांचे आणि त्यांच्या साप्ताहिकाचे नाव तसे विस्मृतीच्या पडद्याआड गेलेले आहे. पण सत्त्याग्रह महाविद्यालयाचे संस्थापक -प्राचार्य प्रा डॉ जी के डोंगरगावकर यांच्यामुळे रा सो नलावडे आणि त्यांच्या ‘आम्रपाली’ वर प्रकाशझोत पडला. उपेक्षित समाजासाठी नियतकालिक चालवण्याचे दिव्य नलावडे यांनी एकेकाळी केले होते. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांचा गौरव केला, अशी भावना डॉ डोंगरगावकर यांनी व्यक्त केली.
1978 सालात मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न उभा राहिल्यानंतर ‘बरखास्त’ दलित पँथरला संजीवनी मिळाली होती. अन 1979 सालात नामांतरासाठी निघालेल्या नागपूर ते औरंगाबाद या लॉंगमार्चमुळे गटबाजी आणि बेकीला ठेचून काढणारे चैतन्य आणि नवी ऊर्जा आंबेडकरी चळवळीत संचारली होती. त्या काळात नागपूर येथून साप्ताहिक ‘जयभीम’ आणि मुंबईतून पाक्षिक ‘आम्रपाली’ प्रकाशित व्हायचे. दलित मुक्ती सेनेत सक्रिय असताना मी त्यावेळी चळवळीवर त्या नियतकालिकांतून आणि नवशक्तीसारख्या वृत्तपत्रातून सतत लिहीत होतो.
रा सो नलावडे यांचा विक्रोळीच्या टागोर नगरमधील राहत्या घराच्या पुढील भागात आम्रपालीचा स्वतःचा छापखाना होता. तिथे खिळे जुळवून ते पाक्षिक प्रसिद्ध व्हायचे.नलावडे हे त्याचे फक्त मालक,संचालकच नव्हते. तर, प्रेस कामगार, संपादक, वितरक हे सारे काम तेच करायचे. सी एस टि पासून ते अंबरनाथ, कर्जत आणि चर्चगेटपासून ते बोरीवली पर्यंत प्रत्येक रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून उतरून स्टेशनवरील आणि बाहेरील दोन्ही बाजूंकडे पेपर स्टॉलवर अंक देताना ते हमखास भेटायचे. स्टॉलवर झलकलेला अंक नवीन आलाय, हे आपल्या वाचकाला कळावे, यासाठी नलावडे यांनी एक साधी सोपी युक्ती योजली होती. अंक रंगीत मुळीच नसायचा.पण आम्रपाली हे नाव रिवर्स असायचे. त्या नावामागील रंग ते दर अंकाला न चुकता बदलायचे.
माझ्यासहित सध्याचे प्रख्यात समीक्षक मोतीराम कटारे, विशु काकडे, दिलीप हजारे, कवी वैभव काळखैर अशा त्या काळातील अनेक नवोदित साहित्यिक, पत्रकारांना नलावडे यांनी आम्रपालीतून संधी-प्रसिद्धी दिली होती. शिवाय, ते दलितांचे एकमेव लोकप्रिय पाक्षिक असल्याने अनेक नामवंत साहित्यिकही त्यातून लिहीत असत.
आर्थिक झळ सोसत आणि ट्रेनमधून थैली-झोळीतून अंकाचे वजनदार गठ्ठे वाहत
त्याचे वितरण करणारा हा संपादक आजच्या काळात किती जणांना ठाऊक आहे ? सत्याग्रह महाविद्यालयाने 10 फेब्रुवारीला मूकनायकच्या शताब्दी निमित्त दिलेला पुरस्कार नलावडे यांच्यासाठी पहिलाच ठरला आहे.
राजकुमार मल्होत्रा
——————
‘प्रभात पोस्ट’ हे जयपूर येथून प्रकाशित होणारे राजस्थानातील आंबेडकरी विचारांचे एक साप्ताहिक. राजकुमार मल्होत्रा हे त्याचे संचालक आणि संपादक. मूकनायक बाबासाहेबांनी महाराष्ट्रात चालवला. त्यामुळे आपल्या प्रभात पोस्ट तर्फे मुकनायकचा शताब्दी सोहळा महाराष्ट्राच्या राजधानीत पार पडावा, असा चंग बांधूनच ते जानेवारीत मुंबईत आलेले. दिवसभर कार्यक्रमाच्या तयारीसाठी वणवण फिरायचे आणि रात्री कांदिवली येथील कुठल्या एका बुद्ध विहारात मुक्कामाला जायचे, असा तब्बल 15 दिवस त्यांचा दिनक्रम होता.
राजस्थानातून एका साप्ताहिकाचा कोणी संपादक मूकनायकच्या शताब्दीचा ध्यास घेऊन मुंबईत तळ ठोकतो
आणि सन्मान सोहळ्याची निमंत्रणे देत साहित्यिक, विचारवन्त, पत्रकार, कलावन्त, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना घरोघरी जाऊन गाठतो.
हे चित्र पाहून कोणाला स्वस्थ बसून राहावेसे वाटेल?
शुक्रवारी 31 जानेवारीला मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडलेल्या मूकनायक शताब्दी सोहळ्याच्या तयारीत बऱ्याच जणांना तसेच ओढले होते. त्यात मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र विश्वनाथराव वाबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह बाहेरील असंख्य लोक होते. त्यात नामवंत साहित्यिक प्रा दामोदर मोरेसर यांचे सुपुत्र अभिजित मोरे,स्नुषा अमृता लोखंडे, ज वि पवार, त्यांचे सुपुत्र तेजविल, ऍड प्रदीप जगताप, आयकर खात्यातून निवृत्त झालेले दिलीप हिरे, रेल्वेतून निवृत्त झालेले सुशील पगारे अशा अनेकांनी परिश्रम घेत राजकुमार मल्होत्रा यांना साथ देऊन मूकनायकचा शताब्दी सोहळा यशस्वी केला.